राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले
माढा लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात बोलताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बाजूस अन्य पदाधिकारी. |
माढा लोकसभा मतदार क्षेत्रात रासपची लढत भाजप बरोबर होणार : महादेव जानकर
फलटण (१७/२/२४) : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची लढत भाजप बरोबर होईल, असा खणखणीत इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी फलटणमध्ये विजय निर्धार सभा घेत पक्षाची भूमिका स्पष्ट करून विरोधकावर निशाण साधला. महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, मेळाव्यासाठी साडे तीन लाख रुपये गोळा झाले. आणि खर्च जेवणासह २ लाख १० हजार रुपये झाला. हाच कार्यक्रम जर भाजप किंवा काँग्रेसला घ्यायचा असता तर १ कोट रुपये खर्च केले असते. मी निवडणुकीत उभा राहिलो आणि 'खासदार झालो तर तुमच्या सोन्याच्या चुली होतील असे काही नाही'. परंतु मला खासदार होणे का गरजेच वाटतंय? हे सांगण्यासाठी आज हा मेळावा घेतला आहे. मी कधीच आमदारकी लढली नाही आणि लढणार देखील नाही. मी झालो तर खासदारच होणार आहे. माझी भूमिका हि मेणबत्ती सारखी आहे. मी जळत राहिलो पण प्रकाश मात्र शेतकऱ्याला मिळत राहील, असे जानकर यांनी म्हटले.
रासप नेते आ.जानकर पुढे म्हणाले की, मी कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जाणार नाही, तर तिकीट देणारा मी नेता आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी देखील केले. ते पुढे जाऊन नेते बनले. परंतु मला सुदैव असं मिळालं कि मला पक्ष बनून मला त्याच पक्षाचा आमदार, खासदार होण्याचं भाग्य मिळाल, हा माझा आणि यशवंतराव यांच्यातील फरक आहे.
आ. जानकर पुढे म्हणाले, आपल्याला आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि कोणत्याही खात्याचे मंत्री होता येतंय, पण कोणत्यातरी पक्षाचा झेंडा घेऊन. पण मी तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या तना, मनावर पक्षाचा झेंडा तयार केला. तो महात्मा फुले यांच्या गावात तयार केला आणि तो अखेरपर्यंत घेऊन जाण्याचा मी विढा उचललेला आहे. मला माढयातून १ लाख मते दिली. परंतु तुम्ही म्हणाल, मी पंधरा वर्षात काय केलं? कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत हा तुमचा झेंडा देशाच्या गादीपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी मंत्री असताना तीन खाती होती, पण खाती असताना मी १ रुपयांचा भ्रष्टाचार कधी केलेला नाही, हि शपथ घेऊन सांगतो, असे जानकर यांनी यावेळी म्हंटले. आजही मी आझाद पंछी फकीर आहे, फकीर म्हणूनच राहणार. आज मंत्री असतो शेतकऱ्यांचा दुधाला १०० रुपये लीटर दर केला असता.
माढा लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात जनतेत बसलेले महादेव जानकर व उपस्थित जनता. |
आ. जानकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा झाला नाही तरी, महाराष्ट्र रासपचे नेते काशिनाथ शेवते यांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्री ठरला जाणार नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाबरोबर न जाता स्वतंत्रपणे लढणार आहे. कार्यकर्त्यांनी आपल्याला कोणीतरी पाठींबा देईल या भ्रमात पडू नये. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची भाजप बरोबर लढत होईल. इथले खासदार माझे मित्र आहेत, ते राष्ट्रीय नेते होऊ शकत नाहीत, ते कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्याला मत देणार की, नेत्याला मत देणार हे ठरवा. मला राष्ट्रीय नेता होण्याची संधी द्या. मी तुमचा आहे. पक्ष तुमचा आहे. खटाव - माण, फलटण - कोरेगाव मधून दोन लाखाचे लीड द्या. मागीच्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात त्यांना जिंकून देऊनही भाजपने आमच्याशी कटकारस्थान केले. विधानसभेच्यावेळी आदल्या दिवसापर्यंत माझ्याबरोबर सभा घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पक्षाचा बी फॉर्म ऐवजी भाजपने त्यांचा बी फार्म दोन ठिकाणी दिला. या कपटनीतीचा महादेव जानकर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. महादेव जानकर यांचे काय मेरिट आहे, हे दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जानकर यांनी दिला. भाजपची काँग्रेस झाली असून, मूळ भाजपचे कार्यकर्ते मला आशिर्वाद देतील.
राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य कार्यकारणी सदस्य सैय्यदबाबा शेख, राज्य सरचिटणीस तथा नगर दक्षिण लोकसभा मतदार क्षेत्राचे उमेदवार रवींद्र कोठारी, युवा नेते अजित पाटील यांची भाषणे झाली. वाराणसी - काशी येथून पदयात्रेने काही कार्यकर्ते सभास्थळी हजर झाले होते, महाराष्ट्र रासप पक्षाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्यात राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मनोज निगडकर, राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर, अश्रूबा कोळेकर, बाळासाहेब कोकरे, प्रदेश उपाध्यक्षा वैशालीताई विरकर, राज्य सरचिटणीस सोमनाथ मोटे, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, भाऊसाहेब वाघ, राज्य कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सुळ, इंजी. दादासाहेब दोरगे, आप्पासाहेब पुकळे, कोकण महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, पुजाताई घाडगे, निशाताई माने, एड. विलास चव्हाण, खंडेराव जगताप, मुंबई प्रदेश सचिव संतोष ढवळे, रासेफ राज्य महासचिव जयसिंग राजगे, महादेव कुलाळ, एड. संजय माने, विनायक रुपनवर, तुकाराम गावडे, डॉ. बी. के. यादव यांचेसह निरनिराळ्या प्रांतातून पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक रासपचे फलटण तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले तर आभार निलेश लांडगे यांनी मानले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिखर शिंगणापूर येथील शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन चारचाकी वाहनांची रॅली काढली. शिंगणापूर- कोथळे- जावली- मिरडे- वडले- सोनवडी- सोनवडी बुद्रुक- कोळकीमार्गे ही रॅली मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment