कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती नाही : महादेव जानकर
मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा
मुंबई (२४/७/२५) : कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती होणार नाही. भाजप ही समाजात विष पेरणारी पार्टी आहे. संविधान संपवण्याचे काम करत असल्याने, मतधारक जनतेने सावध राहण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. श्री. जानकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ : ३० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा वैभवनगर शैक्षणिक सभागृह, चेंबूर मुंबई येथे पार पडला. या मेळाव्यात पक्ष शिस्त, मुंबई महानगरपालिका निवडणूक, देश व राज्यातील चालले राजकारण आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका याबद्दल रासपा राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. फुलेपीठावर राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई प्रदेश सचिव इकबाल अन्सारी, मुंबई प्रदेश खजिनदार महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई कामगार आघाडी नेते तुकाराम पाटील, महिला आघाडी मुंबई प्रदेश सचिव सौ. स्वाती जमदाडे, सौ. विद्याताई दुधाळ आदी विराजमान होते. मानखुर्द तालुका अध्यक्ष समीर खान, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव महेश बोडके यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अन्य पदाधिकारी, हितचिंतक, रासपप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात अनेक मान्यवरांनी महादेव जानकर यांची भेट घेतली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची कामगिरी पाहून पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले. अनेक पदाधिकारी पक्षात पदावर असूनही पक्षाचे सक्रीय सभासद नोंदणी, प्राथमिक सभासद नोंदणी केली नसल्याकडे लक्ष वेधले. पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता, इतर पक्षाशी सलगी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर ठेवू नये, अशा कडक सूचना दिल्या. पद घेऊन काम शून्य, अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद देऊ नयेत, कारण हे पदाधिकारी स्वतःची, पक्षाची, नेतृत्वाची फसवणूक करत असल्याची, ही गंभीर बाब स्वतः पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितली. प्रत्येक महिन्याला मीटिंग घेऊन, कोणते काम केले, किती संघटन वाढवले याचा आढावा घेऊन अहवाल पक्ष कार्यालयाकडे पाठवून द्यावा.
पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण स्वतः ठामपणे उभे राहून ताकद देवू, असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय समाज पक्षात सर्व भाषिक, सर्व प्रांतीय, सर्व जात धर्मियांना राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे मोकळे आहेत. पद मोठे आणि काम नाही, अशा पदाधिकाऱ्यांना श्री. जानकर यांनी सुनावले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकाऱ्यांनी करावी. कोणावरही अवलंबून न राहता वॉर्ड अध्यक्षपासून संघटन बांधणी करावी. महिला आघाडीचे संघटन मजबूत करावे.
No comments:
Post a Comment