दुष्काळी भागाचा कायापालट करणारे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा
सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा अतीदुष्काळी तालुका आहे. याच दुष्काळी तालुक्यातील देवापुर गाव. येथील नांगरतास महादेव मंदिर इतिहास प्रसिद्ध आहे. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारे म्हसवड शहरापासून पाच किलमीटरवर राजेवाडी तलावकाठी ते वसले आहे. तलावाच्या पाण्याचा उपयोग हा सोलापूर जिल्ह्यातील गावांना होतो. सांगली जिल्ह्यातील गावांना होतो मात्र सातारा जिल्ह्यातील गावांना होत नाही. या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो. परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहून शेती करावी लागते. तोही वेळेवर पडला तर ठीक, नाहीतर १०० टक्के दुष्काळ पडनारच. दिवाळी संपली की लोकांना परमुलखात पोटासाठी जावे लागते. गावात म्हातारे, लहान मुले व त्यांना सांभाळणारी बाईमंडळी तेवढीच राहतात. या दुष्काळी पट्ट्यात कर्मवीर आण्णा आले, त्यांनी जाणले, या भागातील लोकांना हमखास जमीन कसण्यास मिळण्याचा एक मार्ग होता, तो म्हणजे राजेवाडी तलावाकाठची जमीन. तलावाचे पाणी जसजसे कमी होत जाईल, तसतशी ती जमीन त्यांना खंडाने कसण्यास मिळे. शासन या जमिनीचा कसण्यासाठी दरसाल लिलाव करत होते. हा लिलाव धनिक लोक घेत व या गावच्या लोकांना फारच चढ्यादराने कसण्यास देत. या गावातील कर्मवीर आण्णांनी लोकांची साधी घरे (झोपड्या) व गरीब स्थिती पाहून तेथे त्यांनी मराठी शाळा सुरू केली. या भागात मराठा, धनगर, सणगर व रामोशी, लोणारी या लोकांची वस्ती जास्त आहे. असा भाग पहिला म्हणजे कर्मवीर आण्णाना त्यांची सेवा करण्याचे आव्हानच मिळाले. कर्मवीर अण्णांनी हे आव्हान स्वीकारून आपल्यापरीने कामास लागले. मराठी सातवीची मुले बाहेर पडल्यावर हायस्कूल व पूज्य ठक्कर बाप्पांच्या नावाने वसतिगृह सुरू केले. परंतु या भागातील गरिबीमुळे पालकांना मुलांना शाळेत पाठवणे शक्य होत नव्हते. गुरे राखणे, मेंढरे राखणे, जळणकाटुक गोळा करणे, लहान मुलांना सांभाळणे इत्यादी कामामुळे या लोकांना इच्छा असूनही मुले शाळेत पाठवता येणे शक्य होत नव्हते. यामुळे शाळेत हजेरी कमी भरायची. विद्याखाते ग्रँट देण्यास नाखुश असायचे. यामुळे कर्मवीर अण्णांनी शासनाकडून कोर्ट कमिटेड मुले मिळवली व येथील वसतीगृहात ठेवली. हळूहळू लोकांना शिक्षणाचे महत्व पटू लागल्याने या भागातील मुलांची संख्या वाढू लागली.
येथील गोरगरीब मुलांना 'कमवा व शिका' योजनेसाठी वसतीगृहाच्या मदतीसाठी तसेच कॉलेजच्या मुलांना दिवाळीचे व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काम करून पैसे मिळवण्यासाठी कर्मवीर आण्णांनी शासनाकडून राजेवाडी तलावाकाठची सव्वाशे एकर जमीन खंडाने मिळविली. या शेतीमध्ये निरनिराळी पिके व भाजीपाला, मका ऊस लावण्यास सुरुवात केली. आता पंधरा-वीस एकर उस येथे असतो. या जमिनीला काळा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने विद्यालय व सायन्सचे ज्युनिअर कॉलेज आहे. या कॉलेजात ॲनिमल सायन्स अँड डेरी डेव्हलपमेंट, क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर शाखा शिकवल्या जातात. प्रत्यक्ष शेतीत नेऊन विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल चे धडे दिले जातात. तेथे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. आज काल हे सेंटर स्वावलंबी झाले आहे. देवापुर हे शिक्षण केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथे सोलापूर सांगली या जिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. रयत शिक्षण संस्था पाहण्यास कोणीही आले तर कर्मवीर आण्णा हे देवापूर केंद्र दाखवल्याशिवाय राहत नसत. देवापूर येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा प्रतिकूल परिस्थितीत कस राहावं, कसं जगावं याचेही व्यवहारिक शिक्षण घेत असतो.
कर्मवीरांनी 1953 साली सर दोराबजी टाटा ट्रस्ट रुरल वेल्फेअर बोर्डाने दुष्काळी माण तालुक्यात ग्रामीण विकासाचे काम हाती घ्यावे यासाठी कर्मवीर आण्णानी प्रयत्न केले. आण्णांच्या प्रयत्नानुसार बोर्डाने माण तालुक्यात काम करण्याचे ठरवले. देवापुर, गंगोती, हिंगणी, जांभुळणी, पानवन, पुळकोटी, पळसावडे, शिरताव गावे दत्तक घेतली. येथील लोकांना रयत शिक्षण संस्थातर्फे शिक्षण मिळाले व टाटा ट्रस्ट तर्फे भरपूर मदत मिळाली, यामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावले. खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा यांनी दुष्काळी भागाचा कायापालट केला. कर्मवीर आण्णा यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
- आबासो पुकळे
No comments:
Post a Comment