खासगीकरणाने आरक्षण धोक्यात, खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे : महादेव जानकर
पणजी (७/८/२५) : खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशनात बोलताना केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10 वे अधिवेशन पणजी येथे पार पडले. मंचावर प्राचार्य बबनराव तायडे, महासचिव सचिन राजूरकर व देशभरातील प्रमुख ओबीसी पक्षाचे नेते, अन्य मंत्री उपस्थित होते.
श्री. जानकर म्हणाले, ओबीसी समाज मोठा असला तरी त्यांच्याकडे थिंक टँक किती आहे, याचा विचार केला पाहिजे. ज्या लोकांनी सामाजिक आर्थिक मागास ठेवले तेच लोक पुढे पुढे करत आहेत. सामाजिक आर्थिक राजकीय प्रगती करायची असेल तर थिंक टॅंक लोकांची संख्या वाढली पाहिजे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसीला जागृत करण्याचे काम करत आहे. त्यांना दिशा दाखवली पाहिजे. दशा आणि दिशा सांगितली पाहिजे. ओबीसीनी सहारा घ्यावा, पण कुणाचा बेसहारा नको. ओबीसींनी मुख्यमंत्री आणि मंत्र्याकडे धावत जाणारी मानसिकता बदलली पाहिजे. ६२ टक्के ओबीसींना प्रत्येक क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे. लोकसंख्येच्या हिशाबाने ओबीसींसाठी तमिळनाडू राज्य चांगले आहे. आम्ही आमच्या राज्यात भीक मागणारे आहोत. मागणारा समाज राजा कधी बनत नाही. आम्हाला राजा बनवायचे असेल तर आमचे संघटन चांगलं बनवलं पाहिजे. इथे दोन राजकीय पक्षांचा बोलबाला आहे काँग्रेस आणि भाजप. तुमचे काही नाही, हे बदला. डोके ही त्यांचे आणि पायही त्यांचे. ओबीसींची प्रगती कशी होईल, याचा विचार करावा. ज्यांचे मत कमी ते राज करतात आणि ज्यांचे मत जास्त ते भीक मागतात.
ओबीसींनो, जोपर्यंत तुमचा पक्ष बनणार नाही, तोपर्यंत ओबीसी बेदखलच राहणार. देशाचा पंतप्रधान ओबीसी नेत्यांकडे आला पाहिजे, असे संघटन व्हावे. आरएसएसचे स्टेजवर एक माणूस असतो आणि आमच्या स्टेजवर हजारो माणसं आणि समोर कोणी नसतं हा बदल केला पाहिजे. ओबीसींसाठी महाज्योती बनवताना कॅबिनेट मंत्री होतो. मात्र ओबीसीला बजेट मिळत नाही. दुग्ध विकासमंत्री असताना ओबीसी मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी डेअरीच्या जागा दिल्या. मात्र बाकीच्या मंत्र्यांनी काय दिले याचा विचार केला पाहिजे. खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे ओबीसीला खासगीकरणात देखील आरक्षण पाहिजे. देशात ओबीसींचा एकही उद्योजक नाही. सुप्रीम कोर्टात एक ही जज नाही, प्रशासनात एकही चीफ सेक्रेटरी नाही. तुमचा कोणी अधिकारी नाही. ओबीसीनी राजकारण केले पाहिजे, पण कोणाचा चमचा बनून नाही.
No comments:
Post a Comment