दिनांक २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि श्री. महादेव बल्लाळ नामजोशी या थोर राष्ट्रपुरूषांनी राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षण प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित होऊन १८८० साली पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. छत्रपती शाह महाराज हे संस्थेचे प्रथम अध्यक्ष होते. छत्रपतींच्या पाठींब्याचा हा वारसा त्यांचे वंशज आजसुध्दा पुढे चालवीत आहेत. महाविद्यालयाने आजवरच्या ९९ वर्षांच्या वाटचालीत सहस्रावधी विद्यार्थी-विद्यार्थिनीना उत्कृष्ट अशा उच्च शिक्षणाची व त्यादारे आपले जीवन उजळून टाकण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. महाविद्यालयाच्या नामवंत माजी विद्यार्थ्यांमध्ये भारताचे माजी उपराष्ट्रपती मा. बी. डी. जत्ती, पाँडेचेरी प्रदेशाचे माजी लेप्टनंट गव्हर्नर मा. बिडेश कुलकर्णी, माजी पर्यटन व नागरी विमान वहन मंत्री डॉ. सरोजिनी महिषी, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी अध्यक्ष व रोजगार हमी योजनेचेजनक कै. वि. स. पागे,
माजी खासदार आबासाहेब कुलकर्णी, निवृत्त एअर चिफ मार्शल व्ही. व्ही. मालसे, प्रसिध्द साहित्यिक पद्मविभूषण पु. ल. देशपांडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर, इंटेल आर्किटेक्चरल ग्रुप, अमेरिका या संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उपेंद्र कुलकर्णी, सांगलीचे विद्यमान खासदार मा. संजयकाका पाटील तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक अधिकारी यांचा समावेश आहे. महाविद्यालयास भेटी दिलेल्या थोर व्यक्तींमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, नोबेल परोतोषिक विजेते डॉ. सी . व्ही. रामण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल अदि आहेत.
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.
ReplyDelete