लंपी आजाराने 'सोन्या छब्याचा' घेतला बळी; शेतकरी कुटंबावर शोककळा
सोन्या छब्याचा बेंदुर सणाचा संग्रहित फोटो |
कुकुडवाड : प्रतिनिधी
माण तालुक्याच्या दक्षिण भागात लंपी या चर्मरोगाने धुमाकूळ घातला असून, पुकळेवाडी येथील नामांकित बैल जोडी 'सोन्या आणि छब्या' यांचा लंपी आजाराने बळी गेल्यामुळे, कुकुडवाड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. लंपी आजाराने बैल जोडीचा मृत्यू झाल्याने, शेतकरी कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोन्या छब्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरून, शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. छब्या बैल विना दाव तीन किलोमीटर अंतरावरून, अगदी रसत्याच्याकडेने एक बाजू धरून थेट चालत येऊन थेट दावणीवर थांबायचा.
मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून पुकळेवाडी येथील पशुपालक गोचीडच्या साथीने हैराण असून, त्याकडे पशुसंवर्धन विभागाने डोळेझाक केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी लंपीचा पादुर्भव होऊ नये, म्हणून लसीकरण केले गेले, परंतु लसीकरण करताना गोचिडग्रस्त जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क झाल्याने, लंपीची साथ झपाट्याने पसरून अनेक जनावरांना घेरल्याचे बोलले जात आहे. लस दिल्यानंतर जनावरे अस्वस्थ झाली, त्यामुळे लसीकरण तर चुकीचे झाले नाही ना? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
आयुष्यभर भटकंती करत मेंढपाळीचा व्यवसाय केल्यानंतर स्वर्गीय वस्ताद पुकळे यांनी मोठ्या हिंमतीने 'सोन्या व छब्या'चा सांभाळ केला. वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या पश्चात त्यांची मुले उत्तम पुकळे, प्रकाश पुकळे, संजय पुकळे या बंधूनी सोन्या व छब्याला लहान मुलाप्रमाणे जीवापाड जपले. गावगाड्यात सोन्या आणि छब्याची जोडी उठून दिसायची. मशागतीची कामे करताना बैलजोडी शेतशिवारात फुलून दिसायची, बघताक्षणी समाधान व्हायचे. सोन्या व छब्यास लंपीची लागण होऊन, त्यांचा मृत्यू झाला. डॉ. शेंडगे यांनी बैलजोडी वाचवण्यासाठी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते असफल ठरले, अशी माहिती प्रकाश व उत्तम या बंधूनी दिली.
उत्तम पुकळे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे ही बैलजोडी आमच्या घरी होती. माघी पौर्णिमेस होणाऱ्या सिद्धनाथ देवाच्या बगाडाचा मान सोन्या व छब्यास होता. घरातील लहान थोरांचे व गावकऱ्यांचे देखील या बैलजोडीवर विशेष प्रेम होते. सोन्या व छब्याच्या जाण्याने घरातील सर्वजण धायमोकलून रडत आहेत. लंपी आजाराने आमच्या दावणीची जनावरे नव्हे तर माणसं गेल्या इतकं प्रचंड दुःख आहे. छब्या बैलासारखा गुणवान आणि मानवता प्रिय बैल आमच्या कुटुंबाचा रोजच्या जीवनाचा एक भाग बनला होता. तर काही दिवसांपूर्वी वाई येथील बगाडासाठी सोन्या व छब्याला मागणी आली होती.
शेतकरी उत्तम पुकळे यांच्याशी बोलताना सोन्या आणि छब्यासोबत २०२२ च्या बेंदूर सणातील आठवणीने राष्ट्र भारतीचे संपादक प्रा. आबासो पुकळे भावूक झाले. 'सोन्या आणि छब्या' ही बैल जोडी महाराष्ट्रसह देशात प्रसिद्ध झाली होती, अशी प्रतिक्रिया प्रा. पुकळे यांनी दिली. कुकुडवाड येथील पप्पू काटकर यांनी सांगितले की, सोन्या आणि छब्यासाठी लाखो रुपयांची बोली व्हायची, परंतु उत्तम पुकळे यांनी पै गावातील गोरगरीब लोकांची मशागतीची कामे करून दिली. अडल्या नडल्या लोकांना सोन्या आणि छब्याची जोडी शेवटचा पर्याय ठरायची.
क्लिक करा पाहण्यासाठी>३ जुलै २००२२ बेंदूर सण सोन्या छब्याची आठवण
क्लिक करा पाहण्यासाठी> शेतात मशागतीची कामे करताना आठवणीतले सोन्या आणि छब्या
क्लिक करा पाहण्यासाठी श्री. सिद्धनाथ देवाचा माघी पौर्णिमेस बगाड ओढताना सोन्या आणि छब्या
'राष्ट्र भरती'च्या वाचकांसाठी 'छब्या बैलाची कथा' ही ग्रामीण कथा लवकरच प्रसिद्ध करू
No comments:
Post a Comment