Monday, January 31, 2022

क्रांतिवीर संगोळी रायन्ना भारताचे महानायक : महादेव जानकर

क्रांतिवीर संगोळी रायन्ना भारताचे महानायक : महादेव जानकर



समाज संगम राजयात्रेचा कर्नाटकात समारोप

नंदगड- बेळगाव : राष्ट्र भारती द्वारा

क्रांतिवीर संगोळी रायन्ना केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादीत न ठेवता  भारताचे महानायक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वर्षिकोतस्व कार्यक्रमाप्रसंगी आ. जानकर  बोलत होते.



श्री. जानकर पुढे म्हणाले, या देशातील प्रस्थापित इतिहासकारानी राष्ट्रासाठी काम करणारे राष्ट्रिय समाजातील महापुरूषाना उपेक्षित ठेवले. संगोळी रायन्नानी भारत राष्ट्राच्या स्वराज्यासाठी इंग्रजाबरोबर संघर्ष करून बलिदान दिले, मात्र त्यांची देशपातळीवर इतिहासात नोंद घेतलेली नाही.  समाज संगम राजयात्रेद्वारे राष्ट्रिय समाज पक्षाने २६ जानेवारी २००८ ला नंदगड येथे येवून क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांची समाधी शोधून काढली, तो परिसर स्वच्छ करून समाधीवर पहिल्यांदा सात नद्यांच्या जलाने, सात जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राज्याभिषेक व दुग्धाभिषेक केला. आज चौदावा राज्यभिषेक आहे. या चौदा वर्षांत कर्नाटक राज्य शासनाकडून विकासकामे करण्यात आली. आता हे स्थळ राष्ट्रीय पर्यटनस्थळ होईल. आजही संगोळी रायन्नानी ज्या आनंद गडावर ( दुर्गागड) सैन्य उभा करून संघर्ष केला, तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. आम्ही या स्थळाला भेट दिल्यानंतर २००९ ला राष्ट्रिय समाज पक्षाचा पहिला आमदार  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आला. आज राष्ट्रीय समाज पक्ष सतरा राज्यात पोहचला आहे. ज्यावेळेस आमच्या पक्षाचे दिल्लीत सरकार येईल, त्यावेळेस प्रधानमंत्री संगोळी रायन्ना भूमिस अभिवादन करण्यासाठी येईल. कार्यकर्त्यांनी समाज संगम यात्रेच्या माध्यमातून देशभरातील सर्व जाती धर्म, भाषिक, महापुरुष व समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.

राष्ट्रिय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर आपल्या भाषणात म्हणाले, समाज संगम यात्रेच्या माध्यमातून अनेक भाषा, अनेक जाती, धर्म आणि अनेक संत, महापुरुष यांचा संगम घडवून आणण्याचे काम केले आहे. उपेक्षित महापुरुषाना राष्ट्रिय स्तरावर नेण्याचे कार्य या समाज संगम यात्रेतून घडत आहे.  सर्व मोहाचा त्याग करून हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबासारखे नेतृत्व मिळाले आहे, त्यांच्या हाकेला प्रतिसाद देवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.

दिनांक २४ जानेवारी २०२२ चे समाज संगम यात्रेचे वृत्त 'यशवंत नायक'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. पुढील वृत्त : सरूर शाखा मठ आगतिर्थ पिठाचे जगतगुरू रेवनसिध्द स्वामिजीनी समाज संगम यात्रेचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पुढे ही यात्रा राष्ट्रिय संत कनकदास यांची कर्मभूमी कागीनेली जि. हवेरी येथे पोहोचली. कागीनेली पिठाचे महास्वामी श्रीनिरजानंद यांनी समाज संगम यात्रेचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. ही यात्रा महापुरूष व समाजाला जोडीत, कित्तुरच्या राणी चेन्नमा यांच्या कित्तुर जि. बेळगांव येथील राजवाडा किल्ल्याला भेट देवून, पुतळ्यास अभिवादन केले.

     चंदरगी ता. रामदुर्ग जि . बेळगांव येथे "समाज संगम यात्रेचे "प्रमुख नेते राष्ट्रिय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर व राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर यांचे स्वागत बेळगांव जिल्हाध्यक्ष हानुमंत पुजारी, चंदरगी शाखा अध्यक्ष सोमनगौडा पाटील व ग्रामस्थ मंडळी यल्लप्पा कळगौड, गौडप्पा कट्टी, हिरप्पा हेगडी, हनुमंत कौजलगी, बसवराज दासपगोल, बिरप्पा हेगडी, मलिंगप्पा कट्टी, भीमसी कौजलगी, भास्कर कुंभार यांनी केले.

दि. २५ जानेवारी २०२२ रोजी समाज संगम यात्रा बेळगांव जिल्ह्यात फिरून खानापूर मुक्कामी पोहचली. दि. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी समाज संगम यात्रा सकाळी ७ वाजता नंदगड ता. खानापूर जि. बेळगाव येथे पोहचली. नंदगड येथे क्रांतीवीर  संगोळी रायन्ना समाधीस्थळी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब, सिद्धप्पा अक्कीसागर, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, कर्नाटक प्रभारी धर्मान्ना तोंटापुर यांच्याहस्ते दुग्धराज्यभिषेक करण्यात आला. सकाळी ८ वाजता  संगोळी रायन्ना चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालून राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले. श्री. कृष्णानंद स्वामींच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी सिद्धप्पा अक्कीसागर, नंदगड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर, गोविंदराम शूरनर, शंकर सोनोळी, पत्रकार सुदेश दलाल, सामंत पुजारी, काशीनाथ शेवते, ज्ञानेश्वर सरगर, अजित पाटील व महाराष्ट्र- कर्नाटकचे रासपचे कार्यकर्ते आणि शाळेतील मुले, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. स. १० वाजता क्रांतीवीर  संगोळी रायन्ना बलिदानस्थळी रासपचे राष्ट्रिय अध्यक्ष महादेवजी जानकर व त्यांच्या समवेत असणाऱ्या पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. शेकडो लोकांच्या उपस्थितीत जनसभा पार पडली.

दरम्यान कर्नाटक राज्यासाठी राज्याध्यक्ष म्हणून धर्मान्ना तोंटापुर आणि बेळगांव जिल्ह्यात पक्ष संघटन बांधणी करून जास्तीतजास्त आमदार आणण्याची जबाबदारी प्रकाश मुधोळ यांच्यावर देण्यात आली. उतर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रपाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणून काशीनाथ शेवते, महासचिव म्हणून ज्ञानेश्वर सलगर यांची नियुक्ती करण्यात आली. 

समाज संगम यात्रा समारोपानंतर श्री. महादेव जानकर, श्री. अक्कीसागर साहेब, प्रकाश मुधोळ यांनी बेळगांव येथील जैन आश्रमात जाऊन जैन मुनीजी यांची भेट घेतली.  जैन मुनीजी म्हणाले, भारतात अनेक महापुरूष, क्रांतीवीर व राष्ट्रसंत होऊन गेले. परंतू बरेच महापुरूष अज्ञातवासात आहेत, त्यांना राष्ट्रिय समाज पक्षाच्यावतीने "समाज संगम यात्रा" काढून  त्यांना राष्ट्रिय पातळीवर घेऊन जाण्याचे कार्य महादेवजी जानकर करत आहेत. या संगम यात्रेतून राष्ट्रिय समाजाची नाळ जोडण्याचे कार्य हे उत्तम कार्य आहे, या कार्यासाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना पंचरंगी बस्ती देवून सन्मानित केले. महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या समाज संगम राजयात्रेचा समारोप क्रांतिवीर संगोळी रायन्ना समाधीस्थळ व फाशिस्थळास अभिवादन करून पार पडला, असे रासपचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना सांगितले.

विश्वाचा यशवंत नायक : जानेवारी २०२२

 





Sunday, January 30, 2022

माणगाव तालुक्यातुन दुर्गराज किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या राज्यमार्गास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या : राष्ट्रीय समाज पक्षाची सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे मागणी

माणगाव तालुक्यातुन दुर्गराज किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या राज्यमार्गास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या 

राष्ट्रीय समाज पक्षाची सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्याकडे मागणी

पनवेल राष्ट्र भारती द्वारा, रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते निजामपूर पाचाड मार्गे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक : ९७ या मार्गास 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष (तात्या) ढवळे- धनवीकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, अंखड महाराष्ट्रासह तमाम बहुजनांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माणगाव तालुक्याची भूमी असून, या भूमीतून दुर्गराज किल्ले रायगडाकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गाचे तातडीने देखभाल व दुरुस्ती करून नामकरण करावे. मार्ग रुंदीकरणात हस्तांतरीत झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या भूमीचा योग्य तो मोबदला देण्यात यावा.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण अध्यक्ष भगवानराव ढेबे, रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, रासप नेते श्रीकांतदादा भोईर, रायगड संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनवीकर, उत्तर रायगड अध्यक्ष संपत ढेबे, उरण विधानसभा अध्यक्ष दिपकशेठ पाटील, जेष्ठ समाजसेवक बबनशेठ डावले, रा.स.प. युवा नेते दिनेशशेठ हुंबे, युवा अध्यक्ष रोहिदास झोरे,आदी उपस्थित होते.

Thursday, January 27, 2022

माणच्या सुपुत्राचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गौरव.

माणच्या सुपुत्राचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गौरव.

आसामचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

माणचे सुपुत्र व आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबविलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने माण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव  प्रत्येकासाठीच अभिमानास्पद वाटत आहे.

कोव्हिड19चा प्रादुर्भाव लक्षात घेता आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूका शांततेत व भितीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे काम यशस्वी पार पाडले.  कारण अासाम मध्ये अतिरेकी, जातीय अाणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास अाहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या अाहेत. या सर्व घटनांचा सखोल अभ्यास करून एक वेगळा "आसामचा निवडणूक पॅटर्न"  तयार करून तो यशस्वी देखील करून दाखविला.  याचे फलित म्हणजे मतदानाची टक्केवारी जवळपास 0.5 ने वाढली.

निवडणूक कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला.

या दरम्यान 80 वर्षावरील  वयोवृद्ध शारीरिक विकलांग असणाऱ्या मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली.  

कोरोणा कालावधीत निवडणूक अर्ज भरताना सार्वजनिक मेळावे , मिरवणुकीस मनाई करून प्रचारा दरम्यान रोड शो , मोटार सायकल रॅली काढण्यास सक्तमनाई केली. घरोघरी प्रचारासाठी 5 व्यक्तींनाच परवानगी दिली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुध्द व

सोशल मिडियावरुन अाणि प्रत्यक्ष शांतता व सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या  घटनांना वेळीच पायबंद घालून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने  उपाययोजना  राबवून  पायबंद घालण्यात अाला. पोलिस अाणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात अाला. असे काही विविध प्रयोग देखील केले. याचा फायदा म्हणजे भयमुक्त वातावरणात मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले.मतदानाची टक्केवारी  वाढली. 

कोविड सह  अनेक अाव्हाने समोर असताना देखील नितीन खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक अाणि काटेकोरपणे निवडणूक यंत्रणा राबवली. केंद्रीय निवडणूक अायोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविड च्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक अायोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात अाली अाहे. दिल्ली येथे एका खास कार्यक्रमाचे अायोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार अाहे.

▪️ बीड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत  असताना  राबविलेला "आयुर्मंगलम" प्रोजेक्ट आजही त्यांच्याच नावाने ओळखला जातो. याची दखल त्यावेळी तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली. 

राष्ट्रीय पुरस्कारासाठी याच ठरल्या उल्लेखनीय गोष्टी-

▪️14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.

▪️कोविडचा प्रार्दुभाव असूनही 2019 च्या लोकसभा  विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टक्के ने वाढले.

▪️मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील झाला नाही.

▪️सर्व मतदान कर्मचाऱ्यांचे लसीकरण मार्च पुर्वी पुर्ण केले.

▪️निवडणूका निष्पक्ष अाणि सुरक्षित पार पाडली गेली.

 ▪️ऑनलाइन यंत्रणा व सोशल मिडियाचा प्रभावी वापर....

निवडणूककामी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिड चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांना ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.

Wednesday, January 26, 2022

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते तर कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी धर्मांन्ना तोंटापूर यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते तर कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी धर्मांन्ना तोंटापूर, महाराष्ट्र मुख्य महासचिवपदी ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर

नंदगड- बेळगाव येथे महादेव जानकर यांनी केली घोषणा.

क्रांतिवीर संगोळी रायन्ना स्मृतीस्थळी महादेव जानकर, कृष्णानंद स्वामी, एस एल अक्कीसागर, गोविंदराम शुरनर

मुंबई : राष्ट्र भारती द्वारा

नंदगड ता- खानापुर जिल्हा-बेळगाव (कर्नाटक) येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने भारताचे राष्ट्ररत्न क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांचा १४ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सव पार पडला. महाराष्ट्र व कर्नाटक येथील संगोळी रायन्नाप्रेमी, रासप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान,राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी क्रांतिवीर संगोळी रायान्ना फाशीस्थळी अभिवादन करताना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी श्री.काशिनाथ शेवते, कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी श्री धर्मांन्ना तोंटापूर व महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिवपदी ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर यांची नियुक्ती केल्याचे घोषित केले.  यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस.एल. अक्कीसागर, तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शुरनर, कृष्णानंद स्वामी, प्रकाश मुधोळ( रामदूर्ग), हनुमंत पुजेर, संजय पांढरे, सोमन गौडा, सिद्धू बिसनाळ, रविचंद्रन आदी उपस्थित होते.

श्री. काशिनाथ(नाना) शेवते हे सातारा जिल्ह्यातील मौजे. जावली ता- फलटण येथील रहिवाशी आहेत. श्री. शेवते नाना हे रासपचे बुजुर्ग नेतृत्व असून, महादेव जानकर यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यशवंत सेना ते रासप अशा प्रवासाचे साक्षीदार व भागीदार आहेत. श्री जानकर यांच्या मंत्रिपदाच्या काळात श्री. काशिनाथ शेवते यांनी सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. 

श्री. धर्मांन्ना तोंटापूर हे विजयपुर जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. श्री. तोंटापुर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे गत तीन वर्षापासून कर्नाटक राज्यसंयोजक म्हणून काम करत होते. त्यांच्या नेतृत्वात कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत यश मिळविले आहे. यापूर्वी त्यांनी इंडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांना सामाजिक व राजकीय जाणिवेची जाण भान आहे. 

श्री. ज्ञानेश्वर (माऊली) सलगर हे सोलापूर जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. श्री. सलगर यांनी यशवंत सेनेपासून महादेव जानकर यांच्यासोबत चळवळीत काम केलेले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सच्चे सैनिक म्हणून ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी नव्या उमेदीने शाखा उघडन्याचा धडाका सुरू केला आहे.  

पणजी - गोवा येथील पक्ष वर्धापनदीन कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील पक्ष संघटनेत फेरबदल करण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सूतोवाच केले होते. 

Monday, January 24, 2022

समाज संगम राजयात्रा महाराष्ट्र ते कर्नाटक

 समाज संगम राजयात्रा महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात दाखल


मुंबई : राष्ट्र भारती द्वारा, आबासो पुकळे 

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित कनेक्ट इंडीया स्वराज रॕली अंतर्गत समाज संगम राजयात्रेची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी महात्मा फुलेवाडा, गंजपेठ येथून  आधुनिक भारताचे सामाजिक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची स्फुर्तिनायिका सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासाचिव कुमार सुशील, श्री. बाळासाहेब लेंगरे मामा, रासप मुख्य महासचिव श्री बाळासाहेब दोडतले यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी दत्ताजी ढाकणे,  विनायकजी रूपनवर, अंकुशजी देवडकर, अॕड संजयजी माने, सचिन गुरव व इतर उपस्थित होते. पुढे समाज संगम यात्रेने भिमा कोरेगाव येथे जावून विजयी स्तंभास अभिवादन केले. समता व बंधुत्वाचा नारा देणाऱ्या समाज संगम यात्रेने तुळापूर जि- पुणे येथे छत्रपती संभाजीराजे राज्यभिषेक सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले. पुढे वाफगाव ता- खेड जि- पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन केले. 'समतामुलक समाजाची निर्मिती करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी शिवनेरी किल्यावर समाज संगम राजयात्रेचे आगमन झाले, परंतु कोविडच्या परिस्थितीमुळे किल्यावर जाता आले नाही, किल्याच्या पायरथ्यावरूनच दर्शन घेतले.  यावेळी समाज संगम रजयात्रेचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात रासपचे राष्ट्रीय महासचिव श्री कुमार सुशील, श्री बाळासाहेब लेंगरे, मुख्य महासचिव श्री. बालासाहेब दोडतले , दत्ताजी ढाकणे, शिवाजी कुऱ्हाडे, बालाजी पवार आदी सहभागी झाले होते.


समाज संगम राजयात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड येथे पोहचली. येथे रासपचे युवानेते श्री.राजेभाऊ फड यांनी समाज संगम राजयात्रेचे स्वागत केले. कोविडच्या परिस्थितीमुळे कसलाही गाजावाजा न करता प्रमुख पदाधिकारी यांच्या  उपस्थितीतच राजयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य मुख्यमहासचिव श्री. बाळासाहेब दोडतले, दत्ताजी ढाकणे, मधुकर मुंडे, अक्षय मुंडे, नारायण वाघमोडे आदी उपस्थित होते. समाज संगम यात्रा सिना नदीच्या तीरावर वसलेल्या चोंडी ता- जामखेड जि-  अहमदनगर येथे महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मस्थळ चौंंडी येथे पोहचली. यावेळी रविंद्रजी कोठारी, नानासाहेब जुंधारे, विकासजी मासाळ, रमेश व्हरकटे , दत्ताजी ढाकणे व इतर उपस्थित होते. सावरगावघाट येथे संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमीत्त समाज संगम यात्रेचे आगमन झाले, राजयात्रेचे स्वागत रासपचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वरजी वाघमोडे, विक्रमबप्पा सोनसळे, कृष्णाजी धापसे, रामहरी नागरगोजे, शेषेराव खटके यांनी केले. सावरघाट येथे दुसरा टप्पा पार करून समाज संगम राजयात्रा पश्चिम महाराष्ट्रात परत माघारी फिरली. मुरूम(होळ), ता-फलटण, जि-सातारा येथे अटकेपार झेंडा फडकावनारे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मगावी समाज संगम राजयात्रा पोहचली. पुढे कटगुण, ता-खटाव, जि- सातारा येथे महात्मा जोतिबा फुले यांची कुलभूमी येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मृतीस्थळास अभिवादन केले. भिवडी, ता-पुरंदर, जि-पुणे येथे आद्यक्रांतीविर उमाजीराजे नाईक यांच्या जन्मगावी राजयात्रा पोहचली. वाटेगांव, ता-वाळवा, जि-सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूळगावी त्यांच्या राहत्या घरी व त्यांचे कार्य सांगणाऱ्या शिल्प सृष्टीची पाहणी केली. दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी समाज संगम राजयात्रा महाराष्ट्रमधील टप्पा पार करून  कर्नाटक राज्याच्या दिशेने रवाना झाली.  राजयात्रेचे  विजयपूर, कर्नाटक येथे तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराव शुरनर, कर्नाटक राज्य संयोजक धर्मांना तोंटापुर यांच्याकडे राजयात्रेची पुढील सूत्रे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर(माऊली) सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, एड.संजय माने, सचिन गुरव, अकिल नगारजी, परमेश्वर पुजारी यांनी सोपवली.


