Saturday, October 18, 2025

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली 


राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

मुंबई : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. खोटी आश्वासने देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडले. मुंबई मराठी पत्रकार संघात रासपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेवते बोलत होते. यावेळी रासपचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, राज्य सरचिटणीस अजित पाटील, ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.


श्री. शेवते पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यावर सरकारनिर्मित बाजारभावाचे आणि नैसर्गिक अतिवृष्टीचे संकट असे दुहेरी संकट असताना राज्य सरकारने शेतकऱ्याची थट्टा करू नये. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने अकोला, बीड, नांदेड, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, सातारा, जालना, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिवसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. अक्षरशा शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना, राज्य सरकारने तुटपुंजी मदत करून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. उद्योगपतीना हजारो कोटींचे पॅकेज देऊन घसघशीत मदत करता आणि जगाचा पोशिंदा, राष्ट्राचा अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता, हे राष्ट्रीय समाज पक्ष खपवून घेणार नाही. तटपुंजी मदतीच्या नावाखाली दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत ठणकावले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीके मातीमोल झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा पिकाचे भाव कोसळले आहेत. कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नाही. अतिवृष्टीने कोसळलेल्या शेतकऱ्यांना उभे करायचे सोडून, धनदांडग्या भांडवलदारांचे लाड केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला. श्री. शेवते पुढे म्हणाले, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मदत केली पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना मदत केली पाहिजे.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...