धनगरांनी शब्दांचा वाकबगार व्हावं...!
कै. आ. भाई. गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे यांचं भाषण
आदरणीय विचारमंच, स्व. भाई गणपतरावजी देशमुख चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय प्राचार्य डॉ. आर. एस. चोपडे, तसेच विचार मंचावरील सर्व मान्यवरांचं आणि साहित्य संमेलनासाठी उपस्थित धनगर सारस्वतांचं, शारदेच्या पुजार्यांचं, समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणा-या समाज धुरीनांचं, तरूणांचं, माय मावल्यांचं, बाळ गोपाळांचं, पत्रकार बंधुंचं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या आपणा सर्व रसिक-श्रोत्यांचं मी स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध झालेल्या सांगोला नगरीत शब्दसुमनांनी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो.
खरं म्हणजे आयोजकांनी हे साहित्य संमेलन सांगोला या ठिकाणी आयोजित करण्याचा बहुमान सांगोलाकरांना दिला याबद्दल मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आषाढ महिना सुरू आहे आणि वरूणराज्याची दरवर्षापेक्षा या वर्षी आपल्या सर्वांवर अधिक मेहरबानी आहे. सर्व महाराष्ट्र आषाढसरींनी चिंब-चिंब न्हावून निघालेला आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांच्या या यात्रेत आपणसुद्धा शब्दरूपी सरींच्या पावसात चिंब-चिंब ओथंबून निघणार, याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही.
बंधू-भगिनींनो, साहित्य हा समाजाचा आरसा असतो. या आरशामध्ये समाजमन जसंच्या तसं प्रतिबिंबित होत असतं. जसा समकालीन समाज, तसाच साहित्यामध्ये तो प्रतिबिंबित झालेला असतो. समकालीन समाजाच्या रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती, चालीरीती, व्यक्ती, इ. गोष्टी साहित्यावर छाप टाकत असतात. म्हणूनच प्रत्येक समाजात, संस्कृतीत आणि कालखंडातसुद्धा साहित्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखादा कालखंड जाणून घ्यायचा असेल तर त्या कालखंडातील साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, असं मत सर्वसाधारणपणे तज्ज्ञ व्यक्त करतात. साहित्य जसं समकालीन समाज प्रतिबिंबित करतं, तसं ते भविष्यातील समाज घडविण्याचे काम सुध्दा करत असतं. सुसंस्कृत समाज घडविण्यात साहित्याचं आतापर्यंत फार मोठं योगदान राहिलेलं आहे. म्हणूनच प्रत्येक कालखंडातील संस्कृतीने साहित्यिकांना फार मानाचं स्थान दिलं आहे. साहित्यिकाकडे सृजनशीलता असते. तो काही तरी नवीन निर्माण करू शकतो, म्हणून या विश्वाच्या निर्मात्याइतकंच महत्त्व त्याला ग्रीक व लॅटिन तत्ववेत्त्यांनी दिलं आहे. भौतिक विश्र्व भले निर्मात्याने तयार केलं असेलही, परंतु सुसंस्कृत, विवेकशील व प्रगल्भ विचारांचं जग निर्माण करण्यात साहित्य क्षेत्रातील कलावंतांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. म्हणूनच शेली या इंग्रजी कवीने कवींचा गौरव 'poets are the unacknowledged legislators of the world' अशा शब्दांत केला आहे.
एखाद्या विशिष्ट काळातील समाज जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्या काळातील साहित्य वाचण्याची गरज असते. कारण त्या काळातील समाजमन, संस्कृती, चालीरीती, प्रथा, परंपरा, व्यक्तिछटा, इत्यादी गोष्टी त्या साहित्यामध्ये उमटलेल्या असतात. थोडक्यात, साहित्य हे समाजाचा इतिहास असतो. साहित्य समाजमनाचा आलेख असतो.
जगभर विविध भाषांतील आणि समाजात अनेक साहित्य प्रवाह आहेत. तसे मराठी साहित्यात सुद्धा आपल्याला अनेक प्रवाह बघायला मिळतात. उदा. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, बालसाहित्य, विद्रोही साहित्य, इ. त्या-त्या विशिष्ट प्रवाहात विशिष्ट प्रकारच्या समकालीन समाजाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. मला आनंद आहे की, जसं दलित साहित्य, ग्रामिण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, व विद्रोही साहित्य यांमध्ये दलितांच्या, ग्रामिण भागांतील मध्यमवर्गीय तथा गोरगरीब कष्टकरी समाज व स्त्रियांच्या प्रश्नांची उकल केली गेलेली आहे, त्यांचं सुखदुःख प्रतिबिंबित केलं गेलं आहे, तशाच पद्धतीने धनगरी साहित्यामध्ये सुद्धा धनगर जमातीच्या प्रथा, परंपरा, संस्कृती आणि समस्या या गोष्टी प्रतिबिंबित होतील आणि भारतीय समाजाच्या जडणघडणीत धनगर जमातीचे असलेले योगदान अधोरेखित केले जाईल. तसेच, येणाऱ्या काळात धनगरी साहित्य मराठी साहित्यातील एक स्वतंत्र प्रवाह म्हणून उदयाला येईल, तो अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय होवू शकेल, असा आशावाद आजच्या या साहित्य संमेलनाच्या वेळी मला व्यक्त करावासा वाटतो.
बंधू-भगिनींनो, दुर्दैवानं सांगावासं वाटतं की, धनगर जमातीवर फार कमी लेखकांनी लेखन केललं आहे. व्यवस्थेने ऊसाच्या चिपाटासारखी पिळून काढलेली धनगर जमात प्रस्थापित साहित्यिकांच्या नजरेत भरलीच नाही. त्यांनी पाहिजे तसा न्याय या जमातीला दिला नाही. रानोमाळी, वाड्या-वस्त्यांवर विखुरलेल्या या जमातीच्या सुख-दुखाची दखल प्रस्थापित साहित्यिकांनी फारसी घेतली नाही. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने बहुसंख्य असलेल्या धनगरांची व्यथा, त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी जशा प्रस्थापित राजकारण्यांनी दुर्लक्षित केल्या तशाच त्या लेखकांनीसुद्धा दुर्लक्षित केल्या, असं खेदाने या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या फार मोठ्या समुदायावर म्हणजे धनगर जमातीवर अशा पद्धतीने एक प्रकारे अन्याय केला गेला, अशी भावना कुठल्याही विद्वानाच्या मनात तयार झाली तर ती वावगी वा अतिशोयक्ती ठरणार नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीची कल्पना आपण धनगरांच्या चालीरिती, प्रथा, परंपरा, पेहराव, इ. गोष्टींशिवाय करूच शकत नाही, एवढं मोठं योगदान धनगर जमातीचं महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या जडणघडणीत आहे. सुंभरान, गजनृत्य, इ. कलाप्रकारांचं देणं धनगरांनी माहाराष्ट्राच्या संस्कृतीला दिलं आहे. "बनगरवाडी", "हारण", “झुंज” इ. ठराविक पुस्तकं सोडली तर महाराष्ट्रात बहुसंख्य असलेल्या धनगर जमातीचा साधा नामोल्लेखसुद्धा कुठे पुस्तकांत वा कवितेत बघायला मिळत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे साहित्य वा कविता आल्यात, परंतु पशुपालन करणाऱ्या धनगर जमातीवर मात्र ना पुस्तकं लिहिली गेली, ना नाटकं, ना कविता ! साध्या कथांमधूनही या जमातीला स्थान मिळू नये? ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच समाजातील विविध चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, इ. गोष्टी भविष्यातील पिढीसमोर मांडण्यासाठी धनगर जमातीतीलच तरुणांनीच आता पुढे आलं पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे.
बंधू-भगिनींनो, साहित्य माणासाचे विचार समृद्ध करतं, ते व्यक्तीची संवेदना जागवतं आणि त्याच्यामध्ये विवेकशीलता निर्माण करतं. म्हणूनच जर आपल्याला विवेकशील, समृद्ध आणि प्रगल्भ विचारांची धनगर जमात निर्माण करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला कसदार साहित्याची निर्मिती करावी लागेल. साहित्यातून वाचकांच्या मनाला पाझर फोडण्याचं काम धनगर सारस्वतांनाच करावं लागेल. त्याशिवाय व्यवस्था सुद्धा आपली दखल घेणार नाही. त्यासाठी आपल्याला लेखणी नावाचं दुधारी शस्त्र हातात घेऊन शब्दांवर प्रभुत्व गाजवावं लागेल. व्यवस्था नावाची भित्री गोष्ट फक्त लेखणीलाच घाबरते. म्हणून धनगर जमातीने आत्ता लेखणी नावाच्या शस्त्राचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. पैशांची, शस्त्रांची आणि सत्तेची पूजा करण्याऐवजी या जमातीने आता शब्दांची पूजा केली पाहिजे. कारण आजची ही पृथ्वी सूर्याभोवती फिरता-फिरता शब्दां-भोवतीसुद्धा फिरू लागली, ही काळाची महिमा आहे. म्हणूनच शब्दांची महती सांगताना कवी वामन निंबाळकर म्हणतात,
"शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुदधा.......
शब्द विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची......
शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या...
वाहिले नसते आसवांचे महापूर..
आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर, शब्द नसते तर....... "
म्हणूनच बंधुंनो, जर तुम्हाला या व्यवस्थेवर आणि या जगावर हुकूमत गाजवायची असेल, तर तुम्हाला शब्दांचे किमयागार व्हावे लागेल. तुम्हाला व्हावं लागेल शब्दांचे जादूगार आणि वाकबगार सुद्धा..!
"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने|
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू|
शब्दे वाटू धन जनलोका|
तुका म्हणे पाहा शब्दची हा देव|
शब्देची गौरव पूजा करू|"
बंधुंनो, तुकारामांचा हा संदेश धनगरांनी आता गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी आज आपण आयोजित केलेल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलना सारख्या उपक्रमांतून साध्य करणंच शक्य आहेत.
धनगर जमातीसारख्या विस्थापित जमातीला इतर जमातींसारखंच अनेक पिढ्या शिक्षणाचे दरवाजे बंद केले गेले होते. आज मात्र ते खुले आहेत. जमातीच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून आपण जमातीतील जास्तीत जास्त मुला-मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांच्या संवेदना जागविण्यासाठी, तसेच, जाणिवा व नेणिवा चेतविण्यासाठी कसदार साहित्य वाचायला व लिहायला प्रोत्साहित केलं पाहिजे.
धनगर जमातीला फार मोठा, समृध्द आणि जाज्वल्य इतिहास लाभला आहे. परंतु ही जमात इतिहास विसरली आहे. आपण आपल्या
इतिहासाकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहापासून कोसो मैल दूर राहिल्याने धनगर जमात आत्मविश्वास गमावून बसली आहे. जो समाज इतिहास विसरतो, तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. म्हणून जमातीतील सारस्वतांनी आपल्या वेदना मांडणारं, सुखदुःख प्रतिबिंबित करणारं, चालीरीतींचा आलेख तयार करणारं कसदार व दर्जेदार साहित्य निर्मितीकडे वळले पाहिजे.
सामाजिक चळवळीत साहित्यिकांचं फार मोठं योगदान राहिलं आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, वामनदादा कर्डक आदी साहित्यिकांच्या लेखणीने बहुजन समाजाला जागवण्याचे महत्कार्य केलेलं आहे. आजही महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स, चार्वाक यांचं साहित्य सामाजिक चळवळींना दिशादर्शकाची भूनिका निभावत आहे. सामाजिक परिवरतानाच्या लढाईत या साहित्याने फार मोलाचं योगदान दिलं आहे. धनगर जमातीमध्येसुद्धा सामाजिक परिवर्तनवादी चळवळ रुजविण्यासाठी परिवर्तनवादी विचारांचे साहित्य निर्माण होणे, ही काळाची गरज आहे.
विजय नगरचे साम्राज्य निर्माण करणारे हरिहर व बुक्क हे धनगर होते, मेवाडवर दिर्घकाळ साम्राज्य गाजविणारे मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, पंढरपूरचा विठोबा, संत बाळुमामा, गोरगरीब दीन-दलित, शोषितांचा कैवारी बापू बिरू वाटेगावकर, राजकारणाला नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व कै. भाई गणपतराव देशमुख, कनकदास, मा. दा. देवकाते, इ. महापुरूष धनगरांमध्ये होवून गेलेत, परंतु धर्मांध आणि जातीयवादी इतिहासाने त्यांची पाहिजे तशी दखल घेतली नाही. कारण भारतीय इतिहासाची लेखणी प्रस्थापितांच्या चिपलीखाली दबली गेली होती. धनगरांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रस्थापित इतिहासकारांनी आणि साहित्यिकांनी दखल घेतली नाही. राजे मल्हारराव होळकर व पु. अहिल्यादेवी होळकर यांच्यावर परकीय इतिहासकारांनी लेखन केलं, परंतु स्वदेशीय जातियवादी इतिहासकारांनी आणि साहित्यिकांनी मात्र त्यांच्यावर लिहिणं जाणीवपूर्वक व मुद्दामहून टाळलं. किंबहुना, इतिहासाचं विकृतीकरण करून मल्हारराव होळकरांसारख्या महापराक्रमी योध्द्यास बदनाम करण्याचा घाट घातला गेला. अशा पद्धतीने धनगरांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र, धनगरांनी सजग राहून आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. धनगर जमातीत आजही डॉ. शिवाजीराव ठोंबरे, मा. गोविंद काळे, डॉ. महेश खरात, डॉ. यशपाल भिंगे, मा. आण्णासाहेब डांगे, मा. संगिता धायगुडे, फेसाटीकार नवनाथ गोरे, धनंजय धुरगूडे, इ. अनेक लेखक-लेखिका आहेत, त्यांना आपण वाचलं पाहिजे. धनगर जमातीचा जाज्वल्य इतिहास आणि देशाच्या जळणघडणीत धनगरांचं योगदान ना. सि. ईनामदार, मा. संजय सोनवणी, रा. चि. ढेरे, इरावती कर्वे, इ. साहित्यिकांनी आपल्या अनेक पुस्तकांतून मांडला आहे. त्यांच्या लेखन साहित्यावर संशोधन केलं पाहिजे, पीएचडी केली पाहिजे, तसेच विविध परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांच्या साहित्यावर विचारमंथन झालं पाहिजे. यासाठी समाजातील प्रतिभावंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व राजकारण्यांनी एकत्र आलं पाहिजे. तरच येणाऱ्या काळात आपण धनगर जमातीची अवहेलना थांबवून दशा आणि दिशा बदलवू शकू.
आजच्या संमेलन सोहळ्याच्या आयोजनापासून नियोजनापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच दोन दिवस या ठिकाणी होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य करतो अशी विनंती सुद्धा करतो. बंधूंनो आपली कोणतीच गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी आम्ही घेतलेली आहे. तथापि त्यामध्ये काही कमतरता राहिल्यास व आपली गैरसोय झाल्यास आपण आम्हाला समजून घ्याल अशी माफक अपेक्षा बाळगतो. माझ्यासारख्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकांचे विचार आपल्यासारख्या साहित्य प्रेमिकांनी ऐकून घेतल्यात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष या नात्याने आपण सर्व मान्यवर साहित्यप्रेमी श्रोते सज्जन यांचे भंडार्या इतक्यात सावित सात्विक व पवित्र भावनेने या साहित्य नगरीत एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
एळकोट एळकोट जय मल्हार !
प्रा. संजय शिंगाडे,
स्वागताध्यक्ष
स्व. आ. भाई गणपतराव देशमुख
४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन
सांगोला
मो. +91 94046 66477