ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट
ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळासोबत साधला संवाद
मुंबई, २१ ऑक्टोबर
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची अखिल भारतीय ओबीसी कामगार महासंघाचे महासचिव जी. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली.
या शिष्टमंडळामध्ये एअर इंडिया ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष आणि ,ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव प्रदीप ढोबळे, युनियन बँक ऑफ इंडिया ओबीसी असोसिएशनचे विवेक कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी देखील उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांचे शासकीय निवासस्थान रामटेक याठिकाणी झालेल्या या भेटीत ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने श्री भुजबळ यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले. यामध्ये यामध्ये ओबीसींची जनगणना करण्यात यावी, आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकणे, क्रीमी लेयरची अट काढून टाकणे अश्या काही प्रमुख मागण्या होत्या. यामध्ये तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकार हे विविध पातळ्यांवर आपली लढाई लढत आहे त्यामुळे या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे राज्य सरकार आहे. आपण या गोष्टींसाठी योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांना तामिळनाडूच्या आरक्षणा संदर्भातील "69% आरक्षण कायदा" हे पुस्तक भेट दिले.
No comments:
Post a Comment