समाज संगम राजयात्रा कर्नाटक राज्यात...

विजयपूर, कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समाज संगम राजयात्रेद्वारे कर्नाटक व महाराष्ट्र पदाधिकारी यांनी अभिवादन केले. पुढे कुडलसंगम येथे महात्मा बसवेश्वर यांच्या समाधीस्थळी विनम्र अभिवादन केले.

माझ्यापेक्षा लहान कोणी नाही,

शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही,

याला माझे मन साक्षी, तुमचे चरण साक्षी

कूडलसंगमदेवा अशी प्रार्थना  करण्यात आली. बसवण्णा बागेवाडी, बसवेश्वर यांचे जन्मस्थळ आजोळ इंगळेशवर येथे भेट दिली. समाज संगम राजयात्रा पुढे, बागलोकोट जिल्ह्यात बदामी, पट्टाडकल आणि आयहोल येथे भेट दिली. समाज संगम यात्रेच्याप्रसंगी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष धर्मान्ना तोंटापुरे, प्रदेश उपध्याक्ष रवी डोंबाळे, ॲड संजय माने, सचिन गुरव, संजु पांढरे, सिधु बिसनाळ  तसेच कर्नाटक राज्यातील प्रमुख रासप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सरुर शाखा मठ आगतिर्थ पिठाचे जगतगुरु रेवनसिध्देश्वर शांतमय स्वामीजी यांच्या मठास भेट दिली. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत विधानसभा निवडनुका लढवन्यासाठी पक्षास मदत करण्याच आश्वासन त्यांनी दिले.

बेळगांव जिल्ह्यात रासपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर यांचे स्वागत एम चंदरगी ता- रामदुर्ग येथे बेळगाव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी, यल्लप्पा  कळागौडर,  गौडापा कट्टी, इरप्पा हेगडी, हनुमंत कौजलगी, बसवराज दासापगोल, बिरप्पा हेगडी, मानिंगप्पा कट्टी, भीमशी कौजलगी,  भास्कर कंबार, सोमनगौडा पाटील यांनी केले.

समाज संगम राजत्रेतील क्षणचित्रे>>


























Friday, January 21, 2022

महाराष्ट्रातून समाज संगम राजयात्रा' कर्नाटकात दाखल

 महाराष्ट्रातून 'समाज संगम राजयात्रा' कर्नाटकात दाखल

महाराष्ट्रातून आलेल्या समाज संगम राजयात्रेचे  तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शूरनर, कर्नाटक राज्य संयोजक धर्मांना तोंटापुर, बसवराज कनकवडी यांनी स्वागत केले.

मुंबई : राष्ट्र भारती द्वारा 

कनेक्ट इंडिया स्वराज्य रॅली अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाने क्रांतिवीर संगोळी रायान्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव निमित्त 'महात्मा फुलेवाडा ते संगोळी रायान्ना स्मृतिस्थळ, अशी आयोजित केलेली समाज संगम राजयात्रा आज महाराष्ट्रातून कर्नाटकाच्या दिशेने रवाना झाली. 

कर्नाटक राज्यात दाखल झालेल्या समाज संगम राजयात्रेचे तेलंगणा राज्यप्रभारी गोविंदराव शूरनर, कर्नाटक राज्यसंयोजक धर्मान्ना तोंटापूर, बसवराज कंकनवाडी यांनी स्वागत केले.

Tuesday, January 18, 2022

२२ फेब्रुवारीला मंत्रालयावर धनगर समाजाचा महामोर्चा; यशवंत ब्रिगेडकडून घोषणा

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडकणार


मुंबई : धनगर समाजाचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा यासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. परंतू, त्याची अंमलबजावणी होत नाही. आरक्षणाअभावी या समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला आहे. त्यामुळे या समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील दोन कोटी धनगर समाजाची ताकत दाखवून देण्यासाठी 'यशवंत ब्रिगेड' संघटना २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहे, अशी माहिती यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी दिली आहे.

दरम्यान, २८ फेब्रुवारीला बारामती येथे धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच दिवशी विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्य पूर्वक विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दोन कोटी धनगर समाज असून या समाजाची ताकत दाखवली जाणार आहे, असे सांगून श्री. सोलनकर म्हणाले, धनगर समाजातील जास्तीत जास्त लोकांनी या महामोर्चात सहभागी व्हावे.

या आंदोलनात यशवंत ब्रिगेड, यशवंत छावा संघटना, यशवंत सेना, अहिल्या ब्रिगेड, यशवंत फाउंडेशन, व्हीजे - एनटी समता परिषद, धनगर समाज क्रांती मोर्चा आदी संघटना सहभागी होणार आहेत. धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने उद्योजक महामंडळ स्थापन करून उद्योजकांना अनुदान द्यावे. तसेच धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्याची अंमलबजावणी करावी, अहिल्यादेवी शेळी- मेंढी आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी, वाफगाव येथे यशवंतराव होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे.

तसेच फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत, जे आदिवासींना ते धनगरांना लागू केलेल्या योजना तात्काळ लागू कराव्यात, ओबीसी आरक्षण पूर्ववत होण्यासाठी तीन महिन्यांच्या आत तयार करावा, फिरस्ती मेंढीपालनमध्ये नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी अधूनिक दर्जाचे तंबू वितरण योजना लागू करावी, ज्या तालुक्यात मेंढपाळांची संख्या जास्त आहे, अशा तालुक्यांत शेळी मेंढी यांच्या उपचार व लसीकरण तसेच सुसज्ज मोबाईल हॉस्पिटल उभारावे, मेंढपाळांसाठी आणि शेळ्या मेंढ्यांसाठी एकत्रित विमा योजना लागू करावी.

सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे राज्यात हजारो शेळ्या आणि मेंढ्या दगावल्या असून त्यांच्या भरपाईसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही प्रकारची स्वतंत्र यंत्रणा शेळी आणि मेंढी योजना तयार करावी, कर्नाटक सरकारच्या धर्तीवर विमा संरक्षण योजना लागू करावी, महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेळ्यामेंढ्या मृत होऊन नुकसान झालेल्या मेंढपाळ समूहाला मदत निधीचे तातडीने पॅकेज जाहीर करावे, राखीव वनजमिनींमध्ये शेळ्या - मेंढ्यासाठी ४० ते ५० टक्के कुरणे राखीव ठेवावीत, नोकरीतील पदोन्नतील रद्द झालेले आरक्षण पूर्ववत करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

Sunday, January 16, 2022

समाज संगम यात्रा ! रासपची राष्ट्र यात्रा!!

समाज संगम यात्रा ! रासपची राष्ट्र यात्रा !!

सत्य काय आहे? सुख कशात आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न मानवाने सातत्याने  केलेला आहे. 2000 कोटी वर्षापूर्वी बिंग बंग थिअरीद्वारे विश्वाची निर्मिती झाली. त्यातून असंख्य आकाशगंगा निर्माण झाल्या. आठ हजार कोटी सुर्यमंडळाची मिळून आपली आकाशगंगा आहे. आपल्या सूर्याची उत्पत्ती 460 कोटी वर्षांपूर्वी झाली. सूर्याभोवती फिरणाऱ्या अनेक ग्रह आणि उपग्रहात आपली पृथ्वी आहे. 51 कोटी चौरस  कि.मी च्या भुक्षेत्रामध्ये भारताचे भूक्षेत्र 33 लाख चौ.कि.मी. आहे. पृथ्वीवर 150 कोटी वर्षापूर्वी जीवसृष्टीची सुरुवात झाली. 5 कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राण्याचा जन्म झाला 10 लाख ते पाच लाख वर्षांपूर्वी मानव प्राणी अस्तित्वात आला. त्यापैकी 1 लाख 85 वर्षे मानवप्राणी अश्म - लोह/ताम्र युगात जगत होता. तात्पर्य आजच्या मानवाचा इतिहास हा केवळ 10 ते 15 हजार वर्षाचा आहे. पैठण (महाराष्ट्र) बल्लारी (कर्नाटक) येथे आदीमानवाच्या अस्तित्वाचे जीवाश्म सापडले आहेत. नव पाषाण संस्कृतीचा उगम भारतातून इराण यूरोपमध्ये गेला, असे एक मत आहे. मानवामध्ये कृष्ण, पित आणि गौरवर्णीय असे तीन वर्ण प्रामुख्याने आढळतात.  त्याचप्रमाणे चिनी, अरबी, द्रविडी, युरोपियन आणि इंडो-युरोपीयन असे सहा मूळ भाषा स्रोत सापडतात. क्रमाक्रमाने विकास होत मानव इथंपर्यंत पोहचला आहे.

भारत देश निसर्गदत्त साधन संपत्तीने जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. वर्णाने आणि संस्कृतीने संमिश्र बनलेला, परंतु अत्यंत प्राचीन संस्कृतीचा वारसा आजही जपणारा भारत हा कदाचित एकमेव देश असावा. अनेक आक्रमणे, संक्रमणे, यामधून हा संस्कृती संगम होत गेला, अर्वाचीन भारत बनत गेला. विविध जाती-जमाती धर्म, भाषा, विश्वास, रूढी, चालीरीती, देव, कल्पना, श्रद्धा, वेशभूषा यांचा संगम म्हणजे आपला भारत होय, जगातील प्राचीन-अर्वाचीन बदलांचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर पडत गेला, असे असले तरी या भूमीतील सांस्कृतिक  मूल्ये आजही अबाधित राहिली आहेत, म्हणूनच कवि इक्बाल म्हणतात 'हिंद की हस्ती,  मिटाये नहीं मिटती' सहिष्णुता भारतीयत्वाचा आत्मा आहे, त्यामुळे 'लोकशाही' संकल्पनेचा जन्म भारतात झाला. राज्याचा त्याग करणाऱ्या बुद्धाचा जन्म येथे झाला. भव्य आणि बलशाली भारताचे स्वप्न धनगर बालक चंद्रगुप्त मौर्याने पाहिले. चंद्रगुप्त मौर्य भारताचा पहिला सम्राट बनला. शस्त्राचा त्याग करून शांती आणि प्रेम यांचा संदेश देणाऱ्या सम्राट अशोकाचा जन्मही याच देशात झाला. भारताचे विचारतत्व अशोकानेच विश्व धर्म बनवले. जगाच्या अर्ध्या अधिक भागावर आजही अशोका विजय'चा प्रभाव आहे.  बलशाली भारताला आणि भारतीयाला कमजोर बनविणारे विषही भारतात  आहे. भारतीय सहिष्णुतेला छेद देणारी ही उच्च-निचतेची, भेद-भावाची नीती इराणमधून भारतात आली, असे  महात्मा फुले यांनी सर्वप्रथम दाखविले. त्यामुळे विविध जाती-जमाती, भाषा असूनही सहिष्णुतेद्वारे जगातील प्रगत ठरलेला देश आक्रसत गेला आणि जगातील सर्वात मागास देश बनला.  परकियांच्या आक्रमणांचा शिकार-सावज बनला. संत रोहिदास, कबीर, तुकाराम, कनकदास, चोखा, नामदेव, सोयराबाई सारखे अनेक संत महात्मे, महापुरुष, यांनी समतेचा, प्रेमाचा विचार सांगून भारतीय समाज एक ठेवण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी भेद आणि विषमता पसरविणाऱ्या प्रवृत्तींवर बुद्ध आणि  अशोका नंतर सर्वात मोठा प्रहार केला.

ग्लोबलायझेशनमुळे जगामध्ये घडलेल्या बदलांचा फायदा भारतात मिळत आहे. त्यामुळे एकीकडे अत्याधुनिक साधन-संपत्तीने समृद्ध Indian आणि दुसरीकडे या आधुनिकतेपासून कोसो दूर असलेला भारतीय असा आपला देश विभागला आहे, भारताला बलशाली बनविणे म्हणजे भारतीयांना बलशाली बनवणे होय. बहुसंख्य भारतीय दारिद्र्यरेषेखाली जगत असताना, त्यांचे प्रमाण वाढत असताना, जगातील सर्वात जास्त गरिबीचे प्रमाण भारतात असताना, भारत महासत्ता बनला, तरी त्याचा उपयोग कुणाला ? बहुसंख्याक भारतीय समाजाला जात- जमात, भाषा,  प्रदेश यामध्ये विभागत  भांडत ठेवत, हे प्रस्थापित राजकिय पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधत  आहेत. यामुळे राष्ट्र धोक्यात आले तरी यांना त्याची पर्वा नाही, अशावेळी राष्ट्रीय समाजाचा 'राष्ट्रवाद'च या देशात तारु शकतो, ही भूमिका घेऊन भारताच्या राजकिय पटलावर राष्ट्रीय समाज पक्ष चा 2003 साली जन्म झाला. प्रदेश,धर्म, वर्ण, वय, जात-भाषा यावर आधारित हा राष्ट्रवाद नाही.  या देशातील सर्वांना सामावुन घेणारी सहिष्णुता ज्याचा आत्मा आहे, असा हा राष्ट्रवाद आहे. भारतामधील सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत यांना समान लेखणारा, सर्वांचा सन्मान करणारा हा राष्ट्रवाद आहे." संकुचित वृत्ती जोपासणाऱ्या, जाती-धर्म- भाषा, प्रांत यांचा सहारा घेऊन भेद पसरविणाऱ्या राष्ट्रघातकी प्रवृत्ती, नेतृत्व, संघटना आणि पक्ष यांच्याविरुद्ध असणाऱ्यांचा हा राष्ट्रवाद आहे, भाजप-आर.एस.एस. चे हिंदुत्व खोटे आहे. यांचे राष्ट्रीयत्व हे झुटे आहे. भाजप-आर.एस. एस बहुजन हिंदूंचा शत्रू आहे. भारताच्या एकतेला ते घातक आहेत.  काँग्रेस भाजपचा पिता - निर्माता आहे. काँग्रेसनेच जात-धर्म आधारित राजकारण जन्माला घातले. भारतीय कम्युनिस्ट देखील भाजपचा सख्खा भाऊ आहे. हे तिन्ही पक्ष हिंदू समाजाचे मुख्य शत्रू आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाचेही ते शत्रू आहेत. काँग्रेसची सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) खोटी आहे. काँग्रेस मुळात ब्राह्मणांची पार्टी आहे. असे म्हणत  छत्रपती शाहू यांनी काँग्रेस प्रवेशाची ऑफर नाकारली होती. यामुळेच  यशवंतराव चव्हाण शेवटी अपमानित झाले होते आणि शरद पवार यांना  काँग्रेसमधून तोंडघशी पडून बाहेर पडावे लागले. पंतप्रधानपद तर गेलेच पण सरदारपद तर टिकवून ठेवूया,  या आशेने स्वाभिमानी राष्ट्रवादीला पवार साहेबांनी मॅडम काँग्रेसचा गुलाम केले. प्रबोधन ठाकरेंनी देवळाचा धर्म-धर्माचे देऊळ लिहिले. अनेक देव निर्माण करून भटांनी हिंदूंचे वाटोळे केले. सर्व हिंदू देव-देवतांना गावातील एका ठिकाणी आणून प्रदर्शन गृहात ठेवावे, असे सदर ग्रंथात प्रबोधनकार ठाकरे यांनी  सुचविले होते. शिवजयंतीद्वारे शक्ती, भक्तीचे भरविले जाणारे मेळावे रोखण्यासाठी आणि बहुजन हिंदू पासून जातीयवादी आणि कर्मठ वृत्तीमुळे अलग-अलग पडलेल्या भटांना, हिंदू समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी (शिवजयंतीला शह देण्यासाठी) टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. सन 1920 च्या दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आठवडाभर साजरी केली जात होती. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामुळे शिवजयंती एक दिवसांवर आणली. शिवजयंतीपेक्षा भटांनी सत्यनारायण पुजा महत्वाची मनाली आणि मोठी केली. महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरु केली होती. पुणे आणि महाराष्ट्रभर गावगल्ली- बोळात शिवजयंती मोठ्या प्रमाणात सुरू झाली, तेव्हा बाळ टिळक अजून रांगत होते. नंतर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. राजा बळीच्या विजयासाठी घटस्थापना करून पाळली जाणारी 'नवरात्र' आणि त्यानंतर येणाऱ्या 'दसऱ्या'चाही अर्थ बदलत गेला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत एका बाजूला, टिळक एका बाजूला आणि मध्येच दहा दिवसाचा गणपती मांडला जाऊ लागला. 1894 साली फक्त तीन गणपती पुण्यात बसले होते. आता पुणे-मुंबई सहित संपूर्ण भारतात गणेशोत्सव साजरा होत आहे.  परंतु शिवजयंती कधी साजरी करायची 'तिथी की तारीख' वादात सापडली. 

भारतात 'राजतंत्र आणि गणतंत्र' या दोन राज्यपद्धती होत्या. गणतंत्रामध्ये अनेक जनपदे होती. जनपदाचा गणनायक गणपती निवडला व नेमला जात होता. त्यामुळेच सहिष्णुप्रवृत्तीचा प्रामाणिक देवभोळा हिंदू समाज गणेशोत्सव आनंदाने साजरा करू लागला. धकाधकीच्या जीवनात एकप्रकारे त्यामध्ये विरंगुळाही शोधू लागला. परंतु त्यामुळे महात्मा फुले यांच्या विचारांचा आपण पराभव करतोय, शिवरायांच्या वारशाशी द्रोह करतोय, प्रबोधनकारांच्या विचाराशी गद्दारी  करतोय, हे तो विसरलाय हे सांगण्यासाठी मी लेखणी झीजवत आहे. कारण सत्य-असत्याशी मन केले गाव्ही, नाही मानियले बहुमता असे सांगून नाठाळांच्या माथी काठी हाणनाऱ्या संत तुकारामाचा मी वारकरी असल्याने सत्य सांगणे माझे कर्तव्य आहे. मी हिंदू आहे, हिंदुची अनेक दैव दैवते आहेत. मुस्लिमांना मारूतीला नैवेद्य देताना मी पाहिले आहे. अनेक हिंदू पिराला मानतात. माझी आई तर कोणतेही देऊळ दिसो, त्याला लवून नमस्कार करताना मी पहातो. मग ते चर्च असो, मंदिर असो, वा मस्जिद असो. आमचा हिंदू भारतीय समाज असा सहिष्णु होता. आजही आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न आज मोठया प्रमाणात होत आहे. या प्रवृत्तीनेच भारताची शकले केली. याप्रवृत्तीमूळे भारत कमजोर झाला. आक्रमणाला बळी पडला.  याच प्रवृत्ती जाती, धर्म, भाषा, प्रांत यावरून निरर्थक वाद घालत आहेत. पेपरवाले, टीव्हीवाले त्याला वारेमाप प्रसिद्धी देत आहेत. 'नकली नेते आणि नकली प्रश्न यावर नकली चर्चा' घडवून भारतीय समाजाची - राष्ट्रीय समाजाची, विविध जाती धर्मीय भाषीय समाजाची अक्षरशः टिंगल-टवाळी करून दिशाभुल केली जात आहे, त्यांच्यात फूट पाडली जात आहे आणि हे सर्व हिंदूंना - प्रामुख्याने बहुसंख्यांक ओबीसींना भाजपकडे तर  अल्पसंख्याक मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, दलितांना, काँग्रेसकडे, तसेच मराठी समाजाला शिवसेनेकडे , मनसेकडे वळवण्यासाठी केले जात आहे. त्याद्वारे सतेची खुर्ची आपल्याकडे मिळवण्यासाठी हे सर्व चालले आहे. यामुळे हे राष्ट्र दुबळे होत आहे, याचीही त्यांना पर्वा नाही. 'राष्ट्रीय समाज' या देशाचा मूलनिवासी  समाज आहे. तो जन्मतः राष्ट्रवादी समाज आहे, परंतु जात, धर्म, भाषा, याचा सहारा घेऊन राष्ट्रीय समाजाची दिशाभूल करून हे प्रस्थापित राजकीय पक्ष सत्ता काबीज करीत आले आहेत. या देशावर राष्ट्रीय समाजाची सत्ता आल्याशिवाय हे राष्ट्र खऱ्या अर्थाने बलशाली होणार नाही, हे ओळखून राष्ट्रीय समाजाची राष्ट्रीय समाज पार्टी आम्ही स्थापन केली आहे,  राष्ट्रीय समाजामध्ये भाईचारा निर्माण करण्यासाठी समाज संगम राजयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजित समाज संगम राजयात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून  फिरणार असून विविध जाती धर्म भाषा यांच्यामधील परस्पर बंधू भाव वाढवणे हा या समाज संगम राजयात्रेचा मुख्य उद्देश आहे. धनगर बालक चंद्रगुप्त मौर्याने बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहिले. चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोकाने अफगाणिस्तान ते बंगाल, काश्मिर ते श्रीलंका असे विशाल आणि बलशाली राष्ट्र उभे केले.  महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजीराजे, टिपू सुलतान सारख्या अनेकांनी भारताचे 'स्व'राज्य राखण्याचे प्रयत्न केले. महाराणी अहिल्याबाई होळकर या पहिल्या भारतीय राजकर्त्या महिलेने विशाल भारतावर 30 वर्षे राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी 'संगोळी रायन्ना'ने वीरमरण पत्करले. रेवणसिद्दाने शिव मंत्र  (कल्याणकारी) दिला. धर्म आणि समाज सांगितला संत बसवेश्वराने जातीभेद विरहीत समाज निर्माण केला. अशा अनेक मानवतावादी, राष्ट्रवादी राष्ट्रीय महापुरुषांनी हे राष्ट्र उभारले. मधल्या काळात भारतावर अनेक आक्रमणे झाली. मुठभर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले. जात, धर्म, भाषा, प्रदेश यामध्ये भारताला आणि भारतीय समाजाला विभागले. स्वतंत्र भारतात देखील जात, धर्म, भाषा, प्रदेश यावरून भारतीय समाजाला विभागलेला ठेवण्याचे षडयंत्र राबीवले गेले, राबविले जात आहे. भारतात आणि जगात भयावह झालेल्या आतंकवादाचे मूळही या षडयंत्रात आहे. म्हणूनच बंधू भावाचा संदेश देणारी शिवनेरी (महाराष्ट्र) ते नंदगड (कर्नाटक) 'समाज संगम राजयात्रा' राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केली आहे. ही गंगोत्री घेऊन पुढील काळात देशभरातून ही समाज संगम राजयात्रा फिरविण्याचा संकल्प, राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे. त्यामुळे ही समाज संगम राजयात्रा रासपाची राष्ट्र यात्रा ठरणार आहे.

शिवराय जन्मक्षेत्र शिवनेरी (१६२७-१८६०): महा 'राष्ट्र' निर्माते छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवराज जन्मक्षेत्र 'शिवनेरी' पुणे येथून जलकुंभ घेऊन समाज संगम राज यात्रेचा प्रारंभ होणार आहे.

  अहिल्या जन्मक्षेत्र चोंडी- (१७२५-१७९५) महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे चोंडी हे जन्मगाव. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी भारताच्या विशाल भूप्रदेशावर ३० वर्ष राज्य केले. सर्वजण कल्याणकारी राजकारणाचा आदर्श जगाला दिला. प्रजा आणि राजा यांचा संबंध माता - पुत्रा समान असतो, असे राजमाता अहिल्यादेवी मानत असत. ३१ में २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना चोंडी येथे झाली. चोंडी गावातून सिना नदी वाहते. सिना नदीच्या पात्रातील पाणी धारण करणारे जलकुंभ घेऊन समाज संगम राजयात्रा पुढे वाटचाल करणार आहे. 

बसव पुण्यक्षेत्र कुडल संगम (११२५) महात्मा बसवेश्वराच्या कार्याने पुनीत झालेले हे क्षेत्र.  येथे तीन नद्या एकत्र येतात, म्हणून याला महात्मा बसवेश्वर कुडल संगम म्हणतात. जाती भेद नाही, सर्व माणसे समाज एक आहे. असा संदेश देत एकात्म राष्ट्रीय समाज निर्माण करण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या  शतकात केला होता. राजमाता अहिल्या जन्मक्षेत्रातील सिना नदीच्या जलकुंभात कुडल संगमाच्या मलप्रभा-कृष्णा-भीमा  नदीच्या पवित्र जलाचा संगम करण्यात येईल. याप्रकारे उत्तर-दक्षिण भारताच्या सिना, चंद्रभागा, कृष्णा, मलप्रभा नद्यांच्या पवित्र जलाचा जलकुंभ घेऊन 'समाज संगम राजयात्रा' नंदगड बेळगावकडे वाटचाल करील.

संगोळी रायन्ना स्मृती क्षेत्र नंदगड (१७९४-१८३१)  हा देश भारतीयांचा असून उपऱ्या ब्रिटिशांना येथे राज्य करण्याचा अधिकार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या  संगोळी रायन्नाने ब्रिटिशांविरुद्ध  देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी लढत-लढत २६ जानेवारी१८३१ रोजी वीरमरण स्वीकारले. ब्रिटिशांनी संगोळी रायन्नांना राजद्रोहाच्या आरोपाखाली नंदगड बेळगाव येथे फासावर चढवले. संगोळी रायन्ना, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, नोवसाजी नाईक, हुतात्मा भांगरे, भगत सिंग या सर्वांनी देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले. परंतु या सच्च्या भूमिपुत्रांचे वारसदार स्वतंत्र भारतात सत्तेवर न आल्यामुळे भारतात प्रचंड भ्रष्टाचार, विषमता आणि अराजकता निर्माण झाली. गोऱ्या ब्रिटिशांच्या या निमगोऱ्या वारसदारांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय समता, न्याय याची आश्वासन देणारी भारताची आदर्श राज्यघटना राबविली नाही, त्यामुळे गेल्या ६० वर्षात स्वतंत्र आणि लोकशाही भारतात गरीब अधिक गरीब बनले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत बनत गेले. विज्ञान व विकासाचा फायदा बहुसंख्याक (90 %) राष्ट्रीय समाजाला मिळाला नाही. विविध नद्यांचा मिळून जसा महासागर बनतो त्याप्रमाणे विविध जाती, धर्म,भाषीय, समुदायांचा संगम घडवून राष्ट्रीय समाजाचा विशाल आणि बलशाली महासागर निर्माण करण्याचा संकल्प घेऊन रासपाने समाज संगम राजयात्रेचे आयोजन केले आहे. विविध जाती, धर्म, भाषिक, समुदायाचा एकात्म राष्ट्रवादच या देशाला तारू शकणार आहे. चोंडी (सिना), पंढरपूर (चंद्रभागा), विजापूर (भीमा), कुडल संगम (मलप्रभा-कृष्णा), आदी नद्यांच्या पवित्र आणि शक्तीदायी पाण्याचा जलकुंभ घेऊन ही समाज संगम राजयात्रा नंदगड-बेळगाव येथे पोहोचणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या संगोळी रायन्नाचा राज्याभिषेक समारोह, पवित्र जलकुंभाद्वारे विशाल राष्ट्रीय समाजाच्या साक्षीने, भारताच्या जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. नालायक राज्यकर्त्यांना बदलुन, लायक आणि खऱ्या वारसदारांना विविध राज्यात आणि केंद्रात राजसत्तेवर बसविण्याची शपथ यावेळी संगोळी रायन्नाच्या पवित्र समाधीला साक्षी ठेऊन घेतली जाणार आहे.

निमंत्रक :

मान्य - महादेव जानकर

राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष

शब्दांकन: सिद्धसागर

एस एल अक्कीसागर

साभार: यशवंत नायक ऑक्टोबर 2008 मधून पुनर्रसंपादित आणि प्रकाशित - सिद्धसागर

आजपासून रासपच्या समाज संगम राजयात्रेस पुण्यातून सुरुवात

आजपासून रासपच्या समाज संगम राजयात्रेस पुण्यातून सुरुवात

मुंबई/राष्ट्र भारती द्वारा

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रत्येकवर्षी कर्नाटक राज्यात नंदगड, बेळगाव येथे  क्रांतिकारक संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वर्शिकोत्सवाचे आयोजन केले जाते.  आज पुण्यातून समाज संगम राजयात्रेस प्रारंभ होणार आहे.

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचे २०२२ हे १४ वे वर्ष आहे. यावर्षी पुनः समाज संगम यात्रेचे रासपने आयोजन केले असून, ही यात्रा आधुनिक सामाजिक भारताचे आद्य  निर्माते महात्मा जोतीराव फुले यांची जन्म तथा पुण्यभूमी पुणे येथून आज १६ जानेवारी रोजी प्रस्थान करून 26 जानेवारी २०२२ रोजी संगोळी रायन्ना पुण्यभूमी नंदगड बेळगाव येथे पोहोचणार आहे. दरम्यान महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्नाटक दैवत महात्मा बसवेश्वर यांच्यासहित यात्रेदरम्यान येणाऱ्या महापुरुषाच्या जन्मस्थळ, शक्तीस्थळ, ऊर्जास्थळ यांना अभिवादन करीत, ही यात्रा जनतेत जाणार आहे. समाज संगम - बंधुत्व याचा संदेश देणार आहे. तमाम भारतीय समाजाने कोरोना नियमांचे पालन करीत त्यात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती  व आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीने केले आहे. 

महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यकारिणी द्वारे वरील राजयात्रेचे आयोजन व नियोजन केले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून जाणारी समाज संगम राजयात्रा, रासपाची राष्ट्रयात्रा ठरणार आहे, असे मत रासपचे बुजुर्ग नेतृत्व श्री. एस एल अक्कीसागर यांनी व्यक्त केले आहे.


दरम्यान आज सकाळी राष्ट्रीय समाज पक्ष कनेक्ट इंडीया स्वराज रॕली अंतर्गत समाज संगम यात्रेची सुरवात  महात्मा फुले वाडा येथून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय महासाचिव श्री कुमार सुशीलजी , श्री. बाळासाहेबजी लेंगरे मामा, रासप महाराष्ट्र मुख्यमहासचिव श्री बालासाहेबजी दोडतले यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी दत्ताजी ढाकणे,  विनायकजी रूपनवर, अंकुशजी देवडकर, अॕड संजयजी माने , सचिन गुरव व इतर उपस्थित होते.  तसेच समाज संगम यात्रा भिमा कोरेगाव येथे पोहचली. येथील विजयी स्तंभाचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय महासचिव श्री कुमार सुशील , श्री. बाळासाहेबजी लेंगरे मामा,रासप महाराष्ट्र मुख्य महासचिव मश्री बालासाहेबजी दोडतले, शिवाजी कुराडे, दत्ताजी ढाकणे व इतर उपस्थित होते.




Wednesday, January 12, 2022

छत्रपती शिवाजी विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा

दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटिरामशेठ पाटील कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज वावंजे येथे भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन, प्रभारी प्राचार्य , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.




छत्रपती शिवाजी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 छत्रपती शिवाजी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

३ जानेवारी २०२२ रोजी रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटिराम शेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज वावंजे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.










चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...