मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे : महादेव जानकर
पुणे (१ ऑगस्ट २०२५) : मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलताना केले. मातंग समाज तर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. जानकर आपल्या भाषणात म्हणाले, आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मातंग समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मी अभिनंदन करतो. आण्णाभाऊ साठे आपल्यासाठी भरपूर काय करून गेले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या समाजाची काय प्रगती झाली आहे याचा आत्मचिंतन केलं पाहिजे. डीजे वाजवून धागड धिंगाना घालून समाजाचं भलं होत नाही, समाजाचं भलं करायचं असेल तर काय केलं पाहिजे याचं चिंतन झालं पाहिजे. मुक्ता साळवे यांनी लिहिलेले पत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. आज आम्ही महात्मा फुलेचे वारसदार समजतो पण महात्मा फुले यांची खरी जिवंत कहाणी कोणी ठेवली असेल तर त्याच नाव आहे लहुजी वस्ताद साळवे. मातंग समाजाचे बहुजन समाजावर उपकार आहेत. ज्यावेळी या देशातली व्यवस्था महात्मा फुलेंना संपवण्यासाठी निघाली होती, त्यावेळी मातंग समाजाचा एक महात्मा फुलेंच्या पाठीमागे खंबीरपणे होते. आज मातंग समाजाची भागीदारी कुठे आहे? आयएएस, आयपीएस, मंत्री नाहीत. आमचे गणेश लोंढे यांची मुलगी पाहील न्यायाधीश झाली, ती समाजाची भूषण आहे. मातंग समाजाच्या मुलाने मेल्यानंतर जागा मिळावी अशी मागणी केली, पण मातंग समाजाने राज्य करणारी जागा पाहिजे, असे मागावे. मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे. कुणाचे चमचे बनून, एक दोन मंत्री बनून भला होणार नाही. समाजातले शिक्षण वाढवावे लागेल. मुला मुलींसाठी होस्टेल बनवावी लागतील. मातंग समाजाची मुले अधिकारी झाली पाहिजेत, यासाठी समाजातील विचारवंतानी विचार केला पाहिजे. एक मुलगी जज बनवून चालणार नाही, सुप्रीम कोर्टाचा देखील जज बनला पाहिजे. ज्यांची मते कमी आहेत, ते आमच्यावर राज्य करतात. ज्यांची मते जास्त आहेत ते भीक मागत फिरतात, हे बदलले पाहिजे.
श्री. जानकर पुढे म्हणाले, लोकशाहीच्या शासन, प्रशासन, न्यायालय, पत्रकारिता या चारही स्तंभात मातंग समाजाची भागीदारी नाही. देशाच्या व्यवस्थेला हादरवणाऱ्या माणसाला लहुजी वस्ताद यांनी साथ दिली होती, आणि त्यांचे स्मारक बनवण्यासाठी आमच्या पोरांना लढा उभा राहू लागतो? बापजाद्यांसाठी त्यांना दहा मिनिटात पाहिजे ते मिळतं, यासाठी आम्ही राज्यकर्ते बनले पाहिजे. आपल्या समाजातील चमचे लोक तिथे आहेत, म्हणून समाजाचे वाटोळे झालेला आहे. आता एका सरांनी सांगितले संविधान बदललं, सत्तेत बसलेले संविधान बदलायला बसलेत, त्यात त्यांचं नुकसान नाही, आपले नुकसान आहे. पण आम्ही त्यांना बदलू देणार नाही, यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय. मागून हक्क मिळत नाही ते हिसकावून घ्यायचे ताकद ठेवावी लागेल. आण्णाभाऊ साठे ना वंदन करण्यासाठी मुख्यमंत्रीच इथे आला पाहिजे. मातंग समाजाची संख्या खूप आहे, सकाळपासून तरुण पोरं पेठेत फिरत आहेत. यात उद्योजक झाले पाहिजेत. बिल्डर झाले पाहिजेत. उच्चभ्रू सोसायटीत राहिला पाहिजे. आम्ही विधानसभेला मातंग समाजाला 22 तिकीट दिले पैसेही दिले. आताचे सरकार हक्क आणि अधिकार चोरणारे सरकार आहे. मातंग समाजातील धनवान लोकांनी गरीब मुला-मुलींना आयएएस आणि आयपीएससाठी दत्तक घ्यावे. आम्ही मेंढर राखायची आणि तुम्ही केरसुणी शिवायच्या ही व्यवस्था बदलायची असेल तर एक मुलगी कलेक्टर करा, एक मुलगा मंत्री करा. एकाला उद्योगपती करा. आज मी जजचा सत्कार केलेला आहे, पुढच्या वेळी चार-पाच कलेक्टरचा सत्कार करायची संधी मिळावी. आपल्यातले हेवेदावे जाळून टाका. व्यसनापासून बाजूला राहून उच्च प्रतीचं शिक्षण घ्यावे लागेल.
No comments:
Post a Comment