सत्वाची माऊली : गुणाई जानकर
सत्व, तत्व जागणारी 'सत्वा'ची माऊली गुणाई जगन्नाथ जानकर या थोर मातेचे ३१ मार्च २०२१ रोजी वृद्धापकाळाने पळसावडे ता- माण येथे राहत्या घरी निधन झाले. शोक संदेश देणारी बातमी वायू वेगाने महाराष्ट्रभर पसरली. रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतः तमिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यापर्यंत दुःखद वार्ता पोहचताच वाहन बदलत, विमान बदलत, पुणेमार्गे आईच्या अंत्यसंस्कारासाठी पळसावडे या मूळगावी दाखल झाले. रासप परिवार/ यशवंत नायक परिवाराकडून शोक व्यक्त करण्यात आला. रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव प्रसन्नकुमार, कुमार सुशील यांच्यासहीत हजारो नेते/ कार्यकर्ते गुणाई जानकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पळसावडेच्या दिशेने मार्गस्थ झाले.
पळसावडे गाव सातारा जिल्हाहद्दीत येते. पुढे सांगली आणि सोलापूर जिल्हा हद्द लागते. मुख्य गावापासून २ कि. मी अंतरावर जानकर यांची वस्ती लागते. तिथेच गुणाई जानकर या राहत तर कधी लेकीकडे विरकरवाडी येथे राहत. गुणाई जानकर यांना तीन मुले १)श्री. दादा जानकर, २) महादेव जानकर, ३) सतीश जानकर व एक मुलगी रत्नाबाई वीरकर. महादेव जानकर यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले तर सतीश जानकर यांना वकिलीचे शिक्षण दिले. पुढे या दोन उच्चशिक्षित बंधूनी आजन्म अविवाहित राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावोगावी जाऊन बहुसंख्याक बहुजन समाजात जनजागरण केले. विशेषतः धनगर, माळी, रामोशी समाजात यशवंत सेनेची संघटनात्मक ताकद वाढवली. पुढे महादेव जानकर यांनी चोंडी येथे 'राष्ट्रीय समाज पक्ष' स्थापन केला. रासपची राजकीय शक्ती तयार करून देश व राज्याच्या राजकारणात बेदखल समाजाला दखलपात्र समाज बनवले.
२० वर्षाच्या संघर्षानंतर महादेव जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाचा शपथविधीसाठी गुणाई जानकर यादेखील उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी गुणाई जानकर यांनी समाज माध्यमात प्रतिक्रिया दिली. 'मी मुलास जन्म दिला. लोकांनी मोठे केले. मी आई आहे. माणूस बोलत नाही, आत्मा बोलतुया. तसेच मंत्रीपुत्रास 'चांगले काम कर,नाहीतर मारिन' अशी बेधडकपने मार्मिक प्रतिक्रिया दिली. गुणाई जानकर यांच्या स्मृतीस भावांजली वाहण्यासाठी दि. ८ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी भेट दिली. यशवंत नायक तर्फे शोक व्यक्त करत महादेव जानकर, श्री. दादा जानकर, सतीश जानकर, रत्नबाई वीरकर, नातू स्वरूप जानकर यांची सांत्वनपर भेट घेतली.
आईचे सत्व जपणारे जानकर दांपत्य
कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समान्यापासून ते उच्चपदस्थापर्यंत लाखो लोक घरी भेट देत होते. यावेळी लोकप्रति जानकर कुटूंबियांकडून मायेचा ओलावा दिसून आला. येणाऱ्यांची आपुलकीने चौकशी करून मुखात चार घास घालण्याची पद्धत मनाला खूप भावत होती. दादा जानकर, एड. सतीश जानकर, महादेव जानकर यांच्यापासून ते स्वरूप जानकर यांच्यापर्यंत साधेपणा प्रकर्षाने जाणवत होता. रत्नाबाई वीरकर यादेखील म्हणाल्या,फक्त आमची आई नव्हती सगळ्यांची आई होती. फलटणच्या सभेवेळी जानकर साहेब आईस भेटण्यास आले. असो गुणाई जानकर या सत्याने वागल्या, मुले देखील आईच्या सत्वाला जागले, कोरोना महामारीची साथ असून देखील लाखो लोक जानकर वस्तीला पाय लावून गेले. सत्वाची माउली गुणाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मृतीस यशवंत नायक परिवारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.!
- आबासो पुकळे, मुंबई.