Monday, July 5, 2021

ओबिसी आरक्षणासाठी रासपचा राज्यभर चक्काजाम

ओबिसी आरक्षणासाठी रासपचा राज्यभर चक्काजाम
रासपचा आक्रमक पवित्रा; पोलीस बळाचा वापर करून ठिकठिकाणी आंदोलकांना घेतले ताब्यात



यशवंत नायक ब्यूरो : प्रा. आबासो पुकळे

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने आज दिनांक ४ जुलै २०२१ रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन, जेलभरो आंदोलन केले.  मुंबई मानखुर्द येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महादेव जानकर यांनी यूपीए आणि संपुआ सरकारला खडसावत ओबीसींची जनगणना करण्याविषयी सुनावले तसेच न्याय मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा दिला. नवी मंबई येथे कळंबोली जि- रायगड येथे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर यांच्या उपस्थितीत पुणे - मुंबई जलद दृतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आण्णासो रुपनवर, भगवान ढेबे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  दहिसर नाका येथे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, स्वप्नील ठावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, यावेळी पालघर येथेही आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


सातारा येथे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच श्रीकांत देवकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, परंतु रासप कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन केले.  कोल्हापूर येथे पुणे - बंगळूर महामार्ग अडवून धरणाऱ्या रासप कार्यकर्त्यांना पोलिसी बळाचा वापर करत ताब्यात घेतले. येथे युवा नेते अजितकुमार पाटील, विशाल सरगर यांनी महामार्गावर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सांगली येथे लक्ष्मण सरगर यांच्यासह रासप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणे येथे कात्रज चौकात राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार हमसे डरते है! पोलीस को आगे करते है! अशी घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र होते. यावेळी ओबीसींना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडू, मंत्र्यांना झोडून काढू असा इशारा, दोडतले यांच्याकडून देण्यात आला.


सोलापूरात मडकेवस्ती येथे रासपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. येथे सुनील बंडगर, ज्ञानेश्वर सलगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  आंदोलनस्थळी पोहचण्यास मज्जाव करणाऱ्या कार्यकर्त्यानी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरात ठिय्या दिला. अहमदनगर येथे पुणे महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन छेडण्यात आले, माणिकराव दांगडे यांनी आपली भूमिका मांडली. ओमप्रकाश चितलकर यांच्या नेतृत्वात जालना येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. बीड येथे सोलापूर - धुळे महामार्ग रोखल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. परभणी येथे प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वात बहुसंख्य आंदोलक रस्त्यावर आले.  हिंगोलीत पंढरीनाथ ढाले यांनी आंदोलनात जनावरांना उतरवले होते.  

चेतन आगलावे यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे बसस्थानक चौकात रास्ता रोको करण्यात आला. वाशीम येथे पुसद मार्गावर चक्काजाम करण्यात आला. यावेळी दीपक तिरके यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय समाज पक्ष उस्मानाबाद जिल्ह्याच्यावतीने  सोलापूर -औरंगाबाद हायवे आडवला , पक्षाच्या  पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. लातूर येथे प्रा. विष्णू गोरे, दादासाहेब करपे यांच्या नेतृत्वात महाराणी अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले. बदलापूर जि- ठाणे येथे रुपेश थोरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...