Tuesday, May 17, 2022

बुद्ध आणि मी - पैगंबर शेख

 बुद्ध आणि मी - पैगंबर शेख

कुठलाही व्यक्ती यासाठी ज्ञानी म्हणवला जात नाही, कारण तो फक्त बोलत राहतो. परंतु तो जर शांतीपूर्ण, प्रेमपूर्ण, आणि निर्भय आहे, तर तो वास्तवातच ज्ञानी म्हणवला जातो. 



- तथागत गौतम बुद्ध.  


माझ्यावर प्रभाव असलेल्या काहींपैकी गौतम बुद्ध एक विशेष नाव आहे. त्याला तशी कारण आहेत. काही बाबतीत खंत देखील आहे. पण जे त्यांनी केलं ते योग्यच असंही वाटत. 


गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ वर्षे. त्यांची पहिली मूर्ती  इसवी सन ६०० च्या सुरुवातीला बनवण्यात आल्याचे माहीत आहे. पण लेण्यांची निर्मिती त्याहून आधीची असल्याने how is it possible ? हा प्रश्न पडतोच. असो, पण मला बुद्धांच्या मूर्ती आवडतात. मी मूर्तिपूजक नसलो तरीही मी त्या कलेचा मनापासून आदर करतो. 

बुद्ध धर्मात मुख्यतः तीन पंत आहेत. प्रत्येक धर्मात जसे मूळ व्यक्ती हयात नसताना गट पडतात तसेच बुद्ध धर्मात देखील पडले. हीनयान, महायान आणि वज्रयान हे तीन पंत आहेत. त्यापैकी महाराष्ट्र्रात आपण पाहत असलेल्या लेणी या हीनयान आणि महायान पंताच्या आहेत. याला ओळखणे अगदी सोपे आहे. स्तूपाच्या बाहेर जर बुद्धांची मूर्ती असली तर ती हीनयान लेणी असते आणि फक्त स्तूप असेल तर ती महायान लेणी. या दोन्ही लेणी वेगवेगळ्या कालखंडात बनवल्या गेल्या आहेत. 

मी मूळ व्यक्ती सोडून इतरत्र शक्यतो हालत नाही. परंतु मला बुद्ध कळाले ते बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. 'गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म' वाचल्यावर मला अष्टांग मार्ग समजला. सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, सम्यक् समाधी याचा परिचय त्यातूनच मला झाला. सोबतच पंचशील मार्ग देखील यातूनच मला समजला. खरेतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धर्माला भारतात पुनरुज्जीवित केले. हे अगदी निरपेक्ष भावनेने लिहावे वाटते. 


बौद्ध धर्म आणि त्याच्या लेणींची केलेली नासधूस पाहता. बुद्धांनी त्याकाळी शस्त्र का हाती घेतले नाही ? हा प्रश्न अनेकदा पडतो. कारण बुद्धांच्या नंतर मनुवाद्यांनी आपली वर्णवादी संस्कृती टिकवण्यासाठी जी काही हिंसा केली त्या हिंसेला जगात तोड नाही. याबाबत अधिक वाचायचे असल्यास प्रबोधनकार ठाकरेंचे 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' हे पुस्तक अवश्य वाचावे. पण बुद्धांनी हिंसा केली नाही तेही बरेच झाले असेही वाटते. कारण धर्माच्या नावाने सर्वच धर्मीयांत न्याय कमी आणि अत्याचारच जास्त बोकाळत असल्याचे सध्या तरी दिसतो. आणि या अत्याचाराचा शेवट हिंसेवर जाऊन होतो हे त्याहून अधिक वाईट.

काही वर्षांपूर्वी तालिबानींनी बुद्धांची मूर्ती तोडल्याची आणि ती नष्ट केल्याची बातमीही पाहण्यात आली होती. मुळात मूर्तिपूजक नसावे, याचा अर्थ मूर्ती भंजक असावे असा होत नाही. मूर्तिपूजक का नसावं ? त्यामागच कारण समजून घेणं महत्वाचं आहे. ते समजलं तरी पुरे. तालिबान्यांना बुद्ध समजले असते तर त्यांनी तस केलं नसत. पण दुर्दैव, त्यांना फक्त मूर्ती दिसली. बुद्धांचा विचार दिसला नाही. 

बुद्ध 'अत्त दीप भव' म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा म्हणतात. मला हा विचार जास्त महत्वाचा वाटतो. सोबत अष्टांग मार्ग आचरणात आणणेही महत्वाचे. 

बुद्धांवर माझं कायम विशेष प्रेम राहिलं आहे. २५०० वर्षांपूर्वी मी देव नाही, मी देवदूत नाही, मी प्रेषित नाही. मी फक्त मानव आहे हे सांगून आपल्या विचारांच्या प्रसाराने जगावर प्रभाव पडणारे सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणजे गौतम बुद्ध. 


मी ध्यानधारणा बुद्धांकडून शिकलो. तसेच एक मोठा विचार जास्त महत्वाचा आहे. कुठलीही गोष्ट निश्चित नाही. गोष्टींमध्ये सतत बदल होत असतो. जीवनात कधीही कुठेही थांबलो आहे असे वाटेल, त्यावेळी या विचारावर नक्कीच चिंतन मनन करावे. कधी शांत रहावे. तर कधी होणाऱ्या बदलाचा भाग व्हावे. 

मी बुद्धांकडून एवढंच शिकलोय. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. भवतु सब्ब मंगलम्...

- आयु. पैगंबर शेख

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...