ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे : महादेव जानकर
![]() |
पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, मंचावर डावीकडून बाळासाहेब कोकरे, प्रा. मनोज निगडकर, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, सुनीता किरवे. |
पुणे (१/८/२५) : ज्यांना सत्तेच्या विरोधात संघर्ष करायचा आहे, त्यांनीच माझ्यासोबत यावे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुणे येथे केले. श्री. जानकर हे राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा आयोजित कमिन्स हॉल, पत्रकार भवन, नवी पेठ येथे पदाधिकारी व कार्यकर्ती संवाद बैठकीत बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. श्री. जानकर यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह रासपाचे नेते स्व. सुनील दादा बंडगर यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रीय समाज पक्षाने भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मदत केली, मात्र सत्तेतवर आल्यानंतर त्याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवली नाही. आता भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
श्री. जानकर पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष कोणासोबत युती करणार नाही. स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे. पुणे शहर अध्यक्षांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती करावी. पुणे जिल्ह्यात दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षासाठी अनुकूल आहे, मात्र तिथेही म्हणावे तसे संघटन नाही. एखादा तालुका राहिला तरी चालेल, मात्र जिथे आपण राहतो तिथे तरी पक्षाचे संघटन उभे केले पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केवळ समाजमाध्यमावर फोटो टाकण्याचे काम न करता आपला पक्ष आणि पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसे जातील, यासाठी प्रयत्न करावे. आगामी महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक बूथवर एक कार्यकर्ता असला पाहिजे, असे नियोजन करा. पक्षाचा जो पदाधिकारी काम करणार नाही त्याला पदमुक्त केले जाईल. पक्ष सोडून जाणाऱ्यांचा विचार करू नका, जे भाजपमध्ये गेले त्यांची अवस्था आज काय झाली आहे, हे तुम्ही पाहता. उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस असे त्यांचे झाले आहे. भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करत असल्याने त्यांचे जुने कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊ शकतात, याचा विचार करायला पाहिजे.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजित पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्या श्रीमती सुनिताताई किरवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक लक्ष्मण ठोंबरे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे व राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment