Tuesday, June 30, 2020

उत्तम जानकर- गोपीचंद पडळकर दोघेही 'महाठग', त्यांच्यावर सुपरहिट सिनेमा होईल!

उत्तम जानकर- गोपीचंद पडळकर दोघेही 'महाठग', त्यांच्यावर सुपरहिट सिनेमा होईल !

धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांचे टीकास्त्र
चार दिवसांपुर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यावरून राज्यभरात निषेध सुरू असताना माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी पडळकरांचा निषेध केला, तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पडळकरांना धनगर आरक्षण लढ्यातून बेदखल करण्यात आले. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भाने विक्रम ढोणे यांनी आपली भुमिका मांडली आहे.
@Abaso Pukale जत (जि. सांगली) : ''उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी धनगर आरक्षण आंदोलनाची वाट लावली. हे दोघेही 
'महाठग' असून त्यांनी धनगर चळवळीचे मोठे नुकसान केले आहे', अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

चार दिवसांपुर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यावरून राज्यभरात निषेध सुरू असताना माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी पडळकरांचा निषेध केला, तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पडळकरांना धनगर आरक्षण लढ्यातून बेदखल करण्यात आले. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भाने विक्रम ढोणे यांनी आपली भुमिका मांडली आहे.

ढोणे यांनी म्हटले आहे की, धनगरांच्या एसटी आरक्षणाची मागणी फार जुनी आहे, मात्र गेल्या सात आठ वर्षांत भाजपने धनगर मतांवर डोळा ठेवून फक्त मतांचे राजकारण चालवले आहे. भाजपप्रणित धनगर नेते समाजात सोडून आपल्या सोयीचे घडवून आणायचे, हा डाव सातत्याने खेळला जात आहे. 2012 ला विकास महात्मे यांना याचपद्धतीने भाजपने सोडले होते. एसटी आरक्षणासाठी फार पुरावे असल्याचे ते सांगत होते, मात्र ते म्हणत होते त्याप्रमाणे काहीही घडलेले नाही. ते खासदार झाले, पण समाजाचा प्रश्न 1 टक्केही सुटला नाही. सर्वच प्रस्थापित पक्ष आरक्षणाच्या नावाखाली व्होटबँक पॉलिटिक्स करत आहेत. त्यामुळे समाजाच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे. 

ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत उत्तम जानकर- गोपीचंद पडळकरांनी चालवलेले 'अखेरचा लढा' हे आरक्षण आंदोलन बोगस असल्याचे आम्ही त्यावेळी सांगितले होते. समाजाला आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी नव्हे तर त्या दोघांना आमदारकीचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ते आंदोलन असल्याची जाणीव आम्ही करून दिली होती. ते काही दिवसांत खरे ठरले. 80 दिवसांत सर्टिफिकेट मिळवून देतो म्हणणाऱ्या पडळकर आणि उत्तम जानकरांनी 80 दिवसाला पक्ष बदलले. एकाने आमदारकीचे सर्टिफिकेट मिळवले, दुसऱ्याचे थोडक्यात हुकले, पण ते नव्याने मिळतेय का यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.

उत्तम जानकर आणि पडळकर यांनी सहा महिने आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली सभा घेतल्या. राज्यातील प्रमुख पक्षांना आम्ही धनगर नेते आहोत असे भासविले. त्यातून सर्व प्रमुख नेतेमंडळींकडे जावून खासदारकी, आमदारकीचे तिकीटे, विधान परिषद मिळवण्यासाठी तडजोडी केल्या. हे आता लपून राहिलेले नाही. ते आंदोलन उत्तम जानकर- पडळकर या दोघांचेच होते. त्यांच्या सभांच्या स्टेजवर या दोघांव्यतिरिक्त इतरांना बसायला बंदी होती. भांडवली गुंतवणुकीतून हेलिकॉप्टरने दौरे करून त्यांनी समाजाला भुलवले. स्वत:चा स्वार्थ साधला की तो विषय सोडून दिला. आता नवीन स्वार्थ साधायचा उद्योग उत्तम जानकर आणि पडळकर यांनी सुरू केला आहे. एकजन भाजप तर दुसरा राष्ट्रवादीकडून आरक्षणप्रश्न सोडविण्याच्या बाता मारत आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एफिडिव्हेटविषयी खोटी माहिती दोघांनी समाजाला दिली आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असे एफिडिव्हेट दिल्याचे उत्तम जानकर- पडळकर यांनी सांगितले आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. धनगर समाजाला हेच लोक वेडे बनवत आहेत. मात्र त्यांच्या समाजसेवेचे ढोंग पार दिवस चालणार नाही, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

उत्तम जानकर- पडळकर हे हेलिकॉप्टरने दौरे करून आरक्षण मागत होते, जनतेला बिरोबाची शपथ घालून राजकीय नेत्यांसोबत तडजोडी करत होते. हे कथित आंदोलन सुरू असताना उत्तम जानकर- पडळकर यांच्या भुमिका असलेल्या धुमस चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. अगदी लोकसभेच्या तोंडावर त्यांनी हा चित्रपट रिलीज केला. धनगर तरूणांच्या भावनेला हात घालून त्यांनी हिरो बनण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्षात हे दोघेही खलनायक आहेत. हे दोघे समाजासाठी काम करत नाहीत, ते पक्षासाठी त्यांच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. ते कुठल्याही पक्षात असलेतरी ते स्वत:चा स्वार्थ साधतात. त्यांनी केलेल्या फसवणुकीवर सुपरहिट सिनेमा तयार होईल, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

भारत-चीन दरम्यानचं वादग्रस्त ‘गलवान’ काय आहे?

'भारत-चीन' दरम्यानचं वादग्रस्त ‘गलवान’ काय आहे? 
वाचा १३० वर्षांपूर्वीची गूढ कथा!

@Abaso Pukale'भारत-चीन'दरम्यानचं वादग्रस्त ‘गलवान’ काय आहे? वाचा १३० वर्षांपूर्वीची गूढ कथा!
गेल्या काही दिवसांपासून गलवान खोरं हे नाव सातत्याने कानांवर पडत आहे. याच ठिकाणी भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये चकमक झाली. २० भारतीय जवान शहीद झाले. त्यासोबतच अनेक चीनी सैनिकही मारले गेले. त्यांचा निश्चित आकडा अजूनही अंदाजितच आहे. या मुद्द्यावरून सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीनमधील वातावरण कमालीचं तापलं आहे. भारत आता अक्साई चीनवर सर्जिकल स्ट्राईकही करू शकतो, असं देखील म्हटलं जाऊ लागलं आहे. पण नक्की हे गलवान आहे तरी काय? याचं असं नाव कसं पडलं? याची एक मोठी रंजक कहाणी आहे. दीडशे वर्षांपूर्वीची!

गलवान ही एक दरी आहे. याच दरीतून एक नदी देखील वाहते आणि तिचं नाव देखील गलवान असंच आहे. तब्बल १४०० फूट खोल असणाऱ्या या दरीचं तापमान अनेकदा उणे २० अंशांच्याही खाली जातं. १९६२ साली भारत – चीनमध्ये झालेल्या युद्धाला देखील याच गलवान दरीतून सुरूवात झाली होती. त्यामुळे जिथे साधं गवताचं पातं देखील उगत नाही, असा हा गलवान भाग दोन्ही देशांसाठी प्रचंड संवेदनशील झाला. पण या भागाचं नाव गलवान का पडलं याची एक गूढ कथा आहे!

…आणि गलवान खोऱ्याचा शोध लागला!

या भागाचं नाव गुलाम रसूल गलवान या व्यक्तीच्या नावावरून पडलं. आता ही व्यक्ती कोण होती, याचं मोठं गूढ आहे. काही लोकं गलवान हा दरोडेखोर होता असं म्हणतात, तर काही लोकं गलवान मेंढपाळ असल्याचं म्हणतात. या गुलाम रसूल गलवानचं घर अजूनही लडाखच्या डोंगरात आहे. त्याचं झालं असं, की १८९९ साली भारतातल्या विविध भूभागांपर्यंत जाऊन तिथल्या परिसराची माहिती काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्थानिकांचे काही गट स्थापन केले होते. त्यात लडाखच्या भागात जाण्यासाठीच्या गटाचं नेतृत्व गुलाम रसूल गलवान याच्याकडे होतं. लडाखच्या डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशात फिरताना पहिल्यांदा या दरीचा आणि तिच्या बाजूने वाहणाऱ्या नदीचा शोध गुलाम रसूलच्या गटानं लावला. त्यामुळे या भागाला गलवान हे नाव देण्यात आलं. काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात गलवानपोरा नावाचं एक गाव देखील आहे.

१९२५मध्ये गलवानच्या जन्मदात्याचा मृत्यू
अनेक इंग्रज आणि अमेरिकी पर्यटकांना हा गुलाम रसूल गलवानला गाईड म्हणून हा भाग फिरवायचा. पुढे या गलवानला ब्रिटिश जॉइंट कमिशनरचा लडाखमधला मुख्य सहायक म्हणून नियुक्त करण्यात आलं. १८९०मध्ये ब्रिटिश अधिकारी लॉर्ड डुनमोरे या गलवानला आपल्यासोबत पामिरला घेऊन गेला. तिथे २५ वर्ष काढल्यानंतर १९१४मध्ये अशाच एका शोधकर्त्या गटाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलं. रीमो ग्लेशियर्सचा शोध देखील याच गटाने लावला आहे. १९२५मध्ये गुलाम रसूल गलवानचा मृत्यू झाला.

गलवानचे पूर्वज दरोडेखोर?
गुलाम रसूल गलवानने सर्व्हंट्स ऑफ साहिब नावाचं एक पुस्तक देखील लिहिलं आहे. या पुस्तकात त्याने आपल्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. गुलाम रसूलचे पूर्वज लडाखमध्ये खूप आधीपासून श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गरीबांना वाटत असल्याचं आख्यायिका सांगतात. एकदा काश्मीरच्या राजानं त्यांना भेटायला बोलावलं आणि दगा करून मारून टाकलं, असं देखील बोललं जातं. त्यामुळे गलवान हे मूळचे दरोडेखोर होते अशीही एक आख्यायिका आहे.

पण आजपासून १३० वर्षांपूर्वी गुलाम रसूल गलवान नक्की कोण होता किंवा काय करत होता? याचं निश्चित उत्तर जरी अद्याप मिळू शकलेलं नसलं, तरी त्याच्या नावावरून नाव पडलेल्या गलवान खोरं आणि गलवान नदीचा परिसर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा आणि चिंतेचाही विषय ठरला आहे हे नक्की!

Monday, June 29, 2020

अनलॉक काळात शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्रात बाधित वाढत आहेत ; जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा - गृहमंत्री

अनलॉक काळात शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्रात बाधित वाढत आहेत ; जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा
       - गृहमंत्री अनिल देशमुख 
@Abaso Pukale सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केला.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक आज गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी  राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय हे आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावली तालुक्यातील संसर्ग झालेल्या रुग्णांच्या  मृत्युचे प्रमाण जास्त आहे, तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.  
बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे यामुळे बाधितांची संख्या कमी होईल. जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्युचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बाधितांमध्ये 61 टक्के पुरुष व 39 टक्के महिला आहेत. आजपर्यंत 1 हजार 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात 21 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण  आहे. जिल्ह्यात 308  प्रतिबंधित क्षेत्र आहेत या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी. तसेच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षावरील 12 हजार कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. 50 ते 55 वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी संकुलासाठी  निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
आषाढीवारी साठी जाणाऱ्या 9 पालख्या ह्या 30 जूनला पंढरपुरात पोहचतील. 2 जुलै रोजी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भेटीचा  कार्यक्रम होईल. 18 ते 20 वारकरी हे पादुका घेऊन जातील, याचेही नियोजन झाले आहे, असेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी शेवटी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, उपस्थित आमदार यांनीही वेगवेगळ्या सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Saturday, June 27, 2020

धनगर समाजा विषयी फेसबूकवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तिघांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल

  • धनगर समाजा विषयी फेसबूकवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तिघांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल
@Abaso Pukale  भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या विषयी टीका करताना 'फेसबुक'वर धनगर समाजाच्या नावाने अपशब्द वापरलेल्या प्रदीप खोब्रागडे, दीपक जाधव व सोपान धुमाळ या फेसबुक धारकांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव अभिजीत अरविंद देवकाते यांनी फिर्याद दिली होती.
      पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जून २०२० रोजी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना त्यांच्याविषयी व जातीविषयी अपशब्द जातीविषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी अभिजीत देवकाते यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याकडे फिर्याद दिली. देवकाते यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे मित्र अँड. अमोल सातकर यांनी त्यांना फेसबुकवर तीन जणांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात माहिती दिली. त्यानंतर देवकाते यांनी संबंधित फेसबुक वरील पोस्ट पाहिल्या आणि पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यावरून बारामती शहर पोलीस ठाण्यात वरील तिघाजणांविरोधात सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. बंडगर करीत आहेत.

Saturday, June 20, 2020

कणखर माणदेशी माता : गुणाबाई जगन्नाथ जानकर

गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचा अल्प परिचय

सातारच्या कोडोली- धनगरवाडी येथील शेंडगे घराणेतील गुणाबाई यांच्या जन्म. गुणाबाई यांचा पळसावडे ता- माण येथील मेंढपाळ जगन्नाथ जानकर यांच्याशी विवाह. गुणाबाई यांचे वडील  नाना मारुती शेंडगे हे सुध्दा सातारा कोडोली-धनगरवाडी येथील प्रसिद्ध मेंढपाळ होते. गुणाबाई यांना माहेरी मेंढपाळ व्यवसायातील अनुभव असल्याने सासरीदेखील आपल्या पतीबरोबर माणदेश ते वाईदेशपर्यंत मेंढपाळ व्यवसाय केला. समृद्ध अशा कृष्णाकाठी आई वडीलांच्यासोबत मेंढ्या राखणार्‍या गुणाबाई यांनी पती जगन्नाथ जानकर यांच्यासोबत कणखरपणे दुष्काळी माणदेशात मेंढ्या राखत आपल्या मुलांना उत्तम संस्कार दिले व घडविले.  गुणाबाई जानकर यांनी दुष्काळी माणदेशात जो त्याग, संघर्ष, अपमान पचवला आहे, तो अजोड आहे. 




गुणाबाई जानकर या निरक्षर आहेत, परंतु या मातेने पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक मेंढर राखत निसर्गाची भाषा शिकत जे कार्य केले आहे त्याची गणती केली तर मोजमापही अपुरे पडेल. घोड्याच्या पाठीवर संसार लादून मेंढ्याच्या कळपासोबत रानोमाळ भटकंती करणारे जानकर दांपत्य. भटकंती करणार्‍या कुटुंबांचा मुक्काम हा निश्चित नसतो. आज हिथं तर उद्या तिथं. अशा भटकणार्‍या कुटंबात स्थिर राहून मुलांना उत्तम शालेय शिक्षण देणे किती जिकरीच असत हे फक्त ते कुटुंबंच जाणू शकतं. कितीतरी डोंगर दरी, कड्याकपारी, रानोमाळात भटकणारे स्व. जगन्नाथ जानकर व गुणाबाई जानकर या दांपत्याने ज्या हालअपेष्टा सहन करुन मुलांना चांगले शिक्षण दिले. मुले शिकल्यानंतर जानकर दांपत्याला चांगले दिवस येतील असे वाटले, परंतु या दांपत्यांचा खडतर प्रवास संपला नाही. उच्चशिक्षित मुलांना नोकरी करुन ऐषआरामात जगण्याची आस न  बाळगताता समाजसेवेसाठी मुलांना परवानगी देणारे व स्वत: कष्टकरत जीवन जगणार्‍या जानकर दांपत्याने आजच्या घडिला भारतीय समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.






दादा जानकर,  सतिष जानकर, रत्नाबाई वीरकर, महादेव जानकर ही त्यांची मुले  आहेत. सतिश जानकर यांना वकिलीचे शिक्षण दिले तर महादेव जानकर यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. या दोन बंधूनी अखंड अविवाहित राहण्याचे ठरवून यशवंत सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जोरदार रान उठवले.  २० वर्षाच्या संघर्षानंतर महादेव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी लाल दिव्याच्या गाडीत न बसता जमिनीवर बसणारी माता म्हणजे गुणाई जानकर.  "चांगल काम कर नाहीतर मारीन", अशी आपल्या पुत्रास आज्ञा देणारी कणखर माणदेशी माता गुणाई जानकर.
✍ आबासो पुकळे, दि. २४ ऑगस्ट २०१९.

Thursday, June 11, 2020

माणदेशी धनगरी घोड़दळ : भीमथडी तट्ट

माणदेशी धनगरी घोड़दळ : भीमथडी तट्ट

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ....!

वरील गीताचे बोल ऐतिहासिक भीमथडी घोड्यांची टाप दिल्लीपर्यंत जाते. वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी या नद्या स्वराज्याच्या रक्षणकर्त्या  होत्या व महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्या आहेत. महाराष्ट्रीयनांनी  दिल्ली जिंकून भीमथडी घोड्यांना यमुना नदीचे पाणी पाजले आहे.  महाराष्ट्रीयनांना स्फुर्ती देणारे गीत आहे.  


पण हे भीमथडी तट्ट काय आहे?

भीमकाय ताकदीचे घोड़े हेच भीमथडीचे तट्ट आहेत.  भीमा नदीचे खोऱ्यातील घोडे अर्थात भीमथडीचे तट्ट आहे. काहींनी असा दावा केला की, भीमथडीचे तट्ट नामशेष झाले आहे. परंतु हे 'भीमथडीचे तट्ट' जतन करण्याचे काम धनगर मेंढपाळानी केले आहे. आजही भीमथडी तट्ट धनगर मेंढपाळाकडे आहे.  प्रत्येक मेंढपाळ बांधव या भीमथडी तट्टाना व शेळ्या मेंढ्यांना सोबत घेऊन कोणत्याही मुलखात 'भीमचाल चालतात.  भीमथडी लष्करी घोडे जतन करून धनगरांनी शिवरायांच्या इतिहासाला जागविले आहे. 
छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्तेनंतर महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब बादशहाची धुळदान उडवणाऱ्या सेनापती संताजी घोरपडे यांचा 'लष्करी तळ' हा माणदेशात असायचा. जखमी सैन्यावर वनऔषधांपचार केला जायचा. याच माणदेशात स्वराज्य रक्षणासाठी संताजी घोरपडे यांना येथील धनगरी घोडदळाची मोठी ताकद मिळाली होती. "सेनापती संताजी घोरपडे यांनी माणदेशी धनगरी घोड़दळाच्या बळावर दिल्लीपर्यंत मजल मारली होती", असे म्हसवड येथील इतिहासकार बाळासाहेब माने यांनी मत मांडले आहे. त्यांनी संताजी सोबत १० हजार धनगरी घोडदळ होते अशी नोंद केली आहे.  तर नुकतेच प्रकाशझोतात आलेले "सरंजामी  मरहट्टे" या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखक संतोष पिंगळे यांनी धनगर घोड़दळा चा उल्लेख केला आहे.  'मराठी साम्राज्याची छोटी बखर' यात माणदेशी धनगर सैन्याची माहिती दिली आहे. धनगर समाजाचे पराक्रमी सरदार नेमाजीराजे शिंदे यांनी भीमथडी तट्टाच्या टापा उत्तरेत घुमवत सर्वप्रथम नर्मदा नदी पार करून भीमपराक्रम केला होता. अफजल खानाच्या 'प्रतापगड स्वारी' वेळी छत्रपति शिवरायांचे सख्खे मेव्हणे बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने पकड़ले होते, शिवाय  सुंता करुन ठार करण्याची धमकी दिली होती. परंतु त्यावेळी ६० हजार होन दंड भरून माणदेशातील धनगर समाजाचे मातब्बर सरदार नाईकजीराजे पांढरे यांनी जामीन राहून बजाजी निंबाळकरांची सुटका केली होती. 

धनगरी घोडदळ हे इतिहासात प्रसिद्ध होते. परंतु काळाच्या ओघात भीमथडी तट्ट मोठ्या संख्येने नष्ट होत असताना, धनगर मेंढपाळानी हिंमतीने लष्करी भीमथडी तट्ट सांभाळले आहे. हेही नसे थोडके. 

(चित्रफीत- श्री क्षेत्र सिध्दनाथ गड, पुकळेवाडी ता- माण दि. ८ जून २०२०)
- आबासो पुकळे, सदस्य- मरहट्टी संशोधन व विकास मंडळ.

Saturday, June 6, 2020

छत्रपति शिवाजीराजे राज्याभिषेक दिन


हिंदुस्थानात दुसऱ्याच्या राज्यात सरदारक्या घेणारे अनेक मांडलिक सरदार झाले, परंतु 'स्व'बळावर  'स्व'त:चे 'समतामूलक समाज' निर्मित 'रयते'चे 'स्व'राज्य निर्माण करणारे एकमेव छत्रपति शिवाजीराजे झाले.

छत्रपति शिवाजीराजे राज्याभिषेक दिनाच्या तमाम शिवरायप्रेमींना लाख लाख शुभेच्छ्या.
#जय #मरहट्टी
- आबासो पुकळे
सदस्य, मरहट्टी संशोधन मंडळ.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...