Sunday, May 31, 2020

पुकळेवाडीत महाराणी अहिल्यादेवींना अभिवादन !

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन

पुकळेवाडी ता- माण येथे महाराणी अहिल्यादेवीं होळकर यांच्या २९५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय पुकळेवाडी येथे सरपंच ब्रम्हदेव पुकळे यांच्याहस्ते महाराणी अहिल्यादेवीं होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सामाजिक अंतर राखत ग्रामस्त उपस्थित होते. गत ५ वर्षापासून दि. २७ मे रोजी पुकळेवाडी येथील युवक एकत्र येऊन मोठ्या उत्सहाने जल्लोषात महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करतात. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने कोणताही भव्य कार्यक्रम आयोजित न करता  शासन, प्रशासनाला सहकार्य केले.

Wednesday, May 27, 2020

श्री क्षेत्र सिद्धनाथ गड - सिद्धनाथ देवाची आरती.

सिध्दनाथाची आरती

आरती सिद्धनाथा : जय जय आरती सिद्धनाथा : धृ: 
तुच करता । तुच करविता ।। विश्व चालक स्वतः । जय जय आरती सिद्धनाथा ।।१।।

नेती नेती । म्हणती श्रोती। आठरा पुराणे शोधून पहाती ।।वेद शिनले गाता। जय जय आरती सिद्धनाथा ।।२।।

 अंनन्ये भावे येतीजे शरण। चुकवी त्यांचे जन्म मरण। लावीशी मोक्ष पंता ।जय जय आरती सिद्धनाथा ।।३।।

त्रिसुळ डमरू । जटेत गंगा।  सगून निर्गुण  । द्वादश लिंगा। ठेविला पदी माथा ।जय जय आरती सिद्धनाथा ।।४।।

काळ्या असुराशी । वधुनि त्यासी। जनता पीड़क। सुवर्ण असुराशी। धाड़िले यम पंता । जय जय आरती सिद्धनाथा ।।५।

पंचप्राणाची करुनी आरती । सगुन निर्गून । लाऊनी जोती। ओवळीतो नाथा । जय जय आरती सिद्धनाथा ।।६।।

पुकळेवाडीत सिद्धनाथगड़ । तिथे राहण्याची झाली आवड़। मंदीर डोंगर माथा। जय जय आरती सिद्धनाथा ।।७।।
(समाप्त).

Monday, May 18, 2020

विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी गोपीचंद पडळकर पोहचले धनगर वेषभुषेत

विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी  गोपीचंद पडळकर पोहचले धनगर वेषभुषेत

@Abaso Pukale


सांगली जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते गोपिचंद पडळकर हे आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूशेत  पोहचले आहेत. १.५० कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची गरज  होती. गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या वरिष्ठ कायदा सभागृहात आगामी काळात धनगर समाजासह उपेक्षित समाजाचे प्रश्न ऐरणीवर येतील.



महाराष्ट्र विधान परिषद सभागृह सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी डोइवर पिवळा फेटा बांधून, हातात काठी, खांद्यावर घोंगड़ी टाकून गोपीचंद पडळकर मुंबईला पोहचले आहेत.  शपथ घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
विधान परिषद सभागृह सदस्यत्वाची शपथ घेताना  गोपीचंद पडळकर

Wednesday, May 13, 2020

जाऊ चला जिरे पठारावर

जिरे पठार, तुकाईदेवी मंदिर(भवानीमाता), गव्हानी. 

माणदेशातील प्रसिद्ध जिरे पठार. पठारावर काळी मृदा असून. ५० वर्षापुर्वी पठारावर शेती केली जात होती.  या पठारावर जाण्यासाठी शेरीच्या डोंगरातून पाऊल वाट होती. परंतु दहा वर्षापूर्वी पठारावर मोठमोठे भांडवलदारानी Wind Power तयार करण्याचे ठरवले आणि तेव्हापासून येथे माण- खटावच्या सिमेवर असणाऱ्या नैसर्गिक खिंडीतून पठारावर जाण्यासाठी वाहनमार्ग तयार करणयात आला. पठारावर जिकड़े पहावे तिकडे पवनचक्कीची पाती भिरभिरत आहेत. ब्रिटिश काळात जिरे पठारावरून जोतिबा डोंगर आणि शिंगणापुरचा शंभू महादेव डोंगर दुर्बिनिच्या सह्याय्याने इंग्रज पाहत होते, असे सांगितले जाते. "जुलमी सावकरांना लुटायचे आणि गोरगरीबांना धन, धान्य वाटायचे" अशी कथा असणाऱ्या माणदेशी बंडखोर 'बाज्या-बैज्या' या मामा भाच्याच्या जोडिने या पठारावर काहीकाळ आश्रय घेतला होता.

माण आणि खटावच्या सिमाहद्दीत तुकाईदेवीचे मंदिर आहे. 'तुकाईदेवी' ला भावनिमाता या नावाने सबोधले जाते. या देवीला मेंढ़पाळ वनदेवी बोलतात. एखाद्या व्यक्तिस नायटा उठल्यास या देवीचा प्रकोप असतो, अशी येथील लोकांत धारणा आहे.  नायटा उठल्यास देवीला नैवद्यासह श्रीफळ फोड़ावे, अशी लोकांची समजूत आहे. पाचवड, कटरेवाडी, कुकुडवाड, पुकळेवाडी, मानेवाड़ी येथील लोकांत देवीबद्दल श्रद्धा आहे. 
गव्हानीत हिवर, कारीची झाड़, पळस, फड्या निवडूंग, वाघाट्या, करवंदाच्या जाळ्या, वनऔषधि वनस्पति खुप आहेत. 
- आबासो पुकळे.
@ पुकळेवाडी, १२ मे २०२०.









Sunday, May 10, 2020

तप्त माणदेशात कोसळल्या पाऊसाच्या हलक्या सरी

तप्त माणदेशात कोसळल्या पाऊसाच्या हलक्या सरी

पाऊसच्या  हलक्या  सरी कोसळल्यानंतर फुलांनी बहारुन गेलेले  गुलमोहराचे झाड़.

तप्त माणदेशात कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, धनवडेवाडी, मानेवाड़ी, नंदीनगर, भाकरेवाडी, वळई, शिवाजीनगर, मस्करवाडी, कारंडेवाडी, मरगळेवाडी, वडजल, चिलारेवाड़ी आदि परिसरात पाऊसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कड़कडित उन्हाच्या झळानी हैरान झालेल्या माणवासियांना आजच्या पाऊसाने थोडासा दिलासा मिळालाय. ३ वर्षापूर्वी या परिसरात सर्वात कमी पाऊसाची नोंद झाली होती.

(व्हिडिओ : आबासो पुकळे, पुकळेवाडी ता-माण)

Sunday, May 3, 2020

विश्वाचा यशवंत नायक 22 वा वर्धापन दिन

विश्वाचा यशवंत नायकने 22 वा वर्धापन दिन सोहळा व वाचक मेळावा केला अनोख्या पद्धतीने साजरा

........................................................
अंधारात चाचपडणारा राष्ट्रीय समाजाला प्रकाशनमान करून समर्थ समाज घडवण्याचा केला निर्धार

होय विश्वाचा यशवंत नायकने 22 वा वर्धापन दिन सोहळा व वाचक मेळावा अंधारात साजरा करून प्रस्थापित व्यवस्थेचे लक्ष वेधले. सत्तेसाठी भांडणारा प्रस्थापित वर्ग मात्र बहुसंख्याक धनगर/राष्ट्रीय समाजाला भारतीय लोकशाही असून देखील वाटा देईला तयार नाही. ही बहुसंख्याक ओबीसी.एस.सी, एस.टी साठी गंभीर बाब आहे. अंधारात वर्धापन दिन साजरा करून विश्वाचा यशवंत नायकने अज्ञानाच्या अंधकारात गटखाळया खाणा-या  राष्ट्रीय समाजाबरोबर यशवंत नायक काळोख्या भयान रात्री साथिदार आहे हे एकप्रकारे दाखवून दिलेले आहे . लोक जागृती आणि लोकशिक्षण याद्वारे अज्ञान दूर करून बहुसंख्याक समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणार आहे व राष्ट्रीय समाजाला भारतीय समर्थ समाज घडवणार आसल्याचा निर्धार यशवंत नायक वर्धापन दिनी करण्यात आला.

नकली आणि बनावट लोकांना अमाप प्रसिद्धी देण्यासाठी भारतीय प्रचार-प्रसार माध्यम दिवस-रात्र राबतात. सत्यासाठी लढणा-यांना झाकोळून टाकण्याचे प्रयत्न केले जातात. आजही उघड्यावरच पालातल जिणं जगणारा, अनवाणी पायाने रानोमाळ चालणारा शोषित धनगर समाजावरील अन्याय व्यवसथेला दिसत नाही याचे आश्चर्य वाटते?.

गुलामीत वावरणारा 'प्रजा समाज वाचक समाज' बनावा. 'वाचक समाज लेखक समाज' बनावा.'लेखक समाज शासनकर्ता समाज' बनावा. सर्वांगीण विकास घडून समर्थ समाज बनला पाहीजे यासाठी यशवंत नायक ने प्रयत्न केले.

यशवंत नायक ने बहुसंख्याक राष्ट्रीय समाजाला जागृत करण्यासाठी 22 वर्षापूर्वी घोडदौड सुरू केलेली आहे.
"ज्या समाजाने आपला इतिहास सांभाळून ठेवला आहे, त्या समाजाचे 'वर्तमान' आणि 'भवितव्य' दोन्ही 'उज्वल' आहे." आम्ही मात्र आमचा इतिहास विसरलो. त्यामुळे स्वतंत्र भारतात आमची ससेहोलपट सुरू आहे. "जो समाज सर्व अर्थाने 'जागृत' आणि 'संघटीत' आहे, त्या समाजाचे 'वर्तमान' आणि 'भवितव्य' 'उज्वल' आहे." आम्ही जागृतही नाही संघटितही नाही व्यवसाय व अन्य कारणाने विखुरलेलो आहे. "ज्या समाजाकडे 'सक्षम नेतृत्व' आणि 'मजबूत संघटन' आहे, त्या समाजाचे 'वर्तमान' आणि 'भवितव्य दोन्ही 'उज्वल' आहे".  आमच्याकडे खडतर प्रवासानंतर सक्षम नेतृत्व तयार आहे परंतु मजबूत संघटन नाही. खोटी प्रतिष्ठा बाळगण्याची सवय लागलेली आहे. "मत व्यक्त करण्याची 'क्षमता' असून 'धैर्य' नाही, ते गुलाम आहेत. " मत व्यक्त करण्याचे 'धैर्य' असून 'क्षमता' नाही, ते मूर्ख आहेत."  'मत' व्यक्त करण्याचे 'धैर्य आणि क्षमता' आहे, ते स्वतंत्र, ज्ञानी व प्रगत आहेत."  आम्हाला मात्र यावर सर्वत्र बहुसंख्याक समाजात जाऊन जागृत केली पाहीजे.आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी वाचक मेळाव्यात व्यक्त केला. वर्धापन दिनी वाचक मेळाव्यास चांगला प्रतिसाद लाभला.

समाजाला सामाजिक, राजकीय जागृत करायचे असेल तर यशवंत नायक चा अंक प्रत्येक घराघरात असायला हवा. यशवंत नायक हा आपला नायक आहे.  समाजावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखक, पत्रकार, बुद्धीजीवी राजकारणी तयार झाले पाहिजेत. समाजातून अभ्यासू वक्ते घडावेत यासाठी मदत करायला तयार आहे असे नगरसेवक विष्णू माने यांनी यशवंत नायक वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थितीत राहुन शुभेच्छा दिल्या व मार्ग दर्शन केले.  जेष्ठ नागरिक राजाराम(बापू) शेंडगे यांनी यशवंत नायक अंकाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आबासो पुकळे यांनी यशवंत नायक  हा बहुजन समाजाचा आरसा असून लवकरच दैनिक स्वरूपात आपल्या हाती यावा असा आशावाद केला.तत्पूर्वी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. व नगरसेवक विष्णू माने, समाजसेवक भारत (तात्या) व्हनमाने, सामाजिक कार्यकर्ते अमृत जानकर, शिक्षक तानाजी दुधाळ सर, यवा सामाजिक कार्यकर्ते विशाल सरगर, युवा सामाजिक कार्यकर्ते बबन गडदे, युवा नेते महेश मासाळ, प्रा.उत्तम हराळे, आबासो पुकळे व यशवंत नायक मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत केक कापून विश्वाचा यशवंत नायक 22 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  सांगली शहराचे वैभव महाराणी अहिल्यामाई होळकर स्मारकात हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. महाराणी अहिल्यामाई होळकर स्मारकाचे उर्वरीत काम पूर्णत्वास जावून लोकार्पण सोहळा पार पडावा अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

राष्ट्रीयालय, मुंबई येथून  सुदर्शन अक्किसागर साहेब यांनी भ्रमणदूरध्वनी वरून विश्वाचा यशवंत नायक 22 वा वर्धापन दिन व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच मुंबई, बोरिवलीतील कार्यकर्त्यानी व इतरांनी घेतलेली अपार मेहनत याची माहीती दिली.
-आबासो पुकळे , २९ सप्टेबर २०१७.

महात्मा फुले स्मृतीदीन-विनम्र अभिवादन

महात्मा फुले स्मृतीदीन-विनम्र अभिवादन.- आबासो पुकळे.


     महात्मा फुले यांचे 'जीवन कार्य विचार म्हणजेच फुलेवाद होय.
     एकात्म भारतीय समाज निर्माण करणे हे फुलेवादाचे मुख्य तत्वज्ञान आहे.
     अज्ञानाच्या अंधकारात गटागंळ्या खाणा-या क्षेत्रिय बहुजन/राष्ट्रिय हिंदु समाजाला सर्वप्रथम ज्ञानाची कवाडे उघडी करून दिली त्या महाज्ञानदेवाचे नाव आहे महात्मा जोतिबा फुले.
      फुलेवादाचे अमृतकुंभ घेऊन 'एकात्म भारत' निर्माण होणार यावर माझा विश्वास आहे आहे.
     भारतीय समाजाचे अर्धे अंग असणा-या 'स्त्रियांना शुद्र म्हणून ब्राह्मणशाहीने सत्ता, संपत्ती, सन्मान, शिक्षणापासून वंचित ठेवले होते त्याच भारतीय महिलांना शिक्षणाची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली त्या महापुरूषाचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     शुद्र म्हणून ज्यांनी हिणवले अशा ब्राह्मण समाज परित्यक्ता महिलेच्या अनौरस मुलाला/यशवंताला आपल्या 'पुत्रा'चा दर्जा जोतिराव फुले या महात्म्याने दिला.
     रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे छ.शिवाजीराजे यांची जगातील पहिली जयंती साजरी करून पहिला पोवाडा लिहून गायला त्या शिवशाहीराचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     जगभर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्याय शिलतेचा डंका मिरवला जात असताना भारतीय शेतक-याची अवस्था हिन-दीन का आहे, याला जबाबदार कोण आहे, असा ब्रिटीश राज्यकर्त्याना जाब विचारणा-या आणि शेकडो प्रतिष्ठित मंडळीसमोर ठामपणे सांगणा-या महान धर्यधराचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     भारतातील पहिली कामगार चळवळ चालु करणारा, पहिला कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे ज्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला त्या महान गुरूत्वाचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     दोन सहस्त्रके जाऊन तिसरे सहस्त्रक सुरू झाले. या काळातील, प्राचिन, मध्ययुगीन ,अर्वाचित आणि आधुनिक भारतातील इतिहासात भारतीय सामाजिक क्रांतिचे आद्य प्रणेते म्हणून ज्यांचा उल्लेख केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासातदेखील करावा लागेल, अशा सर्वश्रेष्ठ महामानवाचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     जगाला वंद्य आणि गुरूस्थानी संत सनातन धर्माचा पुरस्कार करून विश्व धर्माचा, हिंदु धर्माचा ज्याने नाश केला त्या ब्राह्मण्याचा, त्या भटशाहीचा ज्यांनी बुरखा सर्वप्रथम फाडून टाकला त्या महाचाणाक्षाचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     ज्या भटशाहीला भांडवल पुरवणा-या शेटशाहीला उघडे पाडणा-या महावेत्याचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
     माझा विचार घेऊन जो कार्य करील तोच माझा वारसादार असेल असे महात्मा फुलेंनी निक्षून सांगितले होते.

महात्मा फुले यांच्या मृत्यूसमयी डाॅ.संतुजी लाड यांच्या सह दुरदुरवरचे अनुयायी महात्मा फुले यांना पाहण्यासाठी जमले होते. त्यावेळी केलेल्या भाषणात कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे म्हणाले होते,आज जरी महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्व वाटत नसले तरी भविष्यात ज्यावेळी भारतीय मानव सत्य शोधण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्व कळून येईल.
     ज्या विचाराची कास केल्याने राजर्षी या सन्मास पोहचले अशा शाहू राजांच्या मार्गदर्शकत्वाचे नाव आहे महात्मा जोतिराव फुले.
इतकेच काय आजचा समाज शुद्र समाज कशामुळे खचला आहे याचे सार महात्मा फुलेंच्या फुलेवादात सापडते.
-
देश के कोनो-कोनो में
फुलेवाद का नारा
यह हमारा वाद..!

-दि २८ नोव्हेंबर २०१६

विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागातर्फे शिक्षक दिन

विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागातर्फे शिक्षक दिन साजरा

भारतात गुरू-शिष्य पंरपरेला मोठे स्थान-प्रा.डाॅ.यु एच नाईक सर

विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग करून आयुष्याची जडणघडण करावी- प्रा.डाॅ.एम एस बापट

सांगली (आबासो पुकळे) :
विलिंग्डन महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमीत्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. गणित विभागातर्फे वेलणकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

काळाबरोबर काही परंपरा आपण विसरत चाललो, तरी चांगल्या गोष्टी स्विकारल्या पाहिजेत. डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक चांगले शिक्षक होते. शिक्षण, संगीत, क्रीडा अन्य क्षेत्रात गुरू-शिष्यांची परंपरा आढळते. भारतात गुरू-शिष्य परंपरेला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन प्रा.डाॅ.यु.एच.नाईक सर यांनी केले. श्रध्दा व श्राध्य यावर भाष्य करत ते पुढे म्हणाले,  की शिक्षक व विद्यार्थी यांचेमध्ये श्रध्दा एकमेकांस पूरक असली पाहिजे तरच गुरू-शिष्य परंपरा बळकट होईल.

प्रा.डाॅ.एम.एस बापट सर रामानुजन पीठावरून विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले, महाविद्यालयात गणित विभाग हा संख्येने मोठा समजला जातो.  महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चांगली आठवण काढतात त्याप्रमाणे विद्यार्थांनी महाविद्यालयातील सेवांचा उपयोग करावा. शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन चांगले यश संपादन करून पुढे जावे. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे.  दोन वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग करून आयुष्याची जडण घडण करावी.

माजी विद्यार्थी महेश बंडगर हे सेट परिक्षा उत्तीर्ण झालेबद्दल महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती  महेश बंडगर यांनी सेट परिक्षा विषयी माहीती सांगून स्वतःचा अभ्यासातील अनुभव विद्यार्थ्यासमोर कथन केला.

कार्यक्रमस्थळी रामानुजन पीठावर महाविद्यालयाचे गणित विभागप्रमुख प्रा.डाॅ.यु.एच.नाईक सर, प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. महेश बंडगर सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. एम.एस. बापट सर, प्रा.डाॅ. जी.डी. शेळके सर, प्रा. एस. दिक्षित सर, प्रा. एम.कोरे सर, प्रा.जाधव मॅडम, प्रा. विभुते मॅडम स्थानापन्न होते. तसेच बीएस्सी(गणित), एम एससी भाग 1 व 2 चे विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

यावेळी अनेक विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. शुभम हुजरे यांनी शिक्षक दिनानिमीत्त प्राजेक्टरवर ध्वनीचित्रफित दाखवली. सुत्रसंचालन एम.एस्सी भाग-2 विद्यार्थीनी कुमारी प्रियांका गुजर व आभार प्रदर्शन कुमार.योगेश कोकरे यांनी केले.
-६ सप्टेबर २०१७

श्री शंभू महादेव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट

श्री शंभू महादेव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट

दहावीचे विद्यार्थ्याकडून घडले ऐतिहासिक काम, मुख्याध्यापकांनी दिली कौतुकाची थाप

रयत शिक्षण संस्थेचे 'श्री. शंभू महादेव माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कुकुडवाड' हे माण तालुक्यात शंभू महादेवाच्या डोंगररांगाच्या पायथ्याला लागून आहे. या विद्यालयाची स्थापना 1961 सालची आहे. गंगाकिनारी वसलेल्या वाराणसी काशिविश्वनाथाचा जिर्णोध्दार करणा-या अहिल्यादेवीचीं प्रतिमा महादेवाच्या फोटोत आहे.  विद्यालयाच्या स्थापनेला अर्धशतकाहून जास्त वर्षे उलटली. पण कुणालाही शंभू महादेवाच नाव लाभलेल्या विद्यालयात अहिल्यादेवीची प्रतिमा असावी असे वाटले नाही. यावर्षी दहावित शिकणा-या नाना दादासो पुकळे, शंकर दत्तात्रय विरकर, सुरेश सखाराम पुकळे, विकास पांडुरंग शेळके (सर्व रा.पुकळेवाडी) , सुमीत बाबासो खरात, बिरा विलास खरात, अनिल गणपत खरात, ज्ञानेशवर तुकाराम पुकळे( सर्व रा.गटेवाडी) , अक्षय ईश्वर कारंडे, निलेश सोपान मासाळ (रा.कारंडेवाडी) कैलास मोहन नरबट, ओंकार नरबट (रा.नरबटवाडी), तुषार सुरेश खाडे (रा.ढाकणी)  विद्यार्थ्यानी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात विद्यालयालयास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली. दिनांक 17 फेब्रुवारी 2017 पासून विद्यालयाच्या कार्यालयात महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच दर्शन घडत आहे. मुख्याध्यापक श्री. खाडे सर यांनी विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले. श्री. सोनवलकर सर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याची माहीती विद्यार्थाना दिली. आर्दश राज्यकारभारचा वसा जगाला देणा-या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा विद्यालयास भेट दिल्याने विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

माणदेशातील नैसर्गिक द्रोणी

माणदेशातील नैसर्गिक द्रोणी 

मराठा सरसेनापती संताजी घोरपडे यांनी ज्या माणदेशी धनगरी घोडदळाच्या बळावर दिल्ली पर्यत धडक मारली त्या माणदेशात नैसर्गिक द्रोणी पाहायला मिळतात. शंभू महादेवाच्या डोंगर रागांत वसलेले प्राचिन श्री सिध्दनाथ मंदिर हे माझे ग्राम दैवत आहे. विजयी दशमी दस-या निमित्त दर्शनाला गेलो असता डोंगर मध्यावरून घेतलेले माणदेशातील प्रसिद्ध नैसर्गिक द्रोणीच छायाचित्र. पूर्वेला श्री सिध्दनाथाच मंदिर तर पश्चिमेला श्री. शंभू महादेवाच मंदिर आहे. दक्षिण दिशेला माणदेशातील विशाल असे जिरे पठार आहे. पठारावर माण-खटावची सीमा असून सीमेवर भवानी मातेचे मंदिर आहे. जिरे पठारावरून शिखर शिंगणापूरचा महादेव पर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. याच शंभू महादेवाच्या मंदिरात बाबाजी निंबाळकर (बाबा लांडे) याचे शुध्दीकरण करून छ.शिवारायांनी हिंदु धर्मात घेतले. तसेच पिलीव, राजेवाडी पर्यंतचा प्रदेश डोळ्यासमोर येतो. ब्रिटिश काळात याच भूमीत माणदेशी बंड घडले. माणदेशी बंडाचा नायक कुकुडवाड गावचा रामोशी समाजातील बाज्या बैज्या आहे. भारतीय संसदेत पहिले मराठी भाषण करणारे क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्या बरोबर पत्रि सरकार मध्ये अग्रभागी असणारा तुकाराम पुकळे उर्फ चेचम्या तुक्या ही याच माणदेशातील पुकळेवाडी गावचा. मानाड्क राजाचा नावाने प्रसिद्धीस पावलेला प्रदेश म्हणजे माणदेश...! पुकळेवाडीच्या सिमेवर वळई नावाचे लोणारी समाजाचे गाव आहे. इतिहासकालिन 'वळईचा ताम्रपट' आहे. या ताम्रपटात कुकुत्वट, हिमगीरी व मानाड्क राजाचा नावाचा उल्लेख आढळतो. मायणी-म्हसवड दरम्यान कुकुत्वट नावाचे कुकुडवाड आणि हिमगीरी नावाचे हिवरवाडी गाव आढळते. मायणी-कुकुडवाड रस्त्यावर नैसर्गिक खिंड ही आढळते. वायव्य दिशेला धनवडेवाडी हे गाव पुसेगाव निवासी संत सेवागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. या परिसरात आठ वाड्या व नववे गाव आहे. धनवडेवाडी येथे पूर्वी पंचक्रोशीतील लोक एकत्र येऊन पुरण-पोळी बनवून सेवागिरी महाराजांचा उत्सव साजरा करीत आता ही परंपरा मोडकळीस येऊन लोप पावत चाललेली आहे. मस्करवाडी,कारंडेवाडी, पुकळेवाडी या गावात अस्सल माणदेशी बोली भाषा ऐकायला मिळते. या परिसरात डोंगर माथ्यावर पवन चक्या भिरभिरताना दिसतात.
- आबासो पुकळे, 
Oct 19, 2016 ·

घोंगडी पालवून पाऊस पाडणारा माणदेशी मेंढपाळ "दाजी शेळके"

घोंगडी पालवून पाऊस पाडणारा एक उपेक्षित माणदेशी मेंढपाळ "दाजी शेळके"


भारतात लक्षणीय कमालीचे दुष्काळाचे सावट असताना,अन्न-पाण्याविना माणस,जनावरे तडफडत असताना दुखःने व्याखूळ झालेल्या दाजी शेळके नामक मेंढपाळाने शंभूमहादेव डोंगररागांतील जिरे पठाराच्या पायथ्याशी 'इराची खडी' या पावन स्थळी आकाशाकडे पाहत घोंगड पालवत जोरजोराने बोंब मारली होती असे स्थानिक लोकांकडून समजते. दाजी शेळकेच्या आक्रोशाने मेघ पाणवला आणि मुसळधार पावसाने हाहाकार माजवून दुःष्काळाची गडद छाया नष्ट केली.

आजही माणदेशात या 'इराची खडी' या पावनस्थळी श्री कुळस्वामी दैवत जोतिबा मंदिर स्थानिक गावकर्र्यानी उभारले आहे.या मंदिरात प्राथमिक शाळाही भरते. याठिकाणापासून जवळच काही अंतरावर ऐतिहासिक नैसर्गिक खिंड पाहायला मिळते. खिंडीत म्हसोबाचे मंदिर आहे.

येथील स्थानिक गितातून मेंढपाळ दाजी शेळके यांचा उल्लेख आढळतो तो असा

कलीयुगामध्ये दुष्काळ पडला।शेळ्या-मेंढ्याला नाही पाणी ॥

पाण्यासाठी हांबारती गायी।मेंढ्या आयाची बाळ तानी ॥

दाजी शेळकेन घोंगड पालवल। आल मुळसळधार पाऊसासकट पाणी॥
- आबासो पुकळे, १ फेब्रुवारी २०१५

शिंग्रोबा धनगरासारखेच एक "उपेक्षित कुंभार्ली घाटाचे संशोधक सोनू धनगर".

शिंग्रोबा धनगरासारखेच एक "उपेक्षित कुंभार्ली घाटाचे संशोधक सोनू धनगर".

दुर्लक्षित मेंढपाळ आदिम संस्कृती व उपेक्षित मेंढपाळ.
सुंबरान मांडिल गा, बिरू माझ्या देवाला ।
धरतरी मातेला गा, मेघराया पित्याला ।
चंद्र-सुर्य बंधुच गा, किसना-कोयना भनिला ।

कोणत्याही बाह्य साधनांशिवाय कळणारी अवघ्या सृष्टिची एक भाषा असून याचेही ज्ञान उमगते. ही भाषा प्रकृतीपुत्राला पशू-पक्ष्यांची भाषा शिकवत,वारा-पाण्याची दिशा दाखवते,झाडाझुडपांचे- मुळ-फांदिचे गुणधर्म दाखवते,अवघ्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जात असते. आदिम संस्कृतीत मेंढपाळ समाजांनी डोंगर-दर्र्यात,रानात, जंगलात,शेतात आणि माळरानात थेट वाटा वर्षानुवर्षे पायाखाली घातल्या आणि त्यांच्या या पाऊलवाटांनी आजच्या सडका आणि घाटमाथ्यावरचे वळण-वाकणाचे रोडमॅप बनवले होते. हे आज जगमान्य सर्वश्रुत आहे.

शिंग्रोबा धनगरासारखेच एक "उपेक्षित कुभार्ली घाटाचे संशोधक सोनू धनगर".

कुभार्ली घाट-जागतिक वारसा स्थानात नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुभार्ली घाट. हा घाट चिपळून-कराड-सातारा-पुणे-बेंगलोर या शहरांना जोडतो.या घाटातील सर्वोच्च ठिकाण घाटमाथा म्हणून ओळखले जाते. कोकण व घाटांना जोडणारा हा केंद्रबिंदू असून प्रचंड वेगाने वाहणारे थंडगार वारे,सूर्यास्ताप्रसंगी दिसणारे नयनरम्य दृश्य अनुभवण्याचा विलक्षणीय आनंद येथे घेता येतो. कोयना अभयारणयाच्या पार्श्वभूमीवरील वनराईमुळे निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो.
मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून व्यापारी दळण-वळणाचा मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या नव्हे तर भारताच्या प्रयटन व्यवसायात महत्वाची भुमिका बजावणार्र्या या कंभार्ली घाट परिसरात एकेकाळी मोठी बलशाली व संस्कृती संपन्न राज्यव्यवस्था नांदत होती. ब्रिटीशांनी येथील "सोनू धनगराच्या" मदतीने घाटरस्ता मार्ग काढला. त्यानंतर सोनू धनगराला ठार मारण्यात आले. आजरोजी सोनू धनगराची समाधी त्याठीकाणी आपणास दिसते. वाटसरू अथवा प्रवासी कोणीही असो या वळणावर हुतात्मा सोनू धनगराला नमस्कार करून पुढे होतात.
- ए.एस.पुकळे 

February 1, 2015 at 3:01pm ·

महाराजा यशवंतराव होळकर जयंती ६ डिसेबर २०१६


सागंली शहरात महाराजा यशवंतराव होळकर यांची 241 वी जयंती साजरी

महाराजा यशवंतराव होळकर जयंतीने सांगली शहराच्या लौकीकात भर

सांगली (आबासो पुकळे) : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा-र्या महाराजा यशवंतराव होळकर चौकात होळकर अनुययांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 241 व्या जयंतीचे दिमाखदार आयोजन करत सांगली शहराच्या लौकीकात भर घातली. यावेळी चौक नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व दिप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 07 व 08 जानेवारीला सोलापूर येथे होणा-या ऐतिहासिक पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या लोगोच यावेळी अनावरण करण्यात आले.
जयंती उत्सवात विविध मान्यवरांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमी शौर्याची गाथा,साहित्य संमेलनांचे महत्व विषद केले.

"यशवंतराव होळकर यांच्या स्फूर्तीतूनच नेपोलियन बोनापार्ट इंग्रजाविरूद्ध लढले" -इतिहाकार अनिल मिसाळ
काही इतिहासकार म्हणतात भारताचा नेपोलियन बोनापार्ट यशवंतराव होळकर हे चुकीचे असल्याचे सांगत ते म्हणाले, महाराजा यशवंतराव होळकर यांच्याकडूनच स्फूर्ती घेऊन नेपोलियन इंग्रजाविरूध्द युद्धास तयार झाले असल्याचे परखड मत इतिहासकार लेखक अनिल मिसाळ यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी हक्कराय बुक्कराय, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बिंदूसार, मल्हारराव होळकर, अहिल्यामाई होळकर यांचा इतिहास सांगून ते म्हणाले,तुकोजीराव होळकरांनी इंग्रजांचा सर्वप्रथम पराभव केला.
आष्टा नगरसेवक बाबासाहेब सिद्ध म्हणाले, पांढरा कपडा घालून नेता होता येत नाही. *समाजाने एकसंघटीत होऊन लढा उभारावा.

उपोषणकर्ते श्रावण वाक्षे म्हणाले, आरक्षणाची अंमलबजावणी करावी. सरकारने समाजाला फसवाफसवी करू नये.
"महिला व कुटुंबामध्ये जागृती होणे काळाची गरज" - संगिताताई खोत नगरसेविका सांगली.
जयंती आयोजन टिमचे भरभरून कौतुक करून त्यांनी समाजाची अपेक्षीत असणारी जागृती होत नसल्याची उपस्थित समाजबांधवापुढे खंत व्यक्त केली. समाजातील महिलांनी बाहेर पडावे. त्या पुढे म्हणाल्या, जोपर्यत महिला व कुटुंबामध्ये समाजातील प्रश्नांची जाणीव होणार नाही तोपर्यंत समाजातील महिला उठाव करणार नाहीत. त्यासाठी समाजातील प्रत्येक महिला व कुटुंबामध्ये जागृती होणे काळाची गरज आहे.

"अहिल्यामाई, मल्हारराव, यशवंतराव होळकर यांची राज्यभर चौकात स्मारके उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा" - विष्णू माने नगरसेविक सांगली. 
सांगली शहरात अहिल्यामाई होळकर स्मारकाचे 80% काम पूर्ण असून उर्वरित काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आपले पूर्वज कोण होते याचे स्मरण व्हावे यासाठी समाजातील महामानवांची चौकाला नाव देण्यात यावे व स्मारके उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढकार घ्यावा असे परखड विचार श्री. माने यांनी मांडले. सामाजिक कार्य करणाराला आर्थिक मदत केली पाहीजे. समाजातील निंदा, टिका टिपणी टाळून समाजाने एकतरीत लढा उभारला पाहिजे. महिलांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक गल्लीत अहिल्यामाई होळकर जयंती साजरी झाली पाहिजे असे प्रतिपादन करून सांगली मार्केट कमिटीला होळकर राजांचे नाव दिले पाहिजे अशी जोरदार मागणी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत(आण्णा) शेजाळ यांच्याकडे केली असता उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाटात मागणीचे स्वागत केले.

"समाजाला चांगल्या शिक्षणाची गरज" - विजयाताई घुटुकडे
प्रथमच होळकर मंचकावरून प्रबोधन करणा-या विजयाताई घुटुकडे यांनी शिक्षणाने समाजाचे आचार विचार बदलतात, समाजाची मानसिकता सुधारली पाहिजे, समाजाला चांगल्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले.
*समाजाच्या चळवळीमध्ये नेटाने काम करणार*- प्रशांत(आण्णा) शेजाळ अध्यक्ष मार्केट कमीटी सांगली.
समाजाच्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची ग्वाही दिली व नगरसेवक माने यांनी केलेली मागणी जीवाची बाजी लावून एखाद्या विभागाला नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे शेजाळ यांनी सांगितले.

समाजाच्या एकत्रित ताकदीपुढे प्रस्थापितांना झुकावे लागते- डॉ. इंद्रकुमार भिसे.
समाजाला मिळणारी पदे कोणताही प्रस्थापित सहजासहजी देत नाही. समाजाच्या एकत्रित ताकदीपुढे प्रस्थापितांना झुकावे लागते तेव्हा समाजाला पदे मिळतात. बी के कोकरे यांच्यामुळे समाजात अस्मिता जागी झाली. 1999 ते 2002 या काळात यशवंत सेनेमुळे प्रस्थापितांना बीड, अहमदनगर, पुणे अशा अनेक जिल्हा परिषदांमध्ये धनगर समाजाला अध्यक्षपदे द्यावी लागली होती. डॉ.भिसे पुढे म्हणाले की,31 मे ला घरावर गुढी उभारली पाहिजे. जयंतीमध्ये गट तट आणू नये. प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत.

"जो इतिहास जाणता है । वो इतिहास बनाता है" । - अमोल पांढरे प्रसिद्धीप्रमुख आदीवासी धनगर साहित्य संमेलन
सुरवातीलीच समाजातील बोलीभाषेतील शब्दाचा उच्चार करून आता समाजबांधवाचा प्रवास साहित्य संमेलनापर्यत झाला आहे असे उदगार काढत अमोल पांढरे यांनी साहित्यसंमेलाची रूपरेषा कथन केली व साहित्य संमेलनाचे महत्व विषद केले. ,महामानवांना जगण्याचा अर्थ समजला होता काय ? असे बोलत
होळकराशाहीतील शौर्याची प्रतिके असणा-या इंदोर, महेश्वर, भानपुरा येथे समाजबांधवानी जाऊन आपला इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन पत्रकार अमोल पांढरे यांनी केले. 'युगपुरूष कितीही मोठा असला तरी अनुयायी जीवंत नसला तर तो महापुरूष संपतो' असे वॉरेन हॅस्टींग यांच तत्व सांगितले. दुरचित्र वाहीनीद्वारे दाखवण्यात आलेल्या अहिल्यामाई होळकर मालिकेतील प्रसंग सांगून जगाला दिशा देण्याचे कार्य होळकर घराणयाने केले असल्याचे सांगितले. वाचाल तर वाचाल याचं समाजाने भान ठेवावे.

"प्रगतीपथावर जाणारा समाज घडवण्यासाठी साहीत्य संमेलन"- जयसिंगतात्या शेंडगे, स्वागत अध्यक्ष आदीवासी धनगर साहित्य संमेलन.
समाजाने यात्रा देव धर्म यावर होणारा खर्च थांबवून मुलांच्या शिक्षणासाठी करावा. साहित्य संमेलनात विचारांचा खजिना लपलेला आहे. समाजबांधवानी विचाराच सोन लुटण्यासाठी साहीत्य संमेलनाला यावे असे आवाहन करून प्रगतीपथावर जाणारा समाज घडवण्यासाठी साहित्य संमेलन असलयाचे प्रतिपादन स्वागत अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे यांनी कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानावरून केले.
कार्यक्रमस्थळी श्रावणी कोळेकर या बालकन्येने उभारलेल्या पुस्तक स्टॉलने लक्ष वेधून घेत समाजबांधवापुढे आदर्श उभा केला. यावेळी खेळाडू, नवनिर्वाचित नगरसेवक, मार्केट कमिटी अध्यक्ष प्रशांत शेजाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पलुसचे नगरसेवक संदीप सीसाळ, विठ्ठल खोत, पांडुरंग रुपनवर,नगरसेवक अर्जुन माने, रासपचे संपर्क प्रमुख विक्रम ढोणे, ज्येष्ट मार्गदर्शक राजारामबापू शेंडगे, रासपचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश टेंगले,लेखक युवराज पाटील,हरीदास लेंगरे,हेंमत येडगे,पत्रकार उत्तम जानकर, विशाल सरगर,विनायक रूपनवर, क्रीडाधिकारी सुहास होनमाने, अमृत जानकर,पै.संभाजी सरगर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.जयंती उत्सवाचे प्रास्ताविक निवांत कोळेकर सर, सुत्रसंचालन तानाजी दुधाळ सर,सागर मदने यांनी केले. होळकरी रक्ताने पेटून उठून समाज कार्यात वाहून घेतलेले समाजसेवक भारत तात्या व्हनमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती निमित्त लेख - २०१५

३० एप्रिल २०१५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती निमित्त 



आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती. दुर्दैवाने राष्ट्रसंतांचं अद्वितिय कर्तृत्व आपण विदर्भापुरतंच मर्यादित ठेवलं आहे. हा राष्ट्रसंत राज्यभरातही पोहचवू शकलो नाही. त्यांचे अनुयायी याला कारण असतीलही. पण पुण्या मुंबईच्या बाहेर न पाहणारं मराठीचे विचारवंतही याला तेवढेच कारणीभूत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील यावली हे लहानसं गाव. ह्या गावात ३० एप्रिल १९०९ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. जन्मताज घरावरचे छप्पर सोसाट्यच्या वा-याने उडवून नेले आणि वरचे आकाश हेच घराचे छप्पर बनून राहिले. त्यांच्या आईचे नाव मंजुळामाय व वडिलांचे नाव बंडोजीबुवा होते. घरात अत्यंत गरिबी. माधानच्या अंध संत गुलाबराव महाराजांनी त्यांचे बालपणीचे नाव माणिक असे ठेवले. मराठी शाळेचे दोन चार वर्ग शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरु आडकोजी बाबांच्या कृपा प्रसादाने तुकड्यादास नावाने भजन लिहायचे. त्याचे भजन जनसामान्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान फक्त देवभक्ती नव्हती तर समाजातील दुःख , वेदना विषमता , त्यांच्या भजनातून प्रतीत व्हायची. एक सुजलाम् सुफलाम् देशाचे स्वप्न त्यांनी बघितले होते.
झाड झडुले शस्त्र बनेंगे , भक्त बनेगी सेना
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे
१९४२ चे स्वातंत्र्य जनआंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर , आष्टी , यावली , बेनोडा येथील स्वातंत्र्य संग्राम यांच्याच प्रेरणेने घडला. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. मग ते चीन युद्ध असो वा पाकिस्तानचे. त्यांच्या लोकपयोगी कामांकडे पाहून महात्मा गांधी आकर्षित झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठ्या आदरातिथ्याने दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजरी भजनाचा कार्यक्रम झाला. त्या भजनाने प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले , आप संत नही , राष्ट्रसंत है. मग सा-या जगाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले.
महाराजांच्यी खंजरी भजन ही भजन पद्धती एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार थेट हृदयालाच जाऊन भीडत. ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांची खड्या आवाजातील भजने क्षणात जनमनाचा पगडा घेत. त्यांची भजन सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्यात यशस्वी झाली.
१९५५ ला जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान राष्ट्रसंतांना मिळाला. तिथे परिषदेच्या आयोजकांनी त्यांना जपानमधे राहून काम करण्यासाठी मोठी प्रलोभन दाखवली. पण आपल्याला भारतातच काम करायचंय सागून ते परतले. ग्रीन कार्ड आणि एच वन व्हिसा हेच सर्वस्व मानणा-यांसाठी हा मोठाच धडा आहे
ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणा-या बुवाबाजीविरुद्ध व अंधश्रद्धेविरुध्द संत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदु बुवांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरेही ओढले आहेत. ग्रामीण , आदिवासी भागात आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याला गावोगावी पोहचविण्याची आज खरी गरज आहे. तिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
ग्रामगीता ही राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचं सार. अनेक संतांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिले. पण अशी गावाच्या विकासाचा मार्ग सांगणारी ही गीता केवळ अद्वितिय आहे. आजही त्यातलं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान भुरळ पाडणारं आहे. ' ग्रामगीता नाही पारायणासी ', असं राष्ट्रसंत कठोरपणे सांगतात.
११ ऑक्टोबर १९६८ रोजी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले. १२ ऑक्टोबर सकाळी ध्यानाचा कार्यक्रम झाला. एका सुशोभित ट्रकवर राष्ट्रसंतांचा चिरनिद्रा घेत असलेला देह ठेवला गेला आणि भजनाच्या निनादात दास टेकडीचं दर्शन घेण्यासाठी दिंडी निघाली. आयुष्यभर राष्ट्रसंतानी दिलेला मानवतेचा संदेश ह्या अंत्ययात्रेत दिसत होता. सर्व धर्म , पंथ , संप्रदायाचे लोक यात सहभागी होते. गुरुदेव सत्संग मंडळ देशभर त्यांचा विचारांचा प्रसार करण्याचे काम करते.
ए.एस.पुकळे

April 30, 2015 at 1:57pm ·

'विलिंग्डन' महाविद्यालयात गणित विभाग क्रमांक 1 चा विभाग- प्राचार्य. बी व्ही ताम्हणकर



'विलिंग्डन' महाविद्यालयात गणित विभाग क्रमांक 1 चा विभाग- प्राचार्य. बी व्ही ताम्हणकर
--------------------------------------------
सांगली/आबासो पुकळे (28 जुलै 2017): पदव्युत्तर पदवीसाठी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 'विलिंग्डन' महाविद्यालयात एम एस्सी गणित भाग-1 साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ वेलणकर सभागृहात आयोजीत केला होता. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.बी व्ही ताम्हणकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागता प्रसंगी बोलताना सांगितले की, शिवाजी विदयापीठातील 'विलिंग्डन' एक चांगले महाविद्यालय आहे. महाविद्यालयात गणित विभाग क्रमांक 1 चा विभाग ओळखला जातो. ते पुढे म्हणाले, आजपर्यंत या महाविद्यालयात खूप विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले आहेत. करिअरच्या खूप संधी असताना विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षणासाठी महाविद्यालयात PG ला प्रवेश घेतला. यावर्षापासून गणित विभाग मुख्य इमारतीतून हलवून स्वतंत्रपणे संगणक लॅब, वर्ग,स्टाफ रूम देत आहोत. काही दिवसांतच गणित विभागाचा चेहरामोहरा बदलेल. पुढचे वर्ष महाविद्यालय शतकोत्सव साजरा करणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्व कृतीकार्यक्रमात सहभागी व्हावे.

पुस्तकी ज्ञान म्हणजे पदवी नव्हे : प्रा.डाॅ.यू एच नाईक
------------------------------------------
विद्यार्थ्यांनी काॅलेज जीवनात शैक्षणिक गोष्टी बरोबरच सांस्कृतिक दृष्ट्या अन्य कार्यक्रमात सहभागी होऊन नवनवीन गोष्टी शिकाव्यात. "काॅलेजमधून पुस्तकी ज्ञान घेऊन जाणे हा एकच विषय असू नये. पुस्तकी ज्ञान म्हणजे पदवी असा अर्थ होत नाही" असे प्रतिपादन गणित विभागाचे अधिविभागप्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक यांनी केले. 
एम एस्सी भाग-2 च्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात अभिमानाने सांगण्यासारखे नवीन काहीतरी करावे. एम.एस्सी चे विद्यार्थी काॅलेजमध्ये सर्वात वरिष्ठ आहेत, वरिष्ठतेचा फायदा बी एस्सी भाग-1,2,3 च्या विद्यार्थ्यांना करून द्यावा. गणितातील काही अडचणी सोडवून दिल्या पाहिजेत ; असे केल्यास स्वतःचे गणित सुधारते. गणित हा उपकाराचा विषय नाही याची जाणिवही श्री नाईक सर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कुठल्याही वर्गातील गणित सोपे असते असे कधी होत नाही. गणित हे गणितच असते.

विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये शिक्षकांसोबत बोलते व्हावे, एम एस्सी म्हणजे काय? कोणते विषय शिकायचे असतात? एम एस्सी पूर्ण कशी करावी, काय करायला पाहीजे अशा सर्व अनुषंगाने प्रा.एस एम दिक्षित सर यांनी त्यांच्या अनुभावातून एक गणितावरील सुदंर अशी कविता व्यासपीठावरून सादर केली तर नवनिर्वाचित प्रा.एम एम कोरे सर यांनी तालासुरात एक 'गवळण' सादर केली.
कार्यक्रमासाठी प्रा.डाॅ.एम एस बापट, प्रा.डाॅ.जी डी शेळके, एम एस्सी भाग-1 व भाग 2 चे विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत समारंभाचे प्रास्ताविक करताना शुभम हुजरे यांनी महाविद्यालयाची ओळख सांगितली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहीत कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन ओंकार पाटिल यांनी मांडले.

विलिंग्डनमध्ये राज्यस्तरीय रामानुजन गणित प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धा -२०१८

'विलिंग्डन'मध्ये राज्यस्तरीय रामानुजन गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात


---------------------------------
विद्यार्थ्यांनी गणितात करिअर करावे : डाॅ.सायली जोशी
---------------------------------
सांगली/आबासो पुकळे : १७ जानेवारी २०१८ ::  विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागाकडून आयोजीत केलेली राज्यस्तरीय रामानुजन प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धा-2018 उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. थोर भारतीय गणिती श्रीनीवास रामानुजन यांच्या जयंती निमीत्त भारत सरकारने सन-2012 पासून रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.  विलिंग्डन महाविद्यालय गणित विभागाच्या वतीने गत सात वर्षापासून राज्यस्तरीय रामानुजन प्रश्नमंजुषा स्पर्धा व भित्तिपत्रिका प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. 

"विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागाने सुरू केलेला रामानुजन प्रश्नमंजुषा व भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धेचा उपक्रम चांगला आहे. गणिताची आवड असणा-या विद्यार्थ्यांनी गणित विषयात  करिअर करावे" असे प्रतिपादन एस.बी जी.आय गणित विभागप्रमुख डाॅ.सायली जोशी यांनी केले. त्या स्पर्धेच्या उद्धघाटनप्रसंगी विद्यार्थ्याशी बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, गणित विषय ब-याच लोकांना अवघड का वाटतो हे मात्र माहीती नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी गणित विषयात करिअरच्या खूप संधी आहेत. एम.एस्सी नंतर चांगल्या संस्थांमध्ये पात्रता परिक्षा देऊन नामांकित संस्थांमध्ये गणित विषयात संशोधन करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. वेळेला महत्व देऊन मोबाईलचा वापर फक्त चांगल्या कामासाठी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सागर फडके म्हणाले, गणित विभागाने घेतलेल्या कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी स्फूर्ती मिळेल. जगात कुत्रिम तंत्रज्ञानात योगदानासाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे त्यासाठी उत्तम गणिततज्ञ तयार व्हावेत. गणित विभागाचे अधिविभाग प्रमुख प्रा. डाॅ.यु.एच.नाईक यांनी भारतीय गणितज्ञांच्या कार्याकडे दुर्लक्ष झाले असले तरी जागतिक पातळीवर उशीरा का होईना दखल घेणे भाग पडत असल्याचे सांगितले. भारतीय गणितज्ञांची माहीती नव्याने आता जगासमोर येत असल्याचे सांगत सर्वांचे लक्ष वेधले.

स्पर्धेचे उद्धघाटन एस.बी.जी.आय च्या गणित विभाग प्रमुख डाॅ.सायली जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेऴी रामानुजन पीठावर स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पंडित, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सदस्य सागर फडके, आजीव सदस्य आर.जे. पाटील, डाॅ.आर.ए. कुलकर्णी, डाॅ.एन.के.आपटे, उपप्राचार्य डी.एम. मुंदुगणूर, उपप्राचार्य आर. एस.पोंदे उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रश्न मंजुषा स्पर्धेत अनुक्रमे : प्रथम क्रमांक - कु.माळी उत्कर्षा संजय( जयसिंगपूर काॅलेज), कु. पाटील श्रध्दा विवेक (के.डब्लू.सी काॅलेज सांगली), जावडेकर ओकांर दिपक (गोगटे जोगळेकर काॅलेज रत्नागिरी).  द्वितीय क्रमांक : कु.कडाळगे आरती परशुराम (डाॅ.घाळी काॅलेज गडहिंग्लज), कु. पाटील अपर्णा कृष्णा (डाॅ.घाळी काॅलेज गडहिंग्लज), जाधव सुजित संजय(बळवंत काॅलेज विटा) तर भित्तीपत्रिका प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक : कु.जाबुंरे ऋतुजा सुरेश, कु. शेडगे दिव्या नानासाहेब( वाय.सी काॅलेज वारणानगर) द्वितीय क्रमांक : कु. हांडे नेहा विश्वास( के डब्ल्यू सी काॅलेज सांगली)  या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

रामानुजन प्रश्न मंजुषा, भित्तिपत्रिका प्रदर्शन स्पर्धा एकुण तीन सत्रात आयोजीत केली होती. आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रम्हगुप्ता, महाविरा, माधवा या भारतीय गणितज्ञांची  स्पर्धेतील गटांना नावे देऊन त्यांच्या गणितातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. शेवटच्या सत्रात स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.भास्कर ताम्हणकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गणित अधिविभाग प्रमुख प्रा. डाॅ. यु.एच.नाईक, प्रा.डाॅ. एम.एस.बापट, प्रा.डाॅ.जी.डी शेळके, प्रा.एस.एम. दिक्षित, प्रा.एम.एम कोरे, प्रा. सौ. एस.ए.विभुते, प्रा. कु. एस एम.जाधव, प्रा. सौ.ए.व्ही. सूर्यवंशी, प्रा. सौ.चेतना मगदूम, प्रा. संतोष बाबर, प्रा.शाहीन बारगीर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी शुभम हुजरे, आबासो पुकळे, रोहित कांबळे, ज्ञानेश्वरी पाटील, पुजा साळोखे, सबिना मुजावर,अजिंक्य कुंभार, शितल राजगोळकर, अभिजित शिंदे, प्रियांका गुजर, अनिल गडदे, सैफ बागवान, विशाल सुर्वे, योगेश कोकरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय गणित दिन २२ डिसेंबर २०१७

विलिंग्डन महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा


-------------------------------------
भारतीय गणितज्ञांचे गणितातील योगदान महत्वाचे : प्रा.डाॅ. यु एच नाईक
-----------------------------------
सांगली /आबासो पुकळे दि.22 डिसेंबर : 
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमीत्त विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागातर्फे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.
 
गणित विभागाचे अधिविभागप्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करण्यात आला.

''भारतातील गणितज्ञांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना होणे अपेक्षित आहे. गणितासाठी भारतीयांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे" असे मत गणित विभागाचे अधिविभागप्रमुख प्रा.डाॅ. यु एच नाईक सर यांनी विद्यार्थ्याशी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, एव्हरीस्ट गॅल्व्हा सारखा गणिती मरण्यापूर्वी 60 पाने लिहून गणिताला खूप काही देऊन गेला. रामानुजन यांना भारतीय गणिती म्हणून जगभर ओळखले जाते. रामानुजन यांच प्रतिभावंत गणित पाहून प्रा. हार्डी सारखा गणितीही भारावला.

यावेळी प्रा.डाॅ.जी डी शेळके सर,  प्रा.एस एम दिक्षीत,प्रा. एम एम कोरे, प्रा.सौ. एस ए विभुते,प्रा.ए व्ही सूर्यवंशी, प्रा.एस एम जाधव, राजेश सूर्यवंशी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात लेखक राॅबर्ट कॅनिगेल यांच्या 'द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी : अ लाइफ ऑफ जिनियस रामानुजन' या पुस्तकांवर आधारीत 'द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी' हा चित्रपट दाखवण्यात आला. याप्रसंगी गणित विभाग बी.एस्सी,भाग-3, एम.एस्सी भाग-1 व 2 चे विद्यार्थी उपस्थित होते.

पत्रकार दिन १ जानेवारी २०१९




वृत्तपत्र क्षेत्रातील युगपुरुषांच्या विचारांचा अभ्यास पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी करावा,,असे प्रतिपादन दैनिक केसरीचे व्यवस्थापक मनोहर पेशवे यांनी केले.  टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली केंद्रातील पत्रकारिता विभागाच्यावतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

श्री. पेशवे पुढे म्हणाले की बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी  वृत्तपत्र चालू केले. त्याकाळी त्यांनी सामाजिक चळवळ आणि समाज सुधारणेबाबत मांडले विचार आजही तंतोतंत लागू होतात तसेच लोकमान्य टिळक यांनी शेतकर्यांसंदर्भात त्याकाळी २४ अग्रलेख लिहले. त्या अग्रलेखातील  विचार आजही उपयोगी पडत आहेत. म्हणून वृत्तपत्र क्षेत्रातील अद्यपुरुषांचे विचार तरुण पत्रकारांनी अभ्यासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. हेमंत मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी महिंद्रकर यांनी केले. राजू घाडगे, किरण पाटील, सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेले अशितोष उपाध्ये,आबासाहेब पुकळे आणि मच्छिंद्र कांबळी यांचा श्री. पेशवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे नियोजन संदीप कुंभार आणि परशुराम कोते यांनी केले.

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025