श्री एस. एल अक्कीसागर साहेब यांचा आज 65 वा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मला समजलेले श्री. एस एल अक्कीसागर साहेब
सिद्धाप्पा लक्ष्मण अक्कीसागर राष्ट्रीय समाज पक्षाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपणास परिचयाचे आहेत. श्री अक्कीसागर साहेब यांनी त्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा प्रवास 'माता से जगदर्शन पिता से पहचान' या 'स्व'लिखित लेखात मांडला आहे, त्यातील माहितीची पुनरावृत्ती टाळून 'मला समजलेले अक्कीसागर साहेब, याविषयी त्यांच्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात लिहत आहे.
श्री एस.एल अक्कीसागर साहेब यांच्या जीवनाची सुरुवात जबलपुर मध्यप्रदेशातुन होते, पुढे तो प्रवास पुणे- मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक सर्वत्र देशभर व्यापलेला आहे. मूळचे कर्नाटकचे असलेले श्री. एस. एल अक्कीसागर साहेब यांना वडिलांच्या नोकरीमुळे फुगेवाडी- पुणे येथे राहावे लागले. तेथे त्यांना काही मित्र भेटले- जोडले गेले, त्या परिसरात हुशार असल्यामुळे अक्कीसागर साहेब यांची ओळख निर्माण होत होती, त्यातून त्यांना तेथील स्थानिक पुढाऱ्यांनी शरद पवारांची भेट घडवून देण्याचे ठरवले व त्यांचे मत न जाणताच यांना काँग्रेसचे पद देऊ केले, ही वार्ता कळताच त्यांनी काँग्रेसचे पद नाकारले शिवाय शरद पवारांची भेट टाळली. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करावा असा त्यांना त्यांच्या मित्रांनी आग्रह धरला असता, त्यावेळी त्यांनी यापासून दूर राहणे पसंत केले.
रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ३७ वर्षाची सेवा केली. नोकरीच्या सुरुवातीला पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले मत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे वारसदार यांना दिल्याचे श्री. अक्कीसागर सांगतात. श्री अक्कीसागर यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड अशा विविध भाषांवर प्रभुत्व आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियातील सेवानिवृत्तीनंतर अक्कीसागर यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आली. राष्ट्रीय अध्यक्षपदी असताना बिहार, केरळ, तमिळनाडू,तेलंगणा, छत्तीसगड राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यात पक्षाचे संघटन उभे करन्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. बहुसंख्यांक असलेल्या भारतातील पशुपालक समाजात एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी पाल -धनगर -गडरिया -रबारी रायका -कुरुबा- मालधारी- भरवाड या नावाने स्नेहसंमेलने आयोजित केली. विविध प्रांतात विखुरलेला विविध भाषिक समाज हा राष्ट्रीय समाज असल्याचे सांगितले. पशुपालक समाज हा विश्वाचा भुपालक समाज आहे.
राजकीय संधी अभावी ठेचा खाणारा, जनजागृती अभावी खच खळग्यातून वाटचाल करणारा बहुसंख्यांक धनगर समाजाची संघटीत शक्ती यशवंत सेनेच्या माध्यमातून तयार होत होती, त्या शक्तीला बुध्दीची युक्ती श्री. अक्कीसागर यांनी दिली. घोषवाक्य दिले, कार्यक्रम दिले, निशाण ठरवले, प्रचार प्रसाराची कोणतीही साधने नसताना कार्यक्रम आखले व ते राबवले.
त्यांनी नोकरी करत असताना बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजाचा राजकीय पक्ष असावा अशी इच्छा बाळगली, 'आपला पक्ष आपला नेता' हे स्वप्न पाहिले, त्यासाठी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. पुढे त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष व नेता महादेव जानकर यांच्या रूपाने ते मिळाले.
महादेव जानकर या नेतृत्वास ते जपण्याचा व वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. महादेव जानकर यांचे नेतृत्व हे डबक्यात साचून राहणाऱ्या पाण्यासारखे नसून खळखळत वाहणाऱ्या व प्रवाहाबरोबर वाहत जाणारे परिवर्तनवादी नेतृत्व आहे, असे ते सांगतात. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाचे अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांना २५ वर्षापूर्वी, २० वर्षांपूर्वी,१५ वर्षापूर्वी, १० वर्षापूर्वी, ५ वर्षांपूर्वी धनगर समाजाची अवस्था काय होती ? असा प्रश्न करून लक्ष वेधतात.
