Monday, April 6, 2020

जोतिबाच्या भेटिसाठी माणदेशातुन जाणाऱ्या नंदीचे प्रस्थान थांबले

जोतिबाच्या भेटिसाठी माणदेशातुन जाणाऱ्या नंदीचे प्रस्थान थांबले
पुकळेवाडी गावातील चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी श्री. जोतिबाच्या भेटिला जाणारा नंदी, सोबत भाविक भक्त

कोरोना या साथीच्या पार्श्वभूमिवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटिने  जोतिबा देवाची यात्रा रद्द केल्याने श्री. जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी पुकळेवाडी ता- माण येथून जाणाऱ्या नंदीचे प्रस्थान झाले नाही.  आहे. या नंदिसोबत माणदेशातील  हजारो भाविक भक्त नंदीच्या पाठीवर असणारा नगारा वाजवत, चांगभलाच्या गजरात जोतिबा यात्रेसाठी मोठ्या उत्साहाने पायी चालत जातात. परंतु यावर्षी कोरोना साथीचा पादुर्भाव होऊ नये यासाठी जनतेवर घरात बसन्याची वेळ आली. याचा परिणाम सर्व सणउत्सवावर झाला. नंदीचे प्रस्थान न झाल्याने जोतिबा यात्रेसाठी पायी चालत जाण्यासाठी वाट पाहत बसलेल्या भाविक भक्तांचा हिरमोड झालाय. 


चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा जोतिबा देवाची यात्रा भरते. हलगिच्या निनादात सासन काठ्या, सबीना, पालखी निघते. लाखो भाविक भक्त गुलाल खोबऱ्याची उधळण करतात. ज्या दिवशी शिखर शिंगणापुरात शंभू महादेवाची चैत्र एकादशीला यात्रा भरते, त्याचदिवशी पुकळेवाडी ता- माण येथून पाठीवर नगारा घेऊन 'रतन' नावाचा नंदी जोतिबा देवाच्या भेटिसाठी जोतिबा डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो.  पहिल्या दिवशी दक्षिण माणमध्ये असणाऱ्या नैसर्गिक खिंडीतून मायणी- महुलीमार्गे  नंदिसोबत यात्रेकरू सांगली जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यादिवशीचा मुक्काम भगताचा मळा, भाळवणी ता- खानापुर येथे असतो. दुसऱ्या दिवशी ताकारी ता- वाळवा येथे कृष्णा नदित पवित्र स्नान करुन कामेरिच्या डोंगरातून नंदी वशी येथे पोहचतो. तिसऱ्या दिवशी  कुरळप ता- वाळवा येथे सकाळी वारणा नदित पवित्र स्नान करुन जाखलेमार्गे जोतिबा डोंगरावर सायंकाळी ५ :०० वाजता पोहचतो. शंभू महादेव यात्रेचा व जोतिबा यात्रेचा संगम साधनाऱ्या या नंदीमुळे 'शिंग वाजे शिंगणापुरी, नगारा वाजे रत्नागिरी' असे बोल यात्राकाळात भक्तांच्या तोंडातुंन उमटतात.

नंदीचे पुजारी असणारे श्री. तात्याबा भैरू शेळके म्हणाले, "गेल्या अनेक वर्षात महाभयंकर दुष्काळ पडले तरी देवाचा नगारा वाजत गाजत नंदी घेऊन जायचो, परंतु अवंदा महामारीच्या साथीने देवाचा नंदी घेऊन जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. शिवकाळापासून माणदेशातून जोतिबा भेटिसाठी जाणाऱ्या नंदीचे प्रस्थान प्रथमच थांबले."
- आबासो पुकळे, ६ एप्रिल २०२०.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025