Wednesday, March 11, 2020

आदरणीय गुरूवर्य उपप्राचार्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर

जिद्दीच्या पंखांना साहसाचे बळ देणारे :  आदरणीय गुरूवर्य उपप्राचार्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर

आज ११ मार्च म्हणजे आम्हा विद्यार्थांचे आदरणीय गुरूवर्य, गणित विभागाचे गणित अधिविभाग प्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांचा वाढदिवस त्यानिमीत्ताने सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. ..!

भारत देशाच्या स्वातंत्र्य व स्वातंत्र्योत्तर  काळातील शैक्षणिक घडामोडींचे साक्षिदार असणारे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे' सांगली शहरातील 'विलिंग्डन काॅलेज' शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित महाविद्यालय म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीनुसार एम एस्सी गणित साठी  विलिंग्डन काॅलेजात माझा प्रवेश निश्चित झाला आणि मी कधीही न पाहिलेल्या वा ऐकलेल्या विलिंग्डन काॅलेजबद्दल उत्सुकता लागून राहीली, मनामध्ये शंकाचे काहूर उठले. पण आज मात्र विलिंग्डन काॅलेज व काॅलेजात लोकप्रिय ठरलेल्या गणित विभागाने मनामध्ये कायमचे घर केले आहे कारण; मला तेथे भेटलेल्या गणित विभागाच्या गुरूजंनामुळेच.

विलिंग्डन काॅलेजातील खोली क्र.१ मध्ये एम.एस्सी चा वर्ग भरत असे. आम्ही विद्यार्थीही तसे काॅलेजमध्ये नवके असल्याने एकमेकांच्या अनोळखी होतो. कदाचित दुपारची वेळ असेल,प्रसन्न वाटणारे, भारदस्त आवाजाचे एक गुरूवर्य वर्गात आले आणि सर्वांशी आपुलकीने बोलता बोलता गंभिरपणाने 'अलज्ब्रिचा'  अभ्यास करायला सांगत होते. ख-या अर्थाने तेथूनच आदरणीय गुरूवर्य प्रा.डाॅ.यु एच नाईक सर यांची पहिली ओळख झाली.

'मी देशाचा देश माझा, मी समाजाचा समाज माझा'- समाजामध्ये काही मोजकीच माणसे अशी असतात की, स्वतःच्या फायदा तोट्याचा विचार न करता देशाच्या प्रगतीसाठी अंखडपणे धडपडत असतात. डाॅ. नाईक सर त्यापैकी एक आहेत असे ठामपणे सांगावे लागेल. विलिंग्डन काॅलेज परिसरावर सरांचा जीव आहे, काॅलेज बद्दल प्रचंड आदराची भावना आहे. काॅलेजच्या उन्नतीसाठी सर नियमितपणे धडपडत असतात. विलिंग्डन काॅलेजच्या लौकीकात भर पडेल असे काहीना काहीतरी करण्यासाठी नवीन संकल्पना योजतात व त्या संकल्पना राबवतात. प्रा.डाॅ. यु एच नाईक सर विलिंग्डन काॅलेज माजी विद्यार्थी संघ 'विलिंग्डोनियन' चे विद्यमान सचिव आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी देश विदेशात विविध पदांवर कार्यरत आहेत.