एस. एल. अक्कीसागर हे महाराजा यशवंतराव होळकर यांना आपले प्रतीक मानतात. कर्नाटकातील त्यांच्या घरी महाराजा यशवंतराव होळकर यांचे तैल चित्र रेखाटले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्रकाशित केलेले यशवंत सेनेचे पत्रक त्यांनी पोस्टाने कर्नाटकातील बांधवांना पाठवले, मात्र तेथील कुलकर्णीने ते पत्र वाचून फेकून दिले व अपमानास्पद शब्द वापरले. यावर महाराजा यशवंतराव होळकर यांचे चित्र छापले होते. त्यातील मजकूर जरी वाचता येत नसला तरी, त्यातील चित्र मात्र तेथील बांधवांनी ओळखले होते, या घटनेवर प्रकाश टाकताना श्री. अक्कीसागर यांनी यशवंत नायकमध्ये कुलकर्णीचे ढोंग व माफीनामा यावर लीहले आहे.
30-जानेवारी-2014 हा दिवस राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर यांच्यासाठी सत्ता संक्रमणाचा दिवस असल्याचे श्री अक्कीसागर म्हणतात, मात्र 2019 साली सत्ता संक्रमणाची वाटचाल करत असलेले महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्ष यांनी महाराष्ट्रात ज्यांच्याशी दोस्ती केली त्यांनीच राजकीय पटलावरून संपवण्यासाठी कटकारस्थान रचले, मात्र दिल्लीच्या सत्तेचे लक्ष्य घेऊन मार्गक्रमण करणारा राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरला व आपले दिल्लीचे स्वप्न जिवंत असल्याचे एस. एल अक्कीसागर यांच्या नेतृत्वात सिद्ध करून दाखवले. ओबीसींच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील कोणताही नेता ईशान्य भारतात पोहचलेला नाही, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर यांचे नेतृत्व आसाम पर्यंत नेण्याचे काम अक्कीसागर यांनी केले आहे. भारतातील विविध नेतृत्वास महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथे आणण्यासाठी एस. एल अक्कीसागरांनी प्रयत्न केले आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार क्षेत्रातून पहिल्यांदा जिंकला ,तेव्हा त्यांनी त्यांच्या आईस, ही गोष्ट सांगितली ; पण त्यांच्या अनपढ आईस यातले काहीच समजले नाही. लहानपणापासून श्री. अक्कीसागर चिकिस्तक वृत्तीचे असल्याकारणाने त्यांनी समाजाला अज्ञानाच्या अंधकरात घेऊन जाणाऱ्या, देवा धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या रूढींना जुमानले नाही. राष्ट्रीय समाजातील महानायक उपेक्षित असल्याकारणाने राष्ट्रीय समाज उपेक्षित असल्याचे श्री अक्कीसागर सांगतात. महाराजा यशवंतराव होळकर यांचा 200 वा स्मृतीदिन भानपुरा येथे पार पाडला, तो दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचे श्री अक्कीसागर सांगतात. शालेय पुस्तकात दिलेले नेतृत्व हे आमचे नसून महादेव जानकर हे आपले नेते आहेत असे श्री अक्कीसागर ठासून सांगतात. भारतातून गोरे इंग्रज गेले, तरी भारतात काळे इंग्रजांचे राज्य आहे आणि ह्या काळे इंग्रजांना हटवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर करतील असा दावा श्री. अक्कीसागर यांचा आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेची आठवण सांगताना श्री अक्कीसागर सांगतात, रिझर्व बँकेच्या पायरीवर महादेव जानकर व आपण असंख्य बैठका घेतल्या. कालांतराने पुढे आम्हाला फोर्टला यशवंत नायकचे ऑफिस मिळाले. मासिक यशवंत नायकमधून श्री अक्कीसागर यांनी दर्जेदार स्फुटलेखन, विविध लेख, कविता, बातम्या, संपादकीय लेख लिहले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर श्री. अक्कीसागर यांनी 'रासेफ'चे संघटन उभे करण्याकडे जोर दिल्याचे समजते.
श्री. अक्कीसागर यांचे योगदान मोठे आहे. काही लोक जाणीवपूर्वक श्री एस एल अक्कीसागर यांचे नाव लपवतात. श्री एस एल अक्कीसागर यांच्याविषयी लिहिण्या बोलण्यासारखे भरपूर आहे, मात्र आज इतकेच लिहीत आहे.
राष्ट्र भारती द्वारा- आबासो पुकळे, मुंबई.
मो - ९६३७१२०४५३
दिनांक : ०५/१२/२०२१
खूप छान लिखाण
ReplyDeleteअफलातून
ReplyDeleteवास्तव
लेखन
Very nice thought
ReplyDelete