Tuesday, June 18, 2019

लढा टेंभूच्या पाण्याचा पुकळेवाडी ग्रामस्थांचा

टेंभू योजनेचे पाणी द्या ; अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार : पुकळेवाडी ग्रामस्थ 
टेंभू योजनेतून पाणी मिळावे यासाठी एकवटलेले पुकळेवाडी ग्रामस्थ.


पुकळेवाडी ग्रामस्थांच्यावतीने दि. १५ जून २०१९ रोजी टेंभू योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी श्री. सिध्दनाथ मंदिरासमोर ग्रामसभेचे आयोजन केले होते. जोपर्यंत टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या ठराव पुकळेवाडी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पुकळेवाडी गावामध्ये पुकळेवाडी व शेळकेवस्तीसह  इतर छोट्या मोठ्या वस्त्या आहेत. पुकळेवाडी ग‍ावात पशुपालकांची संख्या मोठी असून, सततच्या दुष्काळामुळे येथील मेंढपाळांनी चारा पाण्याच्या शोधात स्थलांतर केले आहे. गेली सलग तीन वर्षापासून गावास शासकिय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दक्षिण माण मधिल पुकळेवाडी, मानेवाडी, कुकुडवाड, शिवाजीनगर, भाकरेवाडी, कारंडेवाडी, धनवडेवाडी, मस्करवाडी, नंदीनगर व आगासवाडी या वाड्यांनी एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा लढा उभा केला आहे. पाणी मिळावे यासाठी विविध गावात ग्रामसभा घेण्यात येत आहेत. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा निर्धार पुकळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे.
पुकळेवाडी परिसरातील भौगोलिक व ऐतिहासिक स्थान दर्शवणारी खुण.

पुकळेवाडी परिसरातील भौगोलिक व ऐतिहासिक स्थान दर्शवणारी खुण.
पुकळेवाडी परिसरात डोंगर रागांनी तयार झालेली नैसर्गिक द्रोणी.
टेंभू योजनेचे पाणी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी व विरळी परिसरात पोहचले आहे. तसेच उरमोडी योजनेचे पाणी कुकुडवाडपासून १३०० मीटर अंतरावरून प्रवाहित झाले आहे. परंतु कुकुडवाड व परिसरातील इतर वाड्या  पाण्यापासून वंचित राहिल्या असून, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड परिसरात सोडण्यात यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षापासून येथील नागरिकांमधून होत आहे.आगामी काळात पाण्याच्या लढा अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

"बंदिस्त पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेचे पाणी जिरे पठारावर भवानी मंदिरापर्यंत आणून ते पाणी कुकुडवाड परिसर व कलेढोण परिसरातील गावांना उपलब्ध करुन देण्यात यावे"
- महादेव पुकळे, ग्रामस्थ पुकळेवाडी.





दुष्काळामुळे घोड्याच्या पाठीवर संसार लादून स्थालंतर करताना मेंढपाळ कुटुंब.

पाण्याअभावी वाळून गेलेले पीक, बाटकाची वैरण.

शेळ्या मेंढ्यांना चारा नसल्याने बाभळीच्या झाडाचा पाला पाडताना मेंढपाळ. 


दिनांक २६ऑगस्ट २०१८ रोजी पुकळेवाडीच्या  शिवारात पाण्याचा तळ गाठलेली विहिर



-आबासो पुकळे, १८-०६-२०१९

Friday, June 7, 2019

सत्यशोधक, दंडनायक संत कनकदास

संत कनकदास जयंती दिना’निमित्त...

राष्ट्रीय समाजातील एका महान पण दुर्लक्षित असलेल्या / ठेवलेल्या संत कनकदासांची जयंती आज सोमवार दि.06/11/2017  रोजी आहे... दक्षिण भारतात संत महात्मा बसवेश्वरानंतर संत कनकदासांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.... संत तुकाराम महाराज प्रमाणे संत कनकदासांनी ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ कार्यासाठी आपले जीवन अर्पण केलेले  होते... कनकदासांची कीर्तने हे आट, आडी, जपे, त्रिपुरा, एका, त्रिविड, चप्पू, मटे आदि. तालामध्ये कन्नड भाषेत गायली जातात... मोहन तरंगणी, नल चरित्र , भारत कथा अमृत यांसारखी अनेक सुंदर काव्ये, संत कनकदासांनी लिहली व गायिली आहेत... राणा प्रताप सिंगाने कनकदासांच्या स्मरणार्थ 'कनकवृंदावन' बांधले  असे सांगितले जाते... संत कनकदासांच्या साहित्यावर अनेकांनी प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवलेली आहेत... अनेक कनकपीठे तयार करण्यात आलेली आहेत.... जात / पंथ /  धर्म या पलीकडे जावून सर्व थरातील लोक हे कनकदासांच्या साहित्याकडे आकर्षित झालेले दिसतात.... श्रीकृष्णाचे भक्त असलेले संत कनकदासांनी भारतातील जातीभेदाबद्दल, उच्च वर्णीय मानसिकतेवर जबरदस्त हल्ले त्याकाळी केले होते.....श्रीकृष्णदेवरायाने या महान संत कनकदासांची आठवण म्हणून कनकगोपूर बांधले होते... परंतु मागे काही वर्षापूर्वी संत कनकदासांचे स्मारक 'कनकगोपूर'चा काही कर्मठ पुरोहितांनी विध्वंस केले होते... 7 जानेवारी 2005 रोजी कनकगोपूर विध्वंस निषेधार्थ धनगर / कुरुबा / कुरुमा / पाल / रबारी आदी. भारतभरातील मेषपालक / Shepherds सहित तमाम बहुजन / राष्ट्रीय समाजाने कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळूरू  येथे एका विराट मोर्चाचे आयोजन केले होते. रासप राष्ट्रीय अध्यक्ष व मंत्री महादेवजी जानकर, सध्याचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैयाजी सहित तमाम देशभरातील राष्ट्रीय समाजातील  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या मोर्चात सहभागी होऊन आणि तीव्र रोष व्यक्त करित  विध्वंसकांनात्वरित अटक करून 'कनक गोपूर' जैसे थे बांधून देण्याची मागणी त्यावेळी शासनाकडे केली होती... अनेक वर्षापासून धनगर (कुरुबा) तसेच विविध बहुजन / राष्ट्रीय समाज संघटनेनी संत कनकदासांची जयंती दिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने केल्याने आज गेली काही वर्षे कर्नाटक राज्य शासनाने कनकदास जयंती दिन हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केलेला आहे.... कर्नाटक राज्य सरकार’तर्फे संत कनकदास जयंतीपर अनेक राज्यभर कार्यक्रम आयोजित केले जातात.... अनेक शाळा - कॉलेज मध्ये जयंतीपर कार्यक्रम आयोजित केले जाते....
संत कनकदास सांगतात,
कशासाठी, कशासाठी टिचभर पोटासाठी

धडुतं नि भाकरीच्या कोरभर घासासाठी

हातामधे एकतारी, गोड वाजे तानपुरा

वारवधूसारखेच नाचणे हे पोटासाठी

जटाधारी साधू, जोगी, जंगम हे, संन्यासी

नाना वेश घेतलेले पोटासाठी, पोटासाठी.



ढोंगबाजीवर, यंत्रवत / औपचारिक कर्मकांडावर हल्ला करित, वरवरच्या शुद्ध - अशुद्ध्तेपेक्षा धर्माच्या 'मुळ' आत्मस्वरूपाला जाणून त्यानुसार आचरण करा...असा उपदेश संत कनकदास हे कर्मठ पुरोहित वर्गाला करतात आणि आपल्या ते किर्तनातून  विचारतात कि,

✨ कुळ - कुलीन म्हणून का मिरवीतो ?
मुळ कुळाचे कोणी का जाणतो ?
आणि ठामपणे सांगतात...
शुद्धी - शुद्धी असे , सारखे का घोकता ?
शुद्धीचा अर्थ, तुम्ही न जाणता !! ✨

संत कनकदास विचारतात...
✨ सांगा, जात कोणती सत्याला ?
पूजेसाठी वाहिले पद्मनाभाला, कमळांचा जन्म चिखलातला !
दुध पूर्णान्न जगताला , मांस-रुधीरातून जन्म झाला !
कस्तुरीचा जन्म कोठून झाला ?
सांगा, जात कोणती हरीला ? सांगा, जात कोणती आत्म्याला?
सत्याबोध होते जयाला मनी वसे हरी तयाला, सांगा जात कसली साधूला ? ✨

महाज्ञानी, विद्वान, भाष्यविंद, साहित्यिक, संगीतज्ञ असलेले असलेल्या संत कनकदासांचा एक धनगर / शुद्र / दास...म्हणुन व्यासमठात / शिक्षण मंदिरात / ज्ञान केंद्रात अपमान त्यावेळी केला होता...

✨ संत संगाचा आनंद मिळता, तिर्थक्षेत्रांची भटकंती कशाला !
सत्यबोध झाले मनाला,  दुःख कशाचे असेल तयाला !!

मना चिंता ग्रस्त होवु नकोस, मना शांत हो... मना स्थिर हो !
सर्वांभुती ईश्वर, सर्वांचे रक्षण करील, मना या बद्दल तु निश्चिंत हो !!

हा-तो ? माझे हित करील, यावर विसंबुनहि राहु नको !
पित्यावर विसंबुन राहिला, प्रल्हाद हि फसला गेला !!

कागिनेलीच्या आदी केशवाकडे पुर्ण विश्वास जयाचे !
तया मिळेल... अक्षत धन - अनंत काळाचे...!!✨
- संत कनकदास 
-६-११- २०१७
📒 माहिति संदर्भ : 
लेखक/कवी श्री.एस.एल. अक्कीसागर यांच्या सत्यशोधक - दंडनायक
संत कनकदास’ 
पुस्तिके’मधून साभार...

Kanakdasa asks people to submit themselves to God`s Service, which means SERVICE TO SOCIETY AND HUMANITY.
- Late Sri Sri Sri Beerendra Keshava Tarakanandpuri Swami, Kaginele Gurupeeth

हुतात्मा किसन विरकर

1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा.
.................................................................
माणदेशी कामगार किसन विरकर महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा ठरले......

1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबईसह मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी काही विरांनी जीवनाचे बलिदान दिले. त्यातीलच एक हुतात्मा किसन विरकर.  किसन विरकर हे मुळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणारे विरकरवाडी गावचे सुपुत्र. गोकुळ अष्टमीचा जन्म म्हणून किसन नाव ठेवले. ते अविवाहित होते.   सहा-सात वर्षापर्वी सातारा जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात 'किसन विरकरांचे वारसदार महाराष्ट्र राज्यात उपेक्षित' अशा मथळ्याचे वृत्त वाचले होते. वृत्तात विरकरवाडीतील स्थानिक जि/प शाळेतील तैलचित्र छापले होते. यापलिकडे किसन विरकर या क्रांतीविराबद्दल काहीच माहीत नव्हते. दीड वर्षापूर्वी मी मुंबईला गेलो होतो. मुंबईला कामानिमीत्त किल्ला परीसरात फिरत असताना पाच सहा वेळा हुतात्मा चौकातून गेलो असेन, पण चौकात उभारलेल्या पुतळ्याचे बारकाईने निरीक्षण केलेले नव्हते. नेहमीप्रमाणे एके दिवशी सीएसटी रेल्वेस्थानकावरून 'विश्वाचा यशवंत नायक'अंकाच्या कामानिमित्त केंद्रीय कार्यालय, राष्ट्रीयालयाच्या दिशेने निघालो होतो. तेवढ्यात सहजपणे हुतात्मा चौकातल्या पुतळ्याकडे लक्ष गेले आणि प्रथमदर्शनी मला माझ्या गावाकडच्या माणदेशी माणसाचे चित्र डोळयासमोर दिसले. त्या पुतळ्याच्या शिल्पात मला ' क्रांतीची पेटती धगधगती मशाल हातात धरलेला, खांद्यावर घोंगड(कांबळ) घेतलेला, धोतर नेसलेला, डोक्याला पटका(फेटा) गुंडाळलेला' "एक रांगडा क्रांतिकारक हुतात्मा किसन विरकर" यांचे दर्शन घडले. मुंबईमध्ये राहणारे अनेकजण भेटतात, पण किसन विरकर अथवा या पुतळ्याबद्दल कोणी बोलताना मला आढळलेलं नाही. त्याचवेळी मी या पुतळ्याच्या शिल्पाबद्दल लिहायचे ठरवले होते. तो लेख लिहण्यास कमी पडलो. आगामी काळात 'हुतात्मा किसन विरकर' या व्यक्तीमत्वाची ओळख माणदेशासह महाराष्ट्राला होण्याची गरज आहे . मुंबईला कुर्ला परिसरात किसन विरकरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने राहतात. किसन विरकरांच्या स्मृती जपण्यासाठी कुर्ला येथे नागोबा चौकात एका स्टाॅपला किसन विरकरांचे नाव देण्यात आले आहे. हुतात्मा चौकाबद्दलची फाईल मुंबई महानगरपालिकेने घाळ केल्याचे समोर येत आहे. हुतात्मा चौकातील शिल्पावर संयुक्त महाराष्ट्रसाठी बलिदान केलेल्या 106 हुतात्म्यांची नावे कोरण्यात आलेली आहेत. 
महाराष्ट्राचा प्रत्येक वर्धापन दिनाला या शिल्पासमोर मानवंदना दिली जाते. आज आठवला जाणारा इतिहास बरोबर 62 वर्षापूर्वी या चौकात घडला. माणदेशी मुंबईकर कामगार 'हुतात्मा' किसन विरकर यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त विनम्र अभिवादन. 
- आबासो पुकळे
दि. १ मे २०१७

पानवण अनाथ मुलांची आश्रमशाळा

अनाथ मुलांच्या आश्रम शाळा वसतीगृहाची पायाभरणी ; 'आयटियन्सच्या' प्रयत्नास आले यश

सनराईज प्रतिष्ठानचा उपक्रम : समाजात ठरतोय नवा आदर्श

सातारा जिल्ह्यात माणदेशाच्या प्रदेशावर पाण्याविना येथील जनतेची परवड सुरु असल्याचे निदर्शनास पडते. "माण भूमिवर दुष्काळाचा प्रभाव असला तरी, याच माणदेशाच्या मातीत मायेचा ओलावा मात्र काही कमी नाही हे सिद्ध केलय पानवण गावच्या रमाताई तोरणे या मानदेशी माय माऊलीने". सन-२००० पासून अखंडपणे रमाताई अनाथ मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालवून मायेची उब देण्याचे काम करत आहेत. सध्या आश्रम शाळेत ६० मुलांचा संभाळ होत आहे. शासनाच्या कोणत्याही मदतीविना हे सर्व कार्य रमाताईनी मोठ्या जिद्दिने चालू ठेवले आहे. तोरणे दांपत्याने निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा आश्रमासाठी खर्च केलाय. सध्या त्यांना आर्थिक विंवचनेला सामोरे जावे लागत आहे. आश्रमाच्या संस्थापिका रमाताई तोरणे व मुलगा उमाकांत तोरणे यांनी अनाथ आश्रमसाठीचे घेतलेले कष्ट व त्यांनी दिलेली सेवा, आश्रमात मुलांचे होणारे पालन पोषण पाहून पुण्यात नोकरी करणारे 'आयटियन्सनी' आश्रमाला मदतीचा हात देऊ केलाय. 

'आयटियन्सनीची' ओळख :
पुणे शहरातल्या हिंजवड़ी भागात काम करणाऱ्या आयटियन्सना ' विक एंड' ला भटकती करत असताना मानदेशातल्या पानवण गावातील अनाथ आश्रमाची माहिती मिळाली. गिर्यारोहनाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या तरुण आयटियन्सनी सनराईज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आश्रमशाळेला सोलर देणे, मुलींसाठी स्वतंत्र  वसतीगृह उभरन्याचे ठरवले.  त्यासाठी या आयटियन्सनी गत एक वर्षापासून पुणे, पिपरी चिंचवड शहरात गणेश मंडळासमोर शिक्षणाची  जनजागृती करताना तळागाळातील मुलांची शिक्षणासाठी होणारी फरफट "स्कुल चले हम" या नाटिकेतून मांडली. त्यातून या आश्रमशाळेला मदत करण्याचे आवाहन केले. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत झाले.

दोन दिवसांपूर्वी  संत गजानन महाराज आश्रम, पानवण येथे 'सोलर वाटर हीटर' चे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. ५०० लिटर क्षमता असलेला हा प्रकल्प "रोटरी क्लब चिंचवड" या संस्थेने आश्रमास उपलब्ध करून दिलाय. यासाठी रोटरीच्या अध्यक्षा सौ. अनघा रत्नपारखी यांनी मोलाचे सहकार्य लाभले. सनराईज प्रतिष्ठान, पुणे यांच्या मेहनतीतून होत असलेल्या सुमारे ६५० चौरस फुट वसतीगृहाचे भूमीपूजनाचा कार्यक्रमही या निमित्ताने पार पडला.

पथनाट्यातून उभरला निधी :
सनराईज प्रतिष्ठानने गेल्या एक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर करून तसेच विविध उपक्रम राबवून वसतीगृह बांधण्यासाठी निधी उभारला. वसतीगृह बांधकामाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने मदत निधी उभारण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व आयटियन्सनी समाधान व्यक्त केले आहे. 

या वसतीगृहाचे बांधकाम शासकीय कंत्राटदार श्री. जवाहर काळेल यांना देण्यात आले आहे. सदर वसतीगृहाचे काम पुढील तीन महिन्यांत पुर्ण करण्याचा आशावाद जवाहर काळेल यांनी व्यक्त केला आहे. तसेच श्री. काळेल वसतिगृहाच्या रंगरंगोटीचे काम स्वतः करुन देणार आहेत.

पानवणच्या अनाथ आश्रमाच्या मदतिसाठी आयटियन्सचा समूह असलेला 'सनराईज प्रतिष्ठान' सर्व प्रथम पुढे सरसावला. त्यांनी पुण्याहून थेट माणदेशात अश्रमस्थळी येऊन पाहणी केली. प्रत्यक्ष कामाला सुरवात करुन एक पाऊल पुढे टाकल्याने संगणक अभियंत्याचे संपूर्ण माणदेशात कौतुक होत आहे. 

छायाचित्रात सोलर उद्धघाटन व वसतीगृह भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र असताना श्री. गजानन महाराज आश्रमाच्या संस्थापिका सौ. रमाबाई तोरणे, अधिक्षक श्री. उमाकांत तोरणे, सनराईज प्रतिष्ठानचे श्री. अतुल पारखे, श्री. स्वप्निल जोशी, श्री. सोमनाथ रसाळ, श्री. सुमित पवार व श्री. इंजि.जवाहर काळेल साहेब उपस्थित होते. खरे पाहता पुण्यातील काही संगणक अभियंत्यानी एकत्र येवून  सनराईज प्रतिष्ठानच्या मध्यमातुन अनाथ मुला मुलीसाठी वसतीगृह उभरन्यासाठी सुरु केलेला उपक्रम समाजात नवा आदर्श ठरत आहे. या तरुण 'आयटियन्सना' सॅल्यूट आणि मनापासून  धन्यवाद.
✍ आबासो पुकळे
     दिनांक : ३ जुलै २०१८.

Wednesday, June 5, 2019

आरक्षण धारकाला खुल्या गटात नोकरी नाही.

Reserved category candidates do not have jobs in general quota - Supreme Court
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगरीत नोकरी नाही - सुप्रीम कोर्ट

आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. मात्र, आरक्षित प्रवर्गात जागा न मिळाल्यास संबंधित उमेदवाराला जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आर भानुमती आणि न्यायाधीश एएम खानविलकर यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी हा निर्णय दिला. 

आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारापेक्षाही अधिक गुण मिळवले असले, तरी या उमेदवारास केवळ आरक्षित प्रवर्गातून नोकरी दिली जाईल. जनरल कॅटेगिरीतील नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला दावा करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेतील सुनावणीवेळी दिला. 

आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नेहमीच आरक्षित जागेवरुनच नोकरीसाठी आपला अर्ज भरतात. मात्र, आरक्षित प्रवर्गातील जागा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून जनरल प्रवर्गातील जागेवर नोकरी देण्याची मागणी केली जाते. त्यासाठी जनरल प्रवर्गातील उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवल्याचेही कारण सांगण्यात येते. तर अनेकदा वेगळेच कारण सांगितले जाते, पण ही प्रकिया चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आरक्षित प्रवर्गात नोकरी मिळविण्यात अपयश आल्यानंतर एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये, आपणास सर्वसाधारण प्रवर्गातून नोकरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित महिलेने ओबीसी प्रवर्गातून अर्ज करताना अधिकतम वयोमर्यादेचा फायदा घेतला आहे. तसेच, मुलाखत देतानाही ओबीसी प्रवर्गातूनच दिली. त्यामुळे जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

1 जुलै 1999 च्या डीओपीटीच्या कार्यवाहीतील नियमात यासंदर्भातील बाब स्पष्ट करण्यात आल्याचे न्यायाधीश भानुमती यांनी म्हटले. एसी/एसटी आणि ओबीसीचे उमेदवार, जे आपल्या मेरीटच्या आधारे निवड झाले आहेत. त्यांना जनरल कॅटेगिरीत नोकरी देता येणार नाही. कारण, आरक्षित जागेतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना वय, शिक्षण, गुणवत्ता आणि फीजमध्ये सवलत दिलेली असते, त्यामुळे ते जनरल कॅटेगिरीतील नोकरीवर हक्क दाखवू शकत नाहीत, असेही भानुमती यांनी म्हटले आहे.

ओबीसी महासंघ तिसरे अधिवेशन- मुंबई

ओबीसी समाजातील आमदार-खासदार हे फक्त राजकीय पक्षांच्या हाताखालची बाहुले : खासदार राजकुमार सैनी

ओबीसी समाजातील आमदार-खासदार हे फक्त राजकीय पक्षांच्या हाताखालची खेळणी आहेत. या समाजातील लोकप्रतिनिधींनी पक्ष प्रमुखांच्या पुढ्यात नांगी टाकल्याने समाजाची फसगत होत आहे. परिणामी, अशा लाचार आमदार खासदारांकडून ओबीसी बांधवांनी समाज हिताची अपेक्षा ठेवू नये, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार राजकुमार सैनी यांनी व्यक्त केले.
ते मुंबई येथे आयोजित ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात आपले विचार मांडताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्याला आपला राजकीय वाटा आणि हक्क मिळवून घ्यायचे असतील तर दुसऱ्या पक्षाची गुलामगिरी सोडून स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल. न्याय प्रक्रियेतील आमचा वाटा हिरावल्या गेल्याने आपल्या समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. आता ओबीसी आयोगाल संवैधानिक दर्जा मिळाला असला तरी  आयोगाचा अध्यक्ष हा ओबीसीच राहणार का आणि असला तरी तो कोणाच्या इशाऱ्यावर नाचणारा तर नसेल, या बाबत साशंकता कायम आहे. केंद्रात फक्त 12 टक्के ओबीसी नोकरीवर आहेत.माजी खासदार हनुमंतराव म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय लोकांना घेऊन कामाला सुरवात केली. मंडल आयोग सुद्धा लागू झाले .पण, त्याचा लाभ  हा मिळालाच नाही. एससीएसटी प्रमाणे ओबीसी संसदीय समिती तयार करण्याचे काम केले.आम्हालाच क्रिमिलेयरची गरज का ? क्रिमिलेयर हटविण्याचे काम का केले जात नाही?  क्रिमिलेयर हटवले तर आयएएस-आयपीएस आमची मुले होतील. “वोट हमारा  तो राज भी हमारा होना चाहिये”असेही ते म्हणाले

राज्यसभा खासदार अली अनवर अंसारी म्हणाले की, ज्या़ची स़ंख्या जेवढी,  तेवढीच त्यांची सहभागिता असली पाहिजे.  आम्ही क्षुद्र आहोत.  हिंदु वा मुसलमान आम्ही सर्व एक समान आहोत. ५२ टक्के लोकसंख्या असून नाममात्र २७ टक्के आरक्षण दिले.  तेही मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मुख्यमंत्री महोदय तरूण आहेत. भेदभाव मिटल्याचे ते सांगतात. मग आमच्या हिस्स्याच्या जागा द्या ना. आमच्या नोकऱ्या आम्हाला द्या. बेरोजगारी हटवा. संविधानात ५० टक्के आरक्षणाचा उल्लेख नसताना तसा जाणीवपूर्व अपप्रचार धूर्तमंडळी करीत आहेत. एकदा जातीनिहाय जनगणना तर करा, कोणाचे किती ते स्पष्ट होईल.

क्रांतिवीर संगोळी रायन्ना

देश भक्त क्रांतिवीर गडरिया सांगोली रायन्ना      


कर्नाटक की वीर भूमी पर,कनक दास संत हुऐ ।
पराक्रमी महान योद्धा ,हक्का बुक्का श्रीमंतहुऐ।
इसी धरा पर सांगोली के,रायन्ना नर-कंत हुऐ ।
कित्तूर राज्य के सरदार की,अजर अमर कहानी है ।
भौतिक वादी लोगों ने ,कम समझी कम जानी है ।
राष्ट्र की खातिर फाँसी झूला ,युग पुरुष सम्मानी है ।
15अगस्त को जन्म तिथि ,26जनवरी बलिदानी है।
रानी चेनम्मा का वह , गाडरी वीर अधिकारी था ।
कुरूवा-धनगर ग्वाला , गायरी पाल बलधारी था।
अंग्रेज़ों का जानी-दुश्मन , जन जन हितकारी था ।
प्राणों से प्यारी आजादी ,राष्ट्र भक्त क्रांतिकारी था ।
घनश्याम क्यों तू भूला है,अल्हड पन नादानी में  ।
गोरों के जुल्मों के कारण,आग लगी थी पानी में।
सात फुट का शूरवीर,लडा था भरी जवानी में।
लिखना क्यों भूल गया,आजादी की कहानी मे।
अंग्रेजोंं को रायन्ना ने,जमकर धूल चटाई थी ।
सन् 1831 में महायोद्धा ,ने वीर गति पाई थी ।
शत् शत् नमन वीर को, भारत भू पर जन्म लिया ।
मातृ भूमि की रक्षा हित,नाम अपना अमर किया ।
उठो जवानों उठो-उठो,क्रांति वीर का सम्मान करो ।
भारत के सजग नागरिक,मिलकर सभी गुणगान करो ।
- घनश्याम होळकर, पत्रकार भरतपूर (राजस्थान), राष्ट्रीय सहारा पत्रिका.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...