खोटी आश्वासने देऊन भुलवणाऱ्या पक्षांना थारा न देता रासपला पाठबळ द्यावे : महादेव जानकर
जन स्वराज यात्रेत भाजप, काँगेस, प्रधानमंत्री मोदींवर महादेव जानकर यांचा घणाघात
सातारा (आबासो पुकळे) : आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेवादाचा विचार घेवून राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल सुरु आहे. उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी जाता याव हे आमचे ध्येय आहे. आजवर जनतेला भुलविण्याचे काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला आता थारा न देता जनतेने रासपला मतांचे पाठबळ द्यावे, असे आवाहन करून मी एकवेळ आत्महत्या करेन पण, अन्य कुठल्याही पक्षातून आमदार अथवा खासदार होणार नाही, असे प्रतिपादन रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेचा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात ही जन स्वराज यात्रा आली आणि तिचं रुपांतर सभेत झालं. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय. यावेळी फुलेपिठावर रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिव ज्ञानेश्वर मंदिर, प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा वीरकर, जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक, ज्येष्ठ नेते भाऊसो वाघ, मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, माण तालुका बाजार समिती उपसभापती वैशाली वीरकर, युवक आघाडीचे अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरदभाऊ दडस आदींची उपस्थिती होती.
महादेव जानकर म्हणाले, मी वाहवत जाणारा माणूस नाही. एक काळ असा होता जेव्हा माझे सगळे सहकारी, मित्रपक्ष त्यांचं (भाजपाचं) चिन्ह घेऊन निवडणूक लढवू लागले होते. माझ्यावरही दबाव होता. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला कमळ चिन्ह घ्यावं लागेल. मी त्यांना म्हटलं "माझा राजीनामा घ्या, मी गावाकडं जाऊन शेती करेन किंवा मेंढरं राखेन. मला तुमची काही गरज नाही. मला हे सरकार नको आहे. मी तसं म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं तुमच्या चिन्हावर निवडणूक लढा."
जानकर घणाघाती भाषणात म्हणाले, प्रस्थापित पक्ष निवडणूकीत शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, बेरोजगारांची भाषा करतील, भाई बहनो म्हणतील, पण त्यांना भुलू नका, कारण हे मृगजळ आहे. त्यांना तुमचा विकास करायचा नाही, तुमची फक्त त्यांना मते पाहिजेत. जनतेने केवळ मतदार न होता तुम्ही निवडून गेले पाहिजे. झेंडे, रंग बदलून सत्तेत तेच ते लोक राहतात, हे चित्र रासपला बदलायचे आहे. तुम्हाला कुणाकडे तिकीट मागायची गरज नाही. आजवर ज्यांना राजकारणात जागा मिळाली नाही, त्यांना राजकीय सत्तेत आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जन्माला आलाय. लोकशाहीत राज्यकर्ते जेव्हा जनतेचे मालक होतात तेव्हा जनता भिकारी होते.
आमच्या ताटात माती टाकत असाल तर मी तुमचही ताट भरु देणार नाही, सुरुवात तुम्ही केलीत शेवट महादेव जानकर करेल, असा खणखणीत इशारा भाजपला दिला. जन स्वराज यात्रेचं सर्वच पक्षांनी माढा मतदारसंघात स्वागत केले आहे. याचा अर्थ माझा कोणीच शत्रू नाही. मी शत्रुत्व का स्वीकारत नाही? कारण मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती करू शकतो, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला. मला स्वतःच्या ताकदीवर आता दिल्लीला जायचे आहे. माझे मन मुंबईत रमत नव्हते. मला दिल्लीला जायचे होते. माझ्यावर दबाव टाकून मला राज्यात मंत्री करण्यात आले, असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला. आपलं लक्ष आता महाराष्ट्रात नसून दिल्लीकडे असल्याचंही महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.
मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ, हात आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असं मी भाजपला सुनावलं होतं, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.
महादेव जानकर म्हणाले, मी आमचं चिन्ह घेऊन लढत होतो. मी माझ्या पक्षातून चिन्हावर लढलो, परंतु ६९ हजार मतांनी पडलो. त्यानंतरच्या निवडणुकीत (२०१९) भाजपाने रासप आमदाराच्या बायकोला कांचन कुल यांना बारामतीतून उमेदवारी दिली. त्या कमळ चिन्हावर दीड लाख मतांनी पडल्या. त्यांच्याकडे कमळ होतं तर ते बारामतीत यायला पाहिजे होतं. आजही बारामतीची निवडणूक महादेव जानकरच लढू शकतो, हे मी चॅलेंज देऊन सांगतो.
मोदी ओबीसींच्या पाठीशी आहेत काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाव घेतात आणि ओबीसी मतावर निवडून येतात. मात्र हेच मोदी जातीनिहाय गणनेला विरोध करतात. जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे पंतप्रधान ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. जातनिहाय जनगणना सर्व समाजाची होणे गरजेचे आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल. आणि त्या प्रमाणात त्या जातीचा किती विकास झाला हे सुद्धा समोर येईल. जेव्हा हे सत्यसमोर येईल तेव्हा काँग्रेस आणि भाजपने कशी फसवणूक केली हे सुद्धा उघड होईल, असा दावाही त्यांनी केला. माढा तो झाकी है! वाराणसी अंतिम लक्ष है ! असे सूचक वक्तव्य जानकर यांनी बोलताना केले.
महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. आपला पक्ष चांगला जम धरत आहे. आपल्याला लोक स्वीकारत आहेत. हे सांगण्यासाठी फलटणमध्ये आलो आहे. तुम्ही मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेस जनतेकडून तुफान प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment