स्वयंसेवक : तात्यासाहेब राजाराम पुकळे
©७५ अमृत महोत्सव
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भक्ती, भाव, आणि सेवा या तीन गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रयत सेवक तात्यासाहेब राजाराम पुकळे यांनी केलेली, राष्ट्र - समाज भक्ती, भाव आणि सेवा हे अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्याकडून अनेक विद्यार्थी, पालक, गावकरी, नातेवाईक, शिक्षक यांना फार मोठी ज्ञानाची शिदोरी मिळालेली आहे, सहकार्य लाभले आहे. त्यांचे कार्य हे अत्यंत तळमळीने असायचे. पुकळे सर यांनी आपल्या वयाची पंचाहत्तरी पुर्ण केलेली आहे. त्यांच्या कुटूंबीयाकडून २ मार्च रोजी बचेरी ता- माळशिरस जिल्हा - सोलापूर येथे अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा अत्यंत महत्वाचा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, त्याबद्दल क्षमस्व. आज माझ्याकडून व माझे आई, वडील यांच्यातर्फे श्री. पुकळे टी. आर. सर यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्यदायी, सुख, समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे उर्वरित आयुष्य जावो, हीच ईश्वचरणी प्राथर्ना करून सदीच्छ्या व्यक्त करतो.
थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सहा दशकांहून अधिक काळ सेवा बजावणारे समाजसेवक नव्हे तर 'स्वयंसेवक' श्री. तात्यासाहेब राजाराम पुकळे यांनी निस्वार्थ भाव ठेवून समाजाप्रती, राष्ट्रप्रति आपले कार्य सातत्याने कार्यरत ठेवलेले आहे. गावातील कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्य असो, त्यात त्यांनी तन, मन, धन देऊन आपली सेवा बजावली आहे. तीर्थरूप 'कर्मवीर आण्णा' यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रयत परिवारात रयतसेवक म्हणून सामजिक कार्याचा वसा आणि इंग्रजी विषयासाठी खास शैक्षणीक कार्याचा ठसा उमटला आहे.
गावात मास्तर म्हणून ओळख ते समाजाशी नाळ कायम ठेवणारा स्वयंसेवक
नागरीकरणापासून मागे राहिलेल्या धनगर समाजाचे बहुसंख्य वस्तीस्थान असणाऱ्या माणदेशी खेड्यातला जन्म. मेंढपाळ, पशुपालक, कृषी संस्कृतीचा जीवनावर प्रभाव दिसून येतो. गोरगरीब घरातील मुलांची आस्तेने विचारपूस करून त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करणे. गावातील मंदिर उभारणीचे काम; विशेषतः सिद्धनाथ मंदिराचे शिखराचे कामावर बारकाईने लक्ष देवून पूर्णत्वास नेईपर्यंत घेतलेला ध्यास, त्यासाठी दिलेला अमूल्य वेळ, शिक्षकी पेशा संभाळत असताना सुट्टीच्या काळात घरी आल्यानंतर आराम न करता थेट सकासकाळी हातात झाडू घेऊन मंदीर परिसर स्वच्छ करणे, सामाजिक अडीअडचणी सोडविण्यासाठी स्वतःला सतत गुंतवून ठेवणे, कुटुंबासाठी वेळ कमी आणि समाजासाठी जास्त वेळ देणे, गावगाड्यातील तंटा सोडवण्यासाठी समन्वय साधणे, पारंपरिक पद्धतीने चालत आलेला धार्मिक सांस्कृतिक वारसा जपणे, ढोल कैताळ वादनाचा इतिहास परंपरा अभ्यास सांगणे, समाज प्रबोधनात्मक व्याख्याने, मार्गदर्शन करणे, गजी नृत्याची कला जोपासणे, शिवणकला, शेती कामासाठी उपयोगी येणाऱ्या कळकीच्या वस्तू तयार करणे, सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीच्या कामात गुंतवून घेणे, गावातील लग्न कार्यात मंगलाष्टके म्हणून नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देणे, सण, यात्रा उत्सवात संचलन करणे, दहावित शिकणाऱ्या गावातील मुलांना शून्य रुपयाची फी घेऊन इंग्रजी, गणित विषयाचे ज्ञानदान करणे. याहून जास्त प्रकारचे कार्य श्री. तात्यासाहेब राजाराम पुकळे सर यांनी गावगाड्यात राहून पूर्ण केलेले आहे. साधी राहणीमान, मनमोकळा स्वभाव, शिक्षकाप्रमाणे शिस्तप्रिय असणाऱ्या गुरुवर्य श्री. पुकळे टी. आर. सर यांना अमृत महोत्सवी वर्षात पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा...!.
|आबासो सुखदेव पुकळे, मुंबई
२/३/२०२४
No comments:
Post a Comment