Tuesday, December 9, 2025

राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार

राष्ट्रीय  समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार 


मुंबई : नगरपालिका व नगरपंचायात निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य कोणत्याही पदाधिकारी यांनी अधिकृत कसलीही उमेदवार यादी जाहीर केली नसून, समाज माध्यमात प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून यशवंत नायक मासिकाने संकलन करून राष्ट्रीय समाज पक्षाचे वाचक हितचिंतक यांच्यासाठी प्रसिद्ध करत आहोत याची नोंद घ्यावी. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे क्रमशः १) औसा नगराध्यक्षपदाचे उमेदवार - अमृताताई अविनाश खुरपे, २) परळी वैजनाथ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार - खतीब नाझिया बेगम शमशोद्दीन, ३) करमाळा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार - भावना भद्रेश गांधी, ४) पाथरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार- महादेव गंगाधर गवारे ५) इस्लामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार- सतीश शिवाजी इदाते 


नगरसेवक पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे क्रमशः 

१) सोनपेठ नगरपालिका प्रभाग क्रमांक १ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार - लिंबाजी रंगनाथ कागदे (मामा) २) सोनपेठ नगरपालिका प्रभाग क्रमांक ४ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार - उषा ज्ञानेश्वर कडतन, ३) कुर्डुवाडी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ४ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार - सोमनाथ चंद्रकांत देवकाते, ४) म्हसवड नगरपालिका प्रभाग क्रमांक ९ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार - सुजाता उत्कर्षा सुजित वीरकर ५) म्हसवड नगरपालिका प्रभाग क्रमांक १० अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार - अंजना कोंडीबा वीरकर ६) पाथरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ ब नगरसेवक पदाचे उमेदवार- संदीप सोपान दातरे ७) पाथरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ अ नगरसेवक पदाचे उमेदवार - कृष्णा मधुकर बोरकर ८) पाथरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ ब नगरसेवक पदाचे उमेदवार - काशीबाई ग्यानोबा कांबळे ९) पाथरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ११ ब नगरसेवक पदाचे उमेदवार - हिरा नितीनकुमार वैराळे १०) पांढरकवडा प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार- विजय सखाराम आत्राम ११) परळी वैजनाथ नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार- शेख नदीम मुसा १२) अंबड नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक पदाचे उमेदवार - सचिन लक्ष्मण खरात १३) जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक पदाचे उमेदवार- विक्रम दादासो ढोणे १४) अंबड नगरपरिषद नगरसेवक पदाचे उमेदवार- शेख बद्रुनिस्सा बेगम खुर्शिद अहमद १५) कुळगांव बदलापूर नगरपालिका नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक १३अ सुषमा रुपेश थोरात १६) प्रभाग क्रमांक १३ ब नगरसेवक पदाचे उमेदवार रुपेश बबन थोरात आदी उमेदवार राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे अधिकृतपणे निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांना पितृशोक

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांना पितृशोक



मुंबई :  राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचे वडील श्री. रामराज पाल यांना दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी देवाज्ञा झाली. रासप महासचिव यांना पितृशोक झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायक आहे. श्री. राम राज पाल हे एमटीएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी होते. ओम कल्याणी, आयसी कॉलनी नावगाव, दहिसर पश्चिम मुंबई येथे वास्तव्यास होते. उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील रसुलपुर, पोस्ट मसीदा गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात सुशील कुमार, डॉ. सुरेश पाल, प्रवीण कुमार पाल हे तीन पुत्र असून, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते व मासिक विश्वाचा यशवंत नायक परिवार सर्वजण पाल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. कै. रामराज पाल यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. 

आईशप्पथ भाजपला मत देऊ नका; समाजात फूट पाडण्याचे काम भाजपने केले : महादेव जानकर

आईशप्पथ भाजपला मत देऊ नका; समाजात फूट पाडण्याचे काम भाजपने केले :  महादेव जानकर 

जत मध्ये महाविकास आघाडीस पाठिंबा; प्रभाग ६ मधून रासपचे विक्रम ढोणे मैदानात

जत (२४/११/२०२५) : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकिसाठी प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. जतमध्ये प्रचार सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने हिंदू - मुस्लिम, ओबीसी - मराठा वाद, दलीत - सवर्ण वादनलावून समाजात फूड पाण्याचे काम केले असल्याचा, घणाघात जाहीर प्रचार सभेत बोलताना केला. महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी प्रत्यक्षपणे  महाविकास आघाडीस पाठिंबा दर्शवला. यावेळी सभेस खासदार विशाल पाटील, माजी आमदार  विक्रम सावंत, डिपिआय पार्टीचे अध्यक्ष सुकुमार कांबळे, जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, भाजप सोडून कोणालाही मत द्या, आईची शपथ घेऊन सांगतो, कमळाला मतदान करू नका. माझी चूक झाली होती, ती सुधारावी हे सांगण्यासाठी जत मध्ये आलोय. मी त्यांच्यासोबत होतो, त्यांच्या धोरणाची मला पूर्ण माहिती आहे. जाती- धर्मात विष पेरून समाजात फूट पडण्याचे पाप भाजपने केले. आरक्षणाचे खोटे आश्वासन दाखवले जाते, पण प्रत्यक्षात दिले जात नाही, असा हल्लाबोल केला. आरक्षणासाठी समाजाला रस्त्यावर येण्यास भाग पाडत आहे आणि दुसरीकडे खाजगीकरण करून गोरगरिबांच्या मुलांचे हक्क हिरावून घेत आहे. भाजप हा आरक्षणाविरोधी पक्ष आहे. सरकारी शिक्षणव्यवस्था संपवत आणली आहे. सुजयनाना शिंदे २४ तास शहराच्या विकासासाठी झटणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभाग ६ मध्ये विक्रम ढोणे यांच्यासारखा रात्रंदिवस काम करणारा तरुण कार्यकर्ता आहे. सर्वांना निवडून द्यावे, असे मतदारांना आवाहन करतो.

मध्यप्रदेश मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर

मध्यप्रदेश मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर 


भोपाळ (२९/९/२५) : राष्ट्रीय समाज पक्ष मध्यप्रदेश राज्याची कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर मध्यप्रदेश अध्यक्षपदी अशोककुमार सिंह यांची निवड झाल्याचे रासप राष्ट्रीय कार्यकारणीने काही दिवसांपूर्वी घोषित केले होते. आज राष्ट्रीय समाज पक्ष मध्य प्रदेशतर्फे जिला अध्यक्ष निवडीची पहिली यादी महासचिव एड. रामविशाल पाल, संगठनमंत्री बादाम सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष अशोक कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात जाहीर केली आहे.

जिल्हा व अध्यक्ष क्रमाने पुढीलप्रमाणे : १. शहडोल जिल्हा - चंदू कोल, २. उमरिया जिल्हा - नवल सिंह धुर्वे, ३. कटनी जिल्हा - एड. नागेश पाल, ४. सीधी जिल्हा - एड. अर्जुन पाल, ५.  सिंगरोली जिल्हा - राम बली पाल, ६.डिंडोरी जिल्हा - राधेश्याम धनगर, ७.रीवा जिल्हा - एस एस कुमार, ८. शिवपुरी जिल्हा - मोहबत सिंह, ९.गुना ग्रामीण जिल्हा - टीका राम, १०.रतलाम जिल्हा - संतोष सिंह परिहार, ११. छतरपुर जिल्हा - विजय सिंह यादव, १२.टीकमगढ़ - लक्ष्मी प्रसाद पाल, १३.भिण्ड जिल्हा - सत्यपाल सिंह बघेल, १४.अशोक नगर जिल्हा - शैतान सिंह पाल आदी निवडी जाहीर करण्यात आल्याचे, रासपचे मध्यप्रदेश महासचिव मोहर सिंह केवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

...अन्यथा १ जुलैपासून राज्यात रेल्वे बंद आंदोलन

...अन्यथा १ जुलैपासून राज्यात रेल्वे बंद आंदोलन 

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे शेतकरी एकता जिंदाबाद कार्यक्रमात शेतकरी नेत्यांचा सन्मान

पुणे (६/११/२०२५) : आमच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. आता त्यांना मागे फिरता येणार नाही. शेतकऱ्यांना दिलेले आश्वास पूर्ण न झाल्यास १ जुलैपासून राज्यातील एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा प्रहार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.


शेतकरी, शेतमजूर, कामगार दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन नागपूर येथे हजारो शेतकऱ्यांची एकजूट करून आंदोलन उभारल्याबद्दल, लढवय्या नेत्यांचा सन्मान आणि 'शेतकी एकता जिंदाबाद' बैठक राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुण्यातील गांजवे चौकात श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बच्चू कडू बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल पवार, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वराज संघटनेचे प्रशांत डीक्कर, वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे नितेश कराळे मस्तर, सुनील देवरे, हनुमंत गायकवाड, महाराष्ट्र रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष तोसिफ शेख, सरचिटणीस अजित पाटील आदी उपस्थित होते. 


आमच्या एकूण २२ मागण्या होत्या. आंदोलन करत असताना सरकारवर दबाव महत्वाचा असतो, मात्र पाऊस कोर्टाच्या अडचणी आणि पोलिसांनी केलेल्या जिल्हा नाकेबंदीमुळे आम्ही चर्चेसाठी गेलो होतो. कर्जमाफी करताना चालू वर्षी झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला असताना, त्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसता, त्यामुळे पुन्हा ते शेतकरी वंचित राहिले असते, म्हणून तारीख घेतली. श्री. कडू पुढे म्हणाले, सरकारने आम्हाला गृहीत धरू नये. मागणी मान्य न झाल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू. शेतकऱ्यांनी, दिव्यांग बांधवांनी जिवावर बेतणारी आंदोलने केली आहेत. या वेळीही आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. कार्यकर्ते कमी असले, तरी राज्यभरातील सर्व रेल्वे कशा रोखायच्या याचा अभ्यास केला आहे, असा इशारा कडू यांनी दिला. 

महादेव जानकर म्हणाले, हे सरकार जनतेच्या रेट्यापुढे घाबरते म्हणून आंदोलन करताना कोर्टाच्या नोटिसा देतात. आम्ही फकीर असून कोणालाही भीत नाही. अंगाव आला तर आडवा केल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर ट्रोल केले जात असले तरी त्याकडे लक्ष देऊ नये. त्यामुळे 30 जून पर्यंत कर्जमाफी केली नाही तर पुन्हा आंदोलन पेटेल.चर्चेने प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेतली होती, लोकांनी आम्हाला साथ दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. सरकार उलथवल्याशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका जानकर यांनी केली.

रविकांत तुपकर म्हणाले, आंदोलन सुरू असताना अनेक शेतकरी टीव्हीवर आंदोलन पाहत होते. काहीजण आंदोलनस्थळी आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या एकाचवेळी पूर्ण होणार नसून, टप्प्याटप्प्याने मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत. आज सोयाबीन, कापसाच्या दराचा प्रश्न आहे. त्यासाठी भविष्यात पुन्हा मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. शेतकऱ्यांचासक्रिय सहभाग आंदोलनात असणे अपेक्षित आहे, परंतु तसे झाले नाही. नितेश कराळे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने संत तुकाराम महाराजांची पगडी घालून आमचा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे आभार. शेतकऱ्यांसाठी सरकारची धोरणे बदलावी लागतील. भविष्यात शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव भांडवलदारांचा असल्याचा दावा केला.





कलबुर्गी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न

कलबुर्गी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न कलबुर्गी (१२/११/२०२५) : येथील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची बैठक जिल्हाध्यक्ष श्रीमंत तलवार यांनी आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रासपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर होते. कर्नाटक राज्य व कल्याण कर्नाटक विभागीय रासप पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्हा व तालुका संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी चर्चा करण्यात आली.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने आपले अस्तिवत दाखवले

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने आपले अस्तिवत दाखवले



पटना : बिहार सार्वत्रिक विधानसभा निवडणूकित राष्ट्रीय समाज पक्षाने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत चिन्हावर ३ उमेदवार  तर पुरस्कृत २ असे एकूण ५ उमेदवार निवडणूकित उतरले होते. ठाकूरगंज विधानसभा मतदार क्षेत्रात मोहम्मद मुक्तार यांना २ हजार २४६ मते मिळाली. हरलाखी विधानसभा क्षेत्रात श्री. शिवलाल पासवान यांना १ हजार ४६ मते, सहरसा विधानसभा क्षेत्रात युवा उमेदवार बिट्टू कुमार यांना ८५७ मते, रुपाली विधानसभा मतदार संघात श्री. अवध शर्मा यांना ६०७ मते, पूर्णिया विधानसभा क्षेत्रात अजय स्वर्ण यांना ५०७ मते मिळाली आहेत. रासपचे अधिकृत व पुरस्कृत  उमेदवारांना एकूण ५ हजार २६३ मते मिळाली असून, बिहार सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत बिहार राज्यात आपले अस्तित्व सिद्ध केले.

उपेक्षित महानायक : रासपकडून धरती अब्बा 'बिरसा मुंडा १५० वी जयंती' साजरी

उपेक्षित महानायक : रासपकडून धरती अब्बा 'बिरसा मुंडा १५० वी जयंती' साजरी 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जन जंगलचे रक्षण करून, ब्रिटिशांशी दोन हात करून लढणाऱ्या, क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती उत्सव मध्यप्रदेश राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नुकताच राज्यभर पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव केवळ आदिवासी पाड्यावर साजरा न करता, राष्ट्रीय समाज बांधवांच्या उपस्थितीत महत्वाच्या ठिकाणी कार्यक्रम साजरा करण्यात आला. "उपेक्षित महानायक आणि उपेक्षित समाज" हा विषय घेऊन मासिक विश्वाचा यशवंत नायकने 'इतिहासाच्या उदरात गडप केलेल्या अनेक महानायकांचा शोध घेऊन त्यांना प्रसिद्धी दिली आहे, राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून त्यांना उजेडात आणण्याचे नेहमीच काम केले आहे, येथूनपुढेही ते चालू राहील. कटनी मध्यप्रदेश येथून बिरसा मुंडा जयंती सोहळ्याचा शुभारंभ करण्यासाठी आणि शुभेच्छ्या देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर कर्नाटकहून, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा महाराष्ट्र राज्यातून खास उपस्थित राहिले. मध्यप्रदेश रासप तर्फे प्रदेश अध्यक्ष अशोकसिंह बघेल यांनी त्यांचे स्वागत केले. बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यासाठी सलग २४ तासाहून अधिक काळ सलग प्रवास करून नियोजितस्थळी उपस्थित राहिल्याचे एस. एल. अक्कीसागर यशवंत नायकशी बोलताना सांगत होते. पुढे ते सांगतात, निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात शेतावरच मुक्काम करून दौऱ्याला सुरुवात केली. खूप लोकांशी सुसंवाद झाला. राष्ट्रीय समाजाचा 'राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर' यांची भूमिका सांगितली. लगातार दहा जिल्ह्यात रासपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रम आयोजित केले होते. पहिल्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात बडबरा कटनी येथून झाली. पुढे उमरिया, शहडोल, अनूपपुर, मैहर, सीधी, सिंगरौली, रीवा, सतना, पन्ना, छतरपूर असा समारोप झाला.


बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबर जन्म दिवस आहे. हा दिवस 'जनजाती गौरव दिन' म्हणूनही साजरा केला जातो. बिरसा मुंडा हे भारतीय आदिवासी समाजातून स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजातींच्या हक्क आणि अधिकारांसाठी संघर्ष केला. १९ व्या शतकात आदिवासी बांधवांना एकत्र करून चळवळीचे नेतृत्व केले. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील (तत्कालीन बंगाल प्रेसिडेन्सी) उलिहातू या गावात झाला आणि ९ जून १९०० रोजी त्यांचे निधन झाले. 

 

त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले, असे बोलले जाते. बिरसा यांनी आदिवासींचे जमिनीवरील आणि जंगलांवरील हक्क पुनर्संचयित करण्यासाठी संघर्ष केला, ज्यामुळे त्यांना 'धरती अब्बा' (पृथ्वीचे वडील) असेही म्हटले जाते. ३ फेब्रुवारी १९०० रोजी त्यांना अटक करण्यात आली. रांची येथे तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्यामुळे ते आजही भारतीय आदिवासी समुदायांचे प्रतीक मानले जातात आणि त्यांच्या योगदानामुळे अनेक चळवळींना प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय समाज पक्ष आदिवासी समाज हा राष्ट्रीय समाज असल्याचे मानतो. बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे प्रतीक नसून भारत राष्ट्रात राहणाऱ्या राष्ट्रीय समाजाचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावकुसापासून दूर जंगल, डोंगर, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाजासाठी, अनुसूचित जमातीचे ३४२ वे कलम लिहून न्याय द्यायचा प्रयत्न केला. देशाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आजही अनेक जमातींना स्वातंत्र्याचे अमृत प्राशन करायला मिळाले नाही. आरोग्य, शिक्षण सारख्या प्राथमिक गरजांसाठी संघर्ष सुरू आहे. ३४२ वे कलमामुळे राजकीय, नोकरी शिक्षणात आरक्षण मिळाले, काही जमातींना आजही आरक्षण मिळाले नाही. ठराविक जमातींच्या पदरात लाभ पडत आहे. उपेक्षित जमातीना लाभ मिळू नये, यासाठी लाभार्थी जमाती विरोध करत आहेत. प्रस्थापित पक्षांनी आदिवासी जमातींना आरक्षित जागेवर संधी दिली असली तरी धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मात्र दिले नाहीत, म्हणूनच आदिवासी नेतृत्वाला डावलले जाते. राष्ट्रपतीपदावर काम करणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसदेच्या उद्घाटनांपासून दूर ठेवण्यात आले. महाराष्ट्रात विधानसभा उपसभापतीपदावर काम करणारे नरहरी हिरवळ यांना आदिवासिंच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सभागृहाच्या इमारतीवरून उड्या माराव्या लागतात. तर आरक्षणाच्या सवलतीपासून दूर असणारे धनगर जमातीचे कार्यकर्ते विधानभवनाच्या जाळ्यावरून उड्या मारतात. लोकशाही भारतात मूळनिवासी असणाऱ्या जमातींना समस्याग्रस्त बनवून भांडवलशाही राजवटीचा अप्रत्यक्ष राज्यकारभार सुरू आहे. मणिपूरमध्ये दोन आदिवासी जमातीध्ये हिंसाचार धुमसत असताना भारताच्या गृहमंत्री, प्रधानमंत्र्यांना भेट देऊन सलोखा राखता येत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती, जिल्हा बँक सभागृहाचे नेतृत्व आदिवासी जमातींना दिले आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आदिवासी जमातींना देश (संसद) व राज्यातील (विधानसभा) सर्वोच्च सभागृहाचे नेतृत्व देऊ इच्छित आहे. बिरसा मुंडा यांच्याप्रमाणे नैसर्गिक आणि घटनाद्दत आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी तसेच मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी बंधू भगिनींनी पुढे येऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेतृत्व करावे. राष्ट्रीय समाज पक्ष त्यांचे स्वागत करायला तयार आहे.

- उपसंपादक

शेतकऱ्यांचा कर्जमाफीसह मेंढपाळ, दिव्यांग, मच्छीमार यांच्या हक्कासाठी नागपुरात महाएल्गार

शेतकऱ्यांचा कर्जमाफीसह मेंढपाळ, दिव्यांग, मच्छीमार यांच्या हक्कासाठी नागपुरात महाएल्गार


शेतकरी आंदोलनामुळे 4 महामार्ग बंद; सरकारकडून बॅकफूटवर येत चर्चेचे निमंत्रण 

नागपूर (२९/१०/२०२५) : शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झाला. या मोर्चात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, वामनराव चटप, किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते रविकांत तुपकर, नितेश कराळे मास्तर व अन्य शेतकरी नेते या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चाने नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले. सरकारच्या दुटप्पी भूमिकेमूळे यावेळी शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डोळेझाक करणारे राज्य सरकार प्रथमच बॅकफुटवर आले. शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. 

काल (२८ ऑक्टोबर)च्या रात्री बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर शेकडो आंदोलकांनी जामठा येथील महामार्गावरच मुक्काम केला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागपुरात दाखल झाले आहेत. सध्या कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चासाठी नागपुरात हजारो शेतकरी टॅक्टर, मिळेली ती वाहने घेऊन आले आहेत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, दिव्यांग आणि मच्छीमार यांच्यासह हजारो लोकांनी भाग घेतला. 

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्वरित माफ करावे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा. पिक कर्जा बरोबरच, मध्यम मुदत, पॉली हाउस, शेड नेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा. उसाला सन 2025-26 या वर्षासाठी 9 टक्के रिकव्हरी साठी प्रति टन 4300/- रुपये व वर प्रति एक टक्का रिकव्हरीसाठी 430/- रुपये एफ. आर. पी. द्या. आजवरची थकीत एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांना द्या. कांद्याला किमान प्रति किलो 40/- रुपये भाव द्या. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा. भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन. सी. सी. एफ. चा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळावे यासाठी करा. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या. गायीच्या दुधाला किमान 50/- रुपये बेस रेट व म्हशीच्या दुधाला 65/- रुपये भाव द्या. दुध क्षेत्राला एफ. आर. पी. व रेव्होन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. दुध भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण घ्या. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Tuesday, December 2, 2025

कळंबोलीतील धनगर जमात आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज

कळंबोलीतील धनगर जमात आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज

मल्हारयोद्धा दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात ताकदीने लढण्याचा निर्धार

कळंबोली / नवी मुंबई : केंद्र व राज्य सरकारने तातडीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे यासाठी, आई मायाक्कादेवी मंदिर, कळंबोली येथे काल सायंकाळी (दि.30/11/2025) रोजी धनगर जमात बांधवांची बैठक पार पडली. बैठकीस धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाच्या लढाईत आपल्या जीवाची बाजी लावून जालना येथे मोठे आंदोलन उभे करणारे मल्हारयोद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांची खास उपस्थिती होती.धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे धनगर जमातीच्या युवकांमध्ये कमालीची नाराजी पहायला मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला असून, ऐन थंडीत आंदोलनाचा भडका उडेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 

यावेळी अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास संस्था, कळंबोली तर्फे व जमात बांधवांच्यावतीने दीपक बोऱ्हाडे यांचा विशेष गौरव करीत सरकार करण्यात आला. लवकरच मुंबईत/आझाद मैदानात होणाऱ्या शेड्युल्ड ट्राईबस आरक्षणाच्या आंदोलनास मल्हारयोद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ताकद देण्याचा निर्धार धनगर जमात बांधवांच्यावतीने एकमुखाने करण्यात आला. यावेळी समाजाचे जेष्ठ नेते शिवाजीराव गावडे बुवा (धाराशिव) , बंदीछोडे, महादेव अर्जुन (नवी मुंबई) , सुदाम जरग (आटपाडी), मल्लिकार्जुन पुजारी (बेलापूर), अशोक मोटे (कळंबोली), सतीश धायगुडे (अध्यक्ष अहिल्यादेवी संस्था कळंबोली), सुदर्शन अक्कीसागर (बेळगाव), अण्णासाहेब वावरे (फलटण), आनंदा माने सरकार (कळंबोली), बिरू कोळेकर(सांगली), शरद दडस(सातारा), आशुतोष शेंडगे(माळशिरस), व्याख्याते चंद्रकांत हजारे(लातूर), ऋषीकेश जरग(कळंबोली), गोरक्षनाथ कोकरे (उरण), बाळासाहेब हुलगे (आटपाडी), छोटेलाल खान (उत्तर प्रदेश), चंद्रकांत हिरवे(दहिवडी), बिरू लवटे(लोटेवाडी), आदी जमात बांधव व मान्यवर नेते उपस्थित होते.








Wednesday, November 26, 2025

कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 13 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रुपेश थोरात व सुषमाताई थोरात मैदानात

कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 13 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रुपेश थोरात व सुषमाताई थोरात मैदानात 

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहेत. एकाच कुटुंबात भाऊ, बहीण, पती, पत्नी, आई, वडील असे अनेकजन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत घराणेशाहीच्या उमेदवारीबद्दल चर्चा करण्यात येत होती. मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सर्वच पक्षात घराणेशाही पहायला मिळत आहे. भाजपकडून ६ जोड्यांना तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षानेही कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात व त्यांच्या पत्नी सुषमताई थोरात यांना प्रभाग क्रमांक १३ मधून तिकीट दिले आहे.

आशा प्रतिष्ठान व रासपच्या माध्यमातून थोरात दांपत्याने बदलापूर शहरात केलेल्या सामाजिक राजकीय कामाची दखल मतदार घेतील की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे शिट्टी या चिन्हावर रुपेश थोरात व सुषमाताई थोरात या आपले निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. प्रचारात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये लोकांशी असलेला थेट संपर्क यामुळे श्री व सौ. थोरात यांची उमेदवारी भाजप शिवसेनेपुढे प्रबळ ठरत आहे. शेवटच्या टप्प्यात ते निवडणुकीला कसे सामोरे जातात हे पाहावे लागणार आहे.

Sunday, November 23, 2025

बीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा, कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांशी आघाडी नाही – खासदार वर्षा गायकवाड

बीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा, कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांशी आघाडी नाही – खासदार वर्षा गायकवाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची सिल्व्हर ओकवर चर्चा


महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकरांना भेडसावणाऱ्या महत्वाचे प्रश्न, बीएमसीतील भ्रष्टाचारावर आवाज उठवणार

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर ...

मुंबई महानगरपालिका निवडणूक लोकशाही व संविधान माननाऱ्या पक्षांशी आघाडी करुन लढवण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नैसर्गिक आघाडी असून दोन्ही पक्ष लोकशाही व संविधानवादी आहेत. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चर्चा सुरु असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची आज सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या शिष्टमंडळात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आजच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे, त्यांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव व इतर नेत्यांशी चर्चा झालेली आहे. लवकरच दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन त्यानंतर आघाडीसंदर्भातील निर्णय होईल. 

आघाडीत मनसेच्या सहभागासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वीच निवडणुकीत स्वबळावर जाऊ अशी भूमिका मांडली होती. उद्धव व राज ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचे स्वागतच आहे पण त्याबाबत काँग्रेसशी काहीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसने जेव्हा कोणत्या पक्षाशी आघाडी केली तेव्हा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे केलेली आहे. बीएमसी निवडणूक समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढली पाहिजे असा काँग्रेसचा विचार आहे. मुंबईत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात, मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान आहे. कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकाना जोडण्याचे, प्रेम देण्याचे काम केले आहे असे खासदार गायकवाड म्हणाल्या..

महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या प्रश्नावर झाली पाहिजे. जात, प्रांत, भाषा आणि धर्म यावर न होता मुंबईकरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मुंबईत प्रदुषणाची मोठी समस्या आहे, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण बीएमसी मधील भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत त्यावर आवाज उठवला जाईल असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा

वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा

वसई (२०/११/२०२५) : राज्याच्या राजकारणात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असताना महापालिका निवडणूका तोंडावर येऊन ठेपले आहेत. राज्यात रोज वेगवेगळ्या नवीन राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हितेंद्र ठाकूर- माजी आमदार आण राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांच्या नेतृत्वात पालघर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यात कोणती नवीन राजकीय समीकरणे जुळतात हे पहावे लागेल. 

बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष रामदरश पाल, वासई विरार महापालिका शहर अध्यक्ष नितीन पेंढारी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. वसई - विरार महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Friday, November 21, 2025

मध्यप्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे आयोजन ; कटनी येथून सुरुवात तर छतरपूर येथे समारोप

मध्यप्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे आयोजन ; कटनी येथून सुरुवात तर छतरपूर येथे समारोप

रासप नेते एस. एल. अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे मध्य प्रदेश दौऱ्यावर : प्रदेशाध्यक्ष अशोककुमार सिंह यांची माहिती 

मुंबई (२१/११/२०२५)  : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जन जंगलचे रक्षण करून ब्रिटिशांशी दोन हात करून लढणाऱ्या त्यागनायक क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती सोहळ्याचे आयोजन मध्यप्रदेश राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित केले असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक कुमार सिंह यांनी यशवंत नायकशी भ्रमध्वनीद्वारे बोलताना दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव राष्ट्रीय समाज बांधवांच्या उपस्थित साजरा करण्यात येत आहे. जयंती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे (मामा) खास उपस्थित राहणार आहेत.


राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे मध्यप्रदेश राज्यातील लगातार दहा जिल्ह्यात रासपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रम आयोजित केले आहेत. पहिल्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात बडबरा कटनी येथून होणार आहे. पुढे उमरिया, शहडोल, अनूपपुर, मैहर, सीधी, सिंगरौली, रीवा, सतना, पन्ना, छतरपुर आदी जिल्ह्यात कार्यक्रम पार पडणार आहे.

Mahadev Jankar Official  Siddappa Akkisagar Balkrishna Lengare बिरसा क्रांती दल जय बिरसा

Thursday, November 6, 2025

रासपतर्फे कुकुडवाड गणातून निवडणूक लढवण्यास अरुणा झिमल इच्छुक

रासपतर्फे कुकुडवाड गणातून निवडणूक लढवण्यास अरुणा झिमल इच्छुक


कुकुडवाड दि. २ (प्रतिनिधी) - कुकुडवाड पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. कुकडवाडा गटात अत्यंत चुरशीची निवडणुक होईल, असे बोलले जात आहे. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे कुकुडवाड पंचायत समिती गणातून सौ. अरुणा अरुण झिमल या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सौ. झिमल यांच्या रासपमधून निवडणूक लढवण्याच्या दावेदारीने राजकीय समीकरणे बदलतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंताना संधी देणार, असे राष्ट्रीय समाज पक्षाकडून जाहीर केले आहे. अरुण झिमल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. गणातील अनेक गावागावात महादेव जानकर यांचे निष्ठावंत समर्थक मोठ्या संख्येने आहेत. विस्कळीत कार्यकर्त्यांना एकत्र करून मोर्चेबांधणी केल्यास झिमल यांची उमेदवारी भाजप, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासमोर आव्हान देणारी ठरेल.

पती अरुण झिमल हे सामाजिक, राजकीय कार्यात नेहमीच सक्रिय असतात, त्यांचा मतदारसंघात थेट जनसंपर्क असून, यामुळे आपल्या उमेदवारीस फायदा होईल, असा आशावाद सौ. झिमल यांनी व्यक्त केला आहे. प्रस्थापित पक्षांच्या गोलमाल कारभारास जनता कंटाळली असून, मतदारसंघात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत पाणी, रस्ता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण या सारख्या गंभीर समस्या आहेत. परंपरागत चालत आलेल्या पशुपालकांच्या चराऊ कुरणावर शासनाने डोळा ठेवून वनविभागाकडे वळवल्या आहेत. पशुपालक, मेंढपाळ यांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापूरच्या मार्केटमध्ये कुकुडवाड, वडजल, गटेवाडी, विरळी, गंगोती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला दर मिळाला नाही, याचा रोष शेतकरी वर्गात आहेत. म्हसवड येथे पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत कुकुडवाड पंचायत समिती गणातून आपण उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने माझ्या नावाचा विचार करून संधी दिल्यास ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ.



Sunday, November 2, 2025

जगाबाई पुकळे यांचे दुःखद निधन

जगाबाई पुकळे यांचे दुःखद निधन 

जगाबाई महादेव पुकळे यांचे १ नोव्हेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. मात्र आज पहाटे सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती महादेव भाऊ पुकळे, मुलगा अजय पुकळे, मुली कुसुम कटरे (कटरेवाडी), शोभा खरात (गटेवाडी), आशा हुलवान (कार्वे, कराड), संगीता थोरात (गुळेवाडी), रुपाली गोरड (गटेवाडी), सून, नातू, नाती असा मोठा परिवार आहे. मुलगा अजय हा भारतीय सैन्यात देशसेवा बजावत आहेत. आईची तब्येत ठीक नसल्याने ते गावी आले होते. मेंढपाळ जीवन जगणाऱ्या जगाबाई पुकळे या गावात सामाजिक कार्यात सहभागी असायच्या. लग्न कार्यात मांडवाची गीते गाण्यासाठी त्यांचे नाव लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने पुकळेवाडी ग्रामस्थ शोकमग्न झाले. त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. माती सावडण्याचा विधी सोमवारी सकाळी ७:०० वाजता होणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात प्रदेश अध्यक्षपदी प्रकाश शाह

राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात प्रदेशाध्यक्ष पदावर प्रकाश शाह यांची वर्णी 


मुंबई (१/११/२०२५) : गुजरात राज्यात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळत आहे.  महापालिका, नगरपालिकामध्ये विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी देत मोठा डाव टाकलाय. गुजरात रासप संघटनेबद्दल ऑनलाइन मीटिंग आयोजित करण्यात आली होती. गुजरात राज्याचे राष्ट्रीय प्रभारी श्री. के. प्रसन्नाकुमार यांचे नेतृत्वात ही मीटिंग पार पाडली. या मीटिंगमध्ये रासपाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या मीटिंगमध्ये गुजरात राज्य रासपा अध्यक्षपदी प्रकाश शाह यांची निवड करण्यात आली. या मीटिंगमध्ये गुजरात रासप प्रभारी सुशील शर्मा, किरण सोलंकी व अन्य गुजरात रासपचे पदाधिकारी उपस्थित होते, मात्र निमंत्रित राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गुजरात रासपचे माजी महासचिव एड. संजय वाघमोडे मिटिंगमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकाऱ्यांना भाजप आपल्या गोटात ओढत असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाने गुजरात प्रदेश अध्यक्षपदी प्रकाश शाह यांची नियुक्ती केली आहे. श्री. शाह यांची नियुक्ती केल्याचे गुजरात प्रभारी सुशील शर्मा यांनी जाहीर केले आहे, तसे त्यांनी रासपचे मुखपत्र 'विश्वाचा यशवंत नायक'ला कळले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अहमदाबादचे रहिवाशी प्रकाशभाई शाह नव्या उमेदीने राष्ट्रीय समाज पक्षाचे काम दमदारपणे करतील, असा विश्वास गुजरात रासपचे पदाधिकारी महेंद्र राठोड यांना वाटतो. त्यांच्या निवडीबद्दल रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, संस्थापक सदस्य एस. एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार यांनी अभिनंदन केले आहे.

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; शेतकरी महाएल्गार आंदोलनात महादेव जानकर कडाडले

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; शेतकरी महाएल्गार आंदोलनात महादेव जानकर कडाडले


नागपूर (२९/१०/२५) : शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरुन प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून विविध शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत नागपूरला पोहोचले आहेत. नागपूर येथील मेळाव्यातून नेत्यांची आक्रमक भाषणे सुरू हेत. साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दाची औलाद आहे. जेल कमी पडेल, आम्हा अटक करा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली. तर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र, आम्ही तुला शांत बसू देणार नाही. सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही डाव टाकताय. मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे म्हणत राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आय एम कोर्ट, वुई आर कोर्ट, जनता ही कोर्ट आहे. जोपर्यंत हे नेते सांगत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही. पोलिसांनी आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा, सरकार हरतंय का आम्ही हरतोय हेच आम्हाला बघायचं आहे, असेही महादेव जानकर यांनी नागपुरातील एल्गार मेळाव्यातून बोलताना म्हटले.

माझी मुले तिथे शिकतात. कोकरे महाराज व गुरुकुलला बदनाम करण्याचे षडयंत्र; लवकरच सत्य समोर येईल - मारुती जानकर

माझी मुले तिथे शिकतात. कोकरे महाराज व गुरुकुलला बदनाम करण्याचे षडयंत्र; लवकरच सत्य समोर येईल - मारुती जानकर


लवकरच पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार

मुंबई (१६/१०/२५) : संत ज्ञानेश्वर जीवन मुक्ती धाम सेवा संस्था लोटे परशुराम या गुरुकुल मध्ये भगवान कोकरे महाराज यांच्यावर झालेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत शिवसेना नेते मारुती जानकर यांनी समाज माध्यमात पोस्ट लिहून लवकरच सत्य बाहेर येईल असे म्हटले आहे. योग्य तपास करून महाराजांना निर्दोष करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणाऱ्या गरीब कुटुंबातील गरजू मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले आहे.  महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करायला लावण्यापाठीमागे षडयंत्र करणाऱ्या सर्वांना उघड करावे, असे त्यांनी म्हटले आहे.


समाज माध्यमात सातारचे शिवसेना नेते मारुती जानकर यांनी लिहिली पोस्टमध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे, नमस्कार मी मारुती जानकर ह्यूमन राइट संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाचा एक पदाधिकारी म्हणून जबाबदारीने सांगू इच्छितो लोटे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील संत ज्ञानेश्वर जीवन मुक्ती धाम सेवा संस्था लोटे परशुराम या गुरुकुल मध्ये भगवान कोकरे महाराज यांच्यावर विनयभंगाचे झालेले आरोप या घटनेबाबत माझ्यासमोर आलेली सत्य बाजू मांडत आहे. माझा या गुरुकुलशी असलेल्या संबंध म्हणजे या गुरुकुल मध्ये माझा ही मुलगा शिक्षण घेत आहे. त्याचप्रमाणे माझी बहीण त्या गुरुकुल मध्ये मुलांच्या देखभालीचे काम करीत असून, त्यामुळे घडलेल्या घटने मागचे खरे वास्तव तुमच्यासमोर मांडत असून या गुरुकुल मध्ये फिर्यादी मुलगी व तिची चार भावंडे शिक्षण घेत होती. त्यामध्ये तीन मुली व दोन मुलगे त्या मध्ये एक 22 वर्षाचा मुलगा होता .तो मुलगा गुरुकुल मधील लहान मुलांबरोबर अश्लील कृत्य करून त्यांचे नग्न फोटो काढत असे तसेच त्याला सिगारेट ओढण्याचे देखील व्यसन होते. त्याने गुरुकुल मधील एका मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न देखील केला होता . या सगळ्या त्याच्या कृत्याविषयी गुरुकुल एक प्रमुख व्यक्ती म्हणून भगवान महाराजांनी त्याला अनेक वेळा समज दिली होती.परंतु त्याच्या कृत्यामध्ये काही फरक पडला नव्हता. त्यामुळे दुसरा पर्याय नसल्याने त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गुरुकुल मधील काही कर्मचारी व स्वतः भगवान महाराज पोलीस स्टेशनला गेले होते. परंतु त्यावेळी पोलिसांनी ती तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. ( ही तक्रार न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयात दाखल करण्यात येणार असून त्यामुळे या घटनेचे देखील सत्य न्यायालयासमोर येईल ) यानंतर भगवान महाराज व गुरुकुल मधील जबाबदार व्यक्तींनी त्या मुलाला गुरुकुल मधून काढून टाकले. या प्रकरणानंतर या मुलाला हाताशी धरून संस्थेच्या काही माजी पदाधिकारी यांनी संस्थेमध्ये गोंधळ घातला होता. या माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेमध्ये केलेल्या कृत्याबद्दल लोटे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी संस्थेतील जबाबदार पदाधिकारी गेले असता त्यावेळी देखील पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार तेथील काही राजकीय पुढार्‍यांना समजल्यानंतर अगोदरच भगवान कोकरे महाराज यांच्या विरोधात असलेल्या पुढाऱ्यानी या घटनेचा फायदा घ्यायचा व गुरुकुल ला बदनाम करायचे म्हणून फिर्यादी मुलीला व त्यांच्या कुटुंबीयांना हाताशी धरून कोकरे महाराजांच्या विरोधात खोटी फिर्याद दिली असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. दिलेल्या फिर्यादीचे सत्य हे न्यायालयासमोर येईलच याबद्दल काही शंका नाही. परंतु हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी व माजी पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेल्या कृत्यामुळे गुरुकुल मध्ये इतर निराधार व गरीब कुटुंबातील शिकत असलेल्या मुलांच्यावर मात्र खूप वाईट व गंभीर परिणाम होत आहेत.

पोलीस प्रशासनाने कोणताही दबाव न घेता निष्पक्षपणे तपास केल्यास या प्रकरणातील सत्य सर्वांना समजू शकते. त्या पद्धतीने योग्य तपास करून महाराजांना निर्दोष करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणाऱ्या गरीब कुटुंबातील गरजू मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे असे आवाहन आम्ही पोलिसांना करत आहे. तसेच महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करायला लावण्या पाठीमागे षडयंत्र करणाऱ्या सर्वांना उघड करावे. याबाबत लवकरच पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.

माण तालुका बाजार समितीच्या सत्ता संघर्षात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचा दणका; सभापतिपदी ब्रम्हदेव पुकळे यांची निवड

माण तालुका बाजार समितीच्या सत्ता संघर्षात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचा दणका; सभापतिपदी ब्रम्हदेव पुकळे यांची निवड 










दहिवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडीची बैठक कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती. जयकुमार गोरे यांच्या भाजप व महादेव जानकर यांच्या रासपची माण बाजार समिती निवडणूकित युती झाली होती. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादिला सत्तेपासून दूर ठेवण्यात आ. जयकुमार गोरे यांनी यश मिळवले होते. जयकुमार गोरे व महादेव जानकर यांच्या रासपमध्ये विधानसभा निवडणुकीत अंतर वाढत गेले. बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करून जयकुमार गोरे यांनी रासपच्या आप्पासाहेब पुकळे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपद देऊन आपल्याकडे खेचून घेतले. म्हसवड नगरपालिका व तालुक्यात प्रभाव असलेल्या आप्पासाहेब पुकळे यांनी जयकुमार गोरेंचा दणदणीत विजय विधानसभा निवडणुकीत सुकर करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. बाजार समिती सभापती निवडणुकीत रासपचे तीन सदस्य भाजपच्या गटाकडे गेले तर एक सदस्य राष्ट्रवादीच्या गटाकडे गेला. सभापती पदाची बैठक वादळी ठरल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने निर्णय फेटाळून लावत राष्ट्रवादी पक्षाला झटका दिला. 

अखेर आज नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी बाजार समितीच्या सत्ता संघर्षात दणका देत आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. भाजपच्या गटाकडे 9 तर राष्ट्रवादी गटाकडे 8 सदस्य उपस्थित राहिल्याने भाजपची सरशी झाली. मंत्री गोरेंना किंगमेकर आप्पासाहेब पुकळे यांची साथ लाभली. ब्रम्हदेव पुकळे यांना सभापती पदावर निवड करून तालुक्यावर एका उमद्या नेतृत्वास संधी दिली आहे. श्री. पुकळे यांची निवड होताच मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यासह माण तालुक्यातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. पुकळेवाडी ग्रामस्थ यांनी हलगीच्या निनादात जेसीबीतून फुले उधळत ब्रम्हदेव पुकळे यांची जल्लोषात स्वागत मिरवणूक काढली. एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातील शेतकरी नेतृत्वाला सभापती पदी संधी दिल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी सभापती निवडीचे फटाके वाजवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पायाभरणीचे काम केले. ब्रम्हदेव पुकळे यांच्या निवडीने कुकुडवाड जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद वाढली आहे. 

ब्रह्मदेव पुकळे यांचा राजकीय प्रवास 

ग्रामपंचात सदस्य, सरपंच, उपसरपंच ते सभापती. ब्रम्हदेव पुकळे यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. सर्वसामान्य झटणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

घेरडीत शेतकऱ्याचा आसूड मेळावा

घेरडीत शेतकऱ्याचा आसूड मेळावा 

(२५/१०/२५) : शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळ बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्यांचा असूड मेळावा हजारोंच्या उपस्थित संपन्न झाला.




















राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार

राष्ट्रीय  समाज पक्षाचे नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक उमेदवार  मुंबई : नगरपालिका व नगरपंचायात निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र रा...