महाराष्ट्रात धनगर समाजाला किंमत काय? माजी मंत्री अण्णासाहेब डांगेंचा उद्विग्न सवाल; म्हणाले फेटा बांधून मिरवू कशाला
![]() |
माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करताना खासदार श्रीनिवास पाटील खासदार अमोल कोल्हे माझे मंत्री जयंत पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक व अन्य. |
|महाराष्ट्रातील समाजामध्ये धनगर समाजाला (Dhangar community) किंमत काय? समाजालाच किंमत नसेल तर आपण फेटा बांधून कशाला मिरवायचं, म्हणून मी फेटा बांधायचा सोडून दिला होता, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (Dr. Annasaheb Dange) यांनी दिली. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते. अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाविषयी व्यक्त केलेल्या नाराजीतून त्यांचा रोख नेमका कुणाकडं, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून अण्णासाहेब डांगेंना डी. लिट ही पदवी
महाराष्ट्रातल्या समाजामध्ये धनगर समाजाला काय किंमत आहे? असा सवाल माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी केला आहे. यावर सगळ्यांनी गंभीरपणे विचार करावा असेही डांगे म्हणाले. इस्लामपूरमध्ये अण्णासाहेब डांगे यांना पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इस्लामपूरमध्ये जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना अण्णासाहेब डांगे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यावेळी व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज महत्त्वाचा घटक
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात धनगर समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. धनगर समाजाची एक व्होट बॅंक मानली जाते. विविध राजकिय पक्ष ती आपल्याकडे वळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असतात. यातच सांगली जिल्ह्यातील धनगर समाज राजकिय दृष्ट्या अधिक जागृत आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत दिवंगत बॅ. टी. के. शेंडगे, दिवंगत अण्णासाहेब लेंगरे, दिवंगत शिवाजीराव शेंडगे, प्रकाश शेंडगे हे चार आमदार निवडून विधानसभेत गेले तर अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे हे तीन आमदार विधान परिषदेत गेले. त्यापैकी प्रकाश शेंडगे यांना दोन्ही सभागृहाचे सभासद होण्याची संधी मिळाली.
युतीच्या काळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले
वाळवा तालुक्यातील इस्लामपूरचे अण्णासाहेब डांगे हे संघाच्या मुशील घडले. पुढे त्यांना भाजपने विधान परिषदेत संधी दिली होती. भाजपच्या माधव प्रयोगात ते धनगर समाजाचा चेहरा होते. त्यांनी धनगर समाज भाजपला जोडण्यासाठी संघटनात्मक बांधणी केली. डांगे यांना विधान परिषदेत भाजपचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर ते ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 2001 ला त्यांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला होता. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
No comments:
Post a Comment