भु कैलास गिरी
झाली हुलजंती नगरी...
भारताचा सांस्कृतिक इतिहास आपण समजून घेतला तर आपणास लक्षात येईल भारत ही भूमी रत्नाची खाण आहे. इथे अनेक संत, महंत, साधू, शरण अनेक पंथ उदयास आले. त्यामध्ये महानुभव, वैष्णव, शाक्त देवी, वारकरी असे पुष्कळ पंथ मानणारी लोक इथे आहेत.
पंथाची सरळ सोपी व्याख्या करायची झाल्यास, ज्याच्या त्याच्या आराध्य दैवताला एक सर्वसामान्य जनमानसात प्रतिष्ठेचे स्थान निर्माण करून देणे. शिवाय जीवन जगण्याच्या पद्धती ज्या त्या पंथा प्रमाणे आचरणे. इष्ट देवता यांच्या पूजा पद्धती आपापल्या रीतीने परंपरा अशा धार्मिक कार्याचा प्रचार प्रसार करणे. त्यासाठी वेगवेगळी पुराण ग्रंथसंपदा अनेक प्रचार प्रसाराची माध्यम तयार करून जनमानसाच्या मनावर बिंबवणे हेच त्या साधकांचे किंवा अनुयायांचे काम असते.
भारतामध्ये देखील असे अनेक वेगवेगळे पंथ असतील पण त्याची एकच सोज्वळ वाट आहे.ती म्हणजे सर्वसामान्य माणसाला वाईट प्रवृत्ती पासून दूर करणे आणि त्याला भक्ती मार्गाला लावणे हेच सर्व सांप्रदायांनी केले आहे. माणसा माणसांमध्ये प्रेम, जिव्हाळा, नैतिकता प्रामाणिकपणा, भक्ती-भाव, एकाग्रता अशा अनेक मूल्यांचे अवलोकन करण्यासाठीच मुळात ह्या भक्ती प्रचार प्रसाराचे कार्य आहे.
अशाच प्रकारे महाराष्ट्र कर्नाटक ,आंध्र,तेलंगणा अशा प्रकारे अनेक राज्यात ज्या एका विशाल हालमताची व्याप्ती आहे. अशाच हालमतामधल्या वीर आणि पवाड पुरुष श्री महालिंगरायाच्या यात्रेच्या निमित्ताने हा सगळा प्रपंच....
ज्याप्रमाणे पंजाब पर्यंत संत नामदेवांनी भक्तीची पताका नेली. शिवाय गुरु ग्रंथ साहेब मध्ये त्यांच्या ओव्यांची दखल घेण्यात आली.भक्तीला कशाचीच सीमा नसते.अगदी त्याच नियमाप्रमाणे महाराष्ट्र पुण्यभूमी बारामती स्थानी जन्म घेऊन अनेक चमत्कार करत करत तर लोकांना भक्ती मार्गाला लावत,आपल्या पदस्पर्शाने अनेक भूभाग हिंडून मुक्या गाईंचे पालन करून जगासाठी कसे जगावे? परमार्थ कसा करावा ? याचे उत्तर द्यायचे झाले तर महालिंगरायाच्या चरीत्राकडे आपणा सर्वास डोळसपणे पहावे लागेल.
बारामतीचे मासाळ घराणे त्या मासाळ घराण्यामध्ये या महालिंगरायाचे जनन झाले. वडील तुकाराया चुलते सोमराया आई अमृताबाई व चुलती कनुबाई ज्येष्ठ बंधू जकराया असा इतका मोठा परिवार असताना त्यांनी आपल्या इष्ट दैवतासाठी परभागाला पर मुलखाला येऊन गुरुभक्तीची पताका रोवली.
वडडी वालग शिवस्थान जगात मिरवून अखिल मानवासाठी भक्ती मार्ग खुला केला. पुढे गुरु बिरोबा व महालिंगराया यांची भेट डोणज तळ्यामध्ये झाली. शिरडोण मठामध्ये महालिंगरायानी त्यांची विधिवत स्थापना करून गुरुभक्तीचे पोवाडे गायले.
गुरु बिरोबांनी महालिंगरायास अवघड अनेक गोष्टी सांगितल्या त्यामध्ये वाघिणीचे दूध आणणे न बेडकाने शिवलेले पाणी व बिन किटकाचे फुल अशा अनेक प्रकारे गुरु बिरोबाने महालिंगरायांची भक्ती पाहिली व खऱ्या सोन्याला खस लावला. त्यातून महालिंगराया आपल्या गुरुच्या प्रत्येक परीक्षेत उतरत गेले आणि गुरुभक्तीचा जणू जगाला महिमा दाखवला.
शेळ्या मेंढ्या राखून जगाला त्यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला.चरित्र नायक महालिंगराया सरते शेवटी भुकैलास हुलजंती येथील बाभळी बनात जगाचे कल्याण करत संजीवन समाधीस्त झाले.
महालिंगरायांची गुरूभक्ती इतकी अघाद व अपार होते की, प्रत्यक्ष शिवपार्वती यांना त्यांच्या पंच शिखराला मुंडास (पेरावा) अत्यानंदाने करत आहेत. त्याचीच खून म्हणून दरवर्षी दिवाळीच्या अमावस्याच्या रात्री बारा वाजता अजूनही प्रत्यक्ष शिव-पार्वती येऊन महालिंगरायांच्या पंच शिखराला आहेर करतात व मूक भाकणूकेची मोहोर उमटवतात. ही प्रथा शेकडो वर्षापासून सुरू आहे.
महालिंगरायांच्या चरित्रामधून चमत्कार न पाहता गुरुभक्तीसाठी केलेले कष्ट, कोनूर मठात कुटील सिद्ध भक्तांचे केलेले गर्वहरण,सदाशिव बबलाद येथे नावाड्याचे गर्वहरण, तर मुक्या शेळ्या-मेंढ्या वरती प्रेम करायला लावले. अशा अनेक मूल्यामधून महालिंगरायांचे चरित्र सूर्यासारखे तळपत राहते यात तिळमात्र शंका नाही.
आयुष्यभर आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणी मधून ओविकार मंडळी अशा महालिंगरायाच्या कथा गात चिरंतर ठेवल्या आहेत.त्यामूळे या वीर पुरुषांचा इतिहास आपणास समजत आहे. यांच्यामुळे भक्तीला उधाण येते आणि असा चरित्र नायक आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.
एक महान चरित्र नायक मराठी भुमीमध्ये जन्म घेऊन सर्व भाषेच्या सीमा पार करून कन्नड मराठी, तेलगू लोकांच्या मनावर आजतागायत निर्विवाद अधिराज्य गाजवतो. पण त्याची दखल कोणतेच माध्यम म्हणावे त्या ताकतीने अजूनही घेत नाही ही शोकांतिका आहे.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात भरली नव्हती. पण कोरोना रोगाचा प्रभाव कमी झाल्यामुळे त्याच उत्साहाने ही यात्रा 24 ते 26 ऑक्टोबर 2022 दरम्यान पार पडत आहे. या यात्रेसाठी अनेक गावच्या पालख्या येतात.लाखों लोक एकत्र येतात, भंडारा, लोकर, खोबरे, खारीक याची मुक्त हस्ताने उधळण करतात.सुख दुःखाच्या गोष्टी वाटून घेतात.असाच भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडतो.
*हुलीजयंती....*
आपल्या गुरुसाठी महालिंगरायांनी अपार कष्ट घेतले शिवाय गुरु बिरोबा चरणी महालिंगराया सदैव भक्तीपूर्वक तत्पर असायचे.एके दिवशी गुरूंनी आपणास वाघणीचे दूध खायला मागितले. तेव्हा महालिंगरायानी मोठ्या कष्टातून सकाळच्या न्याहारीला निंबाळ-वार्ती डोंगरातून वाघिणीचे दूध घेऊन आले आणि गुरुचरणी अर्पण केले .त्याच स्मृतिसाठी नारायणपूर गावाचे नामकरण हुलीजयंती असे केले.
*जतचे डफळे सरकार*
संस्थानिकांच्या काळामध्ये सध्याचे हुलजंती हे गाव जत संस्थांनात होतें. त्या संस्थानाचे राजे डफळे सरकार होते .त्यावेळी डफळे सरकारांना वाटले की, शिव पार्वती मुंडास बांधण्यासाठी येत नाहीत. हीच लोक मुंडास बांधतात आणि देवाने बांधले म्हणून सांगतात. त्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी म्हणून त्यांनी प्रत्यक्ष आपल्या शिपायांचा पारा तेथे रात्रभर लावला.पण दिलेल्या वराप्रमाणे प्रत्यक्ष शिव-पार्वती मुंडास करून कैलासाला गेले. त्याचवेळी मात्र डफळे सरकार यांच्या शिपायांच्या डोळ्यांवर अंधारी आली.आपली चूक त्यांना कळून चुकली. त्यांनी मोठ्या तळमळीने, भक्तीने महालिंगरायांची क्षमा मागितली . तेव्हापासून यात्रेचे वेळी जत संस्थानिकाकडून पहिला नैवेद्य येण्याची प्रथा सुरू झाली .
तर विजापूरचे वर्षातून तीन वेळा फुल बाशिंग हुलजंती बनामध्ये येत असते.
अशी या हुलजंती गावची ओळख आहे . तर आपण सुद्धा एकदा या यात्रेला येऊन महालिंगरायाचे दर्शन घ्यावे आणि आपले जीवन सार्थकी लावावे.
*या या अमावस्याच्या राती*
*शिव पार्वती येती*
*भूकैलास हुलजंती होई*
*जन्माला येऊनि मुंडास एकदा पाही...*
*✍🏻सागर माने*
*संचालक:श्री हालमत सांप्रदाय मंडळ;कुपवाड,सांगली*
No comments:
Post a Comment