प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे; महादेव जानकर यांनी ठाकरे बंधूंना भरवले पेढे
मुंबई (५/७/२५) : वरळी येथे शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक संघर्षांनंतर एकत्र आल्याचे पहायला मिळाले. याचा आनंद म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना व महाराष्ट्रातील नेत्यांना पेढे भरवून त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा वरून काढलेल्या जीआरमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. राज्यातून मोठा विरोध झाल्यावर सरकारने तो जीआर रद्द केला. ठाकरे बंधूंनी पक्ष झेंडा विरहीत विजयी मेळाव्याचे आयोजन करत, राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. रासपलाही आमंत्रण दिले होते. महादेव जानकर यांनी उपस्थित राहून खास पाठिंबा दिला. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, देशावर राज्य करायचे असेल तर हिंदी शिकले पाहिजे, जगातील ज्ञान मिळवायचे असेल तर बहुभाषा आत्मसात केल्या पाहिजेत, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी महादेव जानकर यांचा आवर्जून उल्लेख करत आभार मानले. "इथे महादेवराव बसलेत, महादेवराव जानकर यांना खूप दिवसांनी पाहतोय. काहीवेळेला जानकर भी अंजान होते" असे हसतमुखातून उद्धव ठाकरे यांनी उदगार काढले.
मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, भालचंद्र कांगो, कॉ. अजित नवले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment