महादेव जानकर म्हणाले, या देशात आक्रित घडतय
मनोर : पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर, बाजूस सिद्धप्पा अक्कीसागर |
मनोरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न; सब समान तो देश महान : महादेव जानकर
मुंबई : आबासो पुकळे
या देशात आक्रित घडतय; ज्यांची मतांची टक्केवरी कमी आहे ते आमच्या डोक्यावर बसलेत आणि ज्यांची मतांची टक्केवारी जास्त आहेत ते भिक मागत बसलेत, पण मला मागतकरी समाजाला देणारा समाज बनवायचाय, त्यासाठी आम्हाला आमचे दल मजबूत करायचे आहे, असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. पालघर तालुक्यातील मनोर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, जिल्हा प्रभारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेला माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर सामोरे गेले. आ. जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन आम्ही आमचा पक्ष बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे. कारण दुसऱ्या बाजूला काँग्रेस गांधीवादावर चालते, शिवसेना आणि भाजप हिंदूवादावर चालते, समाजवादी पार्टी समाजवादावर चालते तसे आम्ही फुलेवाद व मानवतावादावर चालणारे आहोत. "सब समान तो देश महान" असे उद्गार पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी काढले.
सर्व धर्मीयांना राजकीय, सामाजिक, आर्थिक भागीदारी समान मिळाली पाहिजे, या विचाराने आमचा पक्ष पुढे जाणार आहे. आज सर्वच समाजात जातिभेद केला जातोय, धर्मवाद केला जातोय, दंगली घडवल्या जातात, हे कुठेतरी थांबवून, समतामुलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. मानवतावाद पुढे आणण्याचे काम आमच्या पक्षातील अल्पसंख्यांक आघाडी, मच्छिमार आघाडी, वकील आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व आघाडीचे नेते करणार आहेत, असे पत्रकार परिषदेत जानकर म्हणाले. पुढे जाऊन काँग्रेस आणि भाजपला पर्याय आम्ही देऊ, हे आमचं पुढचं संशोधन असणार आहे. कारण, काँग्रेस आणि भाजपवर आरएसएसचे नियंत्रण आहे, तुम्हाला नेता राहुल गांधी पाहिजे की मोदी पाहिजे हे तेच ठरवतात. प्रधानमंत्री काँग्रेसचा असला तर तो गांधी घराण्यातला आणि भाजपचा असला तर आरएसएस मधून करायचा ही प्रथा बदलायला पाहिजे. सर्वसामान्यांमधला प्रधानमंत्री व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. असे बोलून जानकर यांनी दोन्ही पक्षावर ताशेरे ओढले. भारत देशात राहणाऱ्या उच्चवर्गीय, आदिवासी, ओ.बी.सी, मुस्लिम, ख्रिश्चन मागासवर्गीय सर्व समाजासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. सर्व धर्मियांना संगती घेऊन आमचा पक्ष बळकट करणार आहोत. असे दोन दिवसीय शिबिरात महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज या देशात फक्त मुस्लिम आणि मागासवर्गीय लोकांना टार्गेट केले जातंय. पण हे विसरून चालणार नाही की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुस्लिमांचही तेवढाच योगदान आहे, जेवढा सर्व देशवासीयांचा आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाप्रभारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर माधवधाम, मनोर जिल्हा- पालघर येथे पार पडले. यावेळी जिल्हा प्रभारी यांच्यासह माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, प्रसन्नकुमार, बाळकृष्ण लेंगरे, कुमार सुशीलजी, गोविंदराम शूरनर, पंडित घोळवे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment