Monday, September 26, 2022

अट्टल देवऋषी ते अंधश्रद्धा विरोधी : जगूबाबा गोरड

अट्टल देवऋषी ते अंधश्रद्धा विरोधी : जगूबाबा गोरड 

जगु बाबा गोरड पूर्वा आयुष्यातील एक बाबा.बुवाबाजी करणारा प्रसिद्ध बुवा. छान छोकीत राहणारा. बुवाबाजी करण्यासाठी भक्ताच्या खर्चातून विमानातून प्रवास करणारा. भक्तांच्या वर प्रभाव पाडण्यासाठी अफलातून चमत्कार करणारा. म्हणजेच स्मशानात लोकांना गोळा करून जळती ज्योत या झाडावरून त्या झाडावर स्वतःच्या दैवी मंत्रशक्तीने पळवायला लावणारा. जगू बाबा यांच्या अंगात देवी शक्ती असल्याने बाबाचा दरारा इतका की कोंबडीचं अंड पण बाबाच्या आदेशाने हवेत उडतात उडू लागत. अशा जगू बाबाची गाठ एकदा पडली ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत. चमत्कार झूट असतात, असे सांगणारे डॉ नरेंद्र दाभोळकर पण जगू बाबाचे चमत्कार बघून आश्चर्यचकित झाले. पण डॉ दाभोलकर पण कसलेले खेळाडू होते. शेवटी त्यांनी जगूबाबाचा भांडाफोड करून, जगू बाबाला लोळवलंच. खरंतर डॉ नरेंद्र दाभोलकर म्हणजे विवेकी विचारांचा परिसस्पर्शचं. ज्यांना ज्यांना या परिसाचा स्पर्श झाला. त्यांच्या त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला.जगू बाबाचं पण झालं तसंच. दोन-चार चर्चेमध्येच जगू बाबा डॉक्टर दाभोलकर यांच्या प्रेमातच पडला. आणि या जगू बाबा गोरडचा, बुवाबाजी करणारा जगू बाबा चा, आता अंनिस चा सक्रिय कार्यकर्ता मध्ये रूपांतर झाले. आणि महाराष्ट्रभर आणि बुवा बाबांचे भांडाभोड करून, बहारदार असे चमत्कार करून अंनिसचा विचार तळागाळापर्यंत नेला. जगू बाबा करीत चमत्कार बघून लोक आश्चर्यचकित व्हायचे. पण नंतर जगू बाबा त्याचे शास्त्रीय कारणे सांगितल्यानंतर लोकांना हातोहात फसले असल्याची जाणीव व्हायची. जसं वर जळत्या जोतिचा आणि अंड्याचा चमत्कार सांगितला. आता जळत्या ज्योतीचाच चमत्कार घ्या. अंधाऱ्या रात्री लोकांना स्मशानात नेऊन एक सरडा धरून सरड्याला काळाकुट्ट कलर देऊन सरड्याच्या शेपटीला आग लावून सरडा सोडून द्यायचा. लोकांना सरडा तर दिसायचा नाही पण इकडून तिकडून या झाडावरून त्या झाडावर पळणारी ज्योत मात्र दिसायची. आणि तो तरंगणारा अंडा. अंडा फोडून त्याच्यामध्ये भुंग्याला टाकून पद्धतशीर चिटकून टाकायचा. आणि या अंड्याला जगू बाबा आदेश द्यायचा जरी उड. की अंडे हवेत तरंगायचे. जगु बाबांचा प्रवास देवऋषि करणारा, लोकांना फसवणारा बुवा ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रबोधन करणारा विवेकी सहकारी हा प्रवास आश्चर्यकारक असाच आहे. असाच सर्व समाजाचा प्रवास तिमिरातून तेजाकडे होवो या अपेक्षेसह जगू बाबांना विनम्र आदरांजली.

 - फारूक गवंडी, तासगाव

============================================

जगूबाबा गोरड  (पूर्वार्ध)

हा माणूस आज जिवंत आहे की नाही, माहीत नाही. पण एका आयुष्यात काय काय जगून घ्यावं, हे या माणसाकडून शिकावं. उंच, किडकिडीत शरीर, दाढी मिशाच्या जंजाळात हरवलेला उभट चेहरा. धोतर अन तीन गुंड्याची पैरण. भुंग्यासारखे, बारिक लुकलुकणारे डोळे, ज्यात एखाद्याने डोकावून पाहिले की तो अडकलाच. नजरबंदी करणारी, गांजाच्या कैफात धुंदावलेली, त्याची पारखी नजर एका क्षणात पुढच्या माणसाचं पाणी जोखायची

दोन्ही हात भाजल्याने, बोटं वाकडी झाली होती, तरी त्या वाकड्या बोटांनी गांजा मळन्यापासून ते चिलीम भरून झुरका मारेपर्यंत त्याची नजाकत बघत राहावी.

कसलं अफाट आयुष्य जगला हा माणूस ! माण तालुक्यातलं, घाटाच्या वरचं “विरळी “हे एक खेडं, पण या पठ्ठ्या मुळे “मुंबई -विरळी “ही एस. टी. सुरू झाली होती. या आडाणी माणसाला मोठ मोठे बागायतदार, सधन व्यापारी, उद्योजक विमानाने फिरवत होते. अलिशान गाड्यातून न्हेत होते. हवेल्या, बंगल्यात त्याची बडदास्त ठेवत होते. सेवा करत होते …

लहानपणी जगू बाबाचा जीव शाळेत कधी रमलाच नाही. शेरंडं गुरं वळणे हाच जगूबाबा चा छंद. निसर्गात भटक भटक भटकायचा. दुधातुपाचं खावून, मोकळ्या हवेत फिरून जगूबाबाचं शरीर फोकासारखं चिवट आणि लवलवीत झालं होतं. हा कधी माणसात रमत नव्हता. पण माळरानाशी, झाडाझुडपाशी, शेरडा करडांशी एकरूप झाला होता. रानातल्या पाखरांची भाषा त्याला उमगू लागली होती. काही तरी अफाट करायचं हे वेड त्याच्या डोक्यातून जात नव्हतं ……

बारमाही ओल असणारी, चारी दिशांनी वाहून येणारं पाणी, कवेत घेणारी एक “ओघळ “त्याने हेरली होती. त्या ओघळीत तीन चार फुटाची सपाट जागा होती. त्यात झाडी झुडपं गच्च वाढली होती. गुरामागच्या सवंगड्यामुळे जगूबाबा गांजाची नशा करायला शिकला. गांजामुळे बुवा, बाबांशी संबध येवू लागला. आसपासच्या तांत्रिक,मांत्रिक, देवरूष पण करणाऱ्या लोकांशी जगूबाबा चा संबध येवू लागला. कष्ट न करता कोंबडं, बकरं नारळ, अंडी अन गांजाला पैसा मिळवणारया त्या मांत्रिकांचं त्याला अफाट कौतुक वाटायचं. त्यांची हवी ती सेवा करायला जगू बाबा एका पायावर तयार असायचा …..

चार पाच वर्षाने एकदम अचानक जगू बाबाच्या “अंगात “आलं. “माझा जीव गुदमरतोय, कुणी तरी मला बाहेर काढा, मला सावली द्या, नाहीतर मी गावाचं वाट्टोळं करीन …… “हात पाय झाडंत जगू बाबा, आदळा आपट करत धाडकन भुईवर डोकं आपटू लागला, कपाळाला बारीक खोक पडून रक्ताची धार कपडे लाल करू लागली. कुणी तरी जखमेत हळद भरून चिंधी बांधली. सगळं गाव गोळा झालेलं. जाणती, शानीसुरती माणसं विचारू लागली. “मला बाहेर काढा “…म्हणत उठून जगूबाबा माळाकडं पळंत सुटला, सगळा गाव त्याच्या मागं वरात काढल्या सारखा निघाला. “फावडी घ्या ..टिकाव घ्या …. “जगूबाबा बडबडत आदळत आपटत बसत उठत गावाच्या पुढं चालला होता. “ओघळीत आल्यावर जगूबाबा थांबला. वाळूत, खडकात शरीर झोकून देवू लागला. जमीनीवर हात आपटून खोदायचा इशारा करू लागला. मनगटागत जाडीच्या, झुडपांच्या गचपणात जगूबाबा जागा दाखवू लागला. बघता बघता झाडं तोडून जागा मोकळी केली गेली. मला वर काढा …जगूबाबा किंचाळू लागला. लगेच कुदळी टिकावाचे हात भीडले, माती उपसली जावू लागली. कंबरभर खोदल्यावर मुळांच्या गुंतावळ्यात अडकलेली सुबक आकारात घडवलेली देवीची दगडी मुर्ती दिसली. सगळ्या गावाने जल्लोष केला. वाजत गाजत देवीला अन जगूबाबाला गावात आणलं …एक देखणं मंदिर बांधन्यात आलं ..अन जगूबाबा “देवाचा माणूस “झाला. लोकांचं दुखलं खुपलं ..उपचार करणारा, बाहेरची बाधा बघणारा, कोडी सोडवणारा “देवऋषी “म्हणून पंचक्रोशीत प्रसीद्ध झाला ……

जगूबाबा चा दरबार भरू लागला. लांबून लोक येवू लागले. पोटापाण्याचा प्रश्न सुटला. पण जगूबाबा समाधानी नव्हता. एके दिवशी “घरातले, मंतरलेले गोटे “काढून टाकन्याचं काम घेवून गावातीलच एक जण जगूबाबा कडे आला. त्याचं घराणं आणि पुर्वज अघोरी उपासनेसाठी प्रसीद्ध होते. या पीढीकडे पण लोक संशयाने बघत होते. तो गडी वैतागून गेला होता. ही ब्याद घरातून निघाली तर मोकळा श्वास तरी घेता येईल, असा त्याने विचार केला. घराच्या भिंतीच्या फडताळात लाल कापडावर ठेवलेले, शेंदराने रंगवलेले आठ नऊ दगडी गोटे होते. सगळेजण त्याला “पितरं “म्हणत. जगूबाबाने होय नाही करत हे आव्हान स्विकारले. डोक्यात शेजारच्या गावातील देवऋष्याची मदत घ्यावी हा ही विचार होताच …

पण त्या देवरूष्याने कानावर हात टेकले. आसलं आवघड काम आपण कधी केले नाही, गोटे उलटले तर जीव घेतील, तु पण या भानगडीत पडू नको, असा सल्ला त्या देवरूष्याने जगूबाबाला दिला. पण जगूबाबा च्या इज्जतीचा सवाल होता. शेवटी जगूबाबाने धाडस करायचे ठरवले. बातमी गावभर, गावातून पंचक्रोशीभर झाली. बघायला गर्दी झाली. मनातून जगूबाबा घाबरलेला होता पण आता माघारी फिरता येत नव्हतं. अंगात धाडस येण्यासाठी जगूबाबाने हातभट्टीची पहील्या धारेची लावली. अन काय होईल ते होवू दे म्हणून कैफातच त्या घरात घुसला ….

लाल रेशमी फडके जमीनीवर अंथरले आणि गावदेवीचा धावा करून फडताळात हात घातला. हाताला गोट्यांचा थंडगार स्पर्श झाला. भीतीची एक लहर शरीरभर पसरत गेली. सगळ्यांचे डोळे जगूबाबा वर खिळलेले. जगूबाबाने तिरमिरीतच एक गोटा उचलला अन जमीनीवर अंथरलेल्या लाल रेशमी फडक्यावर ठेवला. लोकांनी निश्वास टाकला. आता दुसरा गोटा ‍..उचलला ठेवला. काहीच घडत नव्हते. अन जगूबाबाच्या खरा प्रकार लक्षात आला. कार्य येवढं सहज, सोपं झाल्यावर त्यात लोकांना काय विशेष वाटणार. तीसरा गोटा छातीवर घेवून जगूबाबा अचानक खाली कोसळला. गोटा छातीपासून ओढून काढायचा प्रयत्न करू लागला. गडाबडा लोळू लागला. जोरजोराने न कळणारे मंत्र म्हणू लागला. शेवटी कसा तरी तो गोटा निर्जीव करून, त्या भारलेल्या रेशमी फडक्यावर ठेवला. त्यानंतर प्रत्येक गोट्याबरोबर त्याची जीवघेणी लढाई होत होती. शेवटी सगळे गोटे निष्प्रभ करून, घामाघूम होवून गोटे बांधलेले रेशमी फडक्याचे गाठोडे घेवून भेलकांडत जगूबाबा घराबाहेर आला. लोकांनी जल्लोष करून जगूबाबा चा जयघोष केला. आता खरया अर्थाने एका देवऋष्याचा जन्म झाला होता ……येथून पुढे जगूबाबा यशाची अन प्रसीद्धीची शिखरे काबीज करत जाणार होता…


