Sunday, May 3, 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती निमित्त लेख - २०१५

३० एप्रिल २०१५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती निमित्त 



आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती. दुर्दैवाने राष्ट्रसंतांचं अद्वितिय कर्तृत्व आपण विदर्भापुरतंच मर्यादित ठेवलं आहे. हा राष्ट्रसंत राज्यभरातही पोहचवू शकलो नाही. त्यांचे अनुयायी याला कारण असतीलही. पण पुण्या मुंबईच्या बाहेर न पाहणारं मराठीचे विचारवंतही याला तेवढेच कारणीभूत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील यावली हे लहानसं गाव. ह्या गावात ३० एप्रिल १९०९ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. जन्मताज घरावरचे छप्पर सोसाट्यच्या वा-याने उडवून नेले आणि वरचे आकाश हेच घराचे छप्पर बनून राहिले. त्यांच्या आईचे नाव मंजुळामाय व वडिलांचे नाव बंडोजीबुवा होते. घरात अत्यंत गरिबी. माधानच्या अंध संत गुलाबराव महाराजांनी त्यांचे बालपणीचे नाव माणिक असे ठेवले. मराठी शाळेचे दोन चार वर्ग शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरु आडकोजी बाबांच्या कृपा प्रसादाने तुकड्यादास नावाने भजन लिहायचे. त्याचे भजन जनसामान्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान फक्त देवभक्ती नव्हती तर समाजातील दुःख , वेदना विषमता , त्यांच्या भजनातून प्रतीत व्हायची. एक सुजलाम् सुफलाम् देशाचे स्वप्न त्यांनी बघितले होते.
झाड झडुले शस्त्र बनेंगे , भक्त बनेगी सेना
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे
१९४२ चे स्वातंत्र्य जनआंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर , आष्टी , यावली , बेनोडा येथील स्वातंत्र्य संग्राम यांच्याच प्रेरणेने घडला. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. मग ते चीन युद्ध असो वा पाकिस्तानचे. त्यांच्या लोकपयोगी कामांकडे पाहून महात्मा गांधी आकर्षित झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठ्या आदरातिथ्याने दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजरी भजनाचा कार्यक्रम झाला. त्या भजनाने प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले , आप संत नही , राष्ट्रसंत है. मग सा-या जगाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले.
महाराजांच्यी खंजरी भजन ही भजन पद्धती एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार थेट हृदयालाच जाऊन भीडत. ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांची खड्या आवाजातील भजने क्षणात जनमनाचा पगडा घेत. त्यांची भजन सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्यात यशस्वी झाली.
१९५५ ला जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान राष्ट्रसंतांना मिळाला. तिथे परिषदेच्या आयोजकांनी त्यांना जपानमधे राहून काम करण्यासाठी मोठी प्रलोभन दाखवली. पण आपल्याला भारतातच काम करायचंय सागून ते परतले. ग्रीन कार्ड आणि एच वन व्हिसा हेच सर्वस्व मानणा-यांसाठी हा मोठाच धडा आहे
ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणा-या बुवाबाजीविरुद्ध व अंधश्रद्धेविरुध्द संत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदु बुवांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरेही ओढले आहेत. ग्रामीण , आदिवासी भागात आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याला गावोगावी पोहचविण्याची आज खरी गरज आहे. तिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
ग्रामगीता ही राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचं सार. अनेक संतांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिले. पण अशी गावाच्या विकासाचा मार्ग सांगणारी ही गीता केवळ अद्वितिय आहे. आजही त्यातलं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान भुरळ पाडणारं आहे. ' ग्रामगीता नाही पारायणासी ', असं राष्ट्रसंत कठोरपणे सांगतात.
११ ऑक्टोबर १९६८ रोजी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले. १२ ऑक्टोबर सकाळी ध्यानाचा कार्यक्रम झाला. एका सुशोभित ट्रकवर राष्ट्रसंतांचा चिरनिद्रा घेत असलेला देह ठेवला गेला आणि भजनाच्या निनादात दास टेकडीचं दर्शन घेण्यासाठी दिंडी निघाली. आयुष्यभर राष्ट्रसंतानी दिलेला मानवतेचा संदेश ह्या अंत्ययात्रेत दिसत होता. सर्व धर्म , पंथ , संप्रदायाचे लोक यात सहभागी होते. गुरुदेव सत्संग मंडळ देशभर त्यांचा विचारांचा प्रसार करण्याचे काम करते.
ए.एस.पुकळे

April 30, 2015 at 1:57pm ·

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...