Saturday, November 25, 2023

छगन भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते : महादेव जानकर

 छगन भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते : महादेव जानकर
दोड्डी बुद्रुक येथे महादेव जानकर यांचे  नोटांचा हार घालून स्वागत केले. यावेळी सुदर्शन उगले व ग्रामस्थ.

नाशिक, दोंडोरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

नाशिक (१४/१०/२३) यशवंत नायक ब्यूरो : 

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणं हे चूक आहे. ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते आहेत. भुजबळ आमचे दैवत असून असं काही होत असल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही. माझं आवाहन आहे की, अशा धमकी देऊ नका, हे योग्य नाही.  छगन भुजबळांच्या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा रासपचे महादेव जानकर यांनी दिला. 


राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर जन स्वराज यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर जनस्वराज्य यात्रा सुरू केली असून, ही यात्रा कुणाला विरोध करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी काढली असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले. आज सकाळी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात  दर्शन घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करत संबंधितांना सज्जड दमच दिला आहे. छगन भुजबळ यांच्या मागे लागू नका, आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा जानकर यांनी दिला. 

महादेव जानकर यावेळी म्हणाले की, मराठ्यांना, धनगरांना, आदिवासींना आरक्षण  मिळाले पाहिजे, ही माझ्यासह अनेकांची भूमिका आहे. मात्र याआधी काँग्रेसने खेळवत ठेवलं, आता भाजप तेच करतं आहे. भाजप काँग्रेससारखे वागत असून आरक्षणासाठी लोकसभेत बील पास केले पाहिजे. यातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी जानकर यांनी केली.  एकीकडे भाजपने धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन द्यायचे, तर कोर्टात वनवासीच्या मार्फत याचिका दाखल करून धनगर समाजाला आरक्षण मिळू नये याचा बंदोबस्त करायचा, अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला. कुठल्याही जातीत भेदभाव न करता सगळ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका जानकर यांनी मांडली. 

 राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील अडीच महिन्यापासून जन स्वराज यात्रेचा दौरा सुरू आहे. अनेक राज्यात आम्ही गेलो, जाणार आहे. जनतेचे राज्य आले पाहिजे, सगळे पक्ष साथ देत आहे, जन स्वराज यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे जानकर म्हणाले. यावेळी महादेव जानकर यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव राजेंद्र पोथारे, नवनाथ शिंदे, विलास पलंगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025