रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा
14/7/2025 : रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा
राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच उत्तर कर्नाटक प्रभारी सुनीलदादा बंडगर यांचे आज पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनिलदादा फार घाई केलीत. तुमच्या अकाली निधनाने कुटुंबाचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे फार मोठे नुकसान झाले. दादा तुम्ही पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते नेते होता. दादा तुम्ही आम्हाला असं अचानकपणे जाऊन आम्हाला पोरंक करून गेलात, अशी भावना कार्यकर्त्यात आहे. बांधकाम कामगार ते बिल्डर व रासप कार्यकर्ते ते प्रदेश सचिव असा तुमचा प्रवास पक्षाची शिस्त राखणारा कार्यकर्ता हे दाखवून देते. बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाल्याची जबाबदारी घेऊन आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यायची घेतलेली भूमिका आठवतेय. पक्ष तळागाळात रुजत असताना जानकर साहेबांच्या नावाने एमजे पार्क नाव दिल्याचे जुना रासप कार्यकर्ता सांगत होता. आदरणीय दादा तुम्हाच्या सारखं व्यक्तीमत्व, नेतृत्व पुन्हा होणार नाही. तुमची आठवण पावलोपावली नेहमीच जाणवत राहील..!तुमच्या पश्चात राष्ट्रिय समाज पक्षाला नेहमी उणीव भासेल. दादांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा पसरली. (दिनांक १४ जुलै) त्यांच्यावर अक्कलकोट मधील मैदर्गी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. मा. महादेव जानकर यांनी एका अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेने भरलेल्या प्रसंगी त्यांच्या पार्थिवास राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ठेवून दादांना अभिवादन केलं. दादांची शेवटची इच्छा होती की, "मी मरताना माझ्या प्रेतावर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा घाला," आणि ती इच्छा जानकर साहेबांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केली. ही कृती केवळ एका कार्यकर्त्याच्या श्रद्धेचे नव्हे, तर संपूर्ण पक्षाच्या मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. पक्षासाठी आयुष्यभर झगडलेल्या व्यक्तीच्या कार्याचा आणि त्याच्या भावना, श्रद्धेचा मान राखला गेला.
सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी मा. महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला वाजत गाजत भव्य मोर्चा काढणारा लढवय्या नेता सुनीलदादा होते. अकोला येथे झालेल्या राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात स्वाभिमानी बंडखोर खणखणीत आवाजात स्वाभिमानाने भाषण देणारे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारक्षेत्रात एकाकी झुंज देणारे नेते सुनीलदादा बंडगर यांच्या निधनाचे वृत्त पाहून अत्यंत दुःख झाले.
2009 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्र्याच्या विरोधात दंड थोपटणारा नेता म्हणून सुनील दादानी दाखवून दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढणारा नेता, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता, तसेच जानकर साहेब यांचा आदेश प्रमाण मानून एकनिष्टने काम करणारा कार्यकर्ता नेता, समाजकारण राजकारणात गुळगुळीत भूमिका न घेता रोखठोक सडेतोड भूमिका घेणारा नेता म्हणजे सुनीलदादादा बंडगर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपले दैवत असणारे नेते महादेव जानकर यांना विश्वासाने दगा देणाऱ्या भाजप पक्षाचा खरपूस समाचार घेऊन जशास तसे उत्तर देणारा नेता सुनीलदादा बंडगर होते.
विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी दादांना आर्थिक प्रलोभने दाखवली गेली, पण त्या सर्वांना धुडकावून लावत रणमैदानात स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार घेऊन बाणेदारपणे लढत देत, समाजासाठी झटणारा मी कार्यकर्ता आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. देशपातळीवर सुनीलदादांचं नाव चर्चिले गेले. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते संदिग्ध भूमिकेत असताना जानकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सुनीलदादानी निःसंदिग्धपणे अक्कोलकोट विधानभक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे रणशिंग फुंकले. सुनील दादा बंडगर यांनी चांगली लढत दिली, असे सांगितले गेले, तसे राष्ट्रीय समाज पक्षात राज्य व राष्ट्रीय पातळीवर बोलले जात होते. सुनीलदादा बंडगर हे अठरापगड समाजातील समाजघटकांना सोबत घेऊन काम करत होते. सुनिलदादा यांचा राजकारणात दबदबा वाढत होता. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, शेतमजुर यांच्या प्रश्नावर सुनीलदादा बंडगर सातत्याने आवाज उठवत होते. सर्वसामान्यांना त्यांचा मोठा आधार होता. राष्ट्रीय समाज पक्षात ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य त्यांच्याकडून होत होते. प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला न जाता, छोट्या मोठ्या सत्तेला भीक न घालता, सत्व आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षात राहून संघर्षची भूमिका घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची आठवण कायम काढत राहील.
सुनीलदादा बंडगर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी यशवंत नायक जवळ शोक व्यक्त केला आहे. सुनीलदादा यांचे अकाली निधनाने राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना, राष्ट्रीय समाज पक्ष परिवार कार्यकर्त्यांना दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृतीस यशवंत नायक परिवार तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली....!
- आबासो पुकळे, मुंबई.
-
No comments:
Post a Comment