रासपची लढाई शोषित बहुजनांच्या उत्थानासाठी : महादेव जानकर
राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे युवा संघर्ष निर्धार परिषदेचे
पुणे (२०/४)२५) : आमची राजकीय लढाई शोषित राष्ट्रीय बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आहे, त्यासाठी राजकीय सत्ता महत्वाची आहे. सत्तेच्या चाव्या राष्ट्रीय समाजाच्या हातात येण्यासाठी कायम संघर्ष करत राहू, असा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित युवा संघर्ष निर्धार परिषदेत श्री. जानकर बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर, बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, स्वाभिमानी युवक संघटनेचे अमर कदम, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सुधाकर जाधवर, शार्दुल जाधवर, रासेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिगंबर राठोड, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अंकुश देवडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनिल पवार, विक्रम ढोणे, दत्तकुमार खंडागळे, सौरभ हटकर, नितीन आंधळे या युवकांचा युवा संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
श्री. जानकर पुढे म्हणाले, मी, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी 2009 मध्ये रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी (रिडालोस) चा प्रयोग केला होता. दिवगंत गोपीनाथ मुंडे यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी छोट्या पक्षाचे महत्त्व ओळखून आम्हाला संधी दिली. छोट्या पक्षाच्या सहकार्यामुळे 2014 मध्ये सत्ता प्रतिवर्तन झाले. त्यानंतर आम्हाला काही काळ सत्तेत काम करण्याची संधी मिळाली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या विचाराचे आमदार मोठ्या संख्येने विधानमंडळात गेले पाहिजेत, त्यासाठी संघर्ष करीत राहू. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेणारे मतदार निवडणुकीच्या वेळेस कुठे जातात, असा बोचरा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला.
बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही. जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले जाते. हा कावा सामान्य लोकांनी ओळखला पाहिजे. आम्हाला सत्तेत सहभागी होता आले नाही, तर सत्ता सर्वसामान्यांच्या दारात नेण्यासाठी प्रयत्न करू. महादेव जानकर यांनी दिल्लीवर चाल करावी, आम्ही नागपूरला वेढा देऊ.
महादेव जानकर म्हणाले, ही एकी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. आम्ही यातून देशात राज्यात सुरू असलेल्या असंतोषाचे जनक बनणार आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे ला दिल्लीत तालकटोरा मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे, जास्तीत जास्त संख्येने दिल्लीच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगाव चौंडीतून काल राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली सुरू झाली आहे, या रॅलीच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवू.
रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागरआपल्या भाषणात म्हणाले, राजकारणात मरगळ आली असताना, सर्वसामान्य लोकांना राजकारणाबद्दल विट आली असताना, आजच्या युवा संघर्ष परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवकांनी लढण्याचा संघर्षाचा केलेला निर्धार कौतुकास पात्र आहे. आरएसएसने ज्या विचारधारेच्या माध्यमातून सर्वांना गुंडाळून ठेवले आहे, त्या विचारधारेला मोडीत काढण्याचे चॅलेंज एस. एल. अक्कीसागर यांनी दिले. माझ उर्वरित आयुष्य हे महादेव जानकर यांना मिळावं, कारण ते या समाजात परिवर्तन करण्यासाठी लढत आहेत, त्यामुळे त्यांना यश मिळावं असे मी निसर्ग निर्मिकाकडे इच्छा व्यक्त करतो. रासपचे राज्यसरचिटणीस अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वाती गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या वेगवेगळ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांना नोटांचा हार घालून सत्कार केला. वेळेअभावी उपस्थित राहून शकल्याने, राजू शेट्टी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महादेव जानकर यांना शुभेच्छा दिल्या. डोक्यावर महात्मा फुले यांची पगडी घालून महादेव जानकर, बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेना ते राष्ट्रीय समाज पक्ष पर्यंत महादेव जानकर यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. युवा संघर्ष परिषदसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या लोकांचा मानाचा पिवळा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment