Friday, June 25, 2021

परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे त्यात घाई करून परिवर्तनाचे मार्ग बंद करू नका : आ. ह. साळुंखे



परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे, त्यात घाई करून परिवर्तनाचे मार्ग बंद करू नका. सर्व संघटना चळवळी , त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरी बसून काहीच होणारं नाही, बाहेर निघून समाजात जावं लागेल, वारंवार एकत्र बसावं लागेल, चर्चा घडवून आणाव्या लागतील. त्या चर्चांमधून, विचार मंथनातून परिवर्तनाचे विविध मार्ग आपल्याला गवसू शकतील.  प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आचार विचारांची आहे. देशातील प्रत्येकाला त्याचे वेगळेपण जपण्याचं स्वातंत्र्य देत सेतू बनून माणसं जोडण्याचं काम करायचं. माणसं जोडत असतांना कुणाच्या घरी जात असतांना फक्त आणि फक्त मित्र बनून जायचं , न्यायाधीश बनून जायचं नाही. कोण घरात कुणाची प्रतिमा लावतो, कुणाला पूजतो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यावरुन जर त्या व्यक्तीला मोजायचं ठरवलं, बोलण्या वागण्यातून आपलं पुरोगामीत्व दाखविण्याची घाई केली तर ती व्यक्ती कायम आपल्यापासून दूर जाण्याचा धोका अधिक वाढतो. परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे त्यात जर घाई केली तर परिवर्तनाचे मार्ग कायमचे बंद होऊन जातील. समजा एक बाप आपल्या मुलाला बोट धरून चालायला शिकवतोय , मुलगा हळू हळू आपल्या पायावर चालण्याचा प्रयत्न करतोय, तर बापाला पण त्या मुलाच्या गतीनेच चालावे लागेल. थोडाफार त्याला झेपावेल इतका वेग बाप वाढवू शकेल. पण बाप जर स्वतःच्या गतीने चालायला लागला तर मुलाला फरफटत नेईल त्याचे पाय ,बोट घासतील, कदाचित तो जखमी होईल व त्यामुळे पुन्हा चालायची हिम्मत करणार नाही. तसंच परिवर्तनाचं आहे. डॉक्टरसुद्धा आजारी व्यक्तीला लवकर बरं व्हावं म्हणून औषधाची पूर्ण बाटली प्यायला लावत नाहीत. हळूहळू शरीराला झेपेल त्या प्रमाणात औषधीचे प्रमाण देतो. 
      कुठल्याही वर्गाला जर बदलायचे आहे तर त्यांना आपलंसं करावं लागेल, म्हणजे समजा हिंदू -मुस्लिम वाद आहे तर यापैकी एका संपूर्ण गटाचे धर्मपरिवर्तन शक्य नाही, एका गटाची पूर्ण कत्तल करणे शक्य नाही, कुण्याही एक गटाला पूर्णपणे देशाच्या बाहेर हाकलून देणे शक्य नाही. किंवा पूर्णपणे कुण्या गटाला गुलाम बनविणे पण शक्य नाही. कारण कायम कुणीच कुणाचं गुलाम राहू शकत नाही आणि कायम कुणीच कुणाला गुलाम ठेऊ शकत नाही. हे चारही मार्ग अज्जिबात या विषयात कामाचे ठरू शकत नाहीत.  त्याकरिता दोन्ही गटांना सामंजस्याने एकमेकांचा स्वीकार करावा लागेल आणि परिवर्तन घडवून आणावे लागेल. 
     चार्वाकांच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे. त्यामुळे चळवळीत काम करतांना आपल्याबरोबरच सर्वांचे वैयक्तिक स्वातंत्र्य देखील जपता आले पाहिजे. 
     भगवान बुद्ध, महावीर यांनी स्वीकारलेल्या सत्य अहिंसा यांमुळे कुठल्याही धर्माचे कधीच नुकसान झाले नाही. अहिंसेचा स्वीकार केला, शस्त्र खाली टाकले म्हणून कुठलाही धर्म बुडाला नाही. नुकसानीचे मुख्य कारण समाजातील भेदभाव आहे. जातीवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, धर्मवाद ही समाजातील वादाची-असंतोषाची मुख्य कारणे आहेत. कुणाच्या पूर्वजांनी काय केले हे उगाळत बसण्यापेक्षा नवीन पिढ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन संघर्ष टाळला पाहिजे.
       स्त्रियांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे त्यांचे स्वातंत्र्य जपले पाहिजे. केरांतीज्योती सावित्रीमाईंना महात्मा जोतिबा फुले यांनी अनुभव घेऊ दिला, क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी त्यावेळी आपल्या कपड्यांवर डाग सहन केले, म्हणून आज आपण डाग नसलेले कपडे घालू शकतोय हे पण आपण विसरता कामा नये. जबरदस्तीने परिवर्तनाचा प्रयत्न नकोय.  त्यांना योग्य मार्ग दाखवून, योग्य ज्ञान पुरवून त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांना शिकू दिलं पाहिजे. म्हणजे त्या आपल्या मतावर ठाम असतील. एकच तर्क-मांडणी सर्वांमध्ये सारखं परिवर्तन घडवून आणेल असं होत नाही. वेगवेगळे तर्क-वितर्क, प्रक्रिया आपल्याला राबवावे लागतील. त्यासाठी संयम, जिद्द, चिकाटी कायम ठेवावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर खरंच आपल्याला समाजात परिवर्तन घावायच असेल तर परिवर्तनाचा मार्ग हा हृदयाकडून मस्तकाकडे जाणारा असावा....!
- डाॅ. आ. ह. साळुंखे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...