- भारत हा पशुपालकांचा देश आहे. मेंढपाळांच्या जीवनात घडलेल्या घटनांचा, दैनिकांत, समाज माध्यमातून व प्रत्यक्ष पाहिलेलेल्या घटनांचा, माहितीचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला आहे. मेंढपाळ सर्वांना माहित आहे, परंतु मेंढपाळांना प्रत्यक्ष रानामाळात भटकाताना ज्या मरण यातना भोगाव्या लागतात याबद्दल फारसे कोणी बोलत नाही. मेंढपाळ आपल्या मेंढ्यासह मुळगावातून चारा-पाणी शोधत स्थंलातंर करत असतो. खरेतर मेंढपाळ ज्या प्रदेशात जातो, तो त्यांचा मुलुख असतो. माझ्या लहाणपणी घरी मेंढरं होती. पुढे मेंढर विकून वडिल गावीच शेती करु लागले. परंतु गावातील कित्येक कुटुंबे मेंढपाळ व्यवसायामुळे विस्थापित होताना डोळ्यांदेखत पाहत होतो. मेंढपाळांना परमुलूखात माणसातील पशुंचा खुप त्रास सहन करावा लागतो. कित्येक मेंढपाळांना जायबंदी व्हावे लागले. नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. कुठेना कुठे रोज ह्रदयद्रावक घटना घडत असतात पण ९९ % घटनांची नोंदच होत नाही. दखल घेतली जात नाही. आपला प्रदेश सोडून जगण्यासाठी परमुलखात गेलेल्या मेंढपाळांच्या मुलखात मरण यातना सहन कराव्या लागतात. अशाच काहि घटना मेंढपाळांच्या मुलखातील मरणवाटा याद्वारे वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी देत आहे, मेंढपाळांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे हा मुख्य हेतु आहे. वाचकांनी प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात.
- आबासो पुकळे.
१.
कुळेकर कुटुंबाची तासभर बिबट्याशी थरारक झुंज ; मेंढपाळ पती-पत्नी जखमी
"कळपात घुसलेल्या बिबट्याला पळवून लावून मेंढय़ांना वाचवण्याच्या प्रयत्नांत मेंढपाळ असलेले कुळेकर पती-पत्नी जखमी झाले. ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर शिवारात १४ मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली."
१८ मार्च २०१३, अकोले
कळपात घुसलेल्या बिबट्याला पळवून लावून मेंढय़ांना वाचवण्याच्या प्रयत्नांत मेंढपाळ असलेले कुळेकर पती-पत्नी जखमी झाले. ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर शिवारात १४ मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढय़ा ठार झाल्या, तर अन्य दोन मेंढय़ा जखमी झाल्या, पण बाकीच्यांचा जीव वाचला.
रेऊबाई कुळेकर (राजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचे कुटुंब आपल्या ५० मेंढय़ा घेऊन बेलापूर शिवारात चरण्यासाठी आले होते. मेंढय़ा चरल्यानंतर त्यांनी रात्री बेलापूरच्या कोटमारा लघूप्रकल्पाच्या जंगलात तळ ठोकून मेंढय़ांना वाघूरमध्ये कोंडले. मध्यरात्री एकच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने वाघूर तोडून कळपात प्रवेश केला. या वेळी मेंढय़ा सैरावैरा धावू लागल्या. बिबट्याने मेंढय़ांवर हल्ला केल्याचे कुळेकर कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला चढवला. यामध्ये रावा कुळेकर (२७), त्यांची पत्नी पिंकाबाई कुळेकर हे दोघेजण जखमी झाले. तासभर बराच संघर्ष केल्यानंतर भिवा व रेऊबाई यांना बिबट्याला हुसकावण्यात यश आले. त्यानंतर या दोघा जखमींना अकोले येथील डॉ. कानवडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.ह्म
या घटनेबद्दल वनखाते अद्याप अनभिज्ञच आहे. वनक्षेत्रपाल जे.डी. गोंदके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याकडे वन विभाग दुर्लक्ष करून आपली जबाबदारी झटकत असल्याबद्दल शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात रेऊबाई कुळेकर म्हणाल्या, सध्या दुष्काळ आहे. मुक्या जनावरांना खायला चारा नाही. मेंढय़ांना जगवण्यासाठी आम्ही पुण्याहून अकोले तालुक्यात आलो आहोत, परंतु बिबट्याने आमच्यावर हल्ला केल्याने झोप उडाली आहे.
उपचाराचा खर्च देऊ
वनपाल इथापे हे ब्राणवाडा येथे राहतात. ही घटना लपून राहण्यासारखी नाही. त्यामुळे अशी काही घटना घडलीच नसून श्रीरामपूर तालुक्यात चौकशी करा, आम्हीही तपास करू. घटना घडली असल्यास उपचाराचा खर्च जखमींना देऊ.’’ जे. डी. गोंदके, वनक्षेत्रपाल, अकोले.
जखमींची प्रकृती स्थिर
"बिबट्याने रावाच्या उजव्या हाताच्या पंजाला कडकडून चावा घेतला आहे. रेबिजचे इंजेक्शन दिले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.’’ डॉ. जे. टी. कानवडे, अकोले.
तर बिबट्याने सर्व मेंढय़ा ठार केल्या असत्या
बिबट्याने कळपावर हल्ला चढवून एका पाठोपाठ एक मेंढय़ा ठार करायला सुरुवात केली. झोपेतून उठून बिबट्याला हुसकावण्यासाठी झुंज दिली. त्या वेळी बायको, आई व भाऊ यांनी मदत केली. बायकोलाही बिबट्याने जखमी केले. बिबट्याला पिटाळले नसते तर त्याने सर्व मेंढय़ा ठार केल्या असत्या. वनखात्याला कळवायला वेळच मिळाला नाही.’’ रावा कुळेकर, जखमी मेंढपाळ.
वन विभाग अनभिज्ञ
अकोल्याचे वनक्षेत्रपाल जे.डी.गोंदके, वनपाल पी. एस.इथापे यांना या घटनेबद्दल माहिती नव्हती. यासंदर्भात त्यांनी कानावर हात ठेवले. वन कर्मचार्यांनी ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे घडल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यातच धन्यता मानली.
•••
२.
विषारी पाण्यामुळे ३२५ मेंढ्यांचा मृत्यू
२९ मे २०१७, रावेर
पाण्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ३२५ मेंढ्यांच्या तळफळुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना अजंदा शेती शिवारात घडली. या घटनेमुळे मेंढपाळ कुटूंबियांचे सुमारे तीस लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान पशु वैद्यकीय तालुक्यातीलअधिकारी अजंदा येथील तरुणांनी घटनास्थळी दाखल होऊन विषबाधीत मेंढ्यांवर उपचार, मदतकार्य केले. तालुक्यातील मुंजलवाडी येथील रहिवासी मेंढपाळ लक्ष्मण डेमा शिंदे, शकंर तानु शिंदे, येलाबाई लहानु शिंदे या मेंढपाळ कुटुंबाचा वाळा अजंदे शेती शिवारात चराईसाठी अनेक दिवसां पासून मुक्कामी होते. सुमारे १२०० मेढ्यांसोबत गाई, शेळ्या नेहमीप्रमाणे सर्व चरण्यासाठी निघाल्या असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांना एका शेतात साचलेले पाणी दिसल्याने सर्व मेढ्यां, गुरे हे पाणी पिण्यासाठी गेले. त्यानंतर ही घटना घडली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळ कुटुंबियांचे सात्वन केले व् त्यांच्या कुटुबियांना शासनाकडुन आवश्यक ती मदत मिळवुन देण्यासाठी नाथाभाऊ, गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
पशुवैद्यकीय अधिकार्यांनी केले उपचार
पाणी पिल्यानंतर चराईसाठी पुढे निघाल्यानंतर अचानक काही मेढया तडफडू लागल्या व एक-एक तात्काळ मृत्यु होत होता. या बाबतची वार्ता प्रशासनाला लागताच पंचायत समितिचे सर्व पशुवैद्यकीय अधिकारीं घटनास्थळी दाखल होऊन बाकी मेंढयावर उपचार केले. या घटनेने मेढपाळ शिंदे कुटुंबावर जणु एक प्रकारचे आभाळच कोसळले होते. यावेळी फौजदार प्रवीण निकाळजे, दीपक ढोमने, हवलदार माधव पाटील, विनोद साळी, आदींनी पंचनामा केला. तहसीलदार विजयकुमार ढगे घटनास्थळी तळ ठोकून होते. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच डॉ. रणजीत पाटील, डॉ. पी. पी.पाटिल, डॉ. उदय ओतारी, डॉ. फालक, सहकारी एस. बी. तायडे, मुशीर मलक, देविदास तायडे यांच्यासह मानवतेच्या दृष्टीकोनातून खाजगी पशुवैद्यकिय डॉक्टरांनी उपचार करून त्यांना पुनः जीवनदान दिले.
•••
३.
कुत्र्याच्या हल्ल्यात १७ मेंढय़ा दगावल्या
५ जुलै २०१७, संकेश्वर
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १७ मेंढय़ा ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील बिरेश्वरनगरात उघडकीस आली आहे. या घटनेत मेंढपाळाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
आठवडीबाजारात विक्री करण्यासाठी १७ मेंढय़ा एका कळपात सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या होत्या. हा कळप दोन मोठय़ा बिल्डिंगच्या आडोशाला असल्याने तिकडे कुणाचाही वावर नसतो. दरम्यान मंगळवारी दुपारी मोकाट कुत्र्यांच्या कळपाने मेंढय़ाच्या कळपात घुसून प्रत्येक मेंढय़ाचे लचके तोडून ठार केले आहे. या हल्ल्यात एकाच वेळी १७ मेंढय़ांना लक्ष्य केल्याच प्रकार मेंढपाळ वैरण घालण्यासाठी कळपाकडे जाताच उघडकीस आला.
मेंढपाळाला पाहताच कुत्र्यांनी तेथून पळ काढला. मात्र विक्रीसाठी ठेवलेले एकही मेंढी शिल्लक राहिली नसल्याचा मेंढपाळाने आक्रोश केला. बँकेचे काढलेले कर्ज परतफेड करण्यासाठी या मेंढय़ाची विक्री करण्यासाठी ठेवली होती. मात्र कुत्र्यांनी भक्ष्य केल्याने हाती काहीच राहिले नाही. आता बँकेचे कर्ज कसे भरणा करायचे हा विचार मेंढपाल कुटुंब करीत होते. नागाप्पा सिद्धलिंगप्पा केरीमनी असे नुकसानग्रस्त मेंढपाळाचे नाव असून या घटनेचा पंचनामा महसूल खात्याने केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
•••
४.
बिबट्याचा मेंढपाळावर मध्यरात्री हल्ला; पुणे जिल्ह्यातील पारगाव तर्फे आळे येथील घटना
६ डिसेंबर २०१७, बेल्हा
जुन्नर तालुक्यात आता बिबट्याचा हल्ला झाला नाही, असा दिवस उजाडत नाही. बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे.
याबाबतची माहिती अशी : मेंढपाळ आप्पा केरू टकले (सध्या रा. पारगाव तर्फे आळे) यांनी त्यांची बकरी बाळू उंडे यांच्या कोबीच्या शेतात बसविली होती. त्यांचे कुटुंबीयही शेजारीच असलेल्या त्यांच्या खोपीत झोपले होते, तर आप्पा टकले बकऱ्यांच्या वाड्यात (कळप) झोपले होते. वाड्याच्या जवळच बिबट्याही दबा धरून बसला होता. रात्री १ वाजण्याच्या समारास मेंढ्यांचा ओरडण्याचा व बुजण्याचा आवाज आल्याने आप्पा उठून बसले. ते उभे राहतानाच अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते एकदमच घाबरून गेले. बिबट्याने त्यांच्या कान, तोंड व उजव्या बाजूला दाढीकडील भागाला जखमा केल्या.
पांडुरंग डुकरे यांनी वनखात्याला माहिती दिली. त्यांना येथून जवळच असलेल्या प्राथमिक उपचारासाठी आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील खासगी रुग्णालयात वन अधिकाऱ्यांच्या मदतीने दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी वनकर्मचारी दत्तात्रय फापाळे, के. एस. नायकोडी व आनंदा गुंजाळ यांनी पाहणी केली. या ठिकाणी लगेचच पिंजरा लावणार असल्याचे फापाळे यांनी सांगितले. या परिसरात ग्रामस्थांना बिबट्या दिवसा व कधी रात्रीच्या वेळी दिसत होता. तसेच पाळीव जनावरांवरही हल्ले करीत होता. लहान मुलेही रस्त्याने जाताना घाबरत होती.
•••
५.
मेंढपाळांच्या आठ वर्षांच्या चिमुकलीचा जीव नेमका कशामुळे गेला?
१२ एप्रिल २०१८, श्रीनगर
कठुआ बलात्कार-खून प्रकरण
आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या जम्मूजवळच्या कठुआमध्ये करण्यात आली. देशभरात खळबळ माजवणाऱ्या या घटनेमुळे या भागात तणावाचं वातावरण आहे.
१७ जानेवारीच्या सकाळी मोहम्मद युसूफ पुजवाला हे गावातल्या लोकांच्या गराड्यात होते. तेव्हा एक शेजारी धावत त्यांच्याकडे आला आणि त्याने पुजवालांना बातमी सांगितली - "तुमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला घरापासून काही अंतरावर झुडुपांत सापडला आहे."
" माझ्या मुलीचं काहीतरी वाईट झालं आहे, असं मला वाटत होतं." असं पुजवाला यांनी सांगितलं. जेव्हा ते बोलत होते तेव्हा शेजारीच बसलेली त्यांची पत्नी नसीमा बीवी मुलीच्या नावाने आक्रोश करत होत्या. आसिफाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, चार पोलीस अधिकारी आणि एका अल्पवयीन व्यक्तीचा समावेश आहे.
आसिफाचं अपहरण कसं झालं?
आसिफा आणि तिचं कुटुंब जम्मू शहरापासून ७२ किलोमीटर अंतरावर राहत होतं. यावर्षी १० जानेवारीला ती बेपत्ता झाली.
पुजवाला हे भटक्या मेंढपाळांशी संबंधित मुस्लीम समुदायातील आहेत. त्यांना गुज्जर- बकरवाल असं संबोधलं जातं. आपल्या बकरी आणि म्हशींना चरायला हिमालयात नेतात.
"घोड्यांना घरी परत आणण्यासाठी आसिफा जंगलात गेली होती. घोडे परत आले, पण आसिफा आली नाही," आसिफाची आई सांगते. नसीमा यांनी त्यांच्या पतीला हे सांगितलं. ते आणि त्यांचे काही शेजारी आसिफाचा शोध घ्यायला निघाले. बॅटरी, कंदील आणि कुऱ्हाड सोबत घेऊन ते रात्रभर तिला शोधत राहिले. पण त्यांना ती काही सापडली नाही.
दोन दिवसानंतर, म्हणजेच १२ जानेवारीला कुटुंबीय पोलिसांत तक्रार दाखल करायला गेले. "पण पोलीस काही मदत करत नव्हते," असं पुजवाला सांगतात. "आसिफा एखाद्या मुलासोबत पळून गेली असेल," असंही एका पोलीस कर्मचाऱ्याने म्हटल्याचं ते सांगतात.
ही बातमी पसरताच गुज्जरांनी निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यांनी रास्ता रोको केला. अखेर मुलीच्या शोधासाठी दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यातला एक दीपक खजुरिया यालाच नंतर गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाच दिवसांनंतर आसिफाचा मृतदेह सापडला. "तिचं शरीर छिन्नविच्छिन्न झालं होतं. पाय तोडण्यात आले होते. तिची नखं काळी पडली होती आणि तिच्या दंडावर आणि बोटांवर लाल खुणा होत्या," नसीमा सांगतात.
तपासात काय पुढे आलं?
२३ जानेवारीला म्हणजेच आसिफाचा मृतदेह सापडल्याच्या सहा दिवसांनंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी क्राईम ब्रांचला घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.
चौकशीतून समोर आलं की काही दिवस आसिफाला स्थानिक मंदिरात बांधून ठेवण्यात आलं आणि औषधं देऊन तिला बेशुद्धावस्थेत ठेवण्यात आलं. आरोपपत्रानुसार तिच्यावर काही दिवस सातत्याने बलात्कार करण्यात आला, तिचा छळ करण्यात आला आणि शेवटी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी दोनदा तिच्या डोक्यावर दगडानं वार करण्यात आले."
६० वर्षीय निवृत्त शासकीय अधिकारी संजी राम यांनी पोलीस अधिकारी सुरेंद्र वर्मा, आनंद दत्ता, तिलक राज आणि खजुरिया यांना हाताशी धरून हा गुन्हा केला.
राम यांचा मुलगा विशाल, त्यांचा अल्पवयीन भाचा आणि त्याचा मित्र परवेश कुमार यांच्यावरही बलात्कार आणि खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खजुरिया आणि इतर पोलीस अधिकारी तर आसिफाच्या घरच्यांसोबत तिची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले होते आणि तिला शोधण्यासाठीही ते सोबत होते. चौकशी अधिकाऱ्यांच्या मते आसिफाचे रक्ताळलेले आणि मातीने माखलेले कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्यांनी धुतले होते.
घटनेचे व्यापक पडसाद
या घटनेमुळे हिंदूबहुल जम्मू आणि मुस्लीमबहुल काश्मीर यांच्यात असलेला अंतर्विरोध चव्हाट्यावर आला आहे. १९८९ मध्ये काश्मीर खोऱ्यात भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळी करण्यात आली होती, तेव्हापासून तिथलं वातावरण तणावपूर्ण आहे.
या घटनेमुळे जम्मूत निदर्शनं करण्यात येत आहेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयात प्रवेश करणाऱ्या पोलिसांना अडवण्याचा वकिलांनी प्रयत्न केला. तसंच आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या निदर्शनात भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्रीही सहभागी होते.
जम्मूत राहणाऱ्या गुज्जर समुदायाच्या मनात दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असं चौकशी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. चरण्यासाठी मेंढपाळ जम्मूमधल्या सार्वजनिक आणि वनजमिनीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी या प्रदेशातल्या हिंदू लोकांशी त्यांचा वाद निर्माण झाला होता.
"हे जागेविषयी होतं," असं आदिवासी कार्यकर्ते आणि वकील तालिब हुसेन सांगतात. आसिफाच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या हुसेन यांनी आरोप केला की स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक करून धमकीही दिली आहे.
आरोपींच्या वतीनं निदर्शनं करणाऱ्या वकिलांपैकीच असलेल्या अंकुर शर्मा यांनी आरोप केला आहे की, "भटके मुसलमान हिंदूबहुल जम्मूची संरचना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या जंगलांवर आणि पाणी स्रोतांवर अतिक्रमण करत आहेत. आरोपींवर खोटे आरोप करण्यात आले आहेत आणि खरे गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत."
जम्मूमध्ये या गुन्ह्यावर जास्त लक्ष केंद्रित झालं नसलं तरी श्रीनगरच्या वर्तमानपत्रांनी या घटनेला पहिल्या पानावर स्थान दिलं आहे. गुज्जर नेते मियान अल्ताफ यांनी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत या वर्तमानपत्रांतील बातमी झळकवत चौकशीची मागणी केली. "ही घटना कौटुंबिक प्रकरण असून अल्ताफ गुन्ह्याचं राजकारण करत आहेत," असं भाजप सदस्य राजीव जसरोटिया यांनी म्हटलं आहे.
आसिफाच्या अंत्यसंस्कारादरम्यान काय झालं?
गुज्जरांना आसिफाला एका स्मशानभूमीत दफन करायचं होतं, जिथं त्यांनी काही वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती. यापूर्वी तिथं पाच लोकांचं दफन करण्यात आलं आहे. "पण जेव्हा आसिफाचा मृतदेह घेऊन ते तिथं गेले तेव्हा हिंदू कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि दमदाटी करून धमकावलं," असं पुजवाला सांगतात.
"सात मैल अंतर चालून आम्हाला तिला दुसऱ्या गावात दफन करावं लागलं," पुजवाला सांगतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी नंतर भावाच्या मुलीला म्हणजेच आसिफाला दत्तक घेतलं होतं. "आसिफा म्हणजे बोलकी चिमणी होती, जी हरणासारखी धावायची," आसिफाची आई सांगते. ज्यावेळेस ते कुठे बाहेरगावी असायचे तेव्हा ती त्यांच्या कळपाची राखण करायची. "तिच्या या गुणांमुळे ती आम्हा सर्वांची लाडकी होती. आमच्या जगाचं केंद्रस्थान होती," असं आसिफाची आई सांगते.
•••
६.
वीज पडून तीन मेंढपाळ गंभीर जखमी
७ जून २०१८, यवतमाळ
तालुक्यातील ब्रम्ही येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.६) रात्री नऊच्या सुमारास झाली. जखमींना येथे प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. बंडू रामू नेमाले, बालू ज्योतीराज टिले व सुभाष बालू टिले असे वीज कोसळून जखमी झालेल्यांची नावे आहेत. नेर तालुक्यातील दगडधानोरा भागात धनगर बांधवांनी आपल्या मेंढ्या बसवल्या होत्या. एका झाडाखाली चौघे बसून होते. मेंढ्यांचे ठाण बाजूलाच होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास वादळवार्यासह पाऊस सुरू झाला, त्यातच वीज झाडावर कोसळून त्याखाली बसलेले चौघेही जखमी झाले. त्यापैकी एकाला कमी धक्का बसला. परंतु, बंडू रामू नेमाले, बालू ज्योतीराज टिले व सुभाष बालू टिले हे तिघे गंभीर जखमी झाले. काही समाजबांधवांनी जखमींना नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
•••
७.
मेंढपाळावर हल्ला ; चौघांना पोलीस कोठडी
२२ सप्टेंबर २०१८, औरंगाबाद
तलावात पाणी पाजल्याच्या कारणावरुन मेंढपाळांवर हल्ला करून त्यांना जखमी करणाऱ्या चौघांना बुधवारी (२० सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींना मंगळवारपर्यंत (२५ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. कैलास गोयकर यांच्या तक्रारीरून मेंढपाळांना मारहाण केल्यावरून चिकलठाणा पोलिसांत विलास महेर, विजय चंदवाडे, विजय महेर व पूनम रामधन दुल्हत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी काम पाहिले.
•••
८.
भरधाव डंपरने मेंढ्या चिरडल्या : ३० मेंढ्या मृत्युमूखी तर १० जखमी
२३ ऑगस्ट २०१८, राहुरी
भरधाव वेगाने जाणा-या वाळूच्या वाहनाने ३० मेंढ्याचा बळी घेतला तर १० मेंढ्या जखमी झाल्या. मेंढ्या चिरडल्या जात असतांना वाहनाने अहमदनगरच्या दिशेने पलायन केले़. मेंढपाळाचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़, या वाहनाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर काल बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात हा अपघात झाला. मयत झालेल्या मेंढ्या पोपटराव हांडे यांच्या मालकीच्या आहेत़, मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरून मेंढ्या नगर-मनमाड रस्ता ओलाडंत होेत्या़, त्याचवेळी राहुरीकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने वाळूचा डंपर जात असलेल्या एका डंपरने तब्बल ४० मेढ्या चिरडल्या. यामध्ये ३० मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला तर १० जखमी झाल्या. मेंढ्या चिरडल्यानंतर न थांबता अंधाराचा फायदा घेत डंपरचालकाने पलायन केले.
घटनेची माहीती कळताच पोलिस निरीक्षक आविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. डेहेरे येथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन डंपरचे फुटेज आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनेची माहीती कळताच रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, विजय तमनर, अण्णा बाचकर यांनी मदत केली.
मेढ्यांनी केले होते आंदोलन
राहुरी तहसील कचेरीसमोर धनगर समाजाने आरक्षण संदर्भात आंदोलन छेडले होते़ त्यावेळी १३० मेंढ्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़ पारनेर तालुक्यातील पोपट हांडे हे पारनेरकडे दुस-या दिवशी मेंढ्यासह रवाना होणार होते. मात्र डंपरने चिरडल्याने आर्थिक व मानसिक हानी झाली़. अपघातात दोन कुत्रेही दगावले आहेत.
•••
९.
मेंढ्यांचा कळप झेलमखाली चिरडला
१६ सप्टेंबर २०१८, श्रीरामपूर
पुढे चाललेल्या मेंढपाळाच्या मागे रेल्वेचे रूळ ओलांडण्यासाठी निघालेल्या तब्बल २५ मेंढ्या भरधाव झेलम एक्स्प्रेसखाली सापडून ठार झाल्या. शनिवारी सकाळी एमआयडीसी परिसरात ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेत एका इसमाचाही मृत्यू झाला असून, रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक मेंढपाळ एमआयडीसी परिसरात मेंढ्या चारत होता. मेंढ्यांचा हा कळप चरण्यासाठी एकामागे एक चाललेला होता. रेल्वे रूळाच्या अलिकडील बाजूला मेंढ्या चारून झाल्यानंतर, हा मेंढपाळ कळपासह रूळ ओलांडत असतानाच जम्मूहून पुण्याकडे जाणारी झेलम एक्स्प्रेस त्याचवेळेस भरधाव वेगात आली. यावेळी कळपातील अनेक मेंढ्या रूळाच्या मधोमध आल्याचे पाहून मेंढपाळाने आरडाओरडा करत मेंढ्यांना पाठीमागे हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वेगात आलेल्या झेलम एक्स्प्रेसखाली २५ मेंढ्या चिरडल्या होत्या.
या दुर्घटनेची माहिती मिळताच काही वेळातच नागरिकांसह रेल्वे प्रशासनाच्या कर्मचार्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी रेल्वे रुळावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. यावेळी एक ४० वर्षीय इसमही जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते.
•••••
१०.
बिबट्याच्या हल्यात मेंढपाळ बालिका ठार
११ नोव्हेंबर २०१८, जुन्नर
खानेवाडी (ता.जुन्नर) येथील एका मेंढपाळाच्या वाड्यावरून कल्याणी सुखदेव झिटे (वय ४ महिने) या चिमुकलीला बिबट्याने फरपटत ओढून ठार केले होते. ही घटना २३ जानेवारीला मध्यरात्री ३ च्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे वन विभागाने या परिसरात ४ ठिकाणी पिंजरे लावले होते, त्यातील एका पिंजरा मेंढपाळाच्या वाड्यापासून १०० फुटावर लावण्यात आला होता. त्यामध्ये या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या मादीला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले आहे.
•••
११.
वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ ठार
१६ जानेवारी २०१९, चंद्रपूर
मुलपासून सुमारे १५ किमी अंतरावर असणाऱ्या कवडपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात एक मेंढपाळ व दोन बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ माजली आहे. सदर घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मृतकाचे नाव मारोती पुठ्ठावार (वय ६५) आहे.
येरगाव येथील मारोती पुठ्ठावार हा मेंढपाळ मुल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील कवडपेठ कक्ष क्रमांक ५३५ मध्ये एका शेतात शेळ्या-मेंढ्या बांधल्या होत्या. त्यातील काही शेळ्या घेऊन तो जंगलात चरायला गेला होता. त्या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांनी तेथून पळ काढत गावकऱ्यांना माहिती दिली. गावकरी धावून आले. पण तोपर्यंत मारोती व दोन शेळ्या ठार झाल्या होत्या. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. वनविभागाच्या वतीने मृतकाचे नातेवाईकांना ३० हजारांची तातडीची मदत देण्यात आली.
•••
१२.
कवठे येमाईत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार , नागरिक दहशतीखाली
२४ फेब्रुवारी २०१९, कवठे येमाई, शिरूर
शिरूर तालुक्यातील कवठे येमाईत कवठे – टाकळी हाजी रोडनजीक ढगेमाथ्या जवळील शेतात असलेल्या शेळ्या-मेंढरांच्या तळावर आज दि. २४ च्या पहाटे ३ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत एका शेळीस ठार केले आहे. मेंढपाळ तुकाराम हिलाळ रा.मुंजाळवाडी यांनी या घटनेबाबत माहिती दिली. तर या घटनेबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सकाळीच घटना साठी भेट देत पंचनामा केला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये मोठीच भीती निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ तुकाराम हिलाळ व त्यांच्या पत्नी भीमाबाई हे आपली १०० मेंढरे व ११ शेळ्या सहा रानोरान फिरून त्यांचा ३ वर्षांपासून सांभाळ करीत आहेत. आज पहाटे ३ च्या सुमारास ढगे माथ्याजवळील उघडे यांच्या शेतात शेळ्या,बकरांसह वास्तव्यास असताना बिबट्याने एका मोठ्या शैलीवर हल्ला करीत तिला ठार केले. एका महिन्यापूर्वी हिलाल यांनी ही शेळी २० हजार रुपयांना खरेदी केली होती. तिला १५ दिवसांची दोन करडे देखील आहेत. बिबट्याने शेळीला ठार मारल्याने हि नवजात २ करडे पोरकी झाली आहेत. तर या घटनेने हिलाळ कुटुंब पूर्ण हादरून गेले आहे. घटना घडताच हिलाळ यांनी मोबाईलवरून जवळील इतर शेतकऱयांना माहिती देताच बाळू वाफारे, गणेश घोडे, रामा किठे, गणपत गावडे, स्वप्नील घोडे, भाऊ देवकर हे शेतकरी तातडीने मदतीसाठी धावून आले. पहाटे बिबट्याच्या हल्ल्यानंतर जाळी तोडून रानोमाळ सैरावरा झालेली सर्व बकरे जमा करीत त्यांनी सकाळ होईपर्यंत तेथे थांबुन हिलाळ कुटुंबाला धीर दिला.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे व ग्रामस्थानी केली आहे. तर शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला नक्कीच दिली जाईल असे आश्वासन शिरूरचे वनाधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले.
•••
१३.
वीज कोसळून ४० शेळ्या आणि दोन मेंढपाळ जागीच ठार
१५ एप्रिल २०१९, परभणी
जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात झालेल्या अवकाळी पाऊसात झाडावर वीज कोसळून दोघा मेंढपाळांसह ४० शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजन गंभीर जखमी झाल्याची घटना पाथरी तालूक्यातील अंधापूरी शिवारात सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली असुन जखमी वर परळी येथे उपचार सुरू आहेत.
मागील चार दिवसापासुन वातावरणात बदल होऊन सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात तालूक्यातील अनेक भागात नुकसानीच्याकोसळून घटना घडल्या तर तालूक्यातील अंधापूरी येथे झाडावर विज दोन शेळी पालक व ४o शेळ्यांचा मुत्यू झाल्याची घटना घडली.
बिड जिल्हयातील धारूर तालूक्यातील सुनवाडी येथील ५० वर्षीय शेळी पालक रामभाऊ साधू शिंदे, बालू सिताराम काळे, कृष्णा रामभाऊ शिंदे ही तिघे जन मागील काही दिवसा पासून अंधापूरी शेत शिवारात गावातील शेतकरी सखाराम मोरे यांच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी राहत होते. दरम्यान सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी सात साडे सातच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसास सुरुवात झाल्याने शेळी पालक शिंदे आपल्या दोन साथीदार व शेळ्यासह शेतातील झाडाखाली आश्रयास थांबले असता त्याच वेळी झाडावर विज कोसळल्याने ४० शेळ्यासह बालू सिताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे हे होरपळून जागीच ठार झाले. तर रामभाऊ शिंदे हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर पाथरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून आंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. तसेच घटनेचा पंचनामा पाथरी तहसील कार्यालयाच्या महसुल विभागाकडून करण्यात आला आहे.
•••
१४.
दुष्काळी स्थितीचा मेंढपाळांना फटका
१९ एप्रिल २०१९, माणदेश
माण तालुक्यातील माळरानावर गेल्या वर्षापासून पावसाअभावी काहीच उगवलं नसल्याने, दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या आणि रानावनात सैरभैर होवून फिरणार्या माणदेशातील मेंढपाळांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. पाऊस-पाण्यावर अवलंबून असणार्या मेंढपाळासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मुलांना शिक्षण कसं शिकवायचं? घरखर्च कसाबसा चालवला पाहिजे, त्यासाठी पैसे कुठून आणायचे? गावकुसात मजुरी करावी तर, हाताला काम मिळत नाही. त्यामुळे मायेनं सांभाळलेल्या अन् जीव लावून जपलेल्या शेळ्या मेंढ्यांना गरज पडली की, म्हसवड, आटपाडी येथील आठवडा बाजारात विकून मेंढपाळ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले आहेत.
पुर्वीपासून माण तालुक्यात कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेषपालन, शेळीपालन हा व्यवसाय केला जातो. उपजिविकेचे साधन म्हणून अनेक शेतकरीबांधव हा व्यवसाय करीत आहेत. माण तालुक्यातील गावागावात वाडीवस्त्यांवर शेळ्या मेंढ्यांचे खांडच्या खांड पहावयास मिळतात. मात्र यावर्षी चाराटंईमुळे माण तालुक्यातील मेंढपाळांचा मुख्य व्यवसायच संकटात सापडला आहे. वास्तविक पाहता माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांचे प्रमाण आहे. प्रामुख्याने आजपर्यंत मेंढपाळ भटकंती करूनच शेळ्या, मेंढ्या पालनातून पैसे मिळवतात,परंतु गेल्या वर्षापासून अपेक्षित पाऊस पडला नाही.
त्यामुळे दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने माण तालुक्यातील मेंढपाळ पुरता पिचून गेला आहे.
आज्यापंज्यापासून शेळ्या मेंढ्यांच्या जिवावरच आमचा संसार तरला आहे. वाडवडिलांपासून आमच्या परिसरातील बरेचजण हा व्यवसाय करीत आहेत. पण ह्या साली चारा नसल्याने सारं मोडकळीस आल्यागत वाटतयं. चार्याविणा शेळ्या मेंढरांची तडफड बघून जिव थोडा थोडा होतोय.
•••
१५.
चारा पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात
२० मे २०१९, रत्नागिरी
शिवारात चारा नाही, पाणी नाही, बागायती भागात बसण्यास शेते नाहीत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांचे हाल-हाल सुरू आहेत. कितीही आक्रोश केला तरी या जनावरांना छावणीचा आसरा देण्यास शासन, प्रशासन तयार नाही. निसर्ग, शासन व प्रशासन जणू यांच्या जीवावरच उठल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे मेंढपाळांवर कोकणात जाण्याची वेळ आली आहे. असे मेंढपाळ सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागात दिसून येत आहेत.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव आहेत. त्यांच्याकडे लाखोंच्या घरात शेळ्या-मेंढ्यांचे पशुधन आहे. परंतु यंदा दुष्काळामुळे फारच बिकट अवस्था झाली आहे. रब्बी आणि खरीप हंगामात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या हाताला काहीच लागले नाही. त्यांच्याच जनावरांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची जनावरे छावणीत दाखल केली आहेत. त्यामुळे मेंढ्या शेतात बसविणे जवळपास बंदच झाले आहे.
तसेच मोकळ्या रानात चारा उपलब्ध नाही. डोंगरमाथे, पठारांवरील खुरटे गवत सुकून गेले आहे. पाणी नसल्याने झाडे-झुडपे वाळून गेली आहेत. खुरट्या झुडपांवर फक्त वाळलेल्या काटक्याच शिल्लक आहेत. पाण्याचे मोठे स्त्रोत आटले आहेत. गाव तलावातही पाण्याचा टिपूस नाही. तलावात पाणी सोडण्यास प्रशासन तयार नाही. माणसांना पिण्यास पाणी देण्यासाठी प्रशासनाने विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे दिवसभर मेंढरे कुठे फिरवायची? त्यांना पाणी कोठून द्यायचे? असा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे.
विकत घेऊन परवडणारे नसल्याने शेळ्या-मेढ्यांच्या चारा, पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे उष्माघातासह अनेक आजारांनी शेळ्या-मेंढ्यांना ग्रासले आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्यूमुखी पडत आहेत. परिणामी मेंढ्या व मेंढपाळांना जगणे असह्य होऊ लागले आहे.
शेळ्या-मेंढ्या मरण्यापेक्षा त्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. परंतु शेळ्या-मेंढ्या विकून आणखी किती दिवस जगायचे? असा मोठा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे. सर्वच शेळ्या-मेंढ्या विकाव्या लागू नयेत म्हणून काहींनी बागायती भाग व कोकणात स्थलांतर सुरू केले आहे. असे तांडेच्या-तांडे सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागात दिसत आहेत. कोकणातील वणव्यांचे प्रमाण वाढल्याने याचा काही प्रमाणात फटका या मेंढपाळांना बसत आहे. सह्याद्री पर्वतात लागणार्या वणव्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
बिबट्यांची भीती...
कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ सध्या शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी आणत आहेत. परंतु अलीकडच्या काही वर्षात कोकणात बिबट्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भर वस्तीत घुसून बिबटे जनवारांवर हल्ले करतात. मेंढपाळ तर जंगलातच शेळ्या-मेंढ्यांसोबत राहतात. त्यामुळे कोकणात चारा, पाणी मिळत असले तरी बिबट्यांची भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया मेंढपाळांनी दिली.
•••
१६.
वीज पडल्याने मेंढपाळाचा जागीच मृत्यू
३ जून २०१९, कामठी-नागपूर
पावसाळा लागल्याच्या तोंडावर ( ३ जून) ला दुपारी तीनच्या दरम्यान कामठी तालुक्यातील आडका गावात जवळपास अर्धा तास झालेल्या वादळी वारा तसेच विजेचा कडकडाट मध्ये गावात काही वेळ भीतीमय वातावरण पसरले होते. दरम्यान ग्रा. पं. सदस्य स्वाती सुभाष खेडकर यांच्या शेतात मेंढ्या चारणारा मेंढपाळाच्या अंगावर वीज पडल्याने त्या मेंढपाळ वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडे तीन वाजता घडली असून, मृतक मेंढपाळ इसमाचे नाव मधुकर गहाणे (वय ५५) वर्ष रा. हिंगणा असे आहे. सदर मृत मेंढपाळ हा मागील चार दिवसांपासून जवळपास ५० मेंढ्याचा कळप घेऊन शेतात तळ ठोकून होता. तर दोन दिवसानंतर दुसऱ्या ठिकाणी हा मेंढ्याचा कळप घेऊन स्थानांतरण करणार होता, मात्र आजच्या या वादळी वारा व विजेच्या कडकडाटच्या घटनेत प्राणज्योत मालवली तर सुदैवाने जवळ असलेल्या कुठल्याही मेंढ्यावर वीज न पडल्याने मेंढ्यावरची जीवितहानी टळली.
काही वेळानंतर वादळी वाऱ्याची स्थिती थांबल्या नंतर गावकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला तर वीज पडून एका मेंढपाळ इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच आडका ग्रा.पं सरपंच भावना चांभारे, प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, केम ग्रा.पं उपसरपंच अतुल बाळबुधे, विजय खोडके, निरंजन खोडके, विष्णू नागमोते आदींनी मदतीचो धाव घेतली व तहसीलदार अरविंदकुमार हिंगे यांना घटनेची माहिती देत मृतक मेंढीपाळ इसमाला नैसर्गिक आपत्ती नुकसानग्रस्त निधी चा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
•••
१७.
चाराटंचाईमुळे मेंढपाळांची वणवण
७ जून २०१९, मंचर
उन्हाळयामुळे हिरवा चारा करपल्याने सध्या मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात चारा टंचाईचा फटका बसत असून चाऱ्यासाठी मेंढपाळांना वणवण करावी लागत आहे. उन्हाळयामुळे त्रस्त झालेले मेंढपाळ पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या चारा आणि पाणीटंचाईचा मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे.
आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये मेंढ्याचे कळप दाखल झाले आहेत. चाऱ्याच्या शोधात त्यांची भटकंती सुरु आहे. शेतकऱ्यांची शेती मोकळी असल्याने कोणत्याही प्रकारचा चारा मेंढ्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे मेंढपाळांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.
उष्णता वाढल्याने रानावनात कुठलाच चारा शिल्लक नाही. अशा परिस्थितीमुळे मेंढ्यांच्या कळपांवर चाऱ्यामुळे उपासमार होण्याची वेळ आली आहे. सध्या काही मेंढपाळ विकतचा चारा घेऊन मेंढ्यांना घालत आहेत. त्यामुळे चाऱ्यासाठी गावोगाव फिरण्याची वेळ मेंढपाळांवर आली असून चाऱ्याची समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभी आहे.
•••
१८.
वीज अंगावर पडून मेंढपाळाचा मृत्यू; देवणी तालुक्यातील घटना
९ जुन २०१९ , लातुर
म्हेत्रे हे मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी ४ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजा कडाडू लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, दुर्दैवाने वीज त्यांच्याच अंगावर पडली.
वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी देवणीसह तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या, तर बोरोळ येथे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यामध्ये वीज अंगावर पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. बाजीराव नागप्पा म्हेत्रे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे.
•••
१९.
पुरंदर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना.....
नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
१४ जुन २०१९, सासवड
पुरंदरमध्ये तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ५५ वर्षांच्या नराधमाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोडीत येथे ही घटना घडली आहे. यासंदर्भात मूलींच्या वडीलांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
सासवड पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार, कोडीत येथे धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते. गेल्या १० जूनला सायंकाळी ०४.३० वा. सुमारास मेंढपाळ कुटुंबातील १३ वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बाजीराव बडदे (वय- ५५, रा. कोडीत,ता. पुरंदर जि. पुणे) हा दुचाकीवरून तेथे आला. आरोपीने मुलीला स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात सासवड - कोडीत रस्त्यावर काटकर लवानाशेजारी असणाऱ्या गोठ्या शेजारी घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 'मुलीला तु जर कोणाला काही सांगितलंस तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली व पिडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले. घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेल्यामुळे घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी पिडीत मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस स्टेशन येथे आणले व फिर्याद दिली.
सासवड पोलिसांनी आरोपी राजू बाजीराव बडदे (वय- ५५, रा. कोडीत,ता.पुरंदर जि.पुणे) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात गु.र.नं. २२०\२०१९ भा.द.वि.कलम ३७६, ३०५, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.नि.आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई.एस. व्ही.सावंत करत आहेत.
•••
२०.
विजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान
१५ जुन २०१९, कन्नड - औरंगाबाद
शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहक तार मेंढ्यांच्या कळपावर पडून जवळपास ७७ मेंढ्या व ५ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यात मेंढपाळाचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना शनीवारी पहाटे ३ च्या सुमारास शिवना-टाकळी प्रकल्पाच्या पायथ्याशी जैतापूर शिवारात घडली आहे.
वैजापूर तालुक्यातील वाकला येथील कडूबा सुखदेव आयनर, संजय मांगू शिंगाडे, सदा देमा शिंदे, अंबादास देमा शिंगाडे, बाळू देमा शिंगाडे, महादू देमा शिंदे या सहा मेंढपाळ कुटूंब जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर पंडीत झाल्टे यांच्या २९६ गट क्रमांकामध्ये रात्री वास्तव्यास होते, या सर्व मेंढपाळांच्या ८५ मेंढ्या एकत्रित वाघूळ (संरक्षक) करून कळपाने बंदिस्त होत्या व शेजारी ५० फुटांवर मेंढपाळ कुटुंबातील ३० जण झोपलेले असताना पहाटे अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्याने शेतातून गेलेली उच्चदाबाची ११ के.व्ही.ची विद्युत तार मेंढरांच्या कळपावर पडली, यात ८५ मेंढ्यांचा व काही शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान विद्युत तार पडल्यानंतर मेंढरांच्या कल्लोळाने मेंढपाळ जागे झाले, पण कळपातून आगीचे लोळ दिसू लागल्याने मेंढपाळानी स्वतःचा जीव वाचवत शेतमालकास कळविले. शेतमालकाने हतनूर सब स्टेशनला कळवून तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केला, परंतु तोपर्यंत सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाला होता....
•••
२१.
अहमदनगरचा मेंढपाळ संकटात ; ३० शेळ्या-मेंढ्या दगावल्या
२० जून २०१९, अहमदनगर
अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील मेंढपाळाच्या ३० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मेंढपाळ शेतकऱ्याला मोठा धक्का बसला असून त्याचा व्यवसाय संकटात सापडला आहे.
नेवासा तालुक्यातील गोधगाव येथे दुष्काळामुळे प्रवरा नदी पात्र उघडे पडले होते. या नदीत असलेल्या विषारी गवताच्या मुळ्या शेतकर्यांनी नांगरल्यामुळे वर आल्या होत्या. हि गवत मेंढपाळ अण्णासाहेब बुचुडे यांच्या शेळ्या मेंढ्यानी खाल्यामुळे त्यांच्या १२५ शेळ्या मेंढ्याना विषबाधा झाली. यामधील २५ मेंढ्या तर पाच शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान मेंढपाळाच्या १५ मेंढ्या अजूनही मृत्युशी झुंज देत आहेत. या घटनेने मेंढपाळाचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून तो आर्थिक संकटात सापडला आहे.
या घटनेत एकुण ४५ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या.
•••
२२.
विजेच्या धक्क्याने ५५ मेंढ्यांचा मृत्यू
२३ जून २०१९, कडूस
कडूस-टोकेवाडी (ता. खेड) येथील आवटे मळ्यात वीजवाहिनीची तार मेंढ्यांच्या कळपावर पडून विजेच्या धक्क्यामुळे दोन सख्ख्या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्यात बचावले.
दरम्यान, कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात वीजवाहिनीची तार तुटून हा अपघात झाला. वीजप्रवाह सुरू असलेली
ही तार शेतात असणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा. ढवळपुरी, जि. नगर) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागीच मरण पावल्या. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या वीजवाहिनीपासून थोड्या अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून सुदैवाने बचावले.
घटनेबाबत माहिती मिळताच, कडूस विकास सोसायटीचे अध्यक्ष निवृत्ती नेहेरे, माजी उपसरपंच पंडित मोढवे व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत तिखोळे कुटुंबाला धीर दिला. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व नुकसानग्रस्त मेंढपाळांनी केली आहे.
•••
२३.
वीज कोसळून मेंढपाळ ठार..
२८ जून २०१९, नांदेड
जिल्ह्यांत वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी शिवारात ही घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जामदरा घोटी परिसरात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला. वीज कोसळून पिंटू चिमा शिंदे (वय-२८) याचा जागीच मृत्यू झाला. पिंटू शिंदे हा तरूण अडाण धरणाकडून आपल्या मेंढ्या गावाकडे आणत असताना त्याच्या अंगावर वीज पडली.
या परिसरात सोमठाणा येथील मेंढपाळांनी मेंढ्या चराईसाठी आणल्या आहेत.
•••
२४.
विषबाधा होऊन मेंढ्याचा मृत्यू; हिंगळजवाडी येथील घटनामेंढपाळाचे लाखोंचे नुकसान
१३ जुलै २०१९, उस्मानाबाद
अंबाजोगाई, माळशिरस तालुक्यातील चार मेंढपाळांच्या ७८ मेंढ्या चार्यातून झालेल्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना ११ व १२ जुलै रोजी हिंगळजवाडी येथे घडली. यामुळे मेंढपाळाच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त मेंढपाळांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
अंबाजोगाई, बीड व माळशिरस येथील मेंढपाळ दिवाळीपासून मेंढ्या जगवण्यासह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद तालुक्यात फिरत होते. बुधवार, दि. १० जुलै रोजी कोंड येथील मुक्कामानंतर हिंगळजवाडी येथे मुक्कामासाठी आल्यानंतर गुरूवार, ११ जुलै रोजी काही मेंढ्या अचानकपणे मरण पावल्या. तर काही मेंढ्या घरी येऊन पडल्या म्हणून या मेंढपाळांनी त्यांच्याजवळ ठेवलेली औषधे देऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम नाही. शुक्रवारपर्यंत मृत मेंढ्यांची संख्या ७८ पर्यंत पोहोचली होती. यामध्ये दाजी माणिक गोरड, पोपट गोरड व अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी येथील भाऊराव करे व दत्तू शेळके या चार मेंढपाळांच्या ७८ मेंढ्या विषबाधा होऊन मेल्याने मेंढपाळांचे जवळपास आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
हे मेंढपाळ दिवाळीनंतर उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह ४३० मेंढ्यांचा कळप घेऊन या भागात भटकंती करीत होते. त्यादरम्यान, चरत चरत येत असताना मेंढ्यांना विषबाधा झाली. यावेळी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव अघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डॉ स्वप्नील जिंतपुरे, डॉ. एस. पी. नागरगोजे, पशुधन पर्यवेक्षक बी. एम. कुंभार, परीचर एस. एस. फंड, जे. एस. सुरवसे आदिंसह पशुसंवर्धन खात्याच्या अधिकारी कर्मचार्यांनीं उर्वरित १२६ मेंढ्यांवर उपचार केले. विषबाधेमुळे आणखीन मेंढ्यांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
•••
२५.
ईदच्या पार्श्वभूमीवर अजित डोवालांचा मेंढी बाजारात फेरफटका; मेंढपाळांशी मारल्या गप्पा
११ ऑगस्ट २०१९ , श्रीनगर
एका मेंढपाळाने अजित डोवाल यांना तुम्हाला द्रास माहिती आहे का, असा प्रश्न विचारला.
अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे काश्मीर खोऱ्यात हिंसक निदर्शने होण्याची भीती आता फोल ठरताना दिसत आहे. कारण, संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या ईदच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बाजारांमध्ये स्थानिकांची लगबग दिसत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी नुकताच अनंतनाग येथील मेंढी बाजारात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी सुरक्षेचा आढावा घेताना स्थानिक मेंढपाळांशी गप्पा मारल्या. अनंतनागमधील या परिसरात दहशतवाद्यांचा मोठ्याप्रमाणावर वावर असतो. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ईदसाठी सध्या अनंतनागच्या मेंढी बाजारात मोठयाप्रमाणावर मेंढ्या आणल्या जात आहेत. यावेळी अजित डोवाल त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी बाजारात मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मेंढपाळाशी गप्पा मारल्या. मेंढ्यांची किंमत किती आहे, त्यांचे वजन किती आहे, या मेंढ्यांना काय खायला घालता, असे जुजबी प्रश्न त्यांनी मेंढपाळांना विचारले. यानंतर त्यांनी मेंढपाळांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या.
या स्थानिक मेंढपाळांना अजित डोवाल यांची ओळख पटली नाही. अजित डोवाल यांच्याशी गप्पा मारणाऱ्या एका मेंढपाळाने या मेंढ्या द्रासमधून आणल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर तुम्हाला द्रास माहिती आहे का, असा प्रश्नही विचारला. अखेर अनंतनागचे पोलीस उपायुक्त खालीद जनागीर यांनी मेंढपाळांना अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्याचे सांगितले.
•••
२६.
आंबेगावला मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याचा हल्ला
१२ ऑगस्ट २०१९, पुणे
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द गावात, आज पहाटे संतोष नारनर या मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. यात बिबट्याने दोन मेंढ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार मेंढपाळाच्या समोरच घडला. त्यामुळे या ठिकाणचे मेंढपाळ सध्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
•••
२७.
गोदावरी पात्रात अडकलेल्या अडीच हजार मेंढ्या, सहा मेंढपाळ बचावले
३० ऑक्टोबर २०१९, नागपूर
गडचिरोली जिल्हा प्रशासनाची कामगिरी; ४८ तासानंतर सुखरूप सुटका
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातील सुकंरअल्ली येथे गोदावरी नदीच्या विस्तृत पात्रात अडकलेल्या २५०० मेंढ्या-बकऱ्या व ६ मेंढपाळांचा जीव गडचिरोली जिल्हा प्रशासनाने दाखवेल्या तत्परतेने वाचला. मेंढ्यांसह मेंढपाळ चारही बाजूने पाण्याने वेढल्याची माहिती डीएम सेल, गडचिरोलीला रविवार २७ रोजी सकाळी ९ ला वाजताच्या सुमारास मिळाली. स्थानिक महसूल तसेच पोलिस प्रशासनाने समन्वय साधत २८ आॅक्टोबर रोजी सकाळी सहा मेंढपाळांसह सर्व जनावरांना सुखरूप बाहेर काढले. २७ रोजी टिमने घटनास्थळी भेट दिली असता मेंढपाळ मेंढ्यांना सोडून यायला तयार नव्हते. अशावेळेस त्यांच्याकडे पुरेसे राशन असल्याची खात्री करून लाईफ जॅकेट्स देण्यात आले व नदीकिनारी रबर बोट व पथक तयार ठेवण्यात आले. रात्री मेडिगड्डाच्या वरील भागातील श्रीरामसागर व येलमपल्ली धरणातील पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने चिंताजनक स्थिती होती. परंतु जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन तसेच मेडीगड्डा प्रकल्प यांच्यातील समन्वयामुळे ४८ तासानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, पोलिस उपअधीक्षक गोरख गायकवाड, सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वामी, तहसीलदार रमेश जसवंत, आसरअल्लीचे नायब तहसीलदार हमीद सय्यद आदींचे मोलाचे सहकार्य मिळाले.
•••
२८
मेंढपाळ महिलेसह मेंढ्याना चिरडले
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.
ReplyDelete