Saturday, April 30, 2022

बाबा केरू प्रथम पुण्यस्मरण

 आण्णांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन..!



आण्णांचे शालेय शिक्षण झाले नव्हते, पण एखाद्या कसलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरला लाजवेल इतके तांत्रिक ज्ञान त्यांच्याकडे होते. गरिबीमुळे लहानपणी दुसऱ्याच्या घरी चाकरीने राहावे लागले. कष्टाच्या बुध्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या घरच्या परिस्थितीला बदलवले होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला. १९९० ते २००५ च्या काळात कुकुडवाड ते म्हसवड, दहीवडी पर्यंत बाबा पाटील नावाचे वादळ निर्माण झाले होते. त्यांच्या नावाचे तालुक्यात एक पर्व सुरू झाले. आण्णांना वादळी जीवन जगावे लागले. आर्थिक हानीलाही सामोरे जावं लागलं. त्यांच्या बुध्दीचातुर्याचा लोकांना हेवा वाटायचा. पडत्या काळात सर्वसामान्यांना केलेल्या मदतीमुळे जनसामान्यांच्या मनावर त्यांच्या आठवणी कोरल्या गेल्यात. इतक्या लवकर आण्णा आम्हाला सोडून जातील हे पचवणे जड जातय. आण्णांच्या अकाली निधनामुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

Friday, April 29, 2022

शेळी मेंढी महामंडळाला निधी कधी मिळणार ? : आनंद कोकरे

शेळी मेंढी विकास महामंडळाला निधी कधी मिळणार ? : आनंद कोकरे

मुंबई/आबासो पुकळे

सगळ्या महामंडळांना निधी मीळाला तोही दुप्पट परंतू शेळी व मेंढी विकास महामंडळास निधी कधी मीळनार..?? असा प्रश्न मेंढपाळपुत्र आर्मीचे संस्थापक आनंद कोकरे यांनी उपस्थित केला आहे. महामंडळाच्या निधीवरून सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेंढपाळ बांधवांकडून सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय विभागाकडील 4 महामंडळांच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल 500 कोटी वरून वाढवून 1000 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 300 कोटी वरून 1000 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 73.21 कोटी वरून 1000 कोटी आणि दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटी वरून 500 कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला डावलण्यात आल्यामुळे मेंढपाळ बांधवांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आवळला आहे. 

लोकसंस्कृतीचे अभ्यासक श्रीकांत हंडाळ यांनी म्हटले आहे, Dhananjay Munde  साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ पण आहे लक्षात असू द्या, नेहमी बांधवांचा फक्त मतदानासाठी वापर होतोय असा गैरसमज आम्हा सर्वांचा होऊ नये एवढच....

इतिहास संशोधक रामभाऊ लांडे यांनी सामाजिक न्याय विभागाकडून झालेल्या असामाजिक न्यायाचा  निषेध व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाने काय पाप केले होते. निदान परळी तालुक्यातील 30 हजार धनगर बांधवांनी आपल्याला मतदान केले त्यांचा तर विचार करायला हवा होता. बहुजन सुखाय बहुजन हिताय आपल्या निर्णयात कुठेच दिसत नसल्याने आपल्या ठराविक भूमिकेचा व सामाजिक न्याय विभागाकडून झालेल्या असामाजिक न्यायाचा आम्ही निषेध करतो.

Thursday, April 14, 2022

श्री. जोतिबा नंदी

माणदेशातून जाणाऱ्या 'रतन' नंदीचे श्री. जोतिबाडोंगराकडे प्रस्थान

शिंग वाजे शिंगणापूरी - नगारा वाजे वाडीरत्नागिरी! जोतिबाच्या नावानं चांगभलं !! म्हणत शेकडो भाविक भक्तांनी रतन नंदी सोबत पुकळेवाडी ता- माण जि- सातारा येथून प्रस्थान केले. आज  दि. १५ एप्रिलला सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री. जोतिबा डोंगर कोल्हापूर येथे ढोल कैताळच्या निनादात, चांगभंलच्या गजरात, भक्तीभावाने नंदीचे आगमन होणार आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकातून चैत्रपौर्णिमेला जोतिबा डोंगरावर हजारो सासण काठ्या पारंपरिक वाद्यासह वाजत गाजत येतात. माणदेशातल्या शंभू महादेवाच्या डोंगरातून पाठीवर नगारा घेऊन रतन नंदी चैत्र पौर्णिमेस जोतिबा डोंगरावर पोहचत असतो. चैत्र पौर्णिमेसाठी जोतिबा देवाच्या दर्शनाला पायी जाण्यासाठी भाविक मोठ्या उत्सहाने पुकळेवाडी येथे एकत्र येत असतात.  गुढी पाडवा झाला की, जोतीबा दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांना जोतिबा देवाचा नंदी पुकळेवाडी गावातून कोणत्या दिवशी प्रस्थान करणार आहे, याची उत्सुकता लागते. दहावीची बोर्ड परीक्षा दिली की, विद्यार्थी नंदिसोबत पायी वारी करण्याची नवी परंपरा चालू झाली आहे.

पुकळेवाडीचे ग्रामस्थ सांगतात की, नंदीच्या पाठीवर नगरा घेऊन जोतिबा देवाच्या दर्शनासाठी पायी चालत जायची मोठी परंपरा आहे. दुष्काळात नंदी मेंढ्यासोबत  मराठवाड्यात असताना देखील रात्रदिवस चालत येऊन जोतिबा डोंगरावर पोहचला होता, गत दोन वर्षात कोरोना महामारीमुळे पायी चालत जाण्याची परंपरा खंडित झाली होती, मात्र यावर्षी जोतिबा देवाची यात्रा भरत असल्याने, आम्ही आमचा वारसा टिकवून ठेवू. २१ एप्रिल रोजी पुकळेवाडी येथे गजी ढोल, धनगरी ओव्या, पारायण सह जोतिबा देवाची यात्रा पार पडनार आहे.

दै. जनमत पान नं- १

क्लिक करा >> जोतिबा डोंगर पायथा , संत जनाबाई ओवी 


Sunday, April 10, 2022

कुकुडवाड, पुकळेवाडीमध्ये आज श्रीराम नवमी निमित्त कार्यक्रम

कुकुडवाड, पुकळेवाडीमध्ये आज श्रीराम नवमी निमित्त कार्यक्रम

कुकुडवाड ता- माण येथे श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. स. भ. श्री. रोहित वाळिंबे (पुणे) संगीतमय रामकथाकार यांचे कीर्तन होणार होणार असून, सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.  या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

"आम्ही श्री राम नवमी(राम जन्म) कार्यक्रम गावस्वरूपी  करत आहोत. श्री गोंदवलेकर महाराजांनी सन:१९१२-१३ साली कुकुडवाड ता- माण जि- सातारा येथे श्रीराम मंदिर स्थापित केले आहे. कुकुडवाड मधील राममंदिरात तेव्हा पासून, श्री राम नवमी हा कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये आम्ही अन्नदान (महाप्रसाद ) ही संकल्पना सन:२०१५ पासून चालू केले आहे. आमचे चालू वर्ष 2022 हे 8 वे वर्ष आहे. दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात.

सकाळी अभिषेक,आरती, दुपारी कीर्तन, रामजन्म कार्यक्रम, भजन, सरबत वाटप, संपुर्ण गावामध्ये महाप्रसाद असतो. गावातील सर्व ग्रामस्थ व सर्व स्त्रिया,भक्तजन  यांचा आनंद घेतात." - प्रसाद हुद्देदार, कुकुडवाड.

पुकळेवाडीत श्रीराम नवमी निमित्त आज सत्संग

दरवर्षिप्रमाणे आज दि.१० एप्रिल, २०२२ रोजी श्रीराम नवमी निमित्त श्रद्धेय श्री स्वानंदकाकांचे उपस्थितीत श्री गुरुपादुका पूजन कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. सकाळी श्रीगुरुपादुका पूजन व आरती, श्री मायाक्कादेवि मंडप येथे महाप्रसाद, दु.१ ते ३ श्री आसारामायण पाठ व भजन, दु.३ ते ५ श्रद्धेय श्री काकांचा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी कृपया जास्तीत जास्त संख्येने  पुकळेवाडी ग्रामस्थ, बंधू-भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची नम्र विनंती, आयोजक निलेश पुकळे, पुकळेवाडी यांनी केली आहे.

Saturday, April 9, 2022

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले



सातारा दि. 9 : श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले. महाराष्ट्र केसरी कुस्तीची  मानाची चांदीची गदा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई व नामांकित मल्ल यांच्या हस्ते  पै. पृथ्वीराज पाटील यांना देवून गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व  जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 च्या अंमित सामन्याचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात करण्यात आले होते.  यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपट्टू उपस्थित होते.  

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुस्ती या खेळाला महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. कुस्ती या खेळात महाराष्ट्रातील मल्लांनी ऑलिंपिक पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव जगात व्हावे यासाठी राज्यातील मल्लांना शासनामार्फत सहकार्य केले जाईल.  महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना उत्साहात होत आहे. महाराष्ट्रात अनेक ताकतीचे मल्ल घडले आहेत.  निवृत्त झालेल्या मल्लांनी नवीन मल्ल घडविण्यासाठी पुढे यावे. तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मल्ल होणे हे सोपे नाही यासाठी मेहनत, आहाराबरोबरच कुस्तीतील डावपेच शिकावे लागतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेंचा अंतिम सामना पाहण्यासाठी  कुस्ती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, April 7, 2022

बिरोबा यात्रेनिमित्त आरेवाडीत मोफत आरोग्य शिबीर

 बिरोबा यात्रेनिमित्त आरेवाडीत गुरूवारी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

मुंबई :- तमाम भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरोबा देवालय आरेवाडी (जि. सांगली) येथील यात्रेनिमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पु. अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन (PADMA) व कृष्णा येरळा प्रतिष्ठान, सांगली संस्थेच्या वतीने हे शिबिर आयोजित केले असून याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन PADMA चे डॅा. अरूण गावडे व कृष्णा येरळा प्रतिष्ठानचे  डॅा. दिलीप मगदुम केले आहे.


PADMA संस्थेच्या वतीने मागील महिनाभरापासून या शिबिराची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने आवश्यक  असणारी औषधे संकलन, फार्मसिस्ट व तज्ञ डॉक्टरांच्या सहभाग तसेच स्थानिक यात्रा कमिटीशी समन्वय आदी पातळीवर सर्व तयारी झाली आहे.


सदर शिबिर गुरुवार दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. अरुण गावडे, दंतरोग तज्ञ डॉ. दिलीप मगदूम, डॉ. सुनील मगदूम, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ. स्वप्नील चोपडे, डॉ. अमित खरजे, डॉ. श्रीनिवास माने, डॉ. सखाराम गारळे, डॉ.  विजय पाटील, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. सुनील लवटे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. वर्षा चौरे, डॉ. नामदेव देशमुख व डॉ. आदर्श गावडे आदी तज्ञ डॉक्टर्स सहभागी होवून आरोग्यसेवा करणार आहेत.

ही यात्रा ऐन उन्हाळ्यात भरत असल्यामुळे बदलत्या हवामानाचा येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे अशा भाविकांना प्राथमिक इलाज व्हावा आणि येणाऱ्या सर्व भाविकांना तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य विषयक सल्ला मिळून उपचार व्हावा, या उद्देशाने या शिबिराचे मागील ७ वर्षांपासून आयोजन करण्यात येते.

 तरी सदर शिरीबाचा जास्तीत जास्त भाविकांसह परिसरातील बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बिरोबा देवस्थान यात्रा कमिटी व PADMA व कृष्णा येरळा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...