🚨✈️गुजरातने मुंबईच्या जबड्यातून विमानतळ काढून नेलं,
तिथं खान्देशच्या पाण्याचं काय घेऊन बसलात?
महाराष्ट्र गुजराथ पेक्षा मोठा आहे, पण गुजराथी नेते मराठी नेत्यापेक्षा मोठे आहेत. कोणी काहीही बोललं तरी सत्य आहे ते आहेच. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी, अमित शहा हे ज्या ज्या काळात झाले, त्या त्या काळातील मराठी नेते यांची उंची गाठु शकले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर गुजराथने कुरघोडी केली आहे. त्यात प्रत्येक वेळी नुकसान खान्देशच झालं.
मुंबईवर दावा करणाऱ्या गुजराथने मुंबई महाराष्ट्राला सोडली पण त्यासाठी मराठी माणसांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. मुंबईसाठी 105 मराठी माणसे तर हुतात्मे झाले हे सत्य आहे पण अर्ध सत्य आहे. या व्यतिरिक्त अजून एक मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. याची चर्चा कधी कोणी करत नाही. कारण ही किंमत खान्देशी अहिर माणसाला मोजावी लागली आहे. त्यावर मराठी माणसे आणि मराठी मीडिया कायम मूग गिळून बसतो.
एक अण्णाभाऊ साठे यांनी *माझी मैना गावाकडे राहिली।* या लावणीत डांग गुजराथने घशात घातला एवढा एक उल्लेख सोडला तर इतर कोणीही या विषयावर ब्र शब्द बोलत नाही. कोणालाही त्याची खंत वाटत नाही. कारण ते असं समजतात की, जे नुकसान झालं ते खान्देशच आहे आपलं नाही. म्हणून ते फक्त निपाणी, खानापूर आणि बेळगावसाठी लढतात.
*काय गमावल खान्देशने?*
जल आणि वन समृद्ध डांग जिला, उकाई धरणात निझर, उच्छल हे दोन तालुके आणि नर्मदा सरोवरासाठी 37 गावे एवढं मोठं नुकसान खान्देशच झालं. शिवाय मध्यप्रदेश मध्ये अहिराणी भाषिक 87 गाव आणि तावडी बोली भाषेची 100 गाव गेली. त्यात खेतीया, पानसमेल, सेंधवा, नेफानगर आणि बऱ्हाणपूर ही मोठी शहर गेली.
आज हे सर्व सांगण्याच कारण म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबादला हलविण्याचे दिशेने पहिले पाऊल गुजराथ सरकारने दिल्लीच्या मदतीने टाकले आहे. या विरुद्ध मुंबईचे आणि दिल्लीचे मोठं मोठे मंत्री काहीच बोलत नाही.
मुंबई गुजराथला हवी आहे आणि ती नियोजन बद्ध पणे पळविण्याच्या ते एक एक प्रक्रिया पूर्ण करत आहे. मुंबई पळविणार म्हणजे, जमीन आणि इमारती महाराष्ट्रात राहतील पण उद्योग सर्व गुजराथमध्ये जातील. आजची मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे ते मुंबईच स्थान उद्या *अहमदाबाद किंवा डोला* सिटी यांच्याकडे जाऊन त्या देशाच्या आर्थिक राजधान्या असतील. विमानतळ मुंबईत राहिल पण आंतरराष्ट्रीय विमान वहातुक अहमदाबाद येथून सुरू होईल. मुंबईत फक्त डोमॅस्टिक प्रवासी वहातुक आणि 2/3 इकडच्या तिकडच्या देशात विमाने ये जा करतील. आता उशिरा अदानी ग्रुप ने खुलासा केला आहे की, *मुंबई विमानतळाचे कार्यालय अहमदाबादला हलविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.* मग अहमदाबाद विमानतळावर गुजराथी कसला गरबा खेळत होते? अदानी ग्रुप हा अडाणी ग्रुप आहे. म्हणून त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राने सावध राहील पाहिजे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कामगार नेते दत्ता सामंत यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत मुंबईचा कापड उद्योग उध्वस्त झाला. इंदिराबाईंच्या राजवटीत दत्ता सामंत यांनी सुरू केलेला संप आज 40 वर्ष झाली तरी सुरूच आहे. गमतीची गोष्ट म्हणजे इंदिराबाई, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले आणि दत्ता सामंत या तीघांच निधन झाल, मुंबईतील सर्व कापड गिरण्या नष्ट झाल्या गिरणी कामगार भिकेला लागला. त्यातले बरेच कामगार वृद्धापकाळाने वारले सुध्दा तरी संप सुरूच आहे. या सर्व धांदलीत सर्व कापड उद्योग नियोजन बद्ध पद्धतीने अहमदाबादला हलवण्यात आला.
डहाणू येथे पोस्टगार्ड प्रशिक्षण वर्ग विद्यालय मंजूर झाले होते. म्हणजे समुद्रावर गस्ती घालणारी पथक, ते आता अहमदाबाद येथे हलविण्यात आले. आताचं हे विमानतळ कार्यालय गोंधळ, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय सुध्दा मुंबईतून अहमदाबादकडे नेणार असल्याचे बोलले जात आहे. *एका वेगळ्या अर्थाने याचा शेवटी परिणाम हाच होईल की, मुंबई गुजराथ मध्ये जाईल. म्हणजे मुंबईचा सांगाडा महाराष्ट्रात आणि मुंबईचा आत्मा गुजराथला अशी ही दूरगामी योजना आहे.*
महाराष्ट्रात अनेक पक्ष संघटना, सामाजिक संघटना, कामगार संघटना आहेत. त्यांचे नेते हुशार आणि आक्रमक आहेत. ते अशा घटनांवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करतात. कृती करतात. तसे नेते आणि संघटना खान्देश मध्ये नाहीत. त्यामुळे गुजराथ महाराष्ट्र लुटायला जातो तेंव्हा जसे लढे उभारले जातात, तसे लढे गुजराथ खान्देश लूटतो तेंव्हा का उभे रहात नाहीत. कारण खान्देशी लोकांना या लुटुतील नुकसान, अनाचार आणि अन्याय लक्षात येत नाही. यांच्या स्वतःच्या संघटना नाहीत. आणि लढाऊ महाराष्ट्राला खान्देशची काही पडली नाही.
बऱ्याच वेळा असा संशय येतो की, खान्देशला महाराष्ट्राने विक्री काढला की काय! डांग दिला, उकाई, सरदार सरोवरात खान्देश बुडवला. आता ही 2009 ची घटना बघा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते आणि गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. केंद्रीय पाणी लवाद मंडळाने केमच्या डोंगरातील 47% पाणी महाराष्ट्राला दिले होते, तर 17% पाणी गुजराथला दिले होते. मुळातील हा पाणी वाटप करार रद्द करून चव्हाण-मोदी यांच्या 1995 च्या नव्या कारारानुसार 36% पाणी महाराष्ट्राला आणि 28% पाणी गुजराथला असे फेर वाटप करून घेतलं. म्हणजे नारपारच 11% पाणी गुजराथला देऊन टाकलं. *कशा बद्दल हे खान्देशच पाणी गुजराथला दिलं?* यात देण्याघेण्याचा नेमका काय व्यवहार झाला? हा व्यवहार शासकीय पातळीवर झाला की, वैयक्तीक पातळीवर झाला हे शोधून काढाव लागेल. कारण अशोक चव्हाण यांना आदर्श इमारत प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते.
गुजराथचा मुख्यमंत्री भाजपचा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग काँग्रेसचे म्हणजे अशोक चव्हाण यांच्यावर केंद्राचा दबाव येणही अशक्य!
मग 11% पाण्यावर उदक सोडण्याच कारण काय?
काही देवाण घेवाण झालीन नसेल तर मग दुसरे कारण हे असू शकते की, धरण पाट बांधायचे तर त्याला खर्च येतो. मग जिथे धरणाचा लाभ खान्देशला फक्त होत असेल तर मग एवढा मोठा खर्च करण्यापेक्षा पाणी गुजराथला सोडून द्या. असा विचार तर महाराष्ट्राचे नेते करत नसतील?
*म्हणून तर हे पाणी अशोक चव्हाणानी गुजराथला दान तर केलं नसेल? अजून एक मजा नारपारच्या या पाणी वाटपाची चर्चा विधान सभेत होत असताना तिथे एकही खान्देशचा आमदार हजर नव्हता. रात्र झाली म्हणून हे सर्व घरी निघून गेले.*
नर्मदा नदीच 11 tmc पाणी केंद्रीय लवादाने महाराष्ट्राला दिलं होतं. त्यातही 6 tmc पाणी महाराष्ट्राने गुजराथला देऊन टाकलं. खान्देशच्या हक्काच पाणी महाराष्ट्र गुजराथला खिरापत म्हणून का वाटप करत आहे? हे सर्व करताना तुम्ही खान्देशी माणसाला का विचारलं नाही? कोणाला विचारून तुम्ही हे करत आहात?
करू द्या त्यांना काय करायच ते करू द्या. पण आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळवायलाचं हवं. खान्देशवर घोर अन्याय करणारा हा करार रद्द करायला आपण भाग पाडू तरच खान्देश जिवंत राहील. नाही तर खान्देशच वाळवंट झाल्या शिवाय राहणार नाही. यातून वाचायचं असेल तर तापी-गिरणा खोऱ्यात एकसंघ पणे मोठा लढा उभा करावा लागेल. त्यासाठी रस्त्यात उतरावे लागेल. उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने रणभेरी फुंकली आहे? तुम्ही सुध्दा मुठी आवळा, दंड थोपटा आणि आंदोलनात भाग घ्या!
एक व्हा।नेक व्हा।
हर जोर जुल्मकी टक्कर मे,
संघर्ष हमारा नारा हैं।
बापू हटकर
कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.
🌊💦🌊💦🌊💦🌊💦🌊💦🌊💦