जगूबाबा गोरड ……(उत्तरा्र्ध )

………. जगूबाबा पंचक्रोशीभर जालीम देवऋषी म्हणून प्रसीद्ध झाला. बाकीचे देवऋषी त्याचा सल्ला घेवू लागले. जगूबाबा ची किर्ती सातारा, कोल्हापूर, पुणे करीत मुंबई पर्यंत पोहचली. अलिशान गाड्या जगूबाबा चा माग काढत विरळी ला येवू लागल्या. शरीर भोगाची अन मानसिक रोगाची जुनाट प्रकरणे जगूबाबा कडे येवू लागली. जगूबाबा त्यावर उपाय तोडगे सांगू लागला. जगू बाबा च्या हाताला जसा गुण येवू लागला, तसे लोक त्याच्या पायावर नतमस्तक होवू लागले. त्याच्या पुढ्यात धनाच्या राशी ओतू लागले. हळू हळू जगूबाबा हमखास गुण देणारा म्हणून महाराष्ट्र भर झाला. मुंबई ला गेलेले चाकरमाने गावाकडे आले की जगूबाबा ची महती अैकून दिपून जायचे, त्यामुळे मुंबईत जगूबाबा चे नाव झाले. मुंबई करांची गर्दी वाढू लागली. एस. टी. खात्यातील एका वरिष्ठ अधिकारी भक्ताने मुंबई -विरळी ही गाडी चालू केली. भक्तांनी खचाखच भरून गाडी रोज गावात येवू लागली. अनेक शिष्य तयार झाले. जगूबाबा ला आता लोक बाहेर घेवून जावू लागले. विमानातून, अलिशान गाड्यातून फिरवू लागले ……..

पैशाला तोटा नव्हता. जगूबाबाने घर बांधले, जमीन घेतली. जगूबाबा आता भारतभर फिरत होता. प्रापंचिक विवंचना, असाध्य आजार, जुने मानसिक रोग, हेवे दावे, सुडबूद्धी, गुप्तधनाची लालसा ….असणारया लोकांना जगूबाबा ची गरज पडायची. जगूबाबा उपाय सांगायचा, यश आले तर जगूबाबा चे, नाही आले तर देवाची मर्जी …….बरं चाललं होतं जगूबाबाचं.

……………..

कोणत्या तरी शहरात डॉ.नरेंद्र दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मुलन वर व्याख्यान चालू होते. तेवढ्यात एक फाटका माणूस जवळ आला आणि मला दोन शब्द बोलू द्या म्हणाला. स्टेजवर आल्यावर त्याने स्वतः ची ओळख करून दिली. “मी जगूबाबा गोरड “…एक प्रसिद्ध देवऋषी. इतकी वर्षे हा धंदा कसा करत होतो. कुणाकुणाला मी कसे फसवत गेलो. लोकांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा, अंधश्रद्धेचा गैरफायदा कसा घेत होतो. याच गावात कीतीजणावर उपचार केले तेही सांगू लागला. कीती पैसा कमावला, पण घर जळालं, बायकापोरं गेली, पैसा भस्मसात झाला, हात जळाले, आयुष्याचा कोळसा झाला…………..

आता बस्स …… आता पश्चात्ताप होतोय. आता उर्वरित आयुष्य दाभोळकरांच्या चळवळीत…… जगूबाबा तुफान बोलंत होता. आपल्या आयुष्याचा पट उलगडत होता. एक एक किस्सा सांगत होता. त्याने सांगीतले, डॉक्टर, वकिल अन देवऋषी हे सख्खे भाऊ असतात. केस आली की डॉक्टर विचारतो, अंग दुखतंय का ताप येतो का, थंडी वाजून येते का, खाण्यात काय आलं का ? …वकिल ही प्रश्न विचारणार सात बारयाला कुणाचं नाव आहे, वहीवाट कुणाच्या नावावर आहे, शेतसारयाच्या पावत्या आहेत का ? वगैरे वगैरे. देवऋषी ही तसंच विचारणार रात्री आमक्या झाडाकडे गेलता का, वाईटावर कोण आहे का, अमक्या देवाला विसरला का,नवस फेडायचा राहीला का ? अशुभाची भीती घालून प्रश्नाचा अंदाज घेणार. लोकांची भीती हेरणार, तोडगे सांगणार. पण बाबांनो देवऋष्याच्या अंगात काही शक्ती नसते. सगळा भीतीचा बागूलबुवा असतो. औषधाने आलेला गुण देवऋष्याच्या नावावर खपतो. मनातली भीती निघाली की बाधा दुर होतात …….

जगूबाबाने त्या दिवसापासून अंधश्रद्धा निर्मुलन चे काम सुरू केले. लोकांना तो त्यांच्या भाषेत यातील फोलपणा समजावून सांगायचा. लोकांना ते चटकन पटायचं, लवकर भावायचं. जगूबाबा गावोगावी त्याचे अनूभव कथन करत लोकांच्या अंधश्रद्धा दूर करत फिरायचा. मानधन मिळालं, ठीक. नाही मिळालं ठीक. दाभोळकरांनी “सामाजिक कृतज्ञता निधी “तून दरमहा पाचशे रूपये मानधन त्याला चालू केले होते .जगूबाबा चे अनूभव कथन अतिशय प्रभावी व्हायचे. पण हा गडी चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर रमलाच नाही. दाभोळकर व्यसनमुक्ती ची पण चळवळ चालवायचे. जगूबाबाचे देवऋषी पण सुटले पण गांजाचे व्यसन काही सुटले नव्हते. गांजासाठी तळमळायचा, चोरून व्यसन करायचा …..कधी समितीचा निरोप आला की कार्यक्रमा ला हजर व्हायचा.

……..असाच फलटण च्या कॉलेजातील एक किस्सा जगूबाबाने सांगीतला. फलटण च्या कॉलेज मध्ये जगूबाबा चा आत्मकथनाचा कार्यक्रम ठेवला होता. कॉलेज ची पोरं भल्या भल्या प्राध्यापकांची दांडी उडवन्यासाठी ख्यातनाम. एखादा “बोअर “करायला लागला की संपलाच. त्यात जगूबाबा चा असला अवतार.दिसायला आडाणी, बोलनं गांवढळ. सभागृह खचाखच भरलेलं, पोरं पोरी, प्राध्यापक, स्टाफ, शिपाई, सगळ्यांची गर्दी झालेली. जगूबाबा उठला तसा पोरांचा अपेक्षाभंग झाल्यासारखा झाला. त्यांनी जगूबाबा ची टर उडवायला सुरूवात केली. जगूबाबाने पण सुरूवात केली ….

“पोरांनो, तुम्ही शीकलेली माणसं, मी आडाणी, आंगठे बहादूर मी तुम्हाला शहाणपण काय सांगणार …..जगूबाबाने त्याची कहानी सुरू केली, अन सगळे मंत्रमुग्ध झाले. जगूबाबा ची वेळ संपून गेली तरी जगूबाबा बोलतच होता ….

…….. कॉलेजच्या पोरीचीच गोष्ट सागतो. तरूण पोरगी, बाप पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर, पोरगी कॉलेजला जाता जाता खंगू लागली, अन्न पाण्यावरची तीची वासना उडाली, दिवसभर निरर्थक चाळे करू लागली.घुम्यासारखी बसून राहू लागली. सगळे उपाय झाले, बाहेरची बाधा आहे ही, सगळे सांगायचे, पण बाधा निघत नव्हती. पोरीचा बाप वेडापीसा होवून सगळीकडे चौकशी करायचा. माझं नाव त्यांच्या कानावर गेलं होतं, त्याने माझे पाय धरले. काय पण करा पण पोरीला बरं करा. लग्नाची पोर आहे, म्हणला. मी त्याच्या घरी गेलो. पोरीला पाहिलं,बाधा झालेल्या, लागीर झालेल्या मानसाच्या डोळ्यात एक वेडसर झाक दिसते. जगूबाबाच्या सराईत नजरेस ती दिसली नाही. त्याने सगळ्यांना सांगीतलं, मी उपाय करीन पण पोरीला एकटं सोडावं लागेल. पोरीला एका खोलीत सोडून सगळी बाहेर निघून गेली, अगदी बंगल्याच्या बाहेर.जगूबाबा सांगत होता ” मी पोरीच्या खोलीला आतून कडी लावून घेतली. पोरगी थरथरत उभी होती, मला पहात होती. मी एका झटक्यात तीच्या कपड्यांना हात घातला.” बरं झालं, मी बरेच दिवस उपाशी होतो, आज तुझा मी भोग घेणार,” असे म्हणून मी तीच्या अंगाला झोंबायला लागलो. पोरीला वाटलं हा बाबा आता आपली इज्जत लूटल्याशिवाय रहात नाही. पोरगी गयावया करायलालागली,रडायला, भेकायला लागली. “खरं सांग, तु ढोंग का करतेस “मी तीला दरडावून विचारले तशी पोरगी घडाघडा बोलायला लागली.” माझे एकावर प्रेम आहे, पण घरातले माझे लग्न दुसरीकडे जूळवायच्या प्रयत्नात आहेत म्हणून मी हे नाटक करत होते. पोरगी रडून मोकळी झाल्यावर मी तीला सांगीतले, पोरी मी तुझ्या बा सारखा, खरे हुडकून काढन्यासाठी मला पण कधी कधी असं खोटं वागावं लागतं.

पोरीला बाहेर आणल्यावर सगळ्यांना सांगीतलं हीची बाधा दूर झालीय, पण वर्षभर तरी पोरीच्या लग्नाचा विचार करू नका. सगळ्यांना वाटलं देवऋष्याच्या जालीमपणामुळे बाधा दूर झाली. पण खरं काय ते मला अन त्या पोरीलाच माहीती होतं ” ……..जगूबाबाने ती सभा जिंकली होती.

………..

जगूबाबा कधी सातार्‍यात आला की आमच्याकडे (मुक्तांगण ) ला मुक्कामी राहायचा. त्यावेळी रात्र रात्र आम्ही त्याच्या आयुष्याची विदारक कहानी अैकत राहायचो.पैसा, प्रसिद्धी भोगलेला जगूबाबा भणंग पणे दिवस काढताना कासाविस व्हायचा, त्याच्या वेदना त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसायच्या. मग पुर्वीची पापं, आठवणी, बायकापोरांचे दुख: तो गांजाच्या नशेत खोल खोल गाडू पाहायचा. बोलता बोलता एकदम गप्प होवून जायचा.

कॉलेज संपलं तसा चळवळीशी असलेला संपर्क तुटला पण संबंध संपला नाही. वैयक्तिक कार्य करतो पण संघटनेसाठी वेळ देता येत नाही ….त्यानंतर जगूबाबा ची कधी भेट झाली नाही. कधीतरी बारामतीला येईन म्हणायचा, पण आला नाही. त्याचे अनेक किस्से, घटना अजूनही मनात घर करून आहेत ….त्या अवलिया जगूबाबा सह……असलाच तर भेट होईलही …कुणी सांगावं …!


No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...