धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनांचा गैरवापर; भ्रष्ट शिक्षण संस्थाचा कारभार चव्हाट्यावर
विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजप कार्यकर्ता ; रासपच्या जिल्हाध्यक्षांचा घणाघाती आरोप
मुंबई (११/७/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंत्री असताना धनगर समाजासाठी आणलेल्या १३ योजनांपैकी एक असणाऱ्या गरीब मुलामुलींना इंग्रजी माध्यमातून देण्यात येत असलेल्या शिक्षण योजनांचा गैरवापर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी नाराजी व्यक्त करून सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी मंत्री काळात केलेल्या विशेष प्रयत्नामुळे, धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'धनगर समाजाच्या योजनांना निधी दिला जात नसल्याबद्दल, सभागृहात महादेव जानकर यांनी आवाज उठवला होता. राज्य सरकार केवळ आश्वासन देऊन निधी देत नसल्याचे सभागृहाचे लक्ष वेधले होते." प्रत्यक्षात मात्र छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील शिक्षण संस्थानी गोरगरीब धनगर मुलांच्यासाठी असलेल्या निधीवर डल्ला मारल्याचे उजेडात येत आहे. हा प्रकार केवळ मराठवाड्यात नसून राज्यभर हा घोटाळा झाल्याचा संशय धनगर समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश, वसतीगृह, भोजन, शैक्षणिक साहित्य अशा सुविधा देण्याचा हेतू होता. रासपचे अजित पाटील म्हणाले, ही योजना सुरुवातीला तत्कालीन मंत्री महादेव जानकर साहेबांच्या पुढाकाराने, राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आली. समाजातील हुशार पण दुर्लक्षित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा त्यामागचा हेतू होता. पण आता हाच हेतू बाजूला पडतोय... आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार पुढे येतोय. काही ठिकाणी शाळा, संस्था आणि वसतीगृह चालकांकडून या योजनेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार वृत्त वाहिन्यांमधून, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीतून समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
श्री. पाटील पुढे म्हणाले, कागदोपत्री विद्यार्थी दाखवून कोट्यवधींचं अनुदान उचललं जातंय. नाव, शाळा, वसतीगृह फक्त कागदावर – प्रत्यक्षात विद्यार्थीच नाहीत. धनगर समाजाच्या डोळ्यात धूळ टाकून तसेच सरकारची फसवणूक करून ही योजना भ्रष्टाचाराचं कुरण बनवली गेली आहे. बहुजन कल्याण विभाग काय करतंय? जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई? तपास, ऑडिट किंवा चौकशी कुठे आहे? गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळतोय का? या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळे अनेकांना वाटतंय की सरकारच्या कामकाजालाच भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आज लाभ कोणाला? ठराविक नेत्यांना! शिक्षणाचं नाव घेऊन पैसे कमवणाऱ्यांना! आणि ज्यांचं शिक्षण खरंच मोडतंय – त्या मुलांना काय? ही बाब समाजासमोर आणणं आवश्यक आहे. ही योजना महादेव जानकर साहेबांच्या सकारात्मक संकल्पनेतून सुरू झाली होती, पण आज तिचं रूपांतर अनियंत्रित भ्रष्टाचारात झालं आहे. या प्रकारांची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजप कार्यकर्ता असल्याचा, घणाघाती आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष रमेश काटकर यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment