महानाट्यातुन पंधराशे विद्यार्थिनींनी घडविले अहिल्याबाई होळकरांचे जीवनदर्शन
पुण्यात अहिल्याबाई होळकर यांचे स्फूर्तिदायी जीवनचरित्र महानाट्यातून पाहायला मिळाले. सुमारे दोन तास चाललेल्या या महानाट्याचे ‘शिवधनुष्य’च जणू अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी समर्थपणे पेलले. क्षणोक्षणी अंगावर रोमांच उभारणारे ‘महाश्वेता’ हे नाट्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलमधील बत्तीस शिक्षिका आणि सुमारे दीड हजार विद्यार्थिनींनी मंगळवारी दिनांक. २४ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे ‘महाश्वेता’ हे महानाट्य साकारले. होळकर कुटुंबाने सन १९३९ मध्ये शनिवारपेठेतला होळकरवाडा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला होता. सोसायटीने या ठिकाणी अहिल्यादेवी प्रशाला ही मुलींसाठीची शाळा सुरू केली. या वास्तूच्या सहस्रचंद्रदर्शन वर्षानिमित्त महानाट्य सादर केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे होते. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार रामहरी रूपनवर, पीएमपीच्या नयना गुंडे, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, संचालक मिलिंद कांबळे, डॉ. सविता केळकर, शाळा प्रमुख स्नेहल कुलकर्णी, दर्शना कोकरे, पर्यवेक्षिका अनघा डांगे, कार्याध्यक्षा ज्योत्स्ना कांबळे, उपकार्याध्यक्षा दीपा अभ्यंकर, अर्चना पंच, विद्यार्थिनी प्रतिनिधी गीता मालुसरे उपस्थित होते. अहल्यादेवींचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले.
महानाट्यातील महत्त्वाचे प्रसंग
'अहिल्यादेवींचा विवाह, सती जाण्याचा प्रसंग, सात-बारा उतारा सुरुवात, महिला फौजेची निर्मिती, तोफा निर्मिती कारखाना, मनुष्यहानी न होता जिंकलेल्या लढाया, समाजासाठी रोजगार आणि उद्योगनिर्मिती, दानधर्म आदी साकारले.
No comments:
Post a Comment