गणित विभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर प्रयत्नशील असतात याचा प्रत्यय अनेकदा माझ्यासह अनेकांनी अनुभवलाय. सर नेहमी गणितातील नव-नवीन कल्पना विद्यार्थ्यांना सतत सांगत असतात. गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून काॅलेज जीवन समृद्ध करावे यासाठी नेहमी आवाहन करतात. विभागातील गुरूवर्य आणि विद्यार्थी यांचा संवाद सुलभ व्हावा यासाठी गणित विभागाचा दरवाजा आजी व माजी विद्यार्थ्यासाठी कायम खुला असेल असे सर ठासून सांगतात. इतकेच काय कुणालाही काही सुट्टीच्या दिवशी अथवा काॅलेज बंद असणा-या दिवशी अडचण आली तर विद्यार्थ्यांना सरळ घरी यावयास सर सांगतात. अभ्यासू विद्यार्थांची आठवण काढताना 'उदय महाजनी' नामक विद्यार्थी अभ्यासातील शंका घेऊन सरांच्या घरी पहाटे पाच वाजता पोहचायचा याबद्दल सर अभिमानाने सांगतात. गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबर इतर कृतीकार्यक्रमात(Activities) सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण करावी अशी सर नेहमी अपेक्षा व्यक्त करतात. शैक्षणिक क्षेत्र असो वा अन्य कोणतेही क्षेत्र असो विद्यार्थ्यांनी कृतीशील बनावे नुसतेच पाट्या टाकण्याचे कार्य करू नये असे नेहमी सर सांगतात. विद्यार्थांना जगातातील चालू घडामोडी समजाव्यात यासाठी काॅलेजला येताना न चुकता घरातून एक मराठी व इंग्रजी दैनिक घेऊनच गणित विभागात सर पाऊल टाकतात.

वर्गातील तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थांना चहा घ्यायला चला असे निमंत्रणच सर वर्गात धाडतात. जर एखाद्या विद्यार्थाने चहाचे पैसे देऊ केले तर लगेच सर म्हणतात, तुम्ही कमवते झालात की मग डिपार्टमेंटला काहीतरी द्या, आता काही देऊ नका. विलिंग्डन काॅलेजमध्ये गणित विभाग सेट/नेटचा अभ्यास करणा-या आजी माजी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन केंद्र, अभ्यासकेंद्र व्हावे अशी इच्छा बाळगून सर आहेत. विद्यार्थ्यांनी येथील पुस्तकातील ज्ञानाचा खजिना अभ्यास करून लुटावा असे मार्गदर्शन करताना सर सांगतात. आपल्या देशात गणित विषयासाठी काम करणारी पुणेस्थित 'भास्कराचार्य प्रतिष्ठान' सारखी संस्था अभ्यास सहलींच्या निमीत्ताने सरांमुळेच मी पाहू शकलो याचे मनोमन समाधान आहे. अनपड कुटुंबात वाढलेल्या माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यांला सरांनी काॅलेज जीवनात टाय डे, ट्रॅडिशनल डे, विद्यापीठातील सेमीनारमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन यामुळे आदरणीय गुरूवर्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांचा खूपच ऋणी आहे.

सर निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्याकडे शहरी व ग्रामीण जीवनातील अनेक अनुभवाचे भांडार आहे. काॅलेजच्या आवारात असणारे मोहाच झाड असो की काॅलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असणारे गेजग्याचे झाड असो. सरांना वृक्षांबद्दल अफाट ज्ञान आहे. *सरांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ असून तितकाच आक्रमकही आहे. स्मित हास्य, प्रसन्न चेहरा हे भाव सरांकडे आहेत. मन मोठे करून अडल्या नडल्याला मदत करणारे, विद्यार्थ्याचे हित जपणारे डाॅ.  नाईक सर गणित विभागासह काॅलेज मधील भक्कम आधारस्तंभ आहेत. विलिंग्डन काॅलेजमध्ये प्राध्यापक पेशा सांभाळत सरांनी सार्वजनिक स्वच्छता, वक्तशिरपणा, त्याग,सेवा या सारख्या राष्ट्रीय मूल्यांची जोपासणा करत स्वतःप्रती अंगी गुण बिंबविले आहेत याची प्रचिती माझ्यासह अनेकांच्या निदर्शनास ठायी ठायी येते. एखादी व्यक्ती काहीतरी करण्यासाठी कुठल्याका का क्षेत्रात असेना, पण त्यासाठी धडपडत असताना त्याला मदतीसह काहीतरी करण्यासाठी धडपडणा-या व्यक्तीच्या पंखांना बळ देण्याचा प्रेरणादायी गुण आदरणीय श्री. नाईक सर यांच्याकडे आहे.  राष्ट्रप्रेमी, विद्यार्थीप्रिय, आदरणीय गुरूवर्य प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांना धनसंपदा, उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे उर्वरित आयुष्य चैतन्याचे जावो अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा देतो.*

-✍आबासो पुकळे,  मुंबई

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...