दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या माण खटाव तालुक्यातील जनेतच्या जखमेवर चोळले मीठ..?
शेजारच्या कर्नाटक शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर केला, परंतू दोन महिने उलटल्यानंतर उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाने ३५८ पैकी १९४ तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती असताना केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहिर केला. विशेष म्हणजे नेहमी सुजलाम सुफलाम असे विकासाचे मॉडेल म्हणून राज्यभर बोभाटा केला जातो अशा बारामती तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याच दुष्काळी तालुक्यात राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांना साखर कारखान्यावर ऊस मोळी पूजनाला आरक्षणाची प्राणांतिक मागणी करणाऱ्या उपेक्षित मराठा समाज बांधवांनी रोखल्याचे वृत्त प्रसार माध्यमात सर्वत्र झळकले. जिथे ऊसाचे मोळी पूजन होते, अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करताना कोणते निकष लावले..? याचा उलगडा होणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यात कृष्णेच्या तिरावर वसलेल्या मिरजेत दुष्काळ जाहीर झाला. पण लागून असलेल्या कायम दुष्काळ असणाऱ्या जत, कवठेमहांकाळ तालुक्याला, आटपाडी तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले.
सातारा जिल्ह्यात तर आक्रित घडलं..?
ज्या पूर्व माण तालुक्यातील लोक वाईदेश म्हणजे वाई तालुक्यात चारा पाण्याच्या शोधात आपली जनावर घेऊन जातात त्या वाई तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. पण माण तालुक्यात पशुसंवर्धन, महसूलमंत्री येऊन देखील दुष्काळ जाहीर झाला नाही.
नोव्हेंबर २०२२ मध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलेल्या मेंढपाळ बांधवांनी २०२३ च्या जून महिन्यात गावची वाट धरली. पण पाऊसाचा थांगपत्ता लागत नसल्याने एका आठवडयात पुन्हा आलेल्या वाटेने मेंढपाळांना माघारी परतावे लागले. पशुपालक, मेंढपाळांची जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात परिस्थिती इतकी गंभीर होती की, अक्षरशः सर्वच लोक अस्वस्थ झाले होते. ऊसतोड मजूर, शेतमजूर, कामगार, रोजगारी महिला यांचे हाल पहावत नव्हते. पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात बी पेरले, पण कुणाचे हवेच्या आद्रतेने उगवले तर कुणाचे उगवलेच नाही. ज्यांचं बी उगवलं त्यांचं पुढं करपून गेले. काही शेतकऱ्यानी चार रूपये मिळतील या आशेने केलेल्या टोमॅटो पिकाला टँकरने पाणी आणून जगवण्याचा प्रयत्न केला. पुढे केंद्र सरकारच्या धोरणामुळे टोमॅटो पीक मातीमोल झाले, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढले. पाऊसाने दडी मारल्याने हतबल झालेला शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला. खरिप हंगामाचा शेवट होत असताना, गणरायाच्या आगमनानंतर काही ठिकाणी थोडा फार पाऊस झाला. कुठेतरी खुरट गवत उगवलं आणि ते खाऊन कशीबशी जितराब पशुपालकांनी जगवली. पुर्ण खरीप हंगाम वाया गेला. शेतकरी उद्धवस्त झाला तरीही मोठ्या हिंमतीने आजही उभा आहे.
दरसाल दुष्काळमुळे माण खटाव तालुक्यातील जनता गाव सोडत असते, मिळेल ते काम करून, काबाड कष्ट करते. माथाडी, ऊसतोडी, मेंढपाळ भटकंती, रंगकामगार, रोजंदारीची कामे करतात. स्वतःच्या गावात कमी अन बाहेर गावीच बहुतांश आयुष्य जगत असते.
माण मध्ये जाणीवपूर्वक दुष्काळ जाहीर झाला नाही..?
माण खटाव तालुक्यातील बऱ्याचश्या गावात पाण्याचे टँकर सुरू होते. काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करा? चारा उपलब्ध करा ? दुष्काळ जाहीर करा? विद्यार्थ्यांची फी माफ करा?, राऊतवाडी बंधाऱ्यात उरमोडीचे पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांनी म्हसवड येथे महात्मा फुले पुतळ्यासमोर आमरण उपोषण केले? अशा प्रकारच्या मागण्या निवेदने शासन, प्रशासन दरबारी होत होती, मात्र या सर्व गोष्टींकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करून बेजबाबदार अधिकारी, शोबाज लोकप्रतिनिधी, डोळे झाकून कारभार करणारे राज्यकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे अंत्यंत गंभीर स्वरूपाचा वास्तवात दुष्काळ असताना देखील माण तालुका दुष्काळ यादीत समावेश होऊ शकलेला नाही. पारतंत्र्य भारतात देखील दुष्काळग्रस्त जनतेवर अन्याय झाला नसेल इतका छळ स्वत्रंत्र भारतात चालू आहे. दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या माण खटाव तालुक्यातील जनतेच्या भळभळणाऱ्या जखमेवर मीठ चोळले, अशाच प्रकारच्या जनभावना उफाळून आल्या आहेत.
ज्याप्रमाणे बारामतीचा सर्व्हे झाला तशाप्रकारचा तिथला अभ्यास करून सरकारचे गुलाम राहीलेल्या अधिकारी वर्गाने शोबाज लोकप्रतिनिधींचे न ऐकता जनतेचे म्हणण ऐकून थेट ग्राउंडवर जाऊन माण खटावचा खराखुरा सर्व्हे करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा.
✍️ आबासो पुकळे (०२/११/२०२३)
No comments:
Post a Comment