सयाजीराव गायकवाड कोण ? त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहितीये ?
"सयाजीराव गायकवाड हे गुजरातच्या बडोदा/बडोदे संस्थानाचे राजे होते. ते सुधारणावादी होते. त्यांनी आपल्या संस्थानात व मराठी मुलुखात सामजिक चळवळीची बीजं रोवली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक आणि एकूणच सर्वतोपरी मदत केली."
हे मला माहिती होतं. कदाचित तुमच्यापैकी बहुतेकांना एवढंच माहिती असावं असा माझा अंदाज आहे.
पण झालं असं, की आमचे वारणानगरचा मित्र Devdatta Kadam मला काही महिन्यांआधी भेटले. ते महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या जीवनकार्याचा अभ्यास करतात. भेटल्यावर त्यांनी मला सयाजीरावांच्या धर्म आणि सामाजिक सुधारणांबद्दलचा एक खंड भेट दिला. तो सहज चाळताना आमचं सयाजीरावांबद्दल बोलणं सुरूच होतं. त्यांच्या बोलण्यामुळे जरा वाचलं आणि इतका मोठा माणूस आपल्याला आधी माहित नव्हता याची खरंच लाज वाटली.
1. शेती
सयाजीरावांनी शेतीसंबंधी आधुनिक ज्ञान घ्यायला कितीतरी होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन परदेशात पाठवलं. रॉयल कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, ऑक्सफर्ड अशा मानाच्या संस्थांमध्ये शिक्षणाची मोफत व्यवस्था केली. Agriculture chemistry सारख्या विषयाचं महत्व त्या काळात त्यांनी जाणलं होतं. बडोद्यात स्वतंत्र कृषी खातं स्थापन केलं. महाराष्ट्रात जेव्हा सहकार चळवळीची सुरुवात होत होती, त्याच्या सुमारे 50 वर्षे आधी सयाजीरावांनी बडोद्यात सहकार मॉडेल ऑलरेडी यशस्वीपणे राबवलं होतं. १९३९ च्या पूर्वी त्यांच्या कारकिर्दीत बडोद्यात ५८ प्रकारच्या सहकारी संस्था यशस्वीपणे कार्यरत होत्या. शेतीला उद्योगाची जोड द्यावी म्हणून त्यांनी असंख्य उपक्रम राबवले. भारतात सर्वप्रथम कृषी-औद्योगिक प्रदर्शनांची संकल्पना बडोद्यात रुजवली.
2.प्राच्यविद्या संशोधन
पुण्यातील प्रसिद्ध भांडारकर संस्था माहितेय नं ? तिच्या स्थापनेसाठी सयाजीरावांनी भरभक्कम आर्थिक मदत केलेली आहे. आजच्या काळात ते मूल्य 4 कोटी 68 लाख रु. हुन अधिक भरतं. तसेच बडोद्यात प्राच्यविद्या परिषद भरवून त्या काळात या विद्याशाखेचं महत्व त्यांनी जाणलं होतं. सर्व धर्मांचा comparative study बडोद्यात सुरु झाला.
3. बुद्धाचा पुतळा आणि बुद्धविचार
आता पुतळे उभे करायची स्टाईल सुरु झालीय, पण त्या मागे काही तात्विक विचार असतो का? सयाजीरावांनी 1910 साली जपानहून बुद्ध मूर्ती मागवून बडोद्यात बसवली होती. या पुतळ्याच्या चबूतऱ्यावर बौद्ध धर्माची तत्वे कोरलेली होती. पुतळा उभारणीच्या भाषणात ते म्हणतात, "बुद्धाचे विचार आपल्याला नवी दृष्टी देतील. त्याच्या विचारांचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून हा पुतळा उभा होतो आहे." बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराच्या आधी 46 वर्षे सयाजीरावांनी 'बुद्ध आपल्याला का हवा आहे" याची कारणमीमांसा केली होती. बौद्ध धम्म्माला आधुनिक काळात पहिला राजाश्रय देणारा राजा म्हणजे महाराजा सयाजीराव ! फर्ग्युसन कॉलेजात बौद्ध धम्म समजून घ्यायला मदत व्हावी म्हणून पाली भाषा शिकवायला सुरु झाली ते सयाजीरावांनी सुरू केलेल्या शिष्यवृत्त्यांमुळेच. हे फार फार थोर आहे.
4. उच्चशिक्षणाचा मानदंड
स्वत: वयाच्या 12व्या वर्षांपर्यंत निरक्षर असलेल्या सयाजीरावांनी तळागाळातील समाजाने शिक्षण घ्यावं म्हणून कला, भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान अशा अनेक विद्याशाखांचं शिक्षण उपलब्ध करून दिलं होतं. तेही अगदी अल्पखर्चात. त्यांनी स्थापन केलेल्या बडोदा कॉलेजला आता 141 वर्षं पूर्ण झालीयेत. १८९० मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या कला भवनमध्ये दादासाहेब फाळकेंनी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक शिक्षण घेतलं होतं. त्यांना camera सुद्धा सयाजीरावांनीच दिला होता. 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिळवणारे सी.व्ही.रमण आणि भारतीय डिजिटल क्रांतीचे सूत्रधार सॅम पित्रोदा हे दोघेही कलाभवनचेच विद्यार्थी! बसला ना धक्का??
5. लोककल्याणकारी राजा
1932 मध्ये कुठल्याही आंदोलनाशिवाय सयाजीरावांनी संस्थानातील सर्व मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. बरं, या प्रतीकात्मक बाबींच्याही पुढे जात सयाजीरावांनी त्याच्या 50 वर्षे आधीच 1882 साली आदिवासी व अस्पृश्यांना मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा लागू केला. यात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून मग 1906 ला तो कायदा अधिक सुधारीत स्वरूपात संपूर्ण बडोदे संस्थानात लागू झाला. पुढे बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली हे आपण जाणतोच. सयाजीरावांची कारकिर्द म्हणजे लोकशाहीचा महाप्रयोग होता. अस्पृश्यांसोबत बसण्याची तयारी असेल अशाच लोकांना धारा सभेची निवडणूक लढवण्याची परवानगी होती. 1894 ला 'गाव तिथे ग्रामपंचायत' स्थापन करण्याचा उद्देश ठरवून 1902 मध्ये त्यांनी भारतातील प्रथम ग्रामपंचायत कायदा बडोद्यात लागू केला. लोकशाही निर्णयप्रक्रियेबद्दलचा आधुनिक भारतातला पहिला लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांना स्वतंत्र भारतातही ज्यासाठी संघर्ष करावा लागला त्या हिंदू कोड बिलामधले सर्वच्या सर्व 6 कायदे १९३३ च्या आधीच बडोद्यात सयाजीरावांनी सर्वप्रथम राबवले होते. म्हणूनच महाराजांच्या मृत्यूनंतर 11 फेब्रुवारी 1939 रोजी आपल्या 'जनता' मधील लेखात बाबासाहेब म्हणतात, "बडोदा संस्थानात महाराजांनी केलेले सामाजिक सुधारणांविषयीचे कायदे युरोप व अमेरिकेतील कुठल्याही कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत."
सयाजीरावांच्या मोठेपणाचा यापेक्षा अधिक मोठा पुरावा काय हवा ?
6. मराठी भाषा आणि साहित्यव्यवहार
भालचंद्र नेमाडे सयाजीरावांचं कौतुक करताना म्हणतात की सयाजीरावांनी मराठीसाठी जेवढं केलंय, तेवढं त्यांच्यानंतर सत्तेवर असलेल्या कोणीही केलेलं नाही. 1910 ला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पायाभरणी व 1912 ला उद्घाटन सयाजीरावांनीच केलंय. सयाजीरावांनी एकूण 7 साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान भूषवलय. यावेळी त्यांनी जी अध्यक्षीय भाषणं केली त्यामध्ये ते नेहमी बहुजनहिताच्या बाजूने बोलत असत. 1909 साली बडोद्याला साहित्य सम्मेलन झालं तेव्हा महाराजांमुळेच किर्तीकरांसारखा एक वनस्पतीशास्त्रज्ञ पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला होता. विशेष गोष्ट म्हणजे १९०९ च्या या संमेलनाचे अध्यक्ष किर्तीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्षदेखील ठरले. हे केवळ सयाजीरावांमुळेच. हा इतिहास आजच्या साहित्यव्यवहारातल्या किती लोकांना माहितीये ?
पाककला, लोकसाहित्य, भाषा, तत्वज्ञान , तंत्रज्ञान, धर्म, कला, संस्कृती, विज्ञान, व्यायाम, कृषी, संगीत, संशोधन, कोश, समाजशास्त्र, प्रवासवर्णन इत्यादी साहित्यप्रकारांत व्यापक ग्रंथनिर्मिती करणारे सयाजीराव हे मराठीच्या इतिहासातले सर्वात मोठे प्रकाशक होत.
7. विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, न्यायशास्त्र
भारतात पहिला tractor सयाजीरावांनी आणला. तेही शेतीविकासाच्या दुरदृष्टीतून. त्यांनी प्रथम उसासोबतच बीटापासून साखरनिर्मितीचा प्रयोग शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावं म्हणून केला होता. त्यांच्या नंतर अजुनही शंभर वर्षे भारतात तसा प्रयोग करण्याची फक्त चर्चाच सुरु आहे. 1882 मध्ये आपल्याला राजा म्हणून मिळणारे विशेष हक्क सोडून ते स्वतः न्यायव्यवस्थेच्या चौकटीत आले. न्यायशास्त्रातील पारिभाषिक कोश तयार केला. स्वतः सयाजीरावांचा तात्विक व तौलनिक धर्माभ्यास होता. त्यांनी स्थापन केलेल्या अध्यासनाकडून 'गायकवाड स्टडीज इन रिलिजन अँड फिलॉसॉफी' नावाच्या ग्रंथमालेत एकूण सतरा पुस्तकं प्रकाशित झालीयेत. अजून एक धक्का देऊ का? १ ऑगस्ट १९१६ रोजी महाराजांनी बडोदा कॉलेजमध्ये सुरू केलेलं 'तत्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासा'च हे अध्यासन अशा प्रकारच भारतातील पहिलं आणि शेवटचं अध्यासन होत.
शिवाजी महाराज - शिवरायांबद्दलच्या स्मरणकार्यासाठी सयाजीरावांनी एवढी कामं करून ठेवलीयेत की इथे लिहायला कमी पडतील. ती मूळातून वाचायला हवीत नक्की.
महात्मा फुलेंसोबत सयाजीरावांचे आदरयुक्त स्नेहसंबंध -
सयाजीरावांच्या सांगण्यावरूनच फुलेंना सत्यशोधक कार्यकर्त्यांनी 1888 साली महात्मा ही उपाधी दिली. कितीतरी ठिकाणी सयाजीरावांनी फुलेंना मदत केलेली दिसते. अनेक ठिकाणी फुले सयाजीरावांचा प्रेमपूर्वक उल्लेख करतात. फुलेंना सयाजीरावांनी शेवटच्या पक्षाघाताच्या आजारपणात आर्थिक मदतही केली. फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई व यशवंतला सन्मानाने जगता यावं म्हणून आर्थिक-शैक्षणिक पाठबळ दिलं. पण फुले दाम्पत्याच्या वैचारिक प्रवासात सयाजीरावांचं योगदान नेहमी अंधारात राहिलं बघा !
महात्मा फुलेंनी आपल्या बैठकीच्या खोलीत महाराजांचा फोटो स्वतःहून मागवून घेऊन लावला होता ही गोष्टच आम्हाला अजून माहित नाहीय...!!
विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब, राजारामबापू अशी कितीतरी माणसंं सयाजीरावांच्या आश्रयाने उभी राहिली. असं म्हणायला काहीच हरकत नाही की आधुनिक महाराष्ट्रातील बहुतेक मोठी माणसंं ही येनकेनप्रकारे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात सयाजीरावांच्या प्रचंड व्यापक कार्याच्या पंखाखाली वाढली, समृद्ध झाली. आपणही त्यामुळेच त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवं.
त्यातूनही हे मी जे लिहिलंय ते फक्त 1 टक्का आहे. जेवणातले स्टार्टर्स समजा हवंतर. महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे 62 जाडजुड खंड आणि साकेत प्रकाशन व महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन प्रशिक्षण संस्थेची मिळून एकूण १०५ पुस्तक आजवर आलीत. हा मेन कोर्स पचवायचा तर बौद्धिक स्टॅमिना वाढवावाच लागेल. बाबा भांड सर आणि कोल्हापूरचे दिनेश पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली खंडांची ही संख्या 200 पर्यंत तरी जाईल. यावरून त्यांचं आधुनिक काळातलं अवाढव्य काम लक्षात येतं. आता हे सगळं मलाच माहित नव्हतं. वेळ मिळेल तसं थोडं वाचायला सुरु केलंय. देवदत्त फेसबुक पोस्ट, लेख वगैरे पाठवत राहतात. त्यांच्यासारखी बरीच मंडळी हे काम पुढे यावं म्हणून राबतायत.
11 मार्चला, म्हणजे येत्या चार दिवसांनी सयाजीरावांची 159वी जयंती आहे. अशावेळी त्यांच्या अफाट कार्याला नमन म्हणून कुठेही बोलताना, लिहिताना शिवराय-फुले- शाहू-आंबेडकर यांच्यासोबत ""सयाजीरावांचंही"" नाव घ्यायला मी सुरुवात करतोय.
हे भारलेपण त्यांना अर्पण करतो आणि तुम्हाला सयाजीरावांबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटेल, अशी आशा व्यक्त करतो ♥️
No comments:
Post a Comment