Saturday, March 21, 2020

माणदेशाचा माणबिंदू महिमानगड

माणदेशाचा माणबिंदू महिमानगड

माण नदीच्या काठावर वसलेल्या माणदेशाचा मानबिंदू म्हणजे महिमानगड. आदिलशाहीपासून रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपल्या देखरेखीखाली हा छोटेखानी किल्ला बांधला. मात्र, माणदेशाचा हा रांगडा महिमानगड सध्या अखेरच्या घटका मोजत असून, चारही बाजूंचे तट ढासळले गेले आहेत. शिवरायांच्या या साक्षीदाराला नवसंजीवनी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या आगळ्या संस्कृतीची साऱ्या जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या माणदेशातील रामोशी अन् धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यात नेहमीच अगे्रसर होता. म्हणूनच, छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी गडाची निर्मिती केली. ‘महिमान’ म्हणजे पाहुणा. या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३,२९१ फूट आहे. पुसेगावपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाला चालत जाणे सोपे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत गडाची तटबंदी ढासळत गेली आहे. या गडावर दोन बुरुज आहेत. तसेच मारुतीचे बिन छपराचे मंदिरही होते. गावकऱ्यांनी श्रमदानातून या मंदिरावर छप्पर टाकले आहे. पूर्वी या गडावर लोकवस्ती होती. आजही गडावर जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायाला मिळतात. स्वराज्याच्या सीमेवर असलल्या या गडाला शिवरायांनी बांधून घेतल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. गडाचा एक भाग वेगळा दिसत असून, तो हत्तीच्या सोंडासारखा भासतो. पूर्वी वळणा-वळणाची तटबंदी लांबूनच दुर्गपे्रमींना खुणावत असे. मात्र, अलीकडच्या काळात मोठी पडझड झाल्याने ते ही भाग्य माणवासीयांच्या नशिबी नाही. या गडावर सध्या राहण्याची सोय नाही. महिमानगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाचाच आसरा घ्यावा लागतो. या गडाच्या परिसरातील रामोशी व धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यास अगे्रसर होता. काटक व चपळ असलेला रांगडा माणदेशी गडी दहा-दहा जणांना भारी पडायचा. शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारा रामोशी व धनगर समाज आजही या गड परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. माणदेशी संस्कृतीचे संग्रहालय हवे माणचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी या गडाचे संवर्धन झाले पाहिजे. गडावरील पाण्याच्या टाक्या जिवंत करून पुन्हा त्या पिण्यास योग्य केल्या पाहिजेत. याशिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे छोटेखानी संग्रहालय या ठिकाणी उभे राहिल्यास या गडाला चांगले दिवस येतील. अनेक लहान-सहान लढाया या गडाच्या आवारात झाल्याचे इतिहास संशोधक सांगतात; पण हा इतिहास सांगणारे पुरावे शाबूत राहिले पाहिजेत. कारण, किल्ले महिमानगड तसा दुर्लक्षितच राहिला आहे. या गडाची चारही बाजूंची तटबंदी पुन्हा उभी राहिली पाहिजे. या शिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे कला दालन कण्हेरी मठाच्या धर्तीवर होणे अपेक्षित आहे. 
- ए.एस.पुकळे, 20 March, 2016

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025