*आपले कुटुंब आपली जबाबदारी*
------------------------------
✍️परशुराम नागरगोजे
जामखेड
भ्रमणध्वनी:
9823091147
----------------------------- औद्योगिकीकरण,शिक्षण, सोशल मीडिया, व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टींमध्ये आपण खूप प्रगतशील झालेले दिसत आहोत.फास्ट फूडच्या जमान्यात आपणही फास्ट झालेले आहोत. स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी माणूस रात्रंदिवस धावपळ करत आहे. नको त्या वस्तू खरेदी करून सुखमय जीवनाची वाट लावून घेत आहे.या अघोरी स्पर्धेचा आपण केव्हा हिस्सा बनून जातो; हे समजत नाही.त्यामुळे आपले शारीरिक, मानसिक व कौटुंबिक नुकसान झाले आहे.
पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत अनेक व्यक्ती छोट्या घरामध्ये सुखाने नांदत असायच्या. एकमेकांचे विचार घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टी केल्या जात नसायच्या.घरामध्ये संवाद साधला जायचा. मोठ्या व्यक्तींचा आदर व लहान मुलांवर जीव लावला जायचा.पुरेसा पैसा नव्हता पण माणुसकी होती. कपडे फाटकी असायची पण मने परस्परांशी जोडलेली असायची. वयस्कर मंडळी घरामध्ये असल्याने त्या काळी घराला कुलूप कधी लागलेले दिसत नसायचे. आत्या, मामा ,काका, मावशी यांची नेहमी वर्दळ असायची. शेजारच्या घरामध्ये काही शिजलं तर ते आपोआप आपल्या घरी यायचं व आपल्या घरी काही शिजलं तर ते शेजारच्या घरी जायचं. माणसं माणसाजवळ जायची. एकमेकांची सुखदुःख दुःख जाणून घ्यायची. त्यामुळे अंत:करणातील सुखदुःख एकमेकाला समजायची.
सुखदुःखात एकमेकाला आधार द्यायची.
त्यामुळे ही छोटी घरे गोकुळासारखी भासायची.
आज हे चित्र पुर्णपणे बदलेले आहे.आर्थिक परिस्थिती सुधारली परंतु त्याचा परिणाम असा झाला की घरातील माणसांची मानसिकता बदलली. घर आहे परंतु घरामध्ये माणुसकीचा अभाव आहे. संवाद नाही, संवेदना नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ नाही.घरात जेमतेम चार व्यक्ती असतात आणि त्या घरातील चार खोल्यात स्वतःला कोंडून घेतात,संवाद नाही,आदर नाही, पाहुणे मंडळी नाही, शेजाऱ्यांचे तोंड सुद्धा दिसत नाही. टी.व्ही आणि मोबाईल मधली दुनियाच आता प्रत्येकाला आपलीशी वाटू लागली आहे. त्याच मन:स्थितीत माणूस जगू लागला आहे.
बाहेरून दिसणारा सुखी माणूस, आज मात्र पूर्णपणे अस्वस्थ झालेला दिसत आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण?......तर आपणच..
मुलं , आई वडिलांचे प्रतिबिंब असतात.मुलं जन्माला येतात, ती कोऱ्या पाटी सारखी. त्या पाटीवर आपण काय लिहायचे ? ते आपणच ठरवायचे. मुलांचे संगोपन करणे;ही खरंतर खूप मोठी जबाबदारी आहे .परंतु तिच्याकडे अधिक गांभीर्याने कोणी पाहत नाही. मुलांशी संवाद साधायला वेळ नाही. स्वतःचे करियर आणि मुलांच्या भवितव्याच्या काळजीने, पालक आपल्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मुलं लहान असतात ; त्यावेळी आई-वडिलांना सतत प्रश्न विचारून त्यांचे डोके उठवतात .त्यावेळी आई-वडील त्याची बडबड ऐकून त्याला गप्प बसवतात. परंतु त्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्या मुलांना हवे असते. घरात त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. म्हणून त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ती मलं घराबाहेर पडतात. मग त्यांची उत्तर देणारा चांगल्या प्रवृत्तीचा आहे, की वाईट प्रवृत्तीचा आहे. याच्याशी त्या मुलाला काहीही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त त्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. मुलं मोठं होतात. आता आई-वडील प्रश्न विचारत असतात व तो मुलगा किंवा मुलगी गप्प असते. कारण त्याला हव्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी बाहेर मित्र शोधलेले असतात.
घरामध्ये मुलं आईला, हे खाद्यपदार्थ, ते खाद्यपदार्थ कर असं म्हणत असतात. परंतु आई कंटाळा करते. आणि त्याला फास्ट फूडच्या गाड्यावर पाठवून देते.मग तो, कधी मित्रांबरोबर, कधी कुटुंबासोबत नाष्टा किंवा जेवायला बाहेर जाऊ लागतो. घरचं अन्न त्याला गोड लागत नाही. मग पालकच काही दिवसांनी म्हणतात , त्याला घरातलं अन्न गोड लागत नाही. खरंतर मुलांसाठी योग्य वेळी,पैसा आणि वेळ खर्च केला तर येणाऱ्या काळामध्ये मुलांसाठी पैसाही खर्च करण्याची वेळ येणार नाही. त्यांच्यासाठी वेळही आपल्याला द्यायची गरज भासणार नाही. कारण त्यांच्यावर त्या पद्धतीचे संस्कार झालेले असतात.
छोट्या छोट्या मुलांच्या पाठीवर शाळेचे खूप मोठे ओझे आहेच. त्याचबरोबर स्केटिंग, स्विमिंग, कोचिंग, सिंगिंग, डान्सिंग, याचे सुद्धा ओझे त्यावर लादले जाते.
खेळण्या बागडण्याच्या वयात स्पर्धेतील घोड्यांसारखी या मुलांची अवस्था झालेली दिसते. लहान वयात या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झालेला असतो. तरीही मुलाच्या मनाचा कुणीही विचार करत नाही. खरंच जगण्यासाठी एवढी धावपळ गरजेचे आहे का ? या सर्व धावपळीत ते मुलं मनाने आणि शरिराने पुर्णपणे कोलमडून जाते. त्याला मोठमोठी पॅकेजेस् कशी मिळवायची;याचे शिक्षण अगदी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच द्यायला सुरू केले जाते. घरात त्याच पद्धतीच्या चर्चा केल्या जातात .शाळेत सुद्धा सतत त्याच चर्चा. परंतु आनंदी जीवन जगण्यासाठी, चर्चा किंवा शिक्षण मात्र त्याला कोणीही देत नाही.
प्रत्येक मुलांत काही सुप्त गुण दडलेले असतात.ते सुप्त गुण ओळखून त्या गुणांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आवडीनुसार कोणतेही काम केले तर ते काम आपल्याला ओझे वाटत नाही. घरामध्ये एखाद्या दिवशी जर चांगली भाजी केली तर आपण निश्चितच नेहमीपेक्षा थोडीतरी भाकरी जास्त खाऊ. जास्तीची भाकरी खाल्ल्यामुळे पचनक्रियेवर ताण पडणार आहे. तरीही आपण थोडीफार तरी भाकरी जास्त खातोच.तसेच आपण आपल्या आवडीचे काम केलं तर त्या कामाचा आपल्याला त्रास होत नाही.
मुलं वयाने मोठी होत असताना आपल्या गावाचा, संस्कृतीचा, देशाचा , कपड्यांचा, खाणपानाचा, स्वच्छतेचा, स्वाभिमानाचा, प्रामाणिकपणाचा अभिमान बाळगण्याचे संस्कार मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.सर्वात मोठी संपत्ती शारीरिक तंदुरुस्ती आणि आनंद. तो कमवायला हवा. स्वतःसाठी भरपूर वेळ द्यायला शिकवायला हवे. आपले आदर्श कोण असायला हवेत? हे सुद्धा बारकाईने पाहायला हवे. छंद आणि संगत जपून करायला हवी.ही शिकवण घरोघरी रूजायला हवी.
गरजांचे प्रमाण इतके वाढले आहे की त्या भागवताना आर्थिक नियोजन कधी कोलमडते हे समजत सुद्धा नाही. चंगळवाद फोफावत आहे.घरचे अन्न गोड लागत नाही. हॉटेलमध्ये जेवणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. या सर्व बाबींमुळे लहान मुलांपासून वयस्कर माणसांच्या तोंडातून 'टेन्शन', हा शब्द ऐकायला मिळत आहे. त्यामुळे घरोघरी 'ब्लडप्रेशर' आणि 'शुगर' सारखे आजार जडलेले दिसत आहेत.या सर्वांवर, मात करण्यासाठी रामबाण औषध म्हणजे फक्त 'संवाद'.
परिस्थिती घडविणे किंवा बिघडवणे हे आपल्याच हातात असते.आपण सतत जे बोलतो,ऐकतो, पहातो, तसे आपण घडतो. परिस्थितीनुसार बदल आवश्यक आहे परंतु तो सद्विचाराने घडलेला असावा. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रलोभने दिले जात आहेत. अनेक जण त्यांना बळी पडताना दिसत आहेत. आपण कपडे विकत घेताना जोपर्यंत ती आपल्याला कपडे आवडत नाहीत;तोपर्यंत नवनवीन व्हरायटीचे कपडे पहातच राहतो. जेंव्हा ती कपडे आपल्याला मनापासून आवडतात; तेव्हा खरेदी करतो. कपडे घेताना आपण किती बारकाईने पाहतो.मग अशा प्रलोभनांना आपण लगेच कसे बळी पडतो. त्यामुळे भावनिक होऊन घेतलेले निर्णय नेहमीच त्रासदायक ठरत असतात. कोणताही निर्णय घेताना भावनिक न होता भानावर राहून निर्णय घ्यायला हवा.
आज प्रत्येक जण सर्व काही पैशाने खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. संवेदना,प्रेम, माणूसकी, आई-वडिलांचे संगोपन,तुटलेली नाती, अबोला,खचलेली मने, अशांतता, तणाव, स्वास्थ्य या सर्व गोष्टी पैशाने कशा खरेदी करायच्या ? अनावश्यक गोष्टींची खरेदी, इतरांशी स्पर्धा या सर्व गोष्टींना आपण जर वेळेत आवर घातली, तर मात्र, वरील गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
एकमेकांचा घरामध्ये सहवास व संवाद अवश्यक आहे. प्रत्येकाने, प्रत्येकाला आदर आणि सन्मान द्यायला हवा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत उभी असणारी आई किंवा पत्नी तिचे खरबुडीत हात घेऊन तिने केलेल्या कष्टाचे कौतुक करावं. आपल्या माणसांनी केलेल्या कौतुकामुळे त्या माऊलीला बारा हत्तीच बळ येतं.घरातील खर्च भागविण्यासाठी उठल्यापासून पळणारा बाप.त्याच्याजवळ जाऊन बसावं. हळूच पाहून गालात हसावं . त्या बापाला दिवसभर केलेल्या कष्टाचं चीज झालेल्याचे समाधान लागतं. लेकरांना तरी आई-वडिलांकडून काय अपेक्षा असते ? थोडसं बोलावं ,थोडसं हसावं, मायेनं जवळ घ्यावं, पाठीवरून हात फिरवावा. हेच तर आहे सुखी जीवनाचं रहस्य.
माणसाला ईश्वराने सर्वात मोठी देणगी दिली असेल तर ती आहे कुटुंब.या कुटुंबाला सावरण्याची, पुढे घेऊन जाण्याची, एकमेकाला आधार देण्याची जबाबदारी कुटुंबातील प्रत्येकाची आहे.ती यशस्वीरित्या प्रत्येकाने जर पार पाडली ;तर आपल्या कुटुंबाला कुणाचीही नजर लागणार नाही..
*******************
No comments:
Post a Comment