वडाळा येथील रुपाली मळेकर या मस्जिदबंदर येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. कंपनीतील काम संपल्यानंतर त्या तेथून वडाळा याठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मध्ये चढल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या काही महिला मैत्रिणीदेखील होत्या. त्या डाऊन वाशी लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करीत होत्या. ट्रेन सुरू होताच विकलांग डब्यातून प्रवास करणाऱ्या एकाने रुपाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून चालत्या ट्रेनमधून फलाटावर उडी मारली. त्यावेळी त्या ट्रेनच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांनी व फलाटावरील इतर महिलांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. मात्र ट्रेनचा वेग वाढल्याने रुपाली यांना त्यामधून उतरता आले नाही. नंतर ती ट्रेन पुढेशिवडी स्टेशन याठिकाणी आल्यानंतर रुपाली व त्यांच्या सहकारी महिला मैत्रिणींनी स्टेशनवर गणवेशात असलेल्या पोलिसांना घडलेला चोरीचा प्रकार सांगितला.
पोलिसांनी तात्काळ घटना घडलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी आम्ही याठिकाणी एका इसमास पकडले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना देत रुपाली यांना वडाळा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. ज्या लोकल ट्रेनमधून रुपाली या प्रवास करीत होत्या. त्याच लोकल मध्ये वडूज येथील रहिवाशी असलेले व सध्या मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले राहुल संजय जाधव प्रवास करीत होते. ज्यावेळी महिलांनी चोर चोर असा आरडा ओरडा केला त्यावेळी राहुल यांनी धावत्या ट्रेन मधून उडी मारली होती. व त्याठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसांच्या मदतीने त्या चोरास पडकले होते.
पकडलेल्या व्यक्तीस रुपाली यांनी व त्यांच्या मैत्रिणींनी ओळखून यानेच चैन हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या इसमाची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दीड तोळे वजनाची सोन्याची चैन सापडली. राहुल जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून व क्षणाचाही विलंब न लावता धावत्या ट्रेन मधून उडी मारून त्या चोरास पकडल्याने रुपाली यांची चोरीस गेलेली सोन्याची चैन त्यांना परत मिळाली.
श्री. जाधव यांच्या धाडसामुळे मळेकर यांची सोन्याची चैन परत मिळाली. जाधव हे येथील रहिवासी असून ते सात वर्षांपासून मुंबईत पोलीस दलात सेवेत आहेत. ही घटना साेमवारी (ता.16) घडली हाेती. धाडसी स्वभावामुळे जाधव हे वडूज परिसरातील नागरिकांना माहिती आहेत. जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चोरास पकडल्याने त्यांच्या धाडसीपणाबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे. याबाबत वडाळा पोलीस ठाण्यात मुकेश मंजी वाघरी याच्याविरोधात रुपाली मळेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
जाधव बंधूंचा धाडसी व प्रामाणिकपणा
राहुल हे मुंबई पोलीस दलात तर त्यांचे धाकटे बंधू अतुल जाधव रेल्वे पोलीस सेवेत नोकरीस आहेत. त्यांचे शिक्षण माध्यमिक शिक्षण येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले आहे. लहानपणापासून दोघेही धाडसी व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. अतुल यांनीही गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे फलाटावर सापडलेल्या बॅगेतील 68 हजारांचा मुद्देमाल परत करून प्रामाणिकपणा दाखवला होता. जाधव बंधूंच्या या धाडसी व प्रामाणिकपणाचे नागरिकांतून कौतूक होत आहे.
No comments:
Post a Comment