Sunday, February 28, 2021

बाबासाहेब कोकरे यांची कविता रसिकांच्या अंतःचक्षूंपुढे ग्रामीण जीवनाचं अवघं भावविश्व साकारते : प्रदीप गांधलीकर

बाबासाहेब कोकरे यांची कविता रसिकांच्या अंतःचक्षूंपुढे  ग्रामीण जीवनाचं अवघं भावविश्व मूर्तिमंत साकार करते  : प्रदीप गांधलीकर



महाराष्ट्राचे ' चार्ली चॅप्लिन ' असा चित्रपट समीक्षक आणि रसिकांनी एक मुखी गौरव केला ते स्वर्गीय दादा कोंडके आणि अवघ्या महाराष्ट्राच्या काना- मनात ज्यांची चित्रपट गीतं सुमारे पंचेचाळीस ते पन्नास वर्षे रुंजी घालताहेत ते शब्दांचे ' जगदीश्वर ' अर्थात स्वर्गीय जगदीश खेबुडकर! या दोन महान कलावंतांनी चित्रपट क्षेत्रातील अफाट कर्तृत्वाने मराठी माणसांच्या आणि विशेषतः  ग्रामीण भागातील रसिकांच्या मनात अढळ स्थान  प्राप्त केलं आहे. सलग आठ ते दहा रौप्य महोत्सवी चित्रपट देणाऱ्या दादांनी आपल्या बहुतांश चित्रपटांमधून, विनोदी आणि कारुण्य यांचा अपूर्व संगम करून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ चित्रण केलं आहे; तर नाना उपाख्य जगदीश खेबुडकर यांनी भोळ्या-भाबड्या, रांगड्या, परंतु खेड्यातल्या अस्सल मराठी मातीतल्या माणसाच्या मनातला सूर  आपल्या गीतांमधून अचूक पकडला आहे. ज्यांच्या सप्तरंगी कवितांनी मन धुंद करणारा गावाकडच्या मातीचा गंध येतो त्या कवी  बाबासाहेब कोकरे यांनी आपला ' इंद्रधनु ' या दोन प्रभृतींना अर्पण  करून खूप मोठं औचित्य साधलं आहे. हिरवं शिवार, पाऊस-वारं, दूध सांडलय असं भासणारी कपाशीची शेतं. धुळीनं अन दगड गोट्यांनी भरलेली बैलगाडीची वाट, घुंगराच्या तालावर पळणारी बैलं, हंबरनाऱ्या गाई, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, पाखरं, शेंबडी पोरं, चूल आणि फुकारी सांभाळणारी आजी, जळणाचा भारा डोक्यावरून वाहात लेकरांच्या ओढीनं खोपटाकडे जाणाऱ्या बाया, जगाने छळलेल्या अश्राप जिवांना चिरशांती देणारी विहीर, कधी दुष्काळानं होरपळून निघणारा; तर कधी पावसात अंतर्बाह्य भिजणारा शेतकरी-कष्टकरी या सर्व प्रतिमांमधून चित्रदर्शी आलेली बाबासाहेब कोकरे यांची कविता रसिकांच्या अंतःचक्षूंपुढे ग्रामीण जीवनाचं अवघं भावविश्व मूर्तिमंत साकार करते.      


                             

 पुष्पमालांची सुंदर सप्तरंगी पखरण असलेला ' इंद्रधनु ' म्हणजे अतूट प्रीतीचा अद्भुत आविष्कार आहे, असं कवी म्हणतो, तेव्हा या संग्रहातील कविता निसर्गाचा दृक प्रत्यय देणाऱ्या आहेत याची ग्वाहीच कोणतीही कृत्रिमता नसलेल्या या निसर्गाच्या मुक्त अदाकारीच्या अनुभूतीसाठी डोंगर- दर्‍या, जंगलं,शिवारं, खेडी आणि त्यांचा अभिन्न अंग असलेला गावाकडचा अकृत्रिम माणूस याला पर्याय नाही. या ग्रामजीवनाचं सप्तरंगी ' इंद्रधनु ' आविष्कृत करताना कविमनात ' कल्पनांचं काहूर ' दाटून येतं. माणसाच्या आयुष्याचं ' पिकलं पान ' पिवळं झाल्यावर  गळून पडायच्या अवस्थेत येतं, त्या वेळच्या कातर भावना कवी व्यक्त करतो. जशी हिरव्या शिवाराकडे जाणारी ' वाट ' ही दगड-धोंड्यांनी भरलेली असते  तशी आयुष्याची वाटही खडबडीत असते हे कवितेच्या रूपकातून मांडलं आहे. ही वाट असह्य होऊन एखादी माऊली आपल्या दोन कच्च्या बच्च्यांना घेऊन विहिरीचा तळ गाठते ही हृदयद्रावक सत्य घटना कवी ' बघतोय परमेश्वरं ' मध्ये सांगतो. पारंपरिक लोकगीताचा बाज असलेली ' धुळदेव गावात ' ही कविता किंवा देवभोळ्या धनगरांची ' बघ जरा ' ही  धुळोबाला केलेली आळवणी भाविकांच्या श्रद्धेचं दर्शन घडवते. नांगरलेल्या रानात उघडी पडलेली ढेकळं, मळ्याचा गळा आवळणारा ' दुष्काळ ' अन् त्यावर वाहणारं ' मृगजळ ' शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाऊसधारा बरसवतो. गाव- शिवार सोडायला भाग पाडणारा हा दुष्काळ, चतकोर भाकरीच्या शोधात झगमगत्या शहराची हवा खायला  कष्टकर्‍याला भाग पाडतो. चिल्यापिल्यांचं बिर्‍हाड पोसताना ' पूर्णविराम ' न घेता मरेस्तोवर कष्ट उपसायचे एवढचं  भागधेय त्या कुटुंबवत्सल माणसाच्या भाळी लिहीलेलं असतं. शेवटी माणसाची आशा अमर असते. आज ना उद्या सोनं पिकेल या आशेने तो जीवनगाडा ओढत असतो. त्या चिरंतन आशेतून उद्याचा छत्रपती शिवराय घडवण्यासाठी ' आईची माया ' लेकरापायी आपली काया झिजवत असते. ग्रामीण जीवनातल्या या हाल-अपेष्टांचं चित्रण करीत असताना कवी शेतकऱ्याचा मानबिंदू असलेली ' खिल्लारी जोडी ', परंपरा जपणारी ' नागपंचमी ',  ' महात्मा फुले ' यांच्या 'महान  कार्याप्रती कृतज्ञता' आणि अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजलीपर कृतज्ञता व्यक्त करणारी कविता लिहितात. तसेच ' हल्ली वेळचं मिळत नाही ' असं म्हणणाऱ्यांच्या  आयुष्याचे बारा वाजतात किंवा कॉलेजमधली चटक चांदणी प्रेमाची याचना करताच ' बाय-बाय ' म्हणते, अशी मार्मिक निरीक्षणं कवितेतून तो नोंदवतो.  ' निसर्ग गुपित ' जाणून घेत असतानाच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या काव्यशैलीची आठवण करून देत ' प्रेम करा सगळ्यावर ' असा संदेश कवी देतो.  ' सांबर ', ' डहाळी ' या अतिशय सुरेख अशा अल्पाक्षरी कविता या संग्रहात आहेत. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत जगायची उर्मी देत कवितेनं तारलं, असं आत्मनिवेदन कवी करतो, तेव्हा त्याची कवितेच्या ठायी असलेली अढळ निष्ठा प्रकट होते.                                       


        

 आज एकविसाव्या शतकात देखील महाराष्ट्राची खरी ओळख ग्रामीण भागातूनच होते. त्याच प्रमाणे मराठी कवितेच्या विस्तृत पटावर गावाकडच्या कवितांचा खूप मोठा वाटा आहे. त्या कवितांचा साक्षेपी अभ्यास कवी बाबासाहेब कोकरे यांनी करावा, अशी विनंती मी त्यांना करतो. अधिकाधिक कवितांच्या वाचन, मनन, चिंतनातून त्यांच्या स्वतःच्या कवितेचा ' बंदा रुपया ' भावी काळात रसिकांच्या मनात प्रेमाचं स्थान नक्की मिळवेल! त्यासाठी त्यांच्या पुढील   साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद!                                                - प्रदीप गांधलीकर

Friday, February 26, 2021

उदयोन्मुख खेळाडू बाळू पुकळेची आर्थिक परिस्थितीशी कसरत; दानशूर मंडळींच्या पाठबळाची गरज

उदयोन्मुख खेळाडू 'बाळू पुकळे'ची आर्थिक परिस्थितीशी कसरत; दानशूर मंडळींच्या पाठबळाची गरज



मुंबई / आबासो पुकळे

नुकत्याच चंदिगढ(हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत ८ किलोमीटरचे अंतर २६ मिनिटं ४० सेकंदांत पार करून वैयक्तिक सहावा क्रमांक मिळवत, महाराष्ट्र संघाला पहिला क्रमांक मिळवून देणाऱ्या, उदयोन्मुख खेळाडू बाळू पुकळेची मैदानावर तसेच मैदानाबाहेर आर्थिक परिस्थितीची कसरत सुरु आहे. राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत हरियाणा व राजस्थान संघाचे तगडे आव्हान असताना बाळू पुकळे व सुशांत जेधे यांच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवता आले.



कराडला शाळेय शिक्षणाबरोबर बाळूने क्रीडा शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. दोन वर्ष कराडला सराव केल्यानंतर बाळू पुकळे गत तीन वर्षापासून मांढरदेव गडावर राहून कसून सराव करतोय. गेल्या वर्षी कोरोना महामारीची परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक स्पर्धा झाल्या नाहीत, अन्यथा बाळू पुकळेची कामगिरी चांगली झाली असती. बाळूने तीन वर्षात चार राष्ट्रीय स्पर्धा तसेच राज्य स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत. बाळू पुकळे हा दीर्घ पल्ल्याचा खेळाडू आहे. 



बाळू पुकळे हा मूळचा माण तालुक्यातील पुकळेवाडी गावचा. अल्पभूधारक असलेल्या बाळूच्या वडिलांनी कराडला कृष्णाकाठी स्थलांतर केले. कराडमध्ये वाखानाच्या शिवारात बाळूच्या वडिलांची झोपडी आहे. बाळूच्या आई वडिलांचा विटभट्टीवर मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता, परंतु अचानक एकेदिवशी विटभट्टीवर काम करत असताना विटांनी भरलेला ट्रकचा फळका निसटून विटांचा  ढीग बाळूच्या वडिलांच्या अंगावर  पडला, त्यात त्यांच्या आतड्यास इजा पोहचून जायबंदी व्हावे लागले.  मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते बचावले. पुढे त्यांना खटकांनी घेतलेली बकरी रोजंदारीवर राखण्याचे काम करण्याची वेळ आली. मोलमजुरी करून आईवडिलांनी बाळूला पोसले व शिकवले.  बाळूला कराडच्या सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी मदत केल्याचे बाळूचे आईवडील सांगतात. २५ वर्षाहून अधिक काळ कराडला झोपडीत राहणारे बाळूचे आईवडील प्रथमच लॉकडाऊनमध्ये दुष्काळी माणमध्ये मूळगावी आले आहेत; परंतु मूळगावी राहायला घरही नसल्याने तिथेही त्यांची परवड सुरूच आहे. 



बाळूची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. सध्या मांढरदेव अथलेटिक्स फौंडेशनच्या मदतीने श्री. राजगुरू कोचळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू प्रशिक्षण घेतोय. येणाऱ्या सर्वच स्पर्धेत अव्वल दर्जाचा खेळाडू बनण्याचा मानस बाळू पुकळे यांनी व्यक्त केलाय. बाळूची स्वतःचा पोषण आहार व प्रवासासाठी लागणारा खर्च करण्याची ऐपत नाही, समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन बाळूला आर्थिक पाठबळ दिल्यास त्याचा खेळ बहरण्यास मदत होणार आहे.



Friday, February 19, 2021

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई



सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी   प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

      रस्त्यावंर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन  गृहराज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.

 नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी. सध्या 100 नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देवून शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस विभागाने पेट्रोलींगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना गृह (ग्रामीण)  राज्यमंत्री श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.

Wednesday, February 10, 2021

२६ फेब्रुवारी पासून कांरड्या लाडीची यात्रा, २ मार्चला मंगळवारी बोन्याचा कार्यक्रम

अवंदा कारंड्या मायबाईची यात्रा भरणार; २० फेब्रुवारी  २०२१ रोजी यात्रा रद्द केल्याचे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

(आबासो पुकळे/ मुंबई ) : श्री. मायाक्कादेवी यात्रा २०२१ दरवर्षीप्रमाणे पार पडणार आहे. सन २०२० मायक्का देवी यात्रा थाठामाठात पार पडल्यानंतर , कोरोना महामारी रोगाचा पदुर्भाव वाढल्याने देशभरात प्रमुख यात्रांवर बंदी घालण्यात आली होती. गतवर्षी एकमेव चिंचली मायाक्कादेवी यात्रा पार पडली होती. माघ पौर्णिमेला होणारी चिंचली ता- रायबाग जि- बेळगाव(कर्नाटक) येथील श्री. मायक्कादेवीची यात्रा नेहमीप्रमाणे यावर्षी होणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संख्येने यात्रेला जातात. म्हाकूबाईची यात्रा म्हणून  भक्ताकडून सांगितले जाते. शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पासून ०७ मार्च २०२१ वार- रविवार पर्यंत यात्रा भरणार आहे. २ मार्च वार- मंगळवार रोजी बोन्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.  उगार- कुडची येथे कृष्णा नदीत काचोळी पूजन व स्नान केल्यानंतर भाविक भक्त चिंचली मायाक्कादेवीच्या दर्शनाला जातात.  दुधनळी नदीला(हल्याळ नदी) स्नान करून महानैवद्य तयार केला जातो. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातुन बैलगाडीने तर मुंबईसह, वसई, ठाणे जिल्ह्यातून भक्त  ट्रॅव्हल्स, रेल्वेने येतात तर काही भक्त खासगी वाहनाने यात्रेला येतात. 

"मायाक्कादेवीची यात्रा भरणार असल्याबाबतची खात्री करून घेण्यासाठी चिंचणी ता- रायबाग जि- बेळगाव येथे स्वतः जाऊन आलो आहे.  पुजाऱ्याची गाठ(भेट) घेऊन आलो आहे; अजून मी रस्त्यातच आहे. २ तारखेला बोन होणार आहे. यात्रा होणार आहे म्हणून सगळीकडे पोस्टर, टीव्हीलाही आलय. मंदिराचे दोन्ही दरवाजे उघडले आहेत. अजून  घरी पोचलु नाय, भंडारा लेऊन आलो आहे, यात्रा होणार आहे म्हणून सांगा, ज्याची इच्छा होईल ते येईल" - म्हाकू पांडुरंग पुकळे, मायाक्कादेवी भक्त.(१७/०२/२०२१).

Mayakka Devi Yatra is annually organized at Chinchali in the month of Magh. It is the important festival of the famous Mayakka Devi Temple at Chinchali in Karnataka. Mayakka Devi Yatra 2021 date is March 2.

Mayakka Devi is a manifestation of Mother Goddess Shakti. She is worshipped mainly in Northern Karnataka and South Maharashtra.



The fair and festival includes numerous rituals the most important being chariot pulling.

Mayakka Devi Yatra is observed on Magh Krishna Paksha Chaturthi Tithi or the fourth day during the waning phase of moon in Magh month as per traditional Hindu lunar calendar followed in Maharashtra.


चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...