राजाबळी, राणी विंध्यावली आणि नवरात्र, दसरा, दिवाळी
"बाणासुराने आपल्या सर्व धनाची मोजदाद करून अश्विन वैद्य त्रयोदशी धनपूजा केली. बाणासुराने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावस्येस आपल्या सर्व सरदारांना उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्या. नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या सरदराना योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन आपआपल्या मुलखी जाण्याचा हुकूम दिला. यावरून येथील एकंदर सर्व अबालवृद्ध स्त्रियास जो काय आनंद झाला की, त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयेस आपआपल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यावर स्त्रियांनी (रणांगणावरून परतलेल्या) पुरुषांना ओवाळून 'इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो' असे म्हणून राजा बळीची आठवण केली. त्यावेळेपासूनच आज दिवसपावेतो दरवर्षी दिपवाळीत भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवांना येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशीर्वाद देत नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले समग्र वाड्मय गुलामगिरीमध्ये राजा बळीच्या आठवणीसाठी दिवाळी साजरी केली जाते, हे स्पष्ट करतात. बाणासुर कोण होता?; बाणासूर राजा बळीचा पुत्र होता. राजा बळी कोण होता ? प्रल्हादाचा नातू तर हिरण्यकश्यपूचा पणतू होता. प्रल्हादाचा मुलगा विरोचन होता. विरोचनाचा मुलगा राजा बळी होता. हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा पिता होता. हिरणाकक्ष आणि हिरण्यकप्यू यांनी इराणमधून आर्य- ब्राह्मण टोळीविरुद्ध लढा दिला होता. तत्पूर्वी, शंकासुराने इराणी लोकाविरुद्ध लढाया केल्या होत्या. बिरोबा, ज्योतिबा, खंडोबा, म्हसोबा कोण होते? हे सर्व राजा बळीचे सरदार होते. महात्मा फुले आपल्या ग्रंथात लिहितात, याजकरिता एकंदर सर्व मराठ्यांनी हर एक शुभकार्य सुरू करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याची सोडले नाही. त्यांनी त्या संस्कारात बिरोबा, धुळोबा, ज्योतिबा, खंडोबास दैवत मानून त्यांची नावाचे चांगभल बोलून 'तळी' उचलू लागले. (भंडारा, खोबरे पानाचा विडा तबकात मांडून ही तळी उचलली जात असे) यावरून हल्लीचे मऱ्हाटे म्हणजे मांग, महार, कुणबी आणि माळी इत्यादी लोक दर आयतवारी (रविवारी) आपल्या कुलस्वामीच्या प्रतिमेवर पाणी घालून, त्यास कोरड्या भाकरीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्या जिभेवर पाण्याचा थेंब सुद्धा ठेवीत नाहीत."
यंदाची नवरात्र झाली. दसरा झाला. नवरात्र- दसरा निमित्त टीव्हीवर अनेक कार्यक्रम झाले. वर्तमानपत्रात लेख आले, परंतु एकाही वर्तमानपत्रातून वा टीव्हीवरून नवरात्र आणि दसरा ज्यांच्यामुळे साजरा केला जातो, त्या राजा बळीच्या आणि राजा बळीची महासती पत्नी विंध्यावलीची एकानेही आठवण केली नाही. महाप्रतापी शेतकऱ्यांचा राजा - पशुपालकांचा राजा महाबळी, महासती विंध्यावलीने नऊ दिवस घटस्थापना करून, अग्नी समोर अन्न-पाण्याचा अंशही न घेता उपवास केला होता. तीच नवरात्र हिंदु बायका आजही साजरी करतात. राजा बळी मोठा पराक्रमी, न्यायी, दानशूर राजा होता. सगळीकडे समृद्धी होती. प्रजा सुखी, समाधानी होती. राजाबळी क्षत्रिय राजा होता. आर्य, इराणी आणि क्षत्रिय राजे यांच्यामध्ये त्याकाळी निरंतर युद्ध चाले. कत्स, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, ब्रह्म आदी इराणी आर्य टोळ्यांचे राज्य होते. शंखासूर, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन, कृष्ण, बळी, बाणासूर क्षत्रिय राजे होते. (बाणासूर कृष्णाचा व्याही होता. कृष्णाच्या प्रद्यूम नावाच्या मुलाबरोबर बाणासुराच्या उषा नावाच्या कन्येचा विवाह झाला होता.) शंखासूर आणि कत्स टोळी यांमधील युद्धात पराभव स्वीकारून शंखासूरासह दख्खनच्या डोंगराचा सहारा घ्यावा लागला होता. राजा हिरण्यकश्यपने आपले क्षेत्र काबीज केले. तेव्हा कपटाने हिरण्यकश्यपूच्या मुलाला प्रल्हादाला फितवून नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा खून केला. प्रल्हादाला आपली चूक कळाली. राजा प्रल्हादाचे राज्य वाढले. प्रल्हाद पुत्र विरोचन गादीवर बसला. राजा विरोचनाचा महाप्रतापी पुत्र म्हणजे राजा बळी होय. राजा बळीने नऊ खंडावर राज्य स्थापित केले. दहावा खंड काशीवर ब्रह्म वामनाचे राज्य होते. राजा बळीने प्रत्येक खंडावर एक खंडोबा नेमला. बिरोबा, ज्योतिबा, भैरोबा नावाचे सरदार नेमले. महासुभा नेमला. तोच पुढे म्हसोबा म्हणून ओळखू जाऊ लागला. महाराष्ट्रदेशी देखील राजा बळीचे राज्य होते. दक्षिणेत केरळ राज्यात 'ओनम' नावाचा सण साजरा केला जातो. ओनम सण राजा बळीच्या स्वागतासाठी केला जाणारा केरळ राज्यातील सर्वात मोठा सण आहे. 'हर हर महादेव', 'महादेवाचे चांगभलं', 'खंडोबाचं चांगभलं', ' सिद्धनाथाच चांगभलं', 'धुळोबाच चांगभलं' बोलून खारीक, खोबर, भंडारा, गुलाल उधळत जय मल्हारचा घोष करीत संपूर्ण भारत राजा बळीने ताब्यात घेतला होता. काशीवर मात्र आर्य- ब्राम्हनांचे राज्य होते. काशी ताब्यात घेण्यासाठी राजा बळी आणि बटू वामन यामध्ये महायुद्ध लढले गेले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते. युद्धावर गेलेल्या पुरुषांनी सुखरू परत यावे, आपला पती राजा बळी विजयी व्हावा, यासाठी राणी विंध्यावलीने सर्व माता- भगिनींच्या साथीने राजवाड्यासमोर खड्डा खणून लाकडे पेटवली, घटस्थापना केली. देवीचा जागर केला. फेर धरून रात्री जागली. आई जगदंबेची आळणी केली. ब्रह्म वामनाची इडा- पिडा जाऊन राजा बळी विजयी होऊन सुखरूप परत येवो, अशी आळवणी राणी विंध्यावली आणि भगिनींनी केली. हा देवाचा जागर नऊ दिवस चालला. हीच ती नवरात्र होय. दसऱ्याच्या दिवशी राजा बळीने विजय मिळवला. बटू वामन पळून गेला. वामनाच्या सैन्याचा पाडाव झाला. परंतु दुर्दैवाने वाने बळीला रणांगणावर वीरमरण आले. राज्य राखले पण राजा गमावला, असा तो विजयादशमीचा दिवस होता, तोच दसरा होय. (राज्यासाठी राजा बळीने बलिदान दिले, पुढे त्याची आठवण म्हणून बळी देण्याची प्रथा पडली असावी) राजा बळीचा पुत्र बाणासूर याला राजा नेमले. राजा बाणासुराने बटू वामनावर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करून काशीवर आक्रमण केले. अनेक दिवस युद्ध चालले. कपटी बटू वामनाचा पराभव केला. त्याचा वध केला. तोच अश्विन शुद्ध त्रयोदशीचा दिवस होय. विजयी राजा बाणासूराने त्या दिवशी काशीत प्रवेश केला. बाणासूराचा राज्याभिषेक झाला.
राजा बळीचे नऊ खंडावर राज्य होते. परंतु दहावे खंड व्यापी बाकी होते. बाणासुराच्या वामनावरील विजयाने एका ऐतिहासिक विजयाने दहा खंडावर संपूर्ण भारतावर राजा बळीच्या वारसदारांचे राज्य स्थापले गेले. हा आनंदाचा सर्वोच्च क्षण होता. म्हणून दीपमाळ लावून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा होऊ लागला. यामुळेच 'दिवाळी, दसरा आनंदाला नाही तोटा' असा सारा बहुजन समाज बोलू लागला. अश्विन शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी राजा बाणासूराने आपल्या पराक्रमी सरदारांना, सैन्यांना गोडधोड खाऊ घातले. कार्तिक वद्य प्रतिपदेच्या दिवशी सरदारांना- सैन्यांना देणग्या देऊन सन्मान केला. कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी बहिणींनी युद्धावर परतलेल्या भावांची भोजन घालून ओवळणी केली. 'इडा पिडा टळो राजा बळीच राज्य येवो' अशी प्रार्थना केली. राजा बळीची दसरा दिवाळीत आजही आठवण केली जाते. राजा बळीच्या स्वागतासाठी दिवा दिपमाळ लावली जाते. आजही कोकणात 'देव दिवाळी' आणि 'राक्षस दिवाळी' साजरी केली जाते. परस दारात उभे राहून बहुजन समाज राजा बळीची आठवण करतो. पुढील दरवाजावर उभा राहून राजा बळीची आठवण करण्यास हा कुणबी- बहुजन का घाबरतो.? केरळ महाराष्ट्रात 'राजा बळीचे राज्य येवो' असे का म्हटले जाते? बटू वामनाने राजा बळीला पाताळात गाडले असून असून त्याचा पराभव झाला आहे, असेच साधारणता मानले जाते. 'ओनम'च्या दिवशी राजा बळी प्रजेकडे ये, असे केरळमध्ये मानले जाते. 'राजा बळीचे राज्य येवो', असे आजपर्यंत साकडे घालण्यास भारतीय समाज राजा बळीची परंपरा हळूहळू विसरत आहे. परंपरा विसरून तो राजा बळीचे राज्य पुन्हा कसे स्थापणार? म्हणून राजा बळीची महान परंपरा समोर मांडण्यासाठी हा लेखन प्रपंच मी केला आहे. बटू वामनाचे वारसदार आजही 'आळी मीळी गुपचिळी, राजा बळीचे कान पिळी' असे म्हणत कणकेचा बळी करून त्याचे आपट्याच्या पानाने त्याचे पोट फाडत आहेत. दर दसऱ्याला राजा बळीचा सांकेतिक खून - वध करीत आहेत. बहुजन हिंदू मात्र तीच तीच आपट्याची पानं घेऊन सोने लूटून आनंद साजरा करीत आहेत. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम असताना, बटू वामन राजा बळीचा कान पिळत आहेत. याला जबाबदार इतिहास परंपरा विसरणारा, बहुजन -हिंदू भारतीय समाज आहे.
भारताचा खरा इतिहास, भारताची खरी परंपरा फक्त महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखली होती. आपल्या विविध ग्रंथाद्वारे समोर मांडली होती. राजा बळीची परंपरा महात्मा ज्योतिराव फुलेंनी जिवंत ठेवली, त्यांचा आजन्म प्रचार केला.
महाराष्ट्र निर्माता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांचाही विसर पडला होता. राजा बळीसारखा विसर पडला होता. रायगड येथे जाऊन ज्योतिबांनी शिवस्मारक शोधले. भारतातील पहिली सार्वजनिक शिवजयंती ज्योतिबांनी सुरू केली. शिवरायांचा पहिला पोवाडा ज्योतिबांनीच गाय, तर मल्हारचा घोष करत सत्यशोधक समाजाची स्थापना केली. संक्रातीला हळदी-कुंकू, नवरात्री, शिवजयंतीला जागर घालून समाज जागृती केली. राष्ट्रमाता सावित्रीमाई फुलेंनी ज्योतिबांना त्यावेळी सावलीसारखी साथ दिली. महात्मा फुलेंमुळे राजा बळीची परंपरा, छत्रपती शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राला दिसत आहे. परंतु नकली वारसदारांनी राजा बळी आणि छत्रपती शिवरायांच्या वारसाला भेटीकरणाद्वारे भ्रष्ट केले आहे. भटांच्या आळी-मीळी गुपचिळीला शह देण्याचे सामर्थ्य केवळ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारात आहे, फुलेवादात आहे. फुलेवादावर आधारित भारतात केवळ एकमेव राजकीय पक्ष दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता स्थापनेचे लक्ष घेऊन वाटचाल करीत आहे, त्या राजकीय पक्षाचे नाव आहे 'राष्ट्रीय समाज पक्ष', राजा बळीच्या परंपरेला आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला मांनणाऱ्यांचे महाराष्ट्रमध्ये बहुमत आहे. मूलनिवासी बहुजन भारतीय समाजाला 'राष्ट्रीय समाज' असे बलवाचक, राष्ट्रवाचक नाव रासपाने दिले आहे. नवरात्र गेली, दसरा गेला, दिवाळी आली आहे. राजा बळी, खंडोबा, ज्योतिबा, रानी विंध्यावली, छत्रपती शिवराय आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे परंपरेला साजेशी दिवाळी साजरी करूया आणि सर्वजण मिळून म्हणूया.
"इडा पिडा हटवू या!
राजा बळीचे राज्य स्थापूया !!"
- एस. एल. अक्कीसागर
राष्ट्रीय अध्यक्ष, रासेफ.
No comments:
Post a Comment