Thursday, August 1, 2019

मराठी साहित्य भूषण : आण्णाभाऊ साठे

मराठी साहित्य भूषण : आण्णाभाऊ साठे

गावाच्या कुसापासुन रशियाच्या वेशीपर्यंत आपली कला, छत्रपती शिवरायांचा इतिहास पोहोचविनारे... महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नसुन ती शाहिरांच्या शाहिरींची, शुद्रांच्या कष्टाची, शेतकर्यांच्या घामाची व मावळ्यांच्या तलवारीची माती आहे, असे ठासून मांडनारे, आपलं संपुर्ण आयुष्य कष्टकर्यांच्या व शोषितांच्या हक्कासाठी लढणारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी, दलित, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असा व्यवहारवादी सिध्दांत मांडून तथाकथित विद्वानांना चिंतन करण्यास भाग पाडणारे साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे, आण्णाभाऊंची गाजलेली पुस्तके : माझा रशियाचा प्रवास, गजाआड, वैर, आवडी, वारणेच्या खोर्‍यात, फकीरा, पाझर.. तब्बल ७७ प्रबोधनात्मक पुस्तके. निरक्षर आण्णाभाऊ साठेंनी निर्मिलेले साहित्य पाहिले तर वास्तवात 'मराठी साहित्याला पडलेल विस्मयकारक स्वप्न म्हणजे आण्णाभाऊ साठे ठरावेत.

लोकशाहिर आण्णाभाऊ साठेंनी मुंबईचे वर्णन केले ते असे...

मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।
परळात राहणारे । रातदिवस राबणारे ।
मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।
ग्रॅंट रोड, गोखले रोड । संडास रोड, विन्सेंट रोड ।
असे किती रोड इथं नाही गणती ।।
गल्ली बोळ किती आत । नाक्यांचा नाही अंत ।
अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।२।।
आगीनगाडी मोटारगाडी । विमान घेतं उंच उडी ।
टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती ।।
हातगाडी हमालांची | भारी गडबड खटा-यांची ।
धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती ||३||

जग बदल घालुनी घाव...

जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।।

( धनवंतांनी अखंड पिऴले । धर्माधांनी तसेच छऴले ॥ अशा शब्दांत आण्णाभाऊंनी शेठशाही व धर्मांधशाहीचा बुरखा फाडला होता. आजही २०१९ ला भारतात, महाराष्ट्रात शासन- प्रशासनाद्वारे शेठशाही आणि धर्मांधशाही राज्य करत असून बहुमतमवाल्या मराठापासून ते एसएसी. एसटी पर्यंतच्या समाजाला पिळत आहे, छळत आहे.)

तमाशाला लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय अण्णाभाऊंकडेच जाते. समाजप्रबोधनात्मक लोकनाट्य तमाशामंडळात गवळण  झिडकारून 'मातृभूमिसह' 'शिवरायांना वंदन' करण्याची परंपरा अण्णाभाऊनी रुजवली ती अशी....   

"प्रथम मायभूमीच्या चरणा | 
छत्रपती शिवाजी चरणा | 
स्मरोनी गातो कवणा || "


आण्णाभाऊंच्या साहित्य क्षेत्रातील प्रवेशाने मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलला. बहुसंख्याक कष्टकरी, उपेक्षित, पतीत, हिन-दिन, नाडलेल्या, दुबळ्या समाजाचे जीवन, विविध अंगे लेखणीद्वारे मांडणारे आण्णाभाऊ साठे यांचे जीवन उपेक्षित असेच राहिले आहे. जिवंतपणी उपेक्षित राहिलेले आण्णाभाऊ साठेंचे मरण आणि मरणानंतरही आण्णाभाऊ साठे उपेक्षित रहिल्याचे दिसते. ज्या सांगली जिल्ह्यात आण्णाभाऊंचा जन्म झाला त्या सांगली शहरात आण्णाभाऊंचे स्मारकासाठी जागा उपलब्ध होत नाही, किती मोठी शोकांतिका आहे. आण्णाभाऊ साठे यांचे विचार वाचून जी च'मानसिक-वैचारिक-सामाजिक क्रांती' होत आहे. त्यामुळे जीवंतपणी उपेक्षित ठरलेले आण्णाभाऊ साठे मात्र आता अमर ठरलेले आहेत.  ४९ वय वर्ष जगलेले प्रतिभावंत, मराठी साहित्य भूषण आण्णा (भाऊ) साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची १ ऑगस्ट आजपासून सुरुवात होत आहे.  आण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस जयंतीनिमित्त विनम्र जय मल्हार.

✍आबासो पुकळे, मुंबई. दि. १ ऑगस्ट २०१९.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...