शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मोर्चा काढणार : महादेव जानकर

यवतमाळ (९/९/२५) : शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारच्या धोरणावरून राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे यवतमाळ येथे आले असता जाहीर केले.
श्री. जानकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये '२०२४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारने शेतकर्यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहामध्ये अडकला असून, शेतकर्यांची कर्जमाफी करावी, विदर्भातील शेतकर्यांना ऊसाप्रमाणे एफआरपी दयावी, व शेतकर्यांच्या इतर मागण्यांकरीता मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना श्री. जानकर म्हणाले की, विदर्भातील शेतकर्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेवून शेतीसोबत पुरक व्यवसाय करण्यावर भर दिला पाहिजे. शेतकर्यांच्या मुलांनी शेतीचे अद्यावत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय फायद्याची शेती केली जावू शकणार नाही. मी मंत्री असताना दुधाला सर्वाधिक दर मिळवून दिले होते, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सत्ताधार्याकडून आपल्याला जाती जातीमध्ये भांडविले जात आहे. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना सरकारने दयावे, कुणाच्याही आरक्षणाच्या हक्काला आमचा विरोध नाही. ज्या जातीची जेवढी जन संख्या असेल, तेवढया प्रमाणात त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. त्यासाठी कायदे तयार करण्याचे अधिकार संसदेला आहेत, त्यांनी ते करावेत असे स्पष्ट मत महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
No comments:
Post a Comment