बाबासाहेब कोकरे यांची कविता रसिकांच्या अंतःचक्षूंपुढे ग्रामीण जीवनाचं अवघं भावविश्व मूर्तिमंत साकार करते : प्रदीप गांधलीकर
महाराष्ट्राचे ' चार्ली चॅप्लिन ' असा चित्रपट समीक्षक आणि रसिकांनी एक मुखी गौरव केला ते स्वर्गीय दादा कोंडके आणि अवघ्या महाराष्ट्राच्या काना- मनात ज्यांची चित्रपट गीतं सुमारे पंचेचाळीस ते पन्नास वर्षे रुंजी घालताहेत ते शब्दांचे ' जगदीश्वर ' अर्थात स्वर्गीय जगदीश खेबुडकर! या दोन महान कलावंतांनी चित्रपट क्षेत्रातील अफाट कर्तृत्वाने मराठी माणसांच्या आणि विशेषतः ग्रामीण भागातील रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं आहे. सलग आठ ते दहा रौप्य महोत्सवी चित्रपट देणाऱ्या दादांनी आपल्या बहुतांश चित्रपटांमधून, विनोदी आणि कारुण्य यांचा अपूर्व संगम करून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ चित्रण केलं आहे; तर नाना उपाख्य जगदीश खेबुडकर यांनी भोळ्या-भाबड्या, रांगड्या, परंतु खेड्यातल्या अस्सल मराठी मातीतल्या माणसाच्या मनातला सूर आपल्या गीतांमधून अचूक पकडला आहे. ज्यांच्या सप्तरंगी कवितांनी मन धुंद करणारा गावाकडच्या मातीचा गंध येतो त्या कवी बाबासाहेब कोकरे यांनी आपला ' इंद्रधनु ' या दोन प्रभृतींना अर्पण करून खूप मोठं औचित्य साधलं आहे. हिरवं शिवार, पाऊस-वारं, दूध सांडलय असं भासणारी कपाशीची शेतं. धुळीनं अन दगड गोट्यांनी भरलेली बैलगाडीची वाट, घुंगराच्या तालावर पळणारी बैलं, हंबरनाऱ्या गाई, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, पाखरं, शेंबडी पोरं, चूल आणि फुकारी सांभाळणारी आजी, जळणाचा भारा डोक्यावरून वाहात लेकरांच्या ओढीनं खोपटाकडे जाणाऱ्या बाया, जगाने छळलेल्या अश्राप जिवांना चिरशांती देणारी विहीर, कधी दुष्काळानं होरपळून निघणारा; तर कधी पावसात अंतर्बाह्य भिजणारा शेतकरी-कष्टकरी या सर्व प्रतिमांमधून चित्रदर्शी आलेली बाबासाहेब कोकरे यांची कविता रसिकांच्या अंतःचक्षूंपुढे ग्रामीण जीवनाचं अवघं भावविश्व मूर्तिमंत साकार करते.
पुष्पमालांची सुंदर सप्तरंगी पखरण असलेला ' इंद्रधनु ' म्हणजे अतूट प्रीतीचा अद्भुत आविष्कार आहे, असं कवी म्हणतो, तेव्हा या संग्रहातील कविता निसर्गाचा दृक प्रत्यय देणाऱ्या आहेत याची ग्वाहीच कोणतीही कृत्रिमता नसलेल्या या निसर्गाच्या मुक्त अदाकारीच्या अनुभूतीसाठी डोंगर- दर्या, जंगलं,शिवारं, खेडी आणि त्यांचा अभिन्न अंग असलेला गावाकडचा अकृत्रिम माणूस याला पर्याय नाही. या ग्रामजीवनाचं सप्तरंगी ' इंद्रधनु ' आविष्कृत करताना कविमनात ' कल्पनांचं काहूर ' दाटून येतं. माणसाच्या आयुष्याचं ' पिकलं पान ' पिवळं झाल्यावर गळून पडायच्या अवस्थेत येतं, त्या वेळच्या कातर भावना कवी व्यक्त करतो. जशी हिरव्या शिवाराकडे जाणारी ' वाट ' ही दगड-धोंड्यांनी भरलेली असते तशी आयुष्याची वाटही खडबडीत असते हे कवितेच्या रूपकातून मांडलं आहे. ही वाट असह्य होऊन एखादी माऊली आपल्या दोन कच्च्या बच्च्यांना घेऊन विहिरीचा तळ गाठते ही हृदयद्रावक सत्य घटना कवी ' बघतोय परमेश्वरं ' मध्ये सांगतो. पारंपरिक लोकगीताचा बाज असलेली ' धुळदेव गावात ' ही कविता किंवा देवभोळ्या धनगरांची ' बघ जरा ' ही धुळोबाला केलेली आळवणी भाविकांच्या श्रद्धेचं दर्शन घडवते. नांगरलेल्या रानात उघडी पडलेली ढेकळं, मळ्याचा गळा आवळणारा ' दुष्काळ ' अन् त्यावर वाहणारं ' मृगजळ ' शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाऊसधारा बरसवतो. गाव- शिवार सोडायला भाग पाडणारा हा दुष्काळ, चतकोर भाकरीच्या शोधात झगमगत्या शहराची हवा खायला कष्टकर्याला भाग पाडतो. चिल्यापिल्यांचं बिर्हाड पोसताना ' पूर्णविराम ' न घेता मरेस्तोवर कष्ट उपसायचे एवढचं भागधेय त्या कुटुंबवत्सल माणसाच्या भाळी लिहीलेलं असतं. शेवटी माणसाची आशा अमर असते. आज ना उद्या सोनं पिकेल या आशेने तो जीवनगाडा ओढत असतो. त्या चिरंतन आशेतून उद्याचा छत्रपती शिवराय घडवण्यासाठी ' आईची माया ' लेकरापायी आपली काया झिजवत असते. ग्रामीण जीवनातल्या या हाल-अपेष्टांचं चित्रण करीत असताना कवी शेतकऱ्याचा मानबिंदू असलेली ' खिल्लारी जोडी ', परंपरा जपणारी ' नागपंचमी ', ' महात्मा फुले ' यांच्या 'महान कार्याप्रती कृतज्ञता' आणि अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजलीपर कृतज्ञता व्यक्त करणारी कविता लिहितात. तसेच ' हल्ली वेळचं मिळत नाही ' असं म्हणणाऱ्यांच्या आयुष्याचे बारा वाजतात किंवा कॉलेजमधली चटक चांदणी प्रेमाची याचना करताच ' बाय-बाय ' म्हणते, अशी मार्मिक निरीक्षणं कवितेतून तो नोंदवतो. ' निसर्ग गुपित ' जाणून घेत असतानाच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या काव्यशैलीची आठवण करून देत ' प्रेम करा सगळ्यावर ' असा संदेश कवी देतो. ' सांबर ', ' डहाळी ' या अतिशय सुरेख अशा अल्पाक्षरी कविता या संग्रहात आहेत. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत जगायची उर्मी देत कवितेनं तारलं, असं आत्मनिवेदन कवी करतो, तेव्हा त्याची कवितेच्या ठायी असलेली अढळ निष्ठा प्रकट होते.
आज एकविसाव्या शतकात देखील महाराष्ट्राची खरी ओळख ग्रामीण भागातूनच होते. त्याच प्रमाणे मराठी कवितेच्या विस्तृत पटावर गावाकडच्या कवितांचा खूप मोठा वाटा आहे. त्या कवितांचा साक्षेपी अभ्यास कवी बाबासाहेब कोकरे यांनी करावा, अशी विनंती मी त्यांना करतो. अधिकाधिक कवितांच्या वाचन, मनन, चिंतनातून त्यांच्या स्वतःच्या कवितेचा ' बंदा रुपया ' भावी काळात रसिकांच्या मनात प्रेमाचं स्थान नक्की मिळवेल! त्यासाठी त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद! - प्रदीप गांधलीकर
No comments:
Post a Comment