Sunday, April 6, 2025

पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाकडून मुजोरी, रुग्णास धरले वेठीस

पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाकडून मुजोरी, रुग्णास धरले वेठीस 

कुकुडवाड (५ एप्रिल २०२५) : आज सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मार्डी येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माण तालुक्यातून अनेक प्राथमिक केंद्रातून रुग्णांना एकत्र बोलावले होते. पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मार्डी येथे शिबिरस्थळी पोहचण्यासाठी पेशंटना म्हसवड येथे सकाळी ७ : वाजता बोलावले होते. ठरल्यावेळेप्रमाणे आशासेविकेसह रुग्ण, नातेवाईक हे पुकळेवाडी येथून म्हसवड येथे खासगी वाहनाने सकाळी ७ वाजता हजर राहिले. पुढे ११ च्या दरम्यान मार्डी येथे शस्त्रक्रिया पार पडल्या. शास्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी पोहचवणे अपेक्षित होते. परंतु पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाने संबंधित रुग्णास त्यांच्या घरी न पोहोचवता पुळकोटी येथे आणून, तब्बल चार तास ताटकळत ठेवले. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णास आरामाची आवश्यकता होती, रुग्णास वेळेत घरी पोचवणे गरजेचे असताना, आशासेविकेस रुग्णवाहिकेचा चालक म्हसवड येथून लगेच येतो, असे सांगून पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघून गेला. पहाटे सहा वाजता घर सोडलेल्या आशासेविका, रुग्ण, नातेवाईक यांना पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रतील रुग्णवाहिका चालकाने मुजोरपणा दाखवत तब्बल चार तास वेठीस धरले. शस्त्रक्रियेसाठी पहाटे घर सोडलेल्या रूग्ण, नातेवाईक यांना ताटकळत ठेवल्याने मनस्ताप सहन करावा लागला. संबंधित रुग्णवाहिकाचालकाची तक्रार करण्यासाठी माण तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीही दोनदा कॉल कट करून फोन घेण्याचे टाळले. माण तालुक्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीनतेरा वाजल्या आहेत, नागरिकांकडून अनेक तक्रारी लोकांमध्ये चर्चिल्या जातात. सन २०२० साली प्रसूत झालेल्या मातेस प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे अद्याप पैसेही मिळाले नाहीत. "दिनांक "२१ नोव्हेंबर २०२४" रोजी श्रीमती ज्योती बाजीराव दडस यांना वडगांव येथे सकाळी ११ : ०० वाजता सर्पदंश झाला होता, उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेहले असता, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते, तेथे उपस्थित असणाऱ्या परिचारिकेने प्राथमिक उपचार करून सातारा येथे पुढे पाठवले, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे, अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याचे, शरद दडस यांनी सांगितले. पुळकोटी आरोग्य केंद्रातील मुजोर रुग्णवाहिका चालक कर्मचारी हे परिचारिका, आशासेविका यांना सरळ सरळ फसवतात, या बेशिस्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी कशी शिस्त लावतात हे पाहावे लागेल. आरोग्य विभागाने सुधारणा केली नाही तर आक्रमक पद्धतीचे आंदोलन छेडण्याचा इशारा, श्री. दडस